प्रगतिपथावरील नारायण टेंभी

2
49

नारायण टेंभी हे अवघ्या तीनशेचौऱ्याऐंशी हेक्टर क्षेत्रफळात वसलेले छोटेसे गाव. ते निफाड तालुक्यात पिंपळगाव बसवंतच्या पूर्वेकडे पाच ते सहा किलोमीटर अंतरावर आहे. गावाने स्वयंस्फूर्तीने विकासाची कास धरली आहे.

नारायण टेंभी गावात ग्रामपंचायतीची स्थापना 1956 साली झाली. नारायण टेंभी ही ग्रूप शेती ग्रामपंचायत आहे. त्यात आसपासची बेहड, लोणवाडी ही गावे येतात. गावच्या, अवघ्या पस्तिशीतील सरपंच शैला बाळासाहेब गवळी आणि त्यांचे पुतणे, उपसरपंच अजय गवळी यांच्याशी बातचीत करताना लक्षात आले, की नव्या पिढीतील जिद्दी, जिज्ञासू आणि जिंदादिल नेतृत्वामुळे गावात मोठ्या प्रमाणावर भौतिक बदल घडून येत आहेत; त्याचबरोबर, जुन्याजाणत्या बुजूर्गांनी घालून दिलेली शहाणपणाची घडीही नीट सांभाळली जात आहे. अजय गवळी यांच्याकडे गावाची माहिती अद्ययावत आकडेवारीसह तयार असते.

‘नारायण टेंभी’हे नाव पडले ते नारायण देवबाबा यांच्या वास्तव्यामुळे. नारायण देवबाबा गावात 1952 पासून वास्तव्य करून होते. त्यांच्यामुळे गावातील वातावरण शांत, अध्यात्मिक आणि नैतिकदृष्ट्या संपन्न झाले. त्यांनी गावात समाधी घेतली. गावात दीडशे वर्षें जुने असे महादेवाचे मंदिर आहे. जुन्या काळाची आणखी एक अवशेषखूण म्हणजे तेथे खणताना सापडलेले धान्याचे जुने पेव. गावात तशी जुनी दोन-तीन पेव आहेत. धान्य साठवण्याची सत्तर वर्षांपासूनची कोठारे, जुने वाडे, माड्या पाहण्यास मिळतात. अजय गवळी सांगत होते, “माझ्या लहानपणी ती कोठारे वापरात असलेली मी पाहिली आहेत.”

नारायण टेंभीच्या तिन्ही बाजूंना नद्या आहेत. पूर्वेला नेत्रावती, पश्चिमेला पारासरी, तर दक्षिणेला कादवा नदी. त्यावर ब्रिटिशकालीन बंधारा आहे. दगड कोरून चुन्यात बनवलेला तो बंधारा मजबूत आहे. गवळी म्हणाले, बंधारा इतका मजबूत आहे,की गावाचा विस्तार करताना परिसरात एकदा दिवसभर सुरूंगलावले तरी एकही दगड हलला नाही.

गावात मराठा, आदिवासी, कुंभार आणि गोसावी या चार जातींचे लोक गुण्यागोविंदाने राहतात असेही ते म्हणाले.

नारायण टेंभीला तिन्ही बाजूनी नद्या असल्या तरी पाऊसपाणी  मुबलक नाही. शैलातार्इंनी अलिकडे पाणी कमी झाल्याचे सांगितले. तेथील प्रमुख पीक अर्थातच द्राक्ष आहे. तसेच, सिमला मिरची, टोमॅटोही तेथे होतो. द्राक्षाच्या बाबतीत गावाचे वैशिष्ट्य म्हणजे, युरोपीयन देशाचे द्राक्षांबाबतचे जे निकष आहेत, ते शंभर टक्केपूर्ण करून उपलब्ध क्षेत्राच्या मानाने कमाल उत्पादन घेणारे नारायण टेंभी एक नंबरचे गाव मानले जाते. पाच हजार मेट्रिक टन एवढा माल गावातून बाहेर जातो. तसेच, टोमॅटोचे उत्पादन पिंपळगावात आणि तेथून ते पाकिस्तान, बांगलादेश इत्यादी देशांत जाते. तेथील सिमला मिरची नाशिकला जाते. द्राक्ष निर्यातीमुळे परकीय देशाला परकीय चलन मिळवून देण्यामध्ये नारायण टेंभी गावाचा वाटा आहे. शेतीतील यशाचे गमक सांगताना अजय अभिमानाने म्हणाले, “गावातील सगळा तरुणवर्ग शेतीत राबतो. ऐंशी टक्केपेक्षा जास्त युवक शेती व्यवसायात आहेत. शेतीवरच गावाचे लक्ष केंद्रित झाल्याने त्याचे फळ त्यांना चांगल्या उत्पादनाच्या रूपाने मिळते आहे. अर्थात, तेथील काळ्या, कसदार जमिनीचीदेखील द्राक्षपिकाला साथ लाभली आहे. गावात लोकसंख्येच्या कितीतरी अधिकतेने झाडांची संख्या आहे. त्यामुळे पर्यावरण संतुलन चांगले राखले गेले आहे. त्यात ग्रामपंचायतीचा वाटा मोठा आहे.” सातत्याने ग्रामसभेत आवाहन करणे, पर्यावरणाचे महत्त्व सांगणे, बाहेरच्या मान्यवर व्यक्तींची व्याख्याने आयोजित करणे, नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर शेतीत करणे, प्रयोगशीलता जपणे यांतून ग्रामपंचायत लोकांना पर्यावरण जतनासाठी, स्वच्छतेसाठी, उत्पादन वाढवण्यासाठी सतत प्रोत्साहित करत असते. गवळी सांगत होते, “आमच्याकडे कृषीक्षेत्र कमी आणि छोटे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान प्रयोग करताना होणार नाही याची काळजी घ्यावी लागते.” एनएसएसच्या माध्यमातून ही खूप प्रबोधन झाल्याचे त्यांनी नमूद केले.

गावक-याचे शिक्षणाकडेही लक्ष आहे. गावात साक्षरतेचे प्रमाण चांगले आहे. एक हजार तीनशेपस्तीसपैकी चक्क एक हजार सेहेचाळीस लोक साक्षर आहेत; त्यात आजमितीला पाचशेअठ्ठावन्न पुरुष आणि चारशेअठ्याऐंशी स्त्रिया आहेत. निरक्षरांमध्ये बहुतेक लोक ज्येष्ठ आणि अति ज्येष्ठ आहेत आणि इतर छोटी बालके आहेत जी उद्या शाळेत जाणार आहेत. गावात डिजिटल अंगणवाडी आहे आणि चौथीपर्यंत शाळा आहे. अंगणवाडीत सत्तर मुले तर शाळेत चाळीस-पन्नास मुले-मुली शिकत आहेत. शाळेसाठी ग्रामस्थांनी सहकार्य केल्याचे गवळी यांनी सांगितले. गावात वाचनालय नाही, पण वृत्तपत्रे येतात, तसेच पोस्टमन येतो असे ते म्हणाले.

गावातील रस्त्यांची परिस्थिती मात्र खूप खराब आहे. पिंपळगाव बसवंतला जोडणारा प्रमुख मार्ग आहे, पण तोही तेवढा चांगला नाही. एनएसएसच्या श्रमदानातून तीन किलोमीटर रस्ता बांधून झाला. बाजार समितीने त्यासाठी अर्ध्या किंमतीत जेसीबी दिल्याचे त्यांनी सांगितले.

गावात दोनशेतीस कुटुंबांपैकी एकशेअठ्याऐंशी कुटुंबे शौचालये वापरतात. मळ्यातही शौचालये बांधली गेली आहेत. महत्त्व पटले, की लोक बदल स्वीकारतात असे शैलाताई म्हणाल्या. मुख्य म्हणजे गाव छोटे आहे आणि ग्रामस्थांमध्ये एकोपा आहे, त्यामुळे काम करणे सोपे होते असे त्यांनी आवर्जून सांगितले. याच स्वागतशील वृत्तीमुळे गावात आजपर्यंत साथीचा आजार, रोगराई कधी आली नाही. गावाचे आरोग्य चांगले आहे. जवळच्या पालखेड गावात प्राथमिक आरोग्यकेंद्र आहे. तसेच, डॉ संदीप वाघ यांचा खाजगी दवाखाना आहे.

अजय गवळी हसून म्हणाले, “गाव व्यसनमुक्त आहे. तेथे दारू कधीही विकली जात नाही. त्यासंबंधीच्या केसेसही नाहीत. तीच गोष्ट तंटामुक्तीची. गावात सगळेच कामात मग्न असतात त्यामुळे भांडायला वेळच नाही. जे काही जुने वाद आहेत त्यावर काही तोडगाच नाही त्यामुळे तंटामुक्तीची गरज भासली नाही.’’

शिवाय गावात अनेक चांगले उपक्रम राबवले जात आहेत. त्यामध्ये अद्ययावत व्यायामशाळा, मैदान, गटारे-नाल्यांची-रस्त्यांची दुरुस्ती, कचराकुंडी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आदिवासी, ठक्कर बापा इत्यादी योजनांची अंमलबजावणी असे उत्तम काम सुरू आहे. ग्रामपंचायत निधीतून काही गोष्टी पुरवल्या जातात