बालमोहन शाळेच्या निमित्ताने – बदल काय होतोय?

7
138
सुहास गो. तपस्वी
सुहास गो. तपस्वी

सुहास गो. तपस्वीमाझ्या ‘बालमोहन’मधील शिक्षणाला १९४९च्या जूनमध्ये पाचव्या इयत्तेत सुरुवात झाली. ते आठवायचं कारण म्हणजे, बापूंचं आत्मचरित्र ‘आठवणीतील पाऊले’ अशातच वाचलं; बापू म्हणजे, बापुसाहेब रेगे, दादा रेगे यांचे मोठे चिरंजीव. ते आत्मचरित्र वाचताना १९५०च्या दशकातल्या शाळेतील आठवणी जागृत झाल्या. साठ-पासष्ठ वर्षांपूर्वीचा, एसएससीपर्यंतचा सात वर्षांचा कालखंड चलतचित्रपटासारखा माझ्या डोळ्यांपुढून गेला.

पी.डी. पाटेकर नावाचे वडलांचे आतेभाऊ होते. ते गिरगावच्या राममोहन शाळेत शिकवायचे; त्यांचा शिक्षणक्षेत्रात दबदबा होता. ते आमच्या घराच्या जवळच, शिवाजीपार्कला राहायचे. मी चवथीपर्यंत म्युनिसिपालिटीच्या शाळेत शिकलो. नंतर शाळा बदलून खाजगी शाळेत जायचं म्हणून वडलांनी मला नवीन शाळेच्या निवडीकरता पंडितकाकांकडे नेलं. दादर म्हणजे त्यावेळी दोनच शाळांची नावं नजरेसमोर येत; स्टेशनजवळची छबिलदास किंवा लांब चालण्याची तयारी असेल तर हिंदू कॉलनीतील ‘किंग जार्ज’. पण पंडितकाकांनी ‘बालमोहन’चं नाव सुचवलं; चर्चेला वावच ठेवला नाही, थोडाफार आग्रह धरला. झालं, ठरलं, ‘बालमोहन’ पक्कं झालं!

त्या काळची पहिली आठवण म्हणजे, चवथीतून पाचवीत आल्यावर खाजगी शाळेतील शिक्षणाला सुरुवात झाल्यावरची. मात्र खाजगी शाळेत आल्यामुळे फार फरक झाल्याचं जाणवलं नाही; तशीच मुलं, तसेच शिक्षक व शाळेचं वातावरणही साधारण तसं. सांगण्याचा उद्देश म्हणजे, मला अपेक्षित दृष्टिकोनातून विशेष बदल जाणवला नाही; ‘बालमोहन’ काही खास निराळी वाटली नाही. बहुतेक, त्यावेळी खाजगी व म्युनिसिपालिटीच्या शाळांत विशेष फरक नसावा; असंही असू शकेल, की मी जात होतो ती मोडक इंजिनीयर्सच्या बंगल्यातील म्युनिसिपालिटीची शाळा तशा इतर शाळांपेक्षा जास्त चांगली होती. मोडक शाळेतल्या पटांगणातील पारावर बसून जसा अधुनमधून मी डबा खायचो, त्याच मोकळ्या वातावरणात पिंपळाच्या पारावर बसून मी ‘बालमोहन’मध्येही डबा खायला लागलो.

पाचवीतील दुसरी आठवण वार्षिक परीक्षेची आहे; मराठीच्या प्रश्नपत्रिकेत ‘तपकिरीने वाचवले’ ह्या चवथीच्या धड्यावरील प्रश्नामुळे. पर्यायी असलेल्या त्या प्रश्नाचं उत्तर तर मी लिहिलं, पण समज असा झाला की खाजगी शाळांमध्ये आधीच्या इयत्तेतील प्रश्नही विचारले जाऊ शकतात! ती खूणगाठ मी मनात बांधली. घरी आल्यावर आईला ती बाब सांगताना मला नंतर कळालं, की तसं काही नसून ‘बालमोहन’मध्ये चवथी-पाचवीचे पेपर्स सारखेच असायचे, कारण त्याच शाळेत शिकणा-या चवथीच्या हुशार मुलांना जर परीक्षेत चांगले गुण मिळाले तर त्यांना ‘डबल प्रमोशन’ मिळून सहावीत प्रवेश दिला जायचा. मी विचारलेला पुढचा प्रश्न होता, तो म्हणजे, त्या शाळेतील जी मुलं माझ्याबरोबर पाचवीत होती, ती हुशार नव्हती का? उत्तर काही मिळालं नाही, पण सहावीत असताना मला स्वत:ला तुलना करता आली. कारण, सहावीत माझी तुकडी बदलली गेली. मी डबल प्रमोशन मिळालेल्या मुलांबरोबर सहावीत प्रवेश केला.

