बालंबिका देवीचे बालमटाकळी

0
1585

बालमटाकळी हे अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्याच्या पूर्व टोकाला वसलेले जुने गाव. त्या गावाला पूर्वी टाकळी किंवा बोधेगाव-टाकळी असे म्हटले जात असे. त्या शेजारीच बोधेगाव आहे. त्या गावाचे हे जोडगाव गणले जाई. गावाचे ग्रामदैवत बालंबिका देवी. तिच्या नावावरून त्या गावाला बालमटाकळी म्हणू लागले. ते नाव मात्र स्थिर झाले. ते गाव बाळुबाई टाकळी या नावानेही काही काळ ओळखले जाई. बाळुबाई म्हणजे बालंबिका देवीच. ते गाव निजामाच्या सरहद्दीजवळ होते; तसेच, दळणवळणाच्या मुख्य रस्त्यावरही होते. त्यामुळे गावाला संरक्षणदृष्ट्या महत्त्व होते. गावची वतनदारी गरुड देशमुख घराण्याकडे होती. सात-आठ पिढ्यांपूर्वीची गोष्ट. तत्कालीन वतनदाराला एक मुलगी होती, तिचे नाव ‘बाली’. तिला सर्वजण लाडाने बाळुबाई म्हणत. बाली धार्मिक प्रवृत्तीची होती. गावात देवीचे मंदिर असावे, असा हट्ट ती तिच्या आईवडिलांकडे करत असे. ती कुमारिका वयाच्या आठव्या वर्षीच मरण पावली. बाळुबाईच्या मृत्यूनंतरही ती जिवंत असल्याचे भास अनेकांना होत असत.

कालांतराने, देशमुखांच्या स्मशानभूमीपैकी काही जमीन एका माळ्याने शेतीसाठी उपयोगात आणली. त्या शेतीमध्ये त्याने विहीर खोदण्यास आरंभ केला. काही फूट खोदकाम झाल्यानंतर त्याला विहिरीमध्ये कठिण पाषाण लागला. तो पाषाण काही फुटेना. तेव्हा माळ्याने सर्व शक्ती एकवटून ‘बोल भवानी की जय’ असे बोलून पाषाणावर पहार चालवली. तेव्हा पहार चार बोटे खोल गेली. तत्क्षणी त्या पाषाणातून कारंज्यासारख्या रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. ते पाहून माळी मूर्च्छित पडला. बाळुबाई त्याच रात्री देशमुख घराण्यातील मुख्य पुरुषाच्या स्वप्नात आली. तिने सांगितले, की “माझी रेणुका माता विहिरीत आहे व तिच्या मस्तकावर पहार लागली आहे. मी जिवंत असताना तुम्ही देवीचे मंदिर बांधले नाही. परंतु आता मंदिर बांधून त्यात देवीची स्थापना करा. तिला बालंबिका असे संबोधा. प्रतिवर्षी नवरात्रोत्सव साजरा करा, तसेच शाकंभरी पौर्णिमेला यात्रा भरवत जा.’’

त्याच दिवशी तसेच स्वप्न त्या माळ्यालादेखील पडले. दोघांनी त्यांना पडलेले स्वप्न एकमेकांना सांगितले. मग कुशल कारागिरांच्या हातून तो देवीचा तांदळा अलगद विहिरीबाहेर काढण्यात आला. त्या जागी मंदिर उभारण्यात येऊन त्यात देवीच्या तांदळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली. देवीचा हा तांदळा अर्धमुर्ती असून चार फूट उंच व तीन फूट रुंद आहे. देवीच्या मंदिराचे मूळ बांधकाम काळ्या पाषाणात केलेले होते. नंतरच्या काळात त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला. दरवर्षी नवरात्रात तेथे मोठा उत्सव साजरा केला जातो. त्या काळात गावात घरोघर उपवास केले जातात. पौष पौर्णिमेला (शाकंभरी पौर्णिमेला) देवीची यात्रा भरत असते.

बालंबिका देवीच्या मूर्तीची स्थापना सुमारे दोनशे वर्षांपूर्वी झाली असावी. देवीची मूर्ती जी विहीर खोदताना सापडली होती, त्या विहिरीमध्ये काही शिलालेख होते. मंदिराचा जीर्णोद्धार करताना ती विहीर बुजवण्यात आली होती, परंतु विहीर बुजवण्यापूर्वी त्या शिलालेखांचे फोटो रमेश शेळके या फोटोग्राफरने काढून पुरातत्त्व खात्याच्या अधिकार्‍यांकडे दिले होते. मात्र त्यांचा पुढे अभ्यास झालेला नाही.

