बाबासाहेब आंबेडकर : जयंती मुलखावेगळी!

5
45
_Aambedkar_2.jpg

प्रशासकीय सेवेतील हर्षदीप कांबळे नावाचे अधिकारी आणि मालाड येथील दंतवैद्य विजय कदम यांच्या सहकार्यातून ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती’ मालाड येथे स्थापन करण्यात आली आहे. समितीने एकशेसव्वीसावी आंबेडकर जयंती 2017 साली वेगळ्या ढंगाने साजरी केली. त्यांनी भावनेत आणि उत्साहात अडकलेला 14 एप्रिलचा जयंती दिन बाहेर काढला आणि त्या उत्सवाला कालानुरूप समर्पक असा अर्थ दिला.

बाबासाहेब आंबेडकर हयातभर त्यांच्या अनुयायांच्या कानीकपाळी ओरडत राहिले, की इतर समाज तुमच्या चळवळीत सामील होईल असे वागा. तुम्हाला त्यांच्या समस्या कळू द्या. त्यांना त्या समस्या सोडवण्यात सहाय्य करा. म्हणजे त्यांनाही तुम्ही ‘आपले’ वाटाल! निवडणुकांत इतरांच्या सहाय्याशिवाय यशस्वी होता येत नाही.

बाबासाहेब जाऊन साठ वर्षें उलटून गेल्यानंतर हर्षदीप कांबळे व विजय कदम यांना बाबासाहेबांचा तो कानमंत्र उमगला आहे. आंबेडकर यांना त्यांच्या महाड चवदार तळे सत्याग्रहात, नाशिकच्या काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहात दलित समाजाव्यतिरिक्त विविध जातिधर्मांतील लोकांनी साथ दिली होती. हर्षदीप व विजय या व्दयीने समाजभान असणा-या त्या महनीयांच्या वंशजांना एकत्र आणले आणि त्यांचा सत्कार घडवून आणला. त्यांनी त्या कार्यक्रमाद्वारे एकूण समाजाला जाणीव करून दिली, की आंबेडकरी समाज त्यांच्या (तथाकथित सवर्ण समाजाच्या) पूर्वजांचे ऋण विसरलेला नाही! त्या समारंभाचे शीर्षक ‘कृतज्ञता सोहळा’ असेच होते. गतकाल पुन्हा जागवता येत नाही की परत आणता येत नाही. पण त्या महनीयांच्या वंशजांना त्यांच्या पूर्वजांच्या जागी मानून महनीयांनी पेटवलेल्या समतेच्या मशालीचा प्रकाश पुन्हा उजळण्याचे काम कांबळे, कदम व त्यांच्या जयंती उत्सवाने केले आहे.

कांबळे-कदम यांनी समारंभाचे रूप व तेथील व्यवस्था चोख केलेले होते. पांढरे शुभ्र आच्छादन घातलेले कोच आणि तशाच पांढ-या शुभ्र आच्छादनाच्या हजारभर खुर्च्या खुल्या थिएटरमध्ये मांडल्या होत्या. सारा सभामंडप आधुनिक रीत्या सजवण्यात आला होता. लांबलचक विशाल व्यासपीठ कम रंगमंच होता. तो पडद्याझालरींनी आकर्षक केला होता. त्यात सौंदर्याची जाणीव होती. व्यासपीठाच्या मध्यावर पार्श्वभागी पडदा होता. त्यावर व्हिडिओ दृश्ये दाखवण्याची सोय होती. अभ्यागतांच्या स्वागताला नखशिखांत पाश्चात्य पेहराव केलेली तरूण मंडळी विनम्रपणे उभी होती, पण त्यात भारतीय परंपरेचे अगत्य होते. स्टेजवर पार्श्वगायक-गायिकांचे सुरेल व लयबद्ध गायन चालू होते. बुद्धकालीन कथाभागावर सामुहिक रीत्या तरूण-तरूणी अशा लीलया नृत्य सादर करत होत्या की क्षणभर वाटावे जणू त्या स्वर्गातील अप्सरा स्टेजवर अवतरल्या आहेत; विशेष म्हणजे त्यांचे नृत्यगान पुराणकालीन संदर्भ घेऊन त्या परंपरेचे आधुनिक अर्थ मांडणारे होते. त्यामधून त्या तरुणांना बुद्धाची व बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण कळली आहे आणि ते ती आजच्या संदर्भात नृत्य-गाण्यांमधून मांडत आहेत असे जाणवत होते. मला तो प्रकार आंबेडकरी सभांच्या आधी वामनराव कर्डक यांचे जलसे वातावरण निर्माण करत, तसाच वाटला, परंतु त्यामध्ये बदलत्या काळाची केवढी जाणीव होती!

बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यात सहभागी झालेल्या इतरेजनांच्या वारसांना कोठून कोठून धुंडून काढून तेथे मुद्दाम पाचारण करण्यात आले होते. ती किमया विजय कदम यांची. आंबेडकर त्या मंडळींच्या पूर्वजांना मान देत हे वाचले होते. कदम यांनी त्यांचे वारस साक्षात उभे करून त्या समभावाच्या, संमिश्रतेच्या रम्य स्मृतींना उजाळा दिला. आंबेडकर यांचे हायस्कूलमधील गुरू ना.म. जोशी यांच्या स्नुषा सौ. जयमाला जोशी आल्या होत्या. राव बहाद्दूर बोले यांचे नातू अॅडव्होकेट सूरज बोले, चिमणलाल सेटलवाड यांच्या माहितीचा अधिकार गाजवणार्‍या नात तिस्ता, केळुस्कर गुरूजी यांचे नातू अॅडव्होकेट हेमंत, देवराव नाईक यांच्या कन्या व जावई – मंदा व मनोहर नाईक – अशी बावीस मंडळी व्यासपीठावर उपस्थित होती. जे बाबासाहेबांचे खरेखुरे सहकारी म्हटले जातील त्यांतील सुरबानाना टिपणीस यांचे नातू सतीश व कमलाकांत चित्रे यांच्या कन्या शकुंतला गुप्ते, सीताराम जोशी यांची कन्या व जावई सुरेखा व सुरेश जोशी, म.भ. चिटणीस यांचे जावई सुहास प्रधान, फतेलाल देशमुख यांचे नातू मोहम्मद अली, श्रीधरपंत टिळक यांचे नातू रोहित, दादू शेट भिल्लारे यांचे नातू संतोष आदी अन्य मंडळींनी हजेरी लावली होती. बाबासाहेबांचे ग्रंथपाल मित्र शां. शं. रेगे यांचे नातू अॅडव्होकेट उमेश रेगे, नारायण नागो पाटील यांचे नातू गौतम प्रमोद, अनंत काणेकर यांच्या स्नुषा अनुराधा व नातू अमिताभ, महाडचे अॅडव्होकेट चंद्रकांत अधिकारी यांचे चिरंजीव श्रीप्रकाश, व्हायोलियन वादक बाळ साठे यांचे पुतणे सुरज साठे यांची हजेरी विशेष वाटली.