आमच्या वेळी राज्यपातळीवर प्राथमिक व माध्यमिक अशा ‘स्कॉलरशिप’च्या दोन परीक्षा असायच्या; चवथीकरता व सातवीकरता. दोन्ही परीक्षांत स्कॉलरशिप मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या याद्यांमध्ये ‘बालमोहन’चे विद्यार्थी डझनावर असत. त्याला कारणं दोन होती. प्रथम म्हणजे सातवीपर्यंतच्या शिक्षकांत रावले, ठाकूर, वि.रा. व ग.ज. पाटील असे खंदे मास्तर होते; ते सर्वजण दादांचे जुने सहशिक्षक होते. ते असं शिकवायचे, की त्यांनी शिकवलेले अभ्यासक्रम विद्यार्थी कधीच विसरू शकले नाहीत. दुसरं जे कारण होतं ते म्हणजे त्या परीक्षा देण्याकरता निवडलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षेकरता झालेली तयारी दादांच्या देखरेखीखाली व्हायची. परंतु, तेव्हा एसएससी बोर्डाच्या गुणवत्ता यादीत मात्र ‘बालमोहन’च्या विद्यार्थ्यांचं नाव नसायचं.

बालमोहनकोणत्याही शाळेत सर्व विद्यार्थ्यांना समभावाची वागणूक देत असताना त्या-त्या मुख्याध्यापकाला त्याच्या शाळेला संस्था म्हणून प्रसिद्धी लाभावी याचीही काळजी घ्यावी लागते. चवथी व सातवीच्या स्कॉलरशिप्स आणि एसएससी बोर्डाच्या गुणवत्ता याद्यांमध्ये विद्यार्थी चमकले व त्या यशाला माध्यमांनी प्रसिद्धी दिली, की शाळेचं नाव होतं व शासन-प्रशासन आणि परिसरातील पालक मंडळींमध्येही संस्थेचा योग्य तो परिचय साधला जातो. ही जाण मला नंतर उद्योगातील कामाच्या अनुभवातून आली आहे, पण दादा रेगे ती जबाबदारी मानत असावेत. मला त्यावेळी आलेल्या काही अनुभवांचा मी अर्थ लावतो, तेव्हा त्या गोष्टीचं महत्त्व माझ्या ध्यानात येतं.

वर्गात रोज जरी सर्व विद्यार्थ्यांना समभावानं वागवलं, सारखी वागणूक व शिक्षण दिलं तरीही प्रत्येक विद्यार्थ्याचा बुद्ध्यांक वेगवेगळा असतो; ते भान दादांनाही होतं. म्हणून निवडक विद्यार्थ्यांवर शाळा सुरुवातीपासून खास परिश्रम घ्यायची, तसे परिश्रम शिक्षकांकडून घेतले जातील ह्या गोष्टीची दादांनी काळजी घेतली. पुढे, बापुसरांनी दादांची सातवीपर्यंतच्या यशाची मजल बोर्डाच्या एसएससी गुणवत्ता यादीपर्यंत पोचवली, त्या यादीतही ‘बालमोहन’चे विद्यार्थी चमकू लागले.

आम्ही अकरावीत नुकतीच सुरुवात केली होती, काही मुलांच्या ध्यानात आलं, की बोर्डाच्या गुणवत्ता यादीत येणा-या ब-याच विद्यार्थ्यांनी इतिहास ह्या विषयाऐवजी अंकगणित घेतलेलं असतं. झालं, आम्ही चार-पाच जण त्या मुद्यावरील चर्चेसाठी दादांकडे गेलो. दादा म्हणाले, “बाळांनो, तुमचा मुद्दा रास्त आहे, परंतु आपल्या शाळेत अकरावीसाठी अंकगणित शिकवणारा मास्तर उपलब्ध नाही.” त्यावर आमच्यातील एक जण म्हणाला, “ ते अंकगणित कोणीही शिकवायची गरज नाही. रावले सरांनी आम्हाला सातवीपर्यंत अंकगणित शिकवलं आहे, ते पुरेसं आहे. त्या ज्ञानावरही आम्ही अंकगणिताचा एसएससीचा पेपर सोडवू शकू.” दादांनी अंदाज घेतला व ते म्हणाले, “ठीक आहे. ज्यांना हा पर्याय स्वीकारायचा आहे त्यांची यादी करा, ती मुलं इतिहासाच्या तासाला वेगळ्या खोलीत बसून अंकगणिताचा अभ्यास स्वत:चा स्वत: करतील.” काही दिवसांनी, दादांनी आमची गणिताची तयारी व्यवस्थित चालली आहे हे बघण्याकरता लिमयेसरांना आठवड्यातून एकदा वर्गावर पाठवून खात्री करून घेतली. आमच्या त्या गटातल्या प्रत्येकानं अंकगणितात किमान नव्वद टक्के मार्क मिळवले व शाळेच्या इतिहासात त्या वर्षी सदानंद आगाशे बोर्डाच्या गुणवत्ता यादीत चमकला; नंतर ती परंपरा चालू राहिली.

