‘फालतू’ हा मराठी भाषेत रोजच्या वापरातील शब्द आहे. तो ‘आजचा चित्रपट अगदीच फालतू होता’, ‘फालतू गप्पा मारू नको’, ‘अमूल्य वेळ फालतू गोष्टीत वाया घालवू नका’, ‘माझ्याशी फालतुपणा करू नको’ अशा अनेक वाक्यांतून नेहमी कानी पडत असतो. जवळ जवळ प्रत्येक व्यक्ती त्याचा वापर करत असते. ‘फालतू’ या शब्दाचे वाईट, बेकार, निरर्थक, वाह्यातपणा, चिल्लर, क्षुद्र, हलक्या प्रतीचे असे काही अर्थ होतात.
‘फालतू’ हा शब्द चांगल्या उच्च कुळातील आहे. म्हणजे, चक्क संस्कृतोद्भव आहे! मूळ ‘फल्गु’ या संस्कृत शब्दापासून ‘फालतू’ या शब्दाची निर्मिती झाली आहे. ‘फल्गु’ या शब्दाचे अर्थ नि:सत्त्व, असार, क्षुल्लक, कुचकामाचे, स्वल्प, दुर्बल, असत्य, निरर्थ असे ज.वि. ओक यांच्या लघुगीर्वाण कोशात दिले आहेत. ज्या सणाला आचरटपणा, टवाळकी म्हणजेच फालतुपणा करण्याची मोकळीक असते, असा सण म्हणजे होळी किंवा शिमगा. तो सण ज्या महिन्यात येतो, तो महिना म्हणजे फाल्गुनमास. ‘फल्गु’ या शब्दावरूनच ‘फाल्गुन’ हा शब्द तयार झाला आहे.
एखाद्या आचरट माणसाला त्याच्या आचरटपणाला पोषक असे वातावरण मिळाले आणि त्याने नसते धंदे केले, तर त्या वेळी ‘आधीच उल्हास, त्यातून फाल्गुनमास’ ही म्हण वापरली जाते. पण खरे म्हणजे फाल्गुन हा कालगणनेतील वर्षाचा शेवटचा महिना आहे. त्या महिन्यात निसर्गात पानगळ सुरू होते. वृक्ष त्यांची जुनी, जीर्ण पाने ढाळतात. त्यामुळे नंतर येणाऱ्या वसंत ऋतूत त्यांना नवीन पालवी फुटते. माणसांनीही त्यांनी वर्षभरात केलेल्या चुका, त्यांच्यातील दोष फाल्गुन महिन्यात टाकून द्यावे असे वाटत असते. त्यांची होळी करायची असते. ती होळीचा सण साजरा करण्यामागील मूळ कल्पना आहे. तसे केले, तरच चैत्रापासून सुरू होणाऱ्या नवीन वर्षात नवीन संकल्प, नवीन कल्पना, नवीन आशा यांची पालवी मानवी मनाला फुटते.
– उमेश करंबेळकर
छान नवीन माहिती
छान नवीन माहिती