– रेश्मा देसाई
जर माझ्या माथ्यावर असे बथ्थड मराठी चित्रपट मारण्यात येणार असतील तर मी माझा पैसा आणि वेळ का म्हणून वाया घालवावा? आज कित्येक मराठी वृत्तपत्रांनी ‘फक्त लढ म्हणा’ या चित्रपटाला अनेक स्टार्स देउन गौरवले आहे. त्यामागे त्यांची काय आर्थिक गणिते असतील मला ठाउक नाही. मात्र आम्ही वाचक या वृत्तपत्रांवर विश्वास ठेऊन चित्रपट पाहायला जातो. पण हा तर सरळसरळ वाचकांचा विश्वासघात आहे. जर मराठी चित्रपटकर्ते सगळी संसाधने हाती असताना चांगले चित्रपट देऊ शकत नसतील आणि वृत्तपत्रेही अशा वाईट चित्रपटांचा उदोउदो करणार असतील, तर मी का म्हणून मराठी चित्रपट पाहावा?
– रेश्मा देसाई
संजय जाधव दिग्दर्शीत आणि महेश मांजरेकर लिखीत ‘फक्त लढ म्हणा’ हा चित्रपट पाहिला. पडद्यावरचे आणि पडद्यामागचे चेहरे प्रसिद्ध असल्याने आणि मांजरेकरांनी यापूर्वी दोन मराठी व्यावसायिक चित्रपट चांगल्या पद्धतीने लिहील्याने, चांगली निर्मितीमूल्य असणारा एक व्यावसायिक चित्रपट पाहण्यास मिळेल, अशी आशा मनात धरून चित्रपट पाहण्यास गेले.
आत जाताच संपूर्ण चित्रपटगृह रिकामी असल्याचे दिसले. आम्ही एकूण केवळ दहा प्रेक्षक हजर होतो. ‘मराठी चित्रपटांची अवस्था किती वाईट झाली बरे! प्रेक्षकांनी चित्रपट पाहण्यास आले पाहिजे…’ वगैरे विचार मनात तरळून गेले. त्यानंतर जे पडद्यावर घडले ते नक्की काय होते याचा उलगडा मला आतापर्यंत झालेला नाही. लहान मुलांनी लिहीलेली एखादी आटपाट नगराची कथाही चांगली असू शकेल एवढी भिकार कथा पड्यावर मांडली होती. अॅक्शन सीन, नाचगाणी, असं जे काही तिथे चाललं होतं त्यापैकी कशाचाच कशाला मागमूस नव्हता. हिंदीवाल्यांच्या तोडीचा सिनेमा काढण्याच्या उद्देशाने या चित्रपटाने प्रथमपासूनच ‘हिंदी चित्रपट’ नावाची मर्यादा स्वतःभोवती आखून घेतल्यासारखी वाटली. चांगले कलाकार, पैसा, प्रसिद्धीची माध्यमे ही सारी साधने उपलब्ध असताना आपल्याला उत्तम आशयघन सिनेमे सोडाच, पण साधे व्यावसायिक सिनेमेही आपल्याला बनवता येऊ नयेत?
काही आठवड्यांपूर्वी बालगंधर्व हा चित्रपट पाहिला. मग त्यावरील एक चर्चासत्र ऐकले. त्यानंतर यापुढे नेमाने मराठी सिनेमे पाहण्याचा मनोमन विचार पक्का केला होता. पण हा चित्रपट पाहिल्यानंतर तो विचार डळमळीत होऊ लागला आहे. जर माझ्या माथ्यावर असे बथ्थड मराठी चित्रपट मारण्यात येणार असतील तर मी माझा पैसा आणि वेळ का म्हणून वाया घालवावा? आज कित्येक मराठी वृत्तपत्रांनी या चित्रपटाला अनेक स्टार्स देउन गौरवले आहे. त्यामागे त्यांची काय आर्थिक गणिते असतील मला ठाउक नाही. मात्र आम्ही वाचक या वृत्तपत्रांवर विश्वास ठेऊन चित्रपट पाहायला जातो. पण हा तर सरळसरळ वाचकांचा विश्वासघात आहे. जर मराठी चित्रपटकर्ते सगळी संसाधने हाती असताना चांगले चित्रपट देऊ शकत नसतील आणि वृत्तपत्रेही अशा वाईट चित्रपटांचा उदोउदो करणार असतील, तर मी का म्हणून मराठी चित्रपट पाहावा? हा चित्रपट पाहणारे माझ्यासारखे प्रेक्षक हाच विचार करून पुन्हा मराठी चित्रपटांच्या वाट्याला जाणार नाहीत. मराठी चित्रपटांचा खेळ दाखवणारी चित्रपटगृहे ओस पडलेली असतील आणि त्याच वेळी कुठेतरी सुरू असलेल्या एखाद्या चर्चासत्रात ही निर्माता-दिग्दर्शक मंडळी ‘हा प्रेक्षकच मराठी चित्रपटांकडे पाठ फिरवतो’ अशी मुक्ताफळे उधळत असतील.
रेश्मा देसाई, 9870423057, rreshmadesai@rediffmail.com
संबंधीत लेख
फिल्म सोसायटींचे काम संपलेले नाही
‘बालगंधर्व’ आणि ‘नटरंग’
नितीन देसाईंनी सेट उभारावे!
‘अवतार’ – तंत्रबंबाळ चित्रपटसृष्टीची नांदी!
{jcomments on}