गांधीहत्येनंतर, इतरत्र म्हणे ब्राह्मणांना खूप त्रास झाला. त्याबाबत मला काही विशेष स्मरत नाही. दोन कारणं असू शकतात. एक तर, माझं पोरवय होतं व दुसरं जास्त महत्त्वाचं कारण म्हणजे, त्या वेळेस मुंबईत माझ्या आजुबाजूला विशेष हाहाकार झाला नसेल. माझ्या शाळेत व वर्गातही कोळी, भंडारी, चांभार वगैरे जातींची मुलं होती आणि शाळेत वा शिक्षकांकडून जातीवरून भेदभाव झाल्याचं मला तरी जाणवलं नाही; तशा गोष्टी ऐकल्याचंही स्मरत नाही. दादा रेगे शाळेत प्रवेश देतानाही जातीपातीचा विचार करत नसावेत. त्या पार्श्वभूमीवर माझ्या ब्राम्हण जातीचा उल्लेख एकदा दादांकडून झाला. तो किस्सा असा होता. त्यातील महत्त्वाचं म्हणजे दादांनी केलेलं नंतरचं स्पष्टीकरण!

दादासाहेब रेगेमाझं मराठीचं शुद्धलेखन कच्च होतं. मी मराठीत जेमतेम पास व्हायचो, कारण शुद्धलेखनाच्या प्रत्येक चुकीकरता अर्धा गुण कापला जायचा. एकदा मराठीच्या मास्तरांनी, नारकरसरांनी निबंधाच्या परीक्षेच्या आधीच घोषित केलं, की गुण देताना ते फक्त लिखाणाचा कस लावणार, हस्व-दीर्घाचे मार्क कापणार नाहीत. त्या परीक्षेत मी वर्गात पहिला आलो! दादांच्या ते कानावर गेलं, त्यांनी मला त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावलं; मी गेलो. माझं कौतुक झालं, जाताना दादा मला म्हणाले होते, “ब्राम्हणाचा मुलगा तू, शुध्दलेखनाच्या चूका व्हायला नकोत हं.” ते जातीवाचक उद्गार ऐकून मी बावरलो. “ब्राम्हण-ब्राम्हणेतर असा फरक तुम्ही करता का?” ह्या माझ्या प्रश्नावर दादा उत्तरले, “नाही, मुळीच नाही. आपल्या शाळेत सर्वांना प्रवेश आहे, तू ते अनुभवतच आहेस. कधी कोणा स्टाफच्या वा मास्तरांच्या वागणुकीत तो भेदभाव तू अनुभवलास का?” मी म्हणालो, “नाही, म्हणून तर मी निघत असताना तुम्ही केलेल्या विधानावर तुम्हाला प्रश्न विचारला.” दादा म्हणाले होते, “हुशारी मुळातच असते, ती जातीपातीवर अवलंबून नसते; पण घरातील वातावरणही महत्त्वाचं असतं. तू ब्राम्हण असल्यामुळे तुझ्या घरी शुद्ध मराठी बोललं जात असणार. त्या वातावरणामुळे तुझ्याकडून मराठी शुद्धलेखनाच्या चुका होऊ नयेत, ही माझी अपेक्षा होती.”

तो किस्सा बरंच काही शिकवून जातो. महत्त्वाचं म्हणजे, मी त्या वेळेस तेरा-चौदा वर्षांचा असेन, त्या वयाच्या मुलालाही दादांना प्रश्न विचारण्याची हिंमत व्हायची, अशी प्रतिमा दादांनी निर्माण केली होती. ती त्यांच्या वागणुकीमुळे.