बालमटाकळी गावात आणखी काही प्राचीन मंदिरे आहेत. त्या मंदिरांवर त्यांच्या स्थापनेचे शिलालेखही कोरलेले आहेत. ग्रामपंचायत कार्यालयाशेजारी तर पाच-सहा मंदिरांचे संकुल आहे. त्यांपैकी विठ्ठल-रुख्मिणी मंदिर शके 1674 (इसवी सन 1752), बारवेतील महादेव मंदिर शके 1681 (इसवी सन 1759), दगडी दीपमाळ शके 1688 (इसवी सन 1766) व बारवेवरील हनुमान मंदिर शके 1707 (इसवी सन 1785) या काळात बांधलेले आहे. शिलालेखांवर सकोजी नाइक/सकोबा नाइक असा उल्लेख आढळतो. शिलालेखांपैकी अगोदरचे तीन शिलालेख मोडी लिपीत तर शेवटचा शिलालेख देवनागरी लिपीमध्ये लिहिलेला आहे. गावाच्या वेशीजवळ जुने हनुमान मंदिर आहे; त्याचाही जीर्णोद्धार करण्यात आला आहे. त्या मंदिराचे अगोदरचे बांधकाम शके 1856 (इसवी सन 1934) सालचे होते असे त्यावरील शिलालेखांवरून माहीत होते. एक धर्मशाळा विठ्ठल-रुख्मिणी मंदिराशेजारी 1934 यावर्षी बांधलेली आहे. ती धर्मशाळा स्वातंत्र्यसैनिक अमोलकचंदजी छाजेड यांच्या आत्या श्रीमती जडावबाई श्रीश्रीमाळ (धुळेकर) यांनी बांधली होती. गावामध्ये पुरातन राममंदिरही आहे. त्याचाही जीर्णोद्धार करण्यात आला आहे.

ही मंदिरे 1752 नंतर बांधण्यात आलेली आहेत. साधारणत: 1750 पर्यंत हा प्रदेश, हे गाव मुस्लिम राजवटीखाली होते. तत्कालीन शेवगाव परगणा मराठ्यांना (1751 चा अहदनामा) मिळाला. त्यापैकी तीन-चार गावे वगळता उरलेली सर्व गावे शिंदे व होळकर यांच्यामध्ये वाटण्यात आली. बालमटाकळी गाव शिंदे यांच्या जहागिरीमध्ये आले. त्यानंतरच मंदिरे उभारली गेली.

टाकेश्वर महादेवाचे मंदिर हे या सर्व मंदिरांपेक्षाही पुरातन होय. ते गावात सध्या असलेल्या मशिदीच्या खाली होते. त्या मंदिरात जाण्यासाठीच्या पायर्‍या मशिदीच्या पूर्व भिंतीजवळ थोडे जरी खणले तरी दिसून येतात. मंदिर सध्याच्या मशिदीच्या आकाराच्या तीन-चार पट मोठे एवढे भव्य असावे. हे एवढे भव्य महादेव मंदिर तेराव्या शतकाच्या बर्‍याच अगोदरचे असावे. म्हणजे बालमटाकळी हे गाव त्या काळाच्याही अगोदर वसलेले आहे म्हणून गावकरी अभिमान बाळगतात.

बालमटाकळी हे गाव शेवगाव ते गेवराई-बीड या रस्त्यावर वसलेले आहे. तो रस्ता जुन्या काळापासून दळणवळणासाठी वापरला जात होता. बालमटाकळी हे पेशव्यांच्या/नंतर इंग्रजांच्या हद्दीतील शेवटचे गाव असल्यामुळे पूर्वी गावाच्या पूर्व दिशेला मुख्य रस्त्यावर एक चेकनाका/जकातनाका होता. पलीकडील निजामाच्या हद्दीतून व्यापारासाठी आलेल्या मालावर तेथे कर वसूल केला जात असे.