आंबेडकर यांचे ज्ञानदाते बडोदा नरेश गायकवाड यांचे नातू सत्यजित व हैदराबादचे निझाम यांचे नातू प्रिन्स मोहसीन खान या दोघांनी संदेश पाठवून त्यांची हजेरी नोंदवली होती. उपस्थित प्रत्येकजण त्याच्या पूर्वजांच्या कार्याच्या आठवणीने मोहरून गेला होता. त्यांनी त्या हृद्य शब्दांत कथनदेखील केल्या. मंदा नाईक यांनी बाबासाहेबांनी त्यांना खेळवले असल्याची रम्य आठवण सांगितली. त्या त्यांच्या पाठीवरून हात फिरवणा-या बाबासाहेबांबद्दल सहजपणे बोलून गेल्या, ‘तेव्हा कुठे माहीत होते, की आपल्या पाठीवरून फिरणा-या हाताचा स्पर्श देवत्वाचा होता ते!’ तिस्ता सेटलवाड म्हणाल्या, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते, म्हणून भारतीय संविधानात स्वातंत्र्य, समता व बंधुत्व या त्रिसूत्रीचा समावेश झाला.’ नारायण नागो पाटील यांचे वंशज गौतम प्रमोद म्हणाले, “महात्मा गांधी यांनी बाबासाहेब यांच्या आधी 1917 मध्ये बिहार चंपारण्यात लढा उभारल्याचे म्हटले जाते, पण तो लढा शेतक-यांसाठी नव्हता. इंग्रज उद्योगपती तेथील शेतकऱ्यांना शेती करण्यास भाग पाडत. म्हणून अप्रत्यक्ष रीत्या तो लढा ब्रिटिशसत्तेविरूद्ध होता. मात्र बाबासाहेबांनी त्यांच्या जन्मदिनी 14 एप्रिल 1929 रोजी चिपळूण येथे शेतकरी परिषद घेतली होती. त्यासोबत खोती पद्धतीला मूठमाती देण्याची घोषणा केली. तीच भारतातील पहिलीवहिली शेतकरी परिषद होय आणि तो शेतकर्‍यांसाठी उभारलेला भारतातील पहिला लढा म्हणावा लागेल.”

हर्षदीप कांबळे त्या सोहळ्याचे यजमान होते. ते म्हणाले, की  बाबासाहेब उच्च शिक्षणासाठी अमेरिका व इंग्लंड या देशांत दोन वेळा गेले, पण मातृभूमीच्या ओढीने आणि त्यांच्या समाजाला उन्नतिपथावर आणून सोडण्यासाठी भारतभूमीत परत आले. त्यांनी पावलापावलावर येथे अपमान, अवमान सहन केला त्याला व इतर सर्व अरिष्टांना, संकटांना तोंड देत त्यांनी त्यांच्या समाजातील प्रत्येकाच्या मनात स्वाभिमानाचा अग्नी चेतवण्याचा प्रयत्न केला, समाज समर्थ केला आणि तरीही त्यांनी समाजात दुही कल्पिली नाही, तर एकसंध भारतीय समाजाचे चित्र पाहिले. आम्ही बाबासाहेबांचा समतेचा तोच लढा पुढे नेण्यासाठी येथे उभे आहोत. आम्हाला सर्व समाजाचे सहकार्य हवे आहे.

_Aambedkar_1.jpgविजय कदम यांचे सूत्रसंचालन मार्मिक होते. बाबासाहेबांच्या सहकाऱ्यांचा व त्यांच्या वंशजांचा परिचय करून देताना पडद्यावर त्यांच्या पूर्वजांचे फोटो झळकावण्याची संकल्पना तर दाद घेऊन जाणारी होती. डोळ्यांचे पारणे फेडणारा व बौद्धिक मेजवानी देणारा तो कृतज्ञता सोहळा होता.