उपरोक्त आठवणीमुळे अशातीलच एक विचार सांगावासा वाटतो; माझ्याच वयाच्या, त्याच्या लहानपणी ‘अस्पृश्य’ मानल्या गेलेल्या समाजातील व्यक्तीच्या आत्मचरित्रपर लिखाणात वाचलेला. ती व्यक्ती विद्यार्थी असताना तिला तिच्या शाळेत जाणवलेला जातीविषयक भेदभाव तिने आत्मचरित्रात नमूद केला होता. त्या पार्श्वभूमीवर बालमोहनमध्ये १९५० च्या दशकातील माझे अनुभव सामाजिक दृष्ट्या खूप सुखद होते. आजच्या मानवी मनाच्या मला आलेल्या समजामुळे एक शक्यता मनात येऊन गेली; शाळेत होणा-या भेदभावापेक्षा त्या व्यक्तीच्या बालवयातील न्यूनगंडामुळे सुध्दा त्या विद्यार्थ्यानं अनुभवांचा तसा अर्थ लावला असेल, किमान तशी शक्यता असण्याचा संभव नाकारता येणार नाही.

‘स्काऊट’चा आमचा कॅम्प एका शनिवारी रात्री शाळेजवळच्या शिवाजी पार्कवर होता, तिथंच तंबूत रात्र काढायची होती. ‘गोंद्या आला रे’ ही स्वातंत्र्यचळवळीतील खूण परवलीचा शब्द म्हणून कोणीतरी सुचवली. आमच्या गप्पा झोपेच्या वेळेनंतरही रात्री चालू होत्या. तेवढ्यात, पी.टी. व स्काऊटचे मुख्य कुलकर्णी सर आले. एकाने, ‘गोंद्या आला रे’ आरोळी ठोकली व तो धूम पळत आपल्या तंबूत जाऊन झोपला. आम्ही सारे कुलकर्णीसरांचं पहिलं नाव ‘गोविंदा’ होतं, ही गोष्ट परवलीचा शब्द ठरवताना विसरलो होतो; ती आठवण लक्षात राहण्याचं कारण म्हणजे दुस-या दिवशी त्या तंबूत राहणा-या आम्हा आठही जणांना शिवाजी पार्कला धावत दोन फे-या माराव्या लागल्या होत्या! प्रशिक्षणामुळे, आम्हा ‘स्काऊट्स’वर दरवर्षी गणपती विसर्जनाच्या वेळी रस्त्यांतील गर्दीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी यायची. त्याचा एक फायदा झाला, रशियाचे अध्यक्ष बुल्गानिन जेव्हा मुंबईत आले तेव्हा त्या जबाबदारीमुळे त्यांना खूप जवळून पाहता आलं.

जोगळेकर मास्तर संगीत शिकवायचे. कोणी वर्गात खोडी काढली वा आवाज केला, की त्या मुलाला शिक्षा व्हायची. शिक्षा म्हणजे मुलानं टेबलावर हात ठेवायचा व सर आमच्यातील कोणाची तरी पट्टी घेऊन ती पट्टी त्या मुलाच्या तळहातावर मारायचे, मुलगा हात मागे घ्यायचा, पट्टी टेबलावर आपटायची, ब-याच वेळा तुटायची. आज लक्षात येतंय, की हात मागे घेण्याची हुषारी आम्हा मुलांची नसायची, ‘विद्यार्थ्यांना मारायचं नाही’ हा शाळेचा नियम होता, मीही दोनचारदा पट्टी चुकवली होती.

इंजिनीयरिंगला जायचं हे माझं शाळेतच ठरलं होतं. राज्यातील चित्रकलेच्या ‘इंटरमिजिएट’ परीक्षेत पास झालं असल्यास इंजिनीयरिंगच्या प्रवेशासाठी काही गुण वाढायचे, हा नियम होता. शाळेत देवसर एलिमेंटरी व इंटरमिजिएट ह्या परीक्षांकरता वेगळे वर्ग घ्यायचे. त्यांच्या शिकवणीमुळे, मी त्या परीक्षा दिल्या. इंटर सायन्सला उनाडक्या केल्यामुळे गरजेचे मार्क मला मिळाले नव्हते, पण चित्रकलेचं शिक्षण आयआयटीच्या प्रवेशपरीक्षेत कामास आलं.

एखाद्या मुलाला वर्गात यायला उशीर झाला की मास्तर थोडा वेळ त्याला वर्गाच्या बाहेर उभा करत. ते दादांना फेरी मारताना दिसलं तर नंतर दादा त्या मुलाला ऑफिसमध्ये बोलावायचे; खूप प्रवचन ऐकायला लागायचं! कदाचित, त्याच धास्तीमुळे आम्हाला वक्ताशीरपणाचं वळण लागलं असावं. ह्या सर्व गोष्टी होताना आम्हाला आश्चर्य वाटायचं, की शाळेतील सर्व मुलांना दादा त्या, त्या मुलाच्या नावानं कसे ओळखायचे, पण तसं होत असे! ती आर्श्चयाची बाब मानली जायची. शाळेत बरेच हिंदू सणवार साजरे व्हायचे. बालदिन तर मोठ्या प्रमाणावर व्हायचा, मिरवणूक निघायची, बैलगाड्या असायच्या, तिळगूळ वाटला जायचा. अशा समारंभांतून मुलांना चांगलं संस्कारित केलं जातं, असा दादांचा दृढ विश्वास होता.