बालमटाकळीमध्ये एक गढी होती. त्या गढीचे भग्नावशेष शिल्लक आहेत. गढी दीड-दोन एकर परिसरात होती. गढीला सात बुरुज होते. गढीच्या सुरुवातीलाच भव्य पूर्वाभिमुखी दगडी कमान होती. कमान तेथून स्थलांतरित केली. पुन्हा ती कमान बालंबिका देवीच्या मंदिराचा मुख्य दरवाजा म्हणून स्थापित करण्यात आलेली आहे. तेथून साधारण पंचवीस-तीस फूट उंच चढून गेल्यानंतर गढीचा पहिला टप्पा होता. त्याला जुन्या काळी वरवाडा असे नाव होते. वरवाड्याच्या सुरुवातीला गढीचा आणखी एक कमान दरवाजा होता. तेथून पुढे उत्तरेकडील अर्ध्या भागात देशमुख मंडळींची काही घरे होती. गढीची मुख्य तटबंदी दक्षिणेकडील अर्ध्या भागात होती. तटबंदीला पूर्व दिशेला तीन, दक्षिण दिशेला तीन तर वायव्य कोपर्‍यात एक असे सात बुरुज होते. तटबंदीची व बुरुजांची उंची जमिनीपासून सुमारे शंभर फूट होती. मुख्य तटबंदीला असलेला भव्य कमान दरवाजा काळाचे घाव सोसत उभा आहे. गढीवरून खाली उतरण्यासाठी दक्षिण दिशेलाही एक रस्ता व कमान दरवाजा होता. तसेच, मालवाहतुकीसाठी तटबंदीच्या उत्तर भिंतीच्या बाहेरून एक रस्ता पश्चिम दिशेकडून होता. पूर्व दिशेच्या तटबंदीच्या व मुख्य द्वाराच्या साधारण वीसेक फूट बाहेर वीस फूट उंचीची आणखी एक तटबंदी दक्षिणोत्तर बांधलेली होती. त्या तटबंदीलाही मजबूत दरवाजा होता. गढीच्या दक्षिणेकडील तटबंदीपासून एक भुयारी मार्ग दक्षिण दिशेला गेलेला होता. तो भुयारी मार्ग अडीच-तीन किलोमीटर अंतरावरील बाडगव्हाण या गावातील गढीपर्यंत गेलेला होता. या दोन्ही गढ्यांच्या मधील भागात केल्या जाणार्‍या खोदकामाच्या वेळी भुयारी मार्गाचे अवशेष अधुनमधून आढळून येत असतात. गढीचे बांधकाम नेमके कधीचे होते हे निश्चित होत नसले तरी ती गढी संरक्षण दृष्टया इतरत्र आढळणार्‍या गढ्यांपेक्षा मजबूत होती. गढीची मालकी गरुड देशमुख घराण्याकडे होती.

