बाबासाहेबांनी गुलामाला गुलामगिरीतून मुक्तता मिळावी यासाठी क्रांती रक्ताचा एकही थेंब न सांडवता घडवून आणली. ती क्रांती म्हणजे धम्म क्रांती होय. बाबासाहेबांनी धम्मक्रांती घडवून आणण्यासाठी भारताचे मध्यवर्ती स्थान म्हणजेच नागपूर हे ठिकाण निवडले. बाबासाहेब 11 ऑक्टोबरला दिल्लीवरून नागपूरला आले. बाबांची तब्येत अस्वस्थ होती. ते कमालीचे थकलेले होते. त्यांना आधाराशिवाय चालता येत नव्हते. म्हणून त्यांनी काठीची मागणी आधारासाठी केली. कार्यकर्त्यांनी पंधरा-वीस काठ्या बाबांसमोर आणून ठेवल्या. त्यातून बाबांनी एक काठी निवडली. काठीला मध्ये आठ गाठी होत्या. काठी हातात घेऊन बाबा म्हणाले, “ही काठी काही साधी नाही. या काठीवर ज्या आठ गाठी आहेत, त्या तथागताच्या आर्य अष्टांगिक मार्गाच्या प्रतीक आहेत. आर्य अष्टांगिक मार्ग म्हणजेच सदाचाराने जीवन जगण्याचा मूलमंत्र. ती काठी माझ्या पुढील आयुष्याला बुद्धाच्या मार्गाने चालण्यास मला आधार देईल. ही माझी धम्म काठी मला रोज तथागतांच्या आर्य अष्टांगिक मार्गानुसार आचरण करण्यास संकल्पित करते.”
– माधुरी उके
(‘रमाई’- सप्टेंबर २०१८ वरून उद्धृत)