बालमोहन विद्यामंदीरची १९५६ सालची विद्यार्थ्यांची तुकडीशाळेचं प्रार्थनागीत ‘अंतर मम विकसित करी, हे परात्परा’ हे होतं. ते शाळा संपल्यावर अनेक वर्षं विद्यार्थ्यांना पाठ असायचं. मी आयआयटी-खडकपूर-ला असताना टागोरांच्या भाषांतरित कवितांच्या चढाओढीची बातमी बहिणीला पत्रातून कळवली होती. बहिणीचं पत्र उलटटपाली आलं, की ‘अंतर मम’ ही कविता मूळ टागोरांची आहे. काहीही तयारी न करता मी स्पर्धेत भाग घेतला व ‘उत्तेजनार्थ’ पारितोषिक पटकावलं!

माझ्याकडे नुकतीच सायकल आली होती, त्यावरून फिरायला खूप मजा यायची. दिलीप मोडककडे पण सायकल होती. एकदा, आम्ही दोघंही मधल्या सुट्टीत शिवाजी पार्कला चक्कर मारायला गेलो. वेळेचं भान राहिलं नाही व उशीर झाला. नंतरच्या तासाला दांडी मारावी असं ठरवून आम्ही ‘स्कॉटिश ऑर्फनेज’च्या दिशेनं सायकली वळवल्या व ठरल्याप्रमाणे पुढच्या तासाला वेळेत हजर झालो. आम्हाला कल्पना नव्हती, की एका शिक्षिकेनं आम्हाला बसमधून बघितलं होतं व ओळखलं होतं. दुस-या दिवशी प्रार्थनेनंतर दादांनी नावं न घेता आम्हा दोघांचा ‘सायकलस्वार’ असा उल्लेख केला. आम्हाला चोरट्यासारखं झालं व आम्ही नंतर जाऊन गुन्हा कबूल केला. झालं एवढंच, की पुढे काही दिवस आम्हा दोघांना ‘सायकलस्वार’ ही शिवी वाटायची व आम्हाला कोणी ‘सायकलस्वार’ म्हणालं तर आम्ही हमरीतुमरीवर यायचो.

मी पुढील आयुष्यात अक्षरावरून ‘बालमोहनचा विद्यार्थी का?’ अशी चौकशी झाल्याच्या गोष्टी ऐकल्या आहेत. मला स्वत:लाही तो अनुभव एक-दोनदा आलेला आहे, परंतु मला स्वत:ला तो योगायोग वाटतो. चांगल्या अक्षरामुळे आठवीत माझ्यावर दोन जबाबदा-या आल्या, एक म्हणजे अधुनमधून फळ्यावर रंगीत खडूने ‘सुविचार’ लिहिणे व दुसरी हस्तलिखित मासिकाची. हस्तलिखिताच्या जबाबदारीमुळे ठरावीक मुदतीत काम करण्याची व त्यासाठी मान मोडून घेण्याची सवय अंगी बाणली गेली.

शाळेचे वाचनालयआम्हाला आठवीपासून इंग्लिश हा नवीन विषय सुरू झाला. त्या वयात ‘जॅक अॅण्ड जिल’ अयोग्य वाटायचं, असो. सोहनीसर आम्हाला शेवटची दोन वर्षं इंग्रजी शिकवायचे. कोणत्याही भाषेतील शब्दाला सहसा दुस-या भाषेत प्रतिशब्द नसतो हे त्यांचं मत होतं व त्या तत्त्वाधारे कठीण इंग्रजी शब्दांचे अर्थ ते सांगायचे, खूप वेळ लागायचा अर्थ उलगडायला. मात्र, अर्थ व्यवस्थित उलगडल्यामुळे इंग्रजी लिखाणात चपखल शब्द वापरता यायचे. दहावीत का अकरावीत, सोहनीसर आमचे वर्गशिक्षकही होते व त्यांच्या घरी अधुनमधून जाण्याइतकी ओळख वाढली. सर फावल्या वेळात ‘इंग्लिश इनटू मराठी’ अशा शब्दकोशावर काम करत होते. होय, तेच ते शब्दकोशप्रसिद्ध शं.वा.सोहनी. ह्यांच्या घरी गेलं, की मी त्यांना त्यांच्याबरोबर शब्दकोशावरील कामात कारकुनी मदत करत असे. नंतर काही वर्षांनंतर तो शब्दकोश बाजारात आला, जणू काही तो माझाच आहे असा मी त्या पुस्तकाला जपतो व नातवंडांना कठीण शब्दांचे अर्थ सांगताना ब-याचदा वापरतो.