बालमटाकळीची पाटीलकी व परिसरातील काही गावांची देशमुखीची वतनदारी तेथील गरुड देशमुख घराण्याकडे होती. गरुड देशमुख यांच्याकडे नेमक्या किती गावांची देशमुखी होती याचे पुरावे उपलब्ध नाहीत. परंतु शेवगाव परगण्यातील सत्तावीस गावांची देशमुखी गरुड देशमुख यांच्याकडे होती, असे जुन्या पिढीतील लोकांकडून सांगितले जाते. परिसरातील काही गावांमध्ये गरुड देशमुख यांचे वंशज राहतात, त्यावरून या वतनदारीतील गावांचा अंदाज लावता येतो. येथील गरुड देशमुख यांना नाईक अशीही पदवी होती. या घराण्याचे ज्ञात मूळ पुरुष सोमजी गरुड हे शिवकालीन होते. तेथील गरुड देशमुख घराण्याची एक शाखा ग्वाल्हेरच्या शिंदे यांच्या सैन्यासोबत रणांगण गाजवत होती. मुघलांविरूद्ध दिल्लीला झालेल्या 1757 च्या लढाईत सरदार शंकररावबाबा गरुड देशमुख यांच्या नेतृत्वातील सैन्याने मोठे शौर्य गाजवले होते. गरुड देशमुख यांची पथके पानिपतच्या 1761 मध्ये झालेल्या रणसंग्रामामध्ये शौर्याने लढली होती. मराठ्यांनी त्यानंतर दहा वर्षांनी, 1771 मध्ये दिल्ली शहर जिंकले, त्यावेळीही सरदार गरुड देशमुख यांचे पथक आघाडीवर होते. त्या अगोदर मराठ्यांनी राजस्थानातील कोटा राज्यावर विजय मिळवला होता असा उल्लेख 1745 सालच्या कागदपत्रांमध्ये सापडतो. त्यावेळी सरदार गरुड यांची पथके मराठ्यांच्या सैन्यात होती. ग्वाल्हेरमध्ये सैन्याच्या तळामुळे तेथे ‘लष्कर’ हा भाग विकसित झाला. त्यावेळी गरुड देशमुख यांची एक शाखा तेथेच स्थायिक झाली. ती शाखा ‘लष्करवाले’ म्हणून ओळखली जात असे. त्या शाखेतील वंशज रणजितसिंह गरुड देशमुख हे औंध (पुणे) येथे स्थायिक झाले आहेत. रणजितसिंह गरुड देशमुख हे सह्याद्री प्रतिष्ठान, हिंदुस्तान आणि हिंदवी स्वराज्य महासंघ, पुणे या संस्थांच्या कार्यकारी मंडळावर मानद सदस्य आहेत. त्यांच्याकडे असलेल्या पूर्वजांच्या शस्त्रसाठ्यामध्ये 1757 च्या विजयानंतर सरदार शंकरराव बाबा गरुड यांना मिळालेली दिल्लीचा बादशहा आलमगीर दुसरा याची सोन्याची मूठ असलेली तलवार आहे. त्या सोबतच गोवळकोंड्याचा तानाशहा अबुल हसन कुतुबशहा याचीदेखील एक तलवार आहे. त्या दोन्ही तलवारींवर शंकरराव बाबा गरुड असे सुवर्णाक्षरात लिहिलेले आहे. गरुड देशमुख यांचे सैन्य शिंदे यांच्या सैन्यासोबत काही लढायांमध्ये पुढील काळातही सहभागी होते. या ‘लष्करवाले’ गरुड देशमुख यांच्या देवघरामध्ये मागील सात-आठ पिढ्यांपासून बालंबिका देवीची एक पूर्णाकृती लाकडी मूर्ती आहे. त्या मूर्तीची पूजा केल्याशिवाय त्यांच्या घराचा दिनक्रम सुरू होत नाही. त्यांच्या घरी पिढ्यान् पिढ्या सांगितल्या जाणार्‍या बालंबिका देवीच्या कथेनुसार बालंबिका देवीच्या स्थापनेच्या काळाचा अंदाज लावता येऊ शकतो.

बालमटाकळीला नाटकांची मोठी परंपरा होती. संगीत नाटके, पौराणिक नाटके, सामाजिक तसेच राजकीय विषयांवर आधारित नाटके देवीच्या यात्रेनिमित्त बसवली जात. लोकप्रिय झालेल्या नाटकांचे प्रयोग परिसरातील काही गावांमध्येही पुढे होत. जुन्या पिढीतील दांडेकरमामा, भाऊरावबप्पा देशमुख, प्रभाकरदादा डेरे, शंकरलाला परदेशी, बापुराव पवार, बापुराव अदवंत, भीमराव राजपुरे, गोपिचंद राजपुरे, चंद्रकांत बागडे, विठ्ठलशेठ बाफना, रावसाहेब सपकाळ आदी मंडळी ही नाट्यपरंपरेची मानकरी आहेत. त्यानंतरच्या काळात सुनिल बागडे, रविंद्र मानुरकर, जयप्रकाश बागडे, राजु छाजेड, नारायण धनगुडे, दिगंबर भिसे, अविनाश सपकाळ, देविदास शिंदे, बाबू इनामदार यांनी ती परंपरा पुढे मोठ्या जोमाने जपली. जयप्रकाश बागडे यांनी तर जिगरा, बन्नोमाँ या सारख्या चित्रपटांमधूनही अभिनय केला आहे. मनोरंजनाची इतर साधने मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे ही नाट्य परंपरा खंडित झालेली आहे.

