बनारस शहरातील मराठी भाषिक समाजाचा समाज-भाषावैज्ञानिक अभ्यास करण्याच्या उद्देशाने एक प्रश्नावली तयार करण्यात आली. वेगवेगळ्या लिंग, वय, आर्थिक स्तर, शैक्षणिक स्तर यांचे प्रतिनिधित्व करणा-या सुमारे एक हजार प्रतिनिधींची निवड केली गेली. जी माहिती समोर आली ती अशी – पंच्याण्णव टक्के लोकांना त्यांचे महाराष्ट्रातील मूळस्थान माहीत नाही. ज्यांना माहीत आहे ते कोकण हे मूळ स्थान असल्याचे सांगतात. सर्वांचेच जन्मस्थान हिंदी क्षेत्रातील असूनही ते मराठीला त्यांची मातृभाषा मानतात. मातृभाषेसंदर्भात समजणे, बोलणे, वाचणे या स्तरांवर स्वतःला कुशल मानतात. त्यांच्या लिखाणाचा स्तर मात्र सर्वसामान्य आहे. ते लोक कुटुंब तसेच, नातेवाईक यांच्याशी संवाद साधताना मराठीचाच प्रयोग करतात. समारंभ, उत्सव यानिमित्ताने एकत्रित आलेला मराठी समाज प्राधान्याने मराठीचा वापर करतो. मराठी ही एक समृद्ध व प्रतिष्ठित भाषा आहे याचे भान सर्वांना आहे.
काशीतील बहुसंख्यांची मातृभाषा हिंदी असल्याकारणाने सर्व व्यवहार हिंदीतून होतात.
बनारसमधील मराठी लोक हिंदी भाषकांच्या संपर्कात असल्याकारणाने त्यांच्यावर हिंदीचा प्रभाव असणे साहजिक आहे. हिंदी वर्णमालेत ‘ळ’ वर्ण नाही. ‘ळ’साठी ‘ल’ हा पर्याय तेथे सर्रासपणे वापरला जातो. नवीन पिढीमध्ये त्याचे प्रमाण जास्त आहे. ‘ज्ञ’ आणि ‘क्ष’चे उच्चारण हिंदीत मराठीपेक्षा भिन्न आहे. हिंदीच्या प्रभावाने त्या वर्णांचा उच्चार अनुकमे ‘ग्य’ आणि ‘छ’ असा होतो. ‘च’ आणि ‘ज’चे उच्चारण मराठीत दोन प्रकारे होते. शब्दांनुसार ते उच्चारण बदलते – याचे भान तेथील भाषकांना नसते. त्यामुळे नको त्या ठिकाणी नको ते उच्चारण होते. उदा. चांगलाऐवजी च्यांगला. हिंदी आणि मराठी व्याकरणात बरेच साम्य आहे. वाक्यरचना समान आहे. त्यामुळे त्यात फारसे दोष आढळून येत नाहीत. असे असले तरी कधी कधी मराठी क्रियापद हिंदीचे रूप घेऊन येते. त्याचप्रमाणे मराठी संभाषणात हिंदी शब्दांचा प्रयोग सर्रासपणे केला जातो. तरुण पिढीत त्याचे प्रमाण जास्त आहे.
– प्रमोद पडवळ
(मूळ लेख – भाषा आणि जीवन, दिवाळी २०१४ वरून – संस्कारित, सुधारित)