एकदा खूप गंमत आली. पण, त्या अनुभवावरून मी बोध घेतला, की माणसाला मोह चुकलेला नाही व गुन्हा होऊ न देण्यासाठी संयोजकानंच विशेष काळजी घेतली पाहिजे. शाळेजवळच्या रामदास मुद्रणालयात शाळेच्या प्रश्नपत्रिकांची छपाई होत असे. परीक्षेदरम्यान रात्री एक मुलगा वर्गातील हुषार आगाशे ह्या मुलाकडे गेला व त्यानं एका विषयाची काही प्रश्नांची उत्तरं आगाशेकडून घेतली, त्या उत्तरांचा रट्टा मारून त्यानं ती तशीच्या तशी पेपरमध्ये लिहिली. त्याला नेहमीपेक्षा खूप जास्त मार्क मिळाले म्हणून दादांनी त्या मुलाला बोलावलं असावं. परंतु त्या मुलाला असं वाटलं, की आपण ‘पकडले गेलो!’ तो अनवधानानं गेल्या गेल्याच बोलून गेला, की त्यानं आगाशेची कॉपी केली नव्हती. नंतर आगाशेकडे चौकशी झाल्यावर कळालं, की तो मुलगा काही काही प्रश्न घेऊन परीक्षेच्या आदल्या रात्री आगाशेकडे ‘अडचणी’ म्हणून उत्तरं मागायला आला होता. ‘दोन आणि दोन चार होतात’ ह्या अंदाजातून रामदास मुद्रणालयाला छपाई दरम्यान काळजी घेण्यास सांगून प्रकरण मिटवलं गेलं असेल असं आम्हा मुलांना मानावं लागलं, कारण त्या दोघांना काहीच शिक्षा झाली नव्हती.

मी उनाड नव्हतो, पण माझी गणना हुषार मुलांत कधीच झाली नाही. एसएससीसाठी वर्गातील आठ-दहा मुलांना शाळेकडून खास शिकवणी असायची. बोर्डाच्या गुणवत्ता यादीत समावेश व्हावा म्हणून त्यांची विशेष तयारी करवून घेतली जायची. त्या यादीसाठी माझा विचार होण्याची सुतराम शक्यता नव्हती. दरवर्षी परीक्षेसाठी पंधरा-वीस दिवस अभ्यास करण्याचा माझा शिरस्ता, एरव्ही इतर उद्योग खूप असायचे. एसएससीला मात्र प्रिलिमनंतर मी अभ्यासाला भिडलो ते शेवटपर्यंत. गावस्करसर शास्त्र शिकवायचे. मी लिहून काढलेली शास्त्राची सर्व प्रश्नोत्तरं व टिपा त्यांनी तपासून मला मार्गदर्शन केलं. भूगोल ह्या विषयातील ‘प्राकृतिक’ विभाग मला विशेष आवडायचा. त्या दोन्ही विषयांत मला वाटतं, एसएससीला मी शाळेत पहिला आलो व सर्व विषयांतील मार्क धरता, शाळेत चवथा. दादांना पेढे द्यायला गेलो तेव्हा त्यांनी शाबासकी दिली व ते म्हणाले, “तू एवढे मार्क मिळवशील असं वाटलं नव्हतं!”

एक ना दोन, त्या दिवशी मी शाळेतील अनेक आठवणी लिहून काढल्या. का? कशाकरता? ह्या प्रश्नांना मी उत्तरं देऊ शकत नव्हतो. बापू रेगे यांचं ‘आठवणीतील पाऊले’ वाचल्यानंतर लिहाव्याशा वाटल्या, एवढं खरं! पुस्तक वाचताना वागळेबाई आठवल्या, आम्ही शाळेत असतानाच त्या ‘कामत’ झाल्या होत्या. सोहनी, आठल्येसर आठवले-आठल्यांचा हिरवट-राखाडी कोट तर मी विसरू शकत नाही. जोगळेकर, देव मास्तर, कुलकर्णीसर ह्यांच्या आठवणी जागृत झाल्या. लिहित असताना माझी धाकटी नात जवळ आली. “काय करताय?” तिचा नेहमीचा प्रश्न. पुढचा प्रश्न तसाच, “कुठपर्यंत आलंय पुस्तक?” आणि तिसरा, शेवटचा प्रश्न, कोणत्याही प्रश्नांच्या उत्तराची अपेक्षा न ठेवता नेहमीप्रमाणं तिनं लागोलाग विचारला, “आमच्यासारख्या लहान मुलासांठी गोष्टींचं पुस्तक लिहायला कधी सुरुवात करणार?” ती प्रश्न विचारून उत्तरं ऐकायला न थांबता शाळेत निघून गेली.