          क्रीडा क्षेत्रातही बालमटाकळीचे नाव वर्षानुवर्षे गाजत आहे. बालंबिका देवीच्या यात्रेनिमित्त जंगी कुस्त्या होत. यात्रेचे व कुस्त्यांच्या हंगाम्याचे नियोजन व त्यासाठीचा खर्च यशवंतराव (बापुसाहेब) देशमुख आणि त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र म्हसाजी देशमुख (भाऊसाहेब पाटील) हे करत. या कुस्त्यांच्या हंगाम्यानिमित्त दूरदूरचे पहेलवान एकेक महिना बालमटाकळीत मुक्कामाला असत. त्यांच्या खर्चाची पूर्ण जबाबदारी भाऊसाहेब पाटील उचलत असत. कुस्त्यांच्या या हंगाम्यामध्ये बर्‍याच वेळा महाराष्ट्र केसरी झालेल्या पैलवानांनी हजेरी लावलेली आहे. गावात काही उत्कृष्ट मल्ल निर्माण झाले आहेत. कासममामा शेख, विक्रम बारवकर यांच्या सारख्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक मुले कुस्तीचे धडे गिरवत असतात. व्हॉलिबॉल खेळालाही स्वातंत्र्यपूर्व काळापासूनची परंपरा आहे. डॉ.साठे, दिगंबरराव देशमुख, भगवानराव येंडे, मोहनराव टोके, विठ्ठलराव वैद्य गुरुजी, नामदेवराव घुले, पांडुरंग गरड, गलधरनाना यांच्यासारख्या अनेक खेळाडूंनी गावात त्या खेळाचे संवर्धन केले. देवीच्या यात्रेनिमित्त दरवर्षी भव्य व्हॉलिबॉल स्पर्धा होतात.

बालमटाकळीची प्राथमिक शाळा जिल्ह्यातील सुरुवातीच्या काही शाळांपैकी एक आहे. बालमटाकळीच्या प्राथमिक शाळेची स्थापना 1865 साली झाली होती. 1884 च्या बॉम्बे गॅझेटियर नुसार 1855-56 मध्ये अहमदनगर जिल्ह्यात एकवीस शाळा होत्या. पुढील दशकात (1865-66) शाळांची संख्या चौसष्टपर्यंत गेली होती. भगवान विद्यालयालाही (स्थापना 1966) यशाची उज्ज्वल परंपरा आहे.

बालमटाकळीला मोठी व्यापारपेठ आहे. 1884 च्या बॉम्बे गॅझेटियरनुसार त्यावेळच्या शेवगाव तालुक्यातील काही मोजक्या व्यापारपेठांपैकी बालमटाकळीची होती. गाव सरहद्दीवरील आणि दळणवळणाच्या मुख्य रस्त्यावरील असल्यामुळे जुन्या काळात येथील व्यापारवृद्धीस मदत झाली. त्यामुळे या गावी फक्त शेवगाव तालुक्यातील नव्हे तर शेजारील औरंगाबाद, जालना, बीड या जिल्ह्यांमधूनही लोक खरेदी-विक्रीसाठी येत असत. बालमटाकळी शेतीपूरक उद्योगधंद्यांच्या बाबतीतही पुढारलेली होती. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये तेथे तीन कापूस जीनिंग मिल आणि सात-आठ गुर्‍हाळे होती. तसेच, त्या काळी गावात तीन सॉमिल होत्या.

अहमदनगर इंग्रजांच्या ताब्यात 1803 मध्ये गेले. पेशवाई 1818 साली बुडाली. परंतु शिंदे यांच्या जहागिरीतील गावे त्यानंतरही बराच काळ शिंदे यांच्याकडेच होती. शिंदे व इंग्रज यांच्यामधील एक करारानुसार (12 डिसेंबर 1860) शेवगाव परगण्यातील शिंदे यांच्याकडील सत्याहत्तर गावे इंग्रजांच्या ताब्यात गेली. बालमटाकळी हे गाव शिंदे यांच्या जहागिरीत येत असल्यामुळे साधारण 1860 नंतर तेथे इंग्रजांचा अंमल सुरू झाला.

