बाळासाहेब भारदे यांची कुशल राजकारणी, गांधीवादी नेता अशी ओळख आहे. त्यांना इंदिरा गांधी यांनी यशवंतराव चव्हाण यांची साथ सोडून मुख्यमंत्री व्हावे असा निरोप दिला. बाळासाहेबांनी काळाची पावले ओळखून पदत्याग केला, परंतु निष्ठा सोडली नाही…
बाळासाहेब भारदे विरुद्ध एकनाथराव भागवत यांच्यामध्ये पहिली सार्वत्रिक निवडणूक शेवगावमध्ये 1952 मध्ये झाली. भारदे त्या चुरशीच्या निवडणुकीत निवडून आले. मतपेट्या देवदार लाकडाच्या होत्या. त्यावर उमेदवाराच्या चिन्हांचे चित्र असे. बाळासाहेब भारदे यांची खूण बैलजोडी, तर भागवत यांची खूण विळा ओंबी. प्रत्येक उमेदवारासाठी चिन्ह असलेल्या मतपत्रिकेवर फुली मारून ती मतपत्रिका मतपेटीत टाकली जाई. बाळासाहेब निवडून आल्यावर त्यांची मिरवणूक मामलेदार कचेरी ते ब्राह्मणगल्ली या मार्गाने गेली. तेथे दत्त मंदिरात त्यांनी जमा झालेल्या कार्यकर्त्यांसमोर छोटेसे भाषण केले. सर्वांना भेळ मागवण्यात आली. त्या निवडणूक प्रचारासाठी फक्त एक स्टेशन वॅगन होती. लोकसभा आणि विधानसभा यांच्या निवडणुका एकाच वेळी असल्याने काँग्रेसतर्फे लोकसभेसाठी उ.रा. बोगावत नावाचे उमेदवार उभे होते. भारदे ब्राह्मण, तर बोगावत मारवाडी समाजाचे असल्याने विरोधकांना शेटजीभटजींच्या काँग्रेसला मते देऊ नका असा प्रचार करण्याची संधी आयतीच मिळाली! पण त्या प्रचाराचा उपयोग झाला नाही. काँग्रेसचे दोन्ही उमेदवार निवडून आले.
संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा जोर महाराष्ट्रभर 1957 मध्ये होता. नगर जिल्ह्यात तर त्या चळवळीची धग जरा जास्तच होती. बाळासाहेबांनी नगरमधून तिकिट मागितले. त्यावेळी केंद्रीय मंत्री गोविंद वल्लभ पंत महाराष्ट्र व मध्य प्रदेश या दोन राज्यांचे तिकिटवाटप बघत होते. पंतांना अर्धांगवायू झाला होता. ते लोडला टेकून तिकिटे जाहीर करत होते. मध्य प्रांताचे तेथील मुख्यमंत्री रविचरण शुक्ला यांचा नंबर आला तेव्हा पंत म्हणाले, “शुक्लाजी, आप बुढे हो गये हो, रिटायर हो जाव”; शुक्लांना तो मोठा धक्का होता. त्यांचे निधन झाल्याचे वृत्त थोड्या वेळात आले, तर पंतांनी त्यांचा अंत्यविधी जोरदार करण्याची आज्ञा दिली! बाळासाहेबांना नगरमध्ये तिकिट मिळेल का, याची खात्री झाल्या प्रकारामुळे वाटेना. त्यांनी तसे त्यांचे भाऊ नानासाहेब भारदे यांच्याकडे बोलून दाखवले, पण नगरचे नाव आले तेव्हा पंत म्हणाले, “भारदेजी, आप नगरसे लढ सकते हो?” नगरला संयुक्त महाराष्ट्र चळवळीतर्फे कमलाबाई रानडे (प्रसिद्ध डॉ.श्रीराम रानडे यांच्या पत्नी) उभ्या होत्या. महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी त्यांच्या प्रचारासाठी नगरला आली होती. आचार्य अत्रे, एस.एम. जोशी, भाई मिरजकर, ना.ग. गोरे असे एकाहून एक वक्ते भारदे यांच्या पाडावासाठी कंबर कसून तयार होते. शाहीर अमर शेख, शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर जंगम स्वामी यांनी तर काँग्रेसविरुद्ध आकाशपाताळ एक केले होते! जंगम स्वामी शेवगावच्या सभेत गरजले, म्हणाले, “बाळासाहेब भारदे नगरला जर निवडून आले, तर मी मूत्राने मिशा भादरीन.” नगर जिल्ह्यातील नगर सोडून इतर सर्व जागी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे उमेदवार निवडून आले. काँग्रेसचे एकटेच बाळासाहेब भारदे जिल्ह्यात निवडून आले.
