जत्रा म्हटले, की अस्सल वऱ्हाडी माणसांची मने मोहरून जातात. झंकारून उठतात. खेड्यांतून शहरांत येऊन स्थायिक झालेली माणसे नकळतपणे आठवणींच्या हिंदोळ्यांवर झुलू लागतात. काही क्षणांतच, लहान असताना व तरुणपणी अनुभवलेल्या जत्रांची चित्रे चलचित्रपटाप्रमाणे डोळ्यांसमोर सरकू लागतात. पूर्वी शेतात पीक निघाले, की शेतकऱ्याचा वर्षभराचा शिणवटा घालवण्यासाठी जत्रा हा प्रकार लहानथोर सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र राहत असे. देवदेवतांच्या नावाने केलेले नवस फेडणे, स्वत:च्या गावात न मिळणाऱ्या वस्तूंचा बाजारहाट उरकणे आणि जलसे-तमाशे व कुस्त्यांच्या दंगली यांत मन रमवणे हा जत्रेला जाण्यामागील मुख्य उद्देश असे.
नव्या काळात बाजारहाट गावागावात भरतात. टीव्हीमुळे करमणूक घरात मिळते. नवस फेडण्यास कोणी जत्रेची वाट बघत नाही. जागृत मंदिरे तर असंख्य व ठिकठिकाणी झाली आहेत. बुवामहाराजांची पैदासही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे जत्रांचे पूर्वीचे ग्लॅमर उरलेले नाही. मात्र तरीही, जत्रा हा जुन्या जमान्यातील प्रकार टिकून राहवा असे सर्वांनाच मनापासून वाटते. जत्रेच्या आठवणी किती किती आहेत. चाळिशी-पन्नाशीत असलेली पिढी तेव्हा उत्तररात्री वा भल्या पहाटे बैलगाडीने जत्रेला निघायची. जत्रेला जाण्यासाठी साऱ्या घरादाराची एकच धांदल उडायची. घरची खिल्लार जोडी बैलगाडीला जुंपली जाई. गाडीत बायकामाणसे आणि पोरेसोरे बसायची. पुरुष माणसे पायी वा घोड्यावर बसून निघायची. रस्त्यात बायकामाणसांचा गप्पांचा बाजार सतत चालू असायचा.
जत्रेच्या ठिकाणी पोचले, की सर्वांमध्ये वेगळेच चैतन्य निर्माण होई. बायांना नवस फेडण्याचे वेध लागत, तर पुरुष मंडळी राहुटी कोठे लावावी याचा शोध घेत. बालगोपाळांना देवळासमोरची नाना प्रकारची दुकाने खुणवत.
ऋणमोचन आणि बहिरम या जत्रा वऱ्हाडीतील प्रसिद्ध म्हणाव्या अशा आहेत. लेखक मधुकर केचे यांनी बहिरमच्या यात्रेचे वेधक असे चित्रण त्यांच्या लेखनातून केले आहे. त्यांनी या जत्रेचे वर्णन सातपुड्याच्या पायथ्याशी महिनाभर मुक्कामाला येणारे एक झगमग स्वप्न असे केले आहे. दिवाळी संपते. हेमंत ऋतू नवे सोने घेऊन येतो. मग पौष महिन्याच्या काळात बहिरमची जत्रा सुरू होते. गहू ओंब्यावर येतो. आम्र वृक्षाच्या झुंडीच्या झुंडी त्याच्या मोहोराची वार्ता आभाळभर करतात. कास्तकारीतून मोकळे झालेले हात आणि भरलेला खिसा घेऊन वऱ्हाडी कास्तकार महिन्याच्या बोलीने त्या स्वप्नात शिरत. विदर्भाची काळी कसदार सोने-चांदी ओकणारी जमीन. तिची वर्धा-पूर्णेच्या कुशीत बागडणारी लेकरे. ती लेकरे आषाढीला ‘हरिमुख म्हणा… हरिमुख म्हणा…’ करत पंढरपूरला जात. ‘महादेवा जातो गा’ म्हणत चौऱ्यागडला वा सालबर्डीला जात, पण सातपुड्याखालचा अमरावती जिल्हा नेमका ऋणमोचन किंवा बहिरमलाच राखून ठेवलेला असायचा. इकडचे तेव्हाचे जमीनदार संस्थानिकांशी बरोबरी करणारे होते. यात्रा महिन्यावर आली, की बंड्या भरभरून त्यांचे सामान बहिरमला जाई. तेथे मग पूर्ण महिनाभर तंबूडेरा. त्या तालेवारांची गोष्टच न्यारी. त्यांचे वैभव दाखवण्यासाठी स्पर्धा लागलेली असे. ते सारे पाटील, देशमुख राहुट्या, तंबू, डेरे यांचे मोहल्ले सातपुड्याच्या पहाडात उभे करत. वाड्यात द्याव्या तशा मेजवान्या परस्परांना त्यांच्या त्यांच्या तंबूत देत. नुकत्याच विकलेल्या कापसाच्या रकमा ‘सदा रंग लाल, तुझ्या भांगात गुलाल’ म्हणत पेटी-तबल्यावर ठुमकणाऱ्या कोण्या चटक चांदणीवर उधळल्या जात. वरखेडकरांपेक्षा तळवेलकरांनी दौलतजादा जास्त दिला, ही स्तुतिवार्त: मग एवरेस्ट विजयाच्या गुमानाने दिवसभर फिरत राही. केचेसरांनी बहिरमच्या अशा खूप साऱ्या आठवणी लिहिलेल्या आहेत. बहिरमची रम्य अशी ही जत्रा काळानुरूप बरीच बदलली आहे. आधुनिकतेमुळे माणसांची जीवनशैली व प्राथमिकता बदलली आहे. त्याचा परिणाम इतर गोष्टींप्रमाणे जत्रेवरही होणे स्वाभाविक आहे.
अलिकडच्या काही वर्षांत बहिरमचा तमाशा बंद केल्याने त्या जत्रेची गंमत गेली असे सांगितले जाते. मात्र त्याला अर्थ नाही. तमाशाच्या नावाने जे गळे काढतात त्यांचे इंटरेस्ट्स वेगळे आहेत. जत्रेमध्ये जे काही तमाशे असतात तेथे नेमके काय चालते हे एकदा प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिले तर तमाश्यांचे समर्थन कोणी करणार नाही. बहिरममध्ये तमाशा नाही म्हणून त्या जत्रेची मजा गेली असे मानण्याचे काही कारण नाही. पूर्वी इंग्रजांच्या काळात तहसीलदार पर्यायाने तहसील कार्यालय बहिरमला येत असे. कोर्टही तेथेच भरायचे. लोक जत्रेच्या निमित्ताने येऊन त्यांची शासकीय कामेही करून घेत. आमदार बच्च कडू दरवर्षी तेथे शासकीय यात्रा भरवतात. तो प्रयोग नित्यनेमाने झाला पाहिजे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सुरेखा ठाकरे यांनीही बहिरमच्या यात्रेचे महत्त्व व वेगळेपण लक्षात घेऊन बहिरम महोत्सवाच्या रूपाने वेगवेगळे उपक्रम, स्पर्धा, महोत्सव यांचेही आयोजन करून जत्रेत नवी जान आणली आहे.
– अविनाश दुधे 8888744716 avinashdudhe777@gmail.com
————————————————————————————————————————————