गोविंद पोवळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गायलेले ‘रात्र काळी घागर काळी’ हे गाणे गाजलेले आहे. ‘रात्र काळी घागर काळी’ ही सोळाव्या शतकातील ‘विष्णुदास नामा’ नावाच्या संतकवीची रचना. ‘रात्र काळी, घागर काळी, यमुनेचे जळ काळे, बुंथ काळी, बिलवर काळी, गळ्यातील मोत्याची एकावळी काळी, काचोळी काळी’ हे सर्व परिधान केलेली नायिका नखशिखांत काळी आणि तिचा एकलेपणा घालवणारी कृष्णमूर्तीही काळी. काळा रंग हा मानवी दृक्-संवेदना शून्यावर आणतो. जणू काही कृष्णविवर. कृष्णभक्तीचे आकर्षण कृष्णविवरासारखे असते. त्यात शिरले, की बाहेर पडणे अशक्य. त्या गाण्याने मला अक्षरशः वेड लावले. त्याच गाण्यात मला ‘बुंथ’ हा शब्द भेटला. ‘बुंथ’ म्हणजे डोक्यावरून सर्व शरीरभर आच्छादनासाठी घेतलेले वस्त्र, ओढणी, खोळ; तसेच, बुरखा किंवा घुंगट. रूप किंवा वेष या अर्थानेदेखील ‘बुंथ’ हा शब्द वापरला गेलेला आढळतो. ‘बुंथ’ हा शब्द ज्ञानेश्वरीत ‘आच्छादन’ या अर्थाने आलेला आहे. सहाव्या अध्यायातील ‘जैसी आभाळाची बुंथी । करून राहे गभस्ती । मग फिटलिया दीप्ती । धरू नये ।’ (ओवी २५१) आणि त्याच अध्यायातील ‘नातरी कर्दळीचा गाभा । बुंथी सांडोनी उभा । कां अवयवची नभा । निवडला तो ।’ (ओवी २९५) या ओव्यांत ‘बुंथ’ हा शब्द वापरला गेला आहे.
विष्णुदास नाम्याच्या अजरामर काव्यामुळे ‘बुंथ’ शब्द विस्मरणात जाण्यापासून वाचला!
मला काव्यरचनेच्या दुसऱ्या एका वैशिष्टयाकडे लक्ष वेधायचे आहे. ‘ळ’ हे अक्षर मराठी भाषेचे वैशिष्ट्य म्हणून ओळखले जाते. मराठीतील अनेक शब्द संस्कृतोद्भव असले तरी ‘ळ’ हे अक्षर संस्कृतमध्ये नाही; तसेच, हिंदीमध्येही नाही. परंतु ‘ळ’ अक्षराचा वापर मराठी काव्यात फारसा केला गेलेला आढळत नाही. त्या संदर्भातील गदिमांचा किस्सा सर्वांना माहीत असतो तो असा, एकदा पुलं गदिमांना तशी तक्रार करत म्हणाले, की ‘ळ’ हे अक्षर मराठी काव्यात फारसे आढळत नाही. कारण त्याचा वापर काव्यात करणे अवघड आहे. तेव्हा गदिमांनी तेथल्या तेथे ‘ळ’ चा मुक्त वापर केलेले काव्य रचले आणि ते म्हणजे ‘घननिळा लडिवाळा, झुलवू नको हिंदोळा.’
गदिमा खरोखरी भाषाप्रभू होते, पण गंमत म्हणजे विष्णुदास नाम्याच्या त्या रचनेतही ‘ळ’ अक्षराचा तसाच मुक्त वापर केलेला आहे. काळी, जळी गळा मोती, एकावळी, काचोळी, सावळी असे अंगी ‘ळ अक्षर असलेले शब्द त्या रचनेत आहेत.
– उमेश करंबेळकर
(‘राजहंस ग्रंथवेध’मधून)
सुंदर छान आनंद मिळाला
सुंदर छान आनंद मिळाला
Apratim. Amazing Marathi…
Apratim. Amazing Marathi song. Height of spirituality