शेवगावला एकनाथ भागवत निवडून आले. त्यांच्या विजयाची मोठी सभा झाली. त्या सभेचे प्रमुख वक्ते जंगम स्वामी होते. त्यांचे भाषण ऐन रंगात आले असताना बाळासाहेबांचा खंदा कार्यकर्ता हरिभाऊ टाकसाळ उभा राहून जोरात ओरडला, “ए, भाषण बंद कर, नगरला बाळासाहेब भारदे निवडून आले आहेत. आता, मुताने मिशी भादर.” हरिभाऊंनी ती सभा उधळून लावली. त्यावेळी भाऊसाहेब हिरे काँग्रेस प्रांतिकचे अध्यक्ष, तर बाळासाहेब सचिव होते. बाळासाहेबांनी यशवंतराव चव्हाण यांची बाजू घेतली. यशवंतराव चव्हाण, हिरे यांच्यावर मात करून मुख्यमंत्री झाले, तर बाळासाहेब त्यांच्या मंत्रिमंडळात सहकार मंत्री झाले.
बाळासाहेबांना नगरचे तिकिट पुन्हा 1962 साली मिळाले. त्यांच्या विरुद्ध भाई सथ्था उभे होते. ती निवडणूक मोठी चुरशीची झाली. भारदे पराभूत होतील असा अनेकांचा अंदाज होता, पण बाळासाहेबांनी ती निवडणूकदेखील केवळ अमोघ वक्तृत्व आणि बुद्धिचातुर्य यांच्या जोरावर जिंकली. त्या निवडणुकीत बाळासाहेबांची प्रचार सभा गांधी मैदानात सुरू असताना काही तरुणांचे टोळके कोपऱ्यात हुल्लडबाजी करत होते. त्यांनी बाळासाहेबांचे भाषण सुरू असताना, आम्ही तुमचे मुळीच ऐकणार नाही अशा घोषणा सुरू केल्या. बाळासाहेब शांत होते. ते तरुणांना उद्देशून म्हणाले, ‘ओरडा’. पोरे ओरडू लागली तसे बाळासाहेब म्हणाले, “अजून जोरात ओरडा.” पोरांनी आवाज वाढवला. बाळासाहेब आवाज चढवून म्हणाले, “अजून जोरात” पोरे तारसप्तकात ओरडली. बाळासाहेब शांतपणे म्हणाले, “छान, निदान माझं एवढं तरी ऐकलंत, धन्यवाद.” पोरे गपगार झाली! बाळासाहेबांचे ते भाषण खूपच रंगले. दुसऱ्या सभेत त्यांचे विरोधक नगरचे नेते बापुसाहेब भापकर म्हणाले, “बाळासाहेब, पाच वर्षे कोठे होता, आता यांना कंठ फुटलाय,” हजरजबाबी बाळासाहेबांचे उत्तर तयारच होते. ते म्हणाले, “बरोबर आहे. कोकीळ वसंतात एकदा येऊन कुहू कुहू करून जातो, बाकी इतर वेळी कावळ्यांची काव काव सुरू असतेच…!”
बाळासाहेब 1967 च्या निवडणुकीत पाथर्डी मतदार संघातून उभे होते. निवडणूक अटीतटीची होती. जातीय ध्रुवीकरण झालेले होते. त्यांच्या विरुद्ध आबासाहेब काकडे उभे होते. त्यांना बाबूजी आव्हाड यांनी पाठिंबा दिला होता. अखेर निवडणूक निकालाचा दिवस आला. आमच्या घराच्या ओसरीवर बाळासाहेब, नानासाहेब, बबनराव ढाकणे, बाजीराव पाटील खरवंडीकर अशी मंडळी बसलेली होती. निकालाचे पारडे क्षणाक्षणाला झुकत होते. एका क्षणी, बाळासाहेब उद्वेगाने म्हणाले, “नानासाहेब, आपण पडणार.” त्यावर खरवंडीचे बाजीराव पाटील तिरीमिरीने उठून म्हणाले, “बाळासाहेब, अजून माझ्या खरवंडीची मोजणी बाकी आहे, ती पेटी फुटू द्या…तुम्हाला भगवानबाबांचा आशीर्वाद आहे. तुम्ही दोन हजारांवर मतांनी निवडून नाही आला तर माझे नाव बदलून ठेवा.” थोड्याच वेळात निकाल आला, बाळासाहेब बावीसशे मतांनी निवडून आल्याचा..!
बाळासाहेबांना शेवगावचे तिकिट 1972 मध्ये मिळाले. दिल्लीहून उमाशंकर दीक्षित बाळासाहेबांना भेटण्यासाठी आले होते. त्यांनी इंदिरा गांधी यांचा निरोप आणला होता, ‘यशवंतरावांची साथ सोडून तुम्ही मुख्यमंत्री व्हावे’ असा तो निरोप होता. बाळासाहेबांनी, ‘यशवंतरावांशिवाय महाराष्ट्राला पर्याय नाही’ असे सांगितले. दीक्षित यांनी त्यांना महाराष्ट्रातील संभाव्य उमेदवारांची यादी दाखवली. त्यात सर्व यशवंतरावविरोधी उमेदवार होते. बाळासाहेबांनी काळाची पावले ओळखली आणि पदत्याग करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ‘येथून पुढे मी निवडणूक लढवणार नाही, राजकारण त्याग नव्हे तर पद त्याग करणार आहे’ असे जाहीर केले!
– प्रा रमेश भारदे, meshrag@gmail.com
शेवगाव 9326383535
——————————————————————————————————————————————–