तीन पिढ्यांचा अनुभव गाठीशी असलेला मी म्हातारा, माझी शाळा, माझ्या मुलांचं शालेय जीवन व आता नातवंडांचं… शाळेतील अनुभवांची तुलना करायला माझी सुरुवात झाली. म्हातारपणी दुसरं काय करणार म्हणा? चांगल्या शाळांतून, शिक्षणातून संस्कार व्हायला पाहिजेत. तीन पिढ्यांत शालेय शिक्षणात काय फरक पडला? “काही नाही” हेच उत्तर परत, परत द्यावं लागतं. म्हणायला बदल खूप झाले, पण फरक कोणता?

आम्ही लॉग टेबल्स वापरायला कॉलेजात सुरुवात केली, माझ्या मुलांनी कॅलक्युलेटर वापरणं माध्यमिक शाळेत सुरू केलं तर नातवंडं प्रायमरी शाळेतच कॉम्प्युटर वापरताहेत! एवढं मोठं स्थित्यंतर होऊनही मी ‘काही नाही’ हे उत्तर कसं देऊ शकतो? ह्या विषयावर माझा माझ्या पत्नीबरोबर वादही झाला. माझ्या शाळेतील आठवणींमध्ये उल्लेख आला होता, की साज-या होणा-या सणांमुळे आम्हा विद्यार्थ्यांवर संस्कार झाले, तीच गोष्ट मला मुलां-नातवंडांच्या बाबतीतही अनुभवास आली. बदल एवढाच झाला, की माझ्या मुलांच्या वेळी परप्रांतांतील व परधर्मांमधील सण-समारंभही साजरे व्हायचे आणि नातवंडं तर ‘फ्रेण्डशिप डे’, ‘पेरेण्ट्स डे’ अशा परदेशी गोष्टींतूनसुद्धा शिकतात. मी ‘स्काऊट’चा ग्रूप लीडर होतो, माझ्यातील नेतृत्वकलेच्या विकासाची ती रुजवात होती, मुलाला ते धडे एका नाटकाच्या दिग्दर्शनातून मिळाले, आणि नातीला? ताप असतानाही ती एका सुटीच्या दिवशी सकाळी शाळेत जायला निघाली, कारण काय होतं? ती शाळेच्या बास्केट बॉलच्या टीमची कप्तान आहे व तिनं सरावासाठी त्या दिवशी टीमला बोलावलं होतं.

‘आठवणीतील पाऊले’मध्ये बापू रेगेनं शिक्षण-प्रशिक्षणातील सुधारणांचे, प्रात्यक्षिकांचे काळाबरोबर बदलणारे अनुभव व्यक्त केले आहेत, पण ती उत्क्रांतीची प्रक्रिया आहे, ती सर्व क्षेत्रांत अनुभवास येते, फरक काय? कन्स्ट्रक्शनचं काम हे माझ्या अनुभवाचं क्षेत्र. श्रॉफ नावाचा सिव्हिल इंजिनीयर माझ्यापेक्षा आठ-दहा वर्षांनी मोठा होता. आम्ही जेव्हा कॉंक्रिटसाठी पंप खरेदी केले तेव्हा त्यानं सांगितलं होतं, की त्यानं कामाला सुरुवात केली तेव्हा मजूर डोक्यावरून घमेल्यात कॉंक्रिट न्यायचे. ‘टॉवर क्रेन’ नावाची वापरलेली क्रेन १९९५च्या सुमारास मी दुबईला जाऊन विकत घेतली. इमारतीच्या कामात तशी क्रेन वापरण्याला, मला वाटतं, मुंबईतील ती सुरुवात असावी; आता, शेकडो क्रेन्स त्या कामासाठी मुंबईत व्यस्त असतात, प्रक्रियेत बदल होतच राहणार!