विजय कदम यांनी अशी सत्तावीस माणसे आणली होती, तरी काही गोष्टी राहून गेल्याच. त्यांचा उल्लेख येथे अगत्याचा वाटतो. आंबेडकर यांना आरंभीच्या काळात वृत्तपत्र चालवण्यासाठी आर्थिक मदत करणा-या व  छापखान्याचे काम करणा-या, 1921 पासून त्यांच्यासोबत असणा-या तेलगू समाजातील शंकर सायन्ना परशा यांच्या वंशजांचा शोध घेऊन त्यांना बोलावायला हवे. बाबासाहेबांच्या चळवळीत तन-मनाने साथ देणा-या, आजन्म अविवाहित राहिलेल्या भंडारी समाजातील भा.र. कद्रेकर यांच्या नातेवाईकांना विसरून कसे चालेल? बाबासाहेब आंबेडकर यांना घटना समितीवर निवडून जाता आले ते जोगेंद्रनाथ मंडल यांच्या प्रयत्नांमुळे. तसेच, डॉ. सोलंकी हे जरी ख्रिश्चन व पूर्वाश्रमीच्या चर्मकार समाजाचे असले तरी चर्मकार समाजातील इतर नेते दत्तोबा पोवार, सीताराम शिवतरकर, पां.ना. राजभोज, गंगाधरराव पोळ, ऐदाळे, देवरूखकर यांनी धर्मांतराच्या घोषणेपासून साथ सोडली तरी त्यांच्या वंशजांनाही बोलावायला हवे. या प्रत्येकाला; तसेच, शाहू महाराजांच्या वंशजांना विसरणे हीदेखील कृतघ्नता ठरेल. सावळाराम यंदे यांच्या वंशजांनाही पाचारण करावे. समाज समता संघातील उरलेली मंडळी म्हणजे वकीलीपेशा करणारे गडकरी व कवळी, बॅ. समर्थ भास्करराव जाधव आणि आचार्य अत्रे यांचे वंशज हवेतच हवे. त्याशिवाय श्यामराव परूळेकर, व्ही.जी. राव आणि गद्रे यांचे वंशजही हवेतच.

तरीही कांबळे व कदम यांना त्यांच्या अभिनव उपक्रमाबद्दल सलाम! त्यांनी त्याच समारंभात आणखी एक वेगळी गोष्ट साधली आणि उपस्थितांची मने जिंकली. भारताचे संविधान ही बाबसाहेबांची कामगिरी मानली जाते. त्यामुळे बाबासाहेब व संविधान या दोन संज्ञा लोकमानसात एकत्र बसल्या आहेत. तेरा वर्षांची मनश्री आंबेडकर हिचा सत्कार कार्यक्रमात करण्यात आला, तो तिला पूर्ण संविधान मुखोद्गत आहे म्हणून. तिने संविधानाची काही कलमे पस्तीस मिनिटांत घडाघडा म्हणून दाखवली.

– सुहास सोनावणे

Last Updated On 14 April 2019

About Post Author

Previous articleसर जमशेटजी टाटा (Sir Jamshedji Tata)
Next articleउत्तराच्या शोधात प्रश्नचिन्ह शाळा!
सुहास सोनावणे हे मुंबईचे रहिवाशी. ते गेल्या तीस वर्षांपासून वृत्तपत्रे, मासिके यांमधून लेखन करतात. ते जुन्या मुंबईचे अभ्यासक आहे. त्‍या विषयावर त्‍यांनी विविध नियतकालिकांमधून लेखन केले आहे. सुहास सोनावणे यांचे 'मुंबई-कालची' हे पुस्तक प्रसिद्ध आहे, तर 'पुसलेली मुंबई' हे पुस्तक लवकरच प्रसिद्ध होणार आहे. त्यांनी 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्‍यांच्या चळवळी' या विषयाचा अभ्यास केला आहे. त्‍यांनी आंबेडकरांसंदर्भात 'सत्याग्रही आंबेडकर', 'शब्द फुलांची संजीवनी', 'ग्रंथकार भीमराव', 'बहु आयामी आंबेडकर', आणि 'डॉ. आंबेडकर आणि समकालीन' ही पाच पुस्तके लिहिली आहेत. लेखकाचा दूरध्वनी 9920801602

5 COMMENTS

  1. Excellent article.. congrats…
    Excellent article.. congrats to Think Maharashtra team and Kamble..Kadam

  2. महाडच्या चवदार सत्याग्रहात G…
    महाडच्या चवदार सत्याग्रहात G.N.उर्फ बापूसाहेब सहस्रबुद्धे ह्यांनी महत्वाची भूमिका बजावली. ते बाबासाहेबांचे जवळचे मित्र होते. मला वाटत नाहीं की बापूसाहेबांच्या कोणा नातेवाईक/वारसाशी संपर्क साधला गेला कारण मी त्यांचा नातू आहे.
    – राजीव मुळ्ये

Comments are closed.