बालमटाकळी राजकीय दृष्टया सजग असलेले गाव आहे. 1942 सालच्या स्वातंत्र्य आंदोलनामध्ये आणि नंतरच्या शेजारील मराठवाड्याच्या मुक्तिसंग्रामामध्ये या गावातील अनेकांनी भाग घेतला होता. अमोलकचंदजी छाजेड, फुलचंदजी डेरे, भीमरावजी बागडे, बाबुराव देवराय, भिमराव गोंधळी, बाबुराव सोनवणे, तारांचदजी परदेशी ही त्यांपैकी काही नावे. स्वातंत्र्योत्तर काळातही गावाला योग्य दिशा देण्याचे काम येथील म्हसाजीराव देशमुख, आबासाहेबअण्णा देशमुख, रंगनाथ (बबनराव) देशमुख, बोडखेबाबा, अमोलकचंदजी छाजेड, डॉ.साठे, गोपिचंदजी राजपुरे, सर्जेराव देशमुख, दामुअण्णा बागडे, अमृतराव भिसे, दगडूजी वैद्य, फुलचंदजी बाफना आदी राजकीय व सामाजिक नेत्यांनी केले. पुढील काळात शिवनाथअण्णा वैद्य, बाळासाहेबदादा देशमुख, चंद्रकांतकाका बागडे, गलधरनाना आदींनी हा वारसा समर्थपणे चालवला. हल्ली मोहनराव देशमुख, रामनाथजी राजपुरे, तुषारभाऊ वैद्य आदी मंडळी उत्तम रीत्या हा वारसा चालवत आहेत.

बालमटाकळीला असलेल्या समृद्ध धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय व व्यापारी वारशाची परंपरा पुढे चालवत गाव प्रगतिपथावर वाटचाल करत आहे. अभिनाथ शिंदे, व्यंकट देशमुख, कृष्णा मसूरे आणि अनिल गुंजाळ या तरुणांनी सुरू केलेली व्यंकटेश मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटी सध्या दरवर्षी पाचशे कोटींपेक्षाही जास्त रुपयांचा व्यवसाय करत आहे. त्यांनी त्यांच्या बावीस शाखांमधून पंचवीस हजार पेक्षा जास्त लघु व्यावसायसिकांचे सक्षमीकरण केले आहे. त्यात अकरा हजारांपेक्षा जास्त महिला आहेत. त्यांची व्यंकटेश फाउंडेशन संस्था विविध सामाजिक कार्यात आघाडीवर असते. व्यंकटेश फाउंडेशन मार्फत गोशाळा, आदर्श विद्यार्थी बचत बँक, शेतकरी प्रशिक्षण शिबिर व कार्यशाळा, महिला सक्षमीकरण उपक्रमाअंतर्गत प्रशिक्षण शिबिरे आदी अनेक उपक्रम राबवले जात आहेत. तसेच, त्यांच्या उद्योगक्रांती या उपक्रमाद्वारे तरुणांना व्यवसाय मार्गदर्शन व सहाय्य दिले जाते आणि त्यांच्या अर्थबोध या उपक्रमाद्वारे तरुणांना आर्थिक साक्षरतेसंबंधी मार्गदर्शन केले जाते. व्यंकटेश मल्टिस्टेटच्या यशापासून गावातील व परिसरातील अनेक तरुणांनी प्रेरणा घेऊन इतरही काही मल्टिस्टेट पतपेढ्या सुरू केल्या आहेत. मयुर रंगनाथ वैद्य या तरुणाने शिवरंग अ‍ॅग्रोची स्थापना करून गूळ व गूळपावडरचे उत्पादन सुरू केले आहे. त्यामुळे परिसरातील शेतकर्‍यांना फायदा तर झालाच आहे, सोबतच मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती झाली आहे. आनंद शिंदे या तरुणाने पतंजली योगपीठ, हरिद्वार येथे स्वामी रामदेव यांच्या सानिध्यात अनेक वर्षे योगसाधना करून योगविद्येमध्ये विशेष नैपुण्य प्राप्त केले आहे. बालमटाकळीमध्ये बरीचशी साहित्यिक मंडळीही आहेत. देविदास शिंदे, अशोक देशमुख, मोहन शेळके, शिवराज सगळे, विनायक सुरसे, इम्रान शेख, भारत कोठुळे आदी साहित्यिक मंडळी उत्कृष्ट लेखन करून गावाचा नावलौकीक वाढवत आहेत. गावातील अनेक तरुण देशविदेशात विविध क्षेत्रांत कार्यरत राहून गावाचा गौरव वृद्धिंगत करत आहेत.

अशोक दिगंबरराव देशमुख 8806290226 deshmukhashok264@gmail.com

———————————————————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here