आमची आजी सांगायची, की समोर काढलेल्या गाईच्या दुधाचा चहा आजोबांना लागायचा. माझ्या लहानपणी, चहासाठी गवळ्याची वाट बघणा-या वडलांना मी पाहिलेलं आहे. बाटल्यांतील ताज्या दुधाचा चहा मला लागायचा, त्या दुधाच्या बाटल्यांसाठी दूध केंद्रावर लवकर उठून कोण जाणार, हे मुलं ठरवायची. माझ्या मुलाला फ्रिजमधून काढलेल्या ताज्या पिशवीतील दुधाचा चहा लागतो. आता मला सांगा, की कालमानानुसार ताज्या दुधाच्या उपलब्धतेत बदल झाला असेल, पण वृत्तीत काही फरक झाला का?

पिढ्यान् पिढ्यांमध्ये बदल होत राहणार! एकोणिसशे सालच्या बापाला मुलं किती आहेत हे माहीत नव्हतं. पुढे, संख्या लक्षात राहायची पण कोण, कोणत्या इयत्तेत शिकतो, ते सांगता यायचं नाही. आजच्या बापांना एकच मूल असल्यामुळं त्याच्या हगल्यापादल्याचीही जाण असते. पिढ्यांच्या नजरेत येणा-या ह्या बदलावरून असं म्हणता येईल का, की आधीचे बाप कुटुंबाची जबाबदारी मानत नव्हते? हा जो बदल आहे तो सुधारणेच्या प्रक्रियेमुळे उत्क्रांतीतून होत असतो, त्याला वृत्तीतील फरक म्हणता येणार नाही.

माझी नातवंडं बापाला ‘अरे, तुरे’ करतात व स्वत:चे, त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय स्वत: घेतात, माझ्या मुलाला त्यांचा पत्ताही नसतो. त्यानं घेतलेले निर्णय मला पटवून देण्याची गरज मुलाला भासते, मी स्वत: निर्णय घेण्यापूर्वी तत्संबंधातील चर्चा माझ्या वडलांबरोबर करायचो आणि माझे वडील तर आजोबांनी घेतलेल्या निर्णयाची फक्त अंमलबजावणी करायचे!

व्यक्तिस्वातंत्र्याच्या वृत्तीतील हे फरक महत्त्वाचे, बाकी सारे फक्त प्रक्रियेतील बदल, असं मला वाटतं!

सुहास गो. तपस्वी
ए – ३/ १९, मिनल गार्डन्स ,
पटवर्धन बाग, एरंडवणे, पुणे – ४११००४
मोबाइल – ९७६६१५२२५३
इमेल – suhas@fandsindia.com

(निवडक छायाचित्रे ‘आम्‍ही बालमोहनकर’ या फेसबुक पेजवरून साभार.)

About Post Author

7 COMMENTS

  1. I am past student of Balmohan
    I am past student of Balmohan Vidyamandir.(Sanjivani Kondhavikar-passed out 1964). I like your article very much.

  2. Simply EXCELLENT. I am proud
    Simply EXCELLENT. I am proud of Balmohan Vidya Mandir. I passed out SC in 1967, but till today, Balmohan is the Best.

  3. Student of 1966 batch. Read
    Student of 1966 batch. Read your article on the changes with the memories of schooldays of BMV.
    Worth reading for all Balmohan students reminding our past in the school.

  4. This article has encouraged
    This article has encouraged me to write my memories of Balmohan days, particularly about equality (?) I experienced during my days. Our 1966 batch is exceptional. Almost all born in 1950 and hence celebrated our combined (all 5 divisions) 50 th birth anniversary in the year 2000 in Lonavala resort and 60 th one in 2010 at Pavankhind Resort, Amba, owned by one of our batch mate.

  5. I am from 1964 batch. we
    I am from 1964 batch. we celeberated 50 yrs. of passing S.S.C.(all Divisions) in Jan. 2014.under able leadership of our friend Alhad (Chandu) Dhaneshwar. However I could not participate therein as I had been to my son in Australia. So some of my friends motivated me to arrange another one & they also cooperated & we had a mini reunion in May last. Though more than 50 yrs. have passed after leaving School, we still have a feeling of ” I owe much to my School, as School has shaped me” & it will remain till end.School has given us a lot beyond normal text books.So when I come across such Articles I read them by getting involved in it & it takes me back to my School Days. Thakx to you for writting & to Jayant for forwording the same. I have also forworded it to Dr. Sadanand Agashe as I knew that he was you friend.

  6. I passed out from BMV in…
    I passed out from BMV in 1966. I read your article and made me nostalgic. Thanks for sharing.

  7. Very nice article & photos.I…
    Very nice article & photos.I am past student of Balmohan Vidyamandir(Vrinda Kharkar 1966) I am proud of our school. We have active whatsapp group of 1966 batch .we always look forward to attend together of our batch.
    Dr. Vrinda Dalvi

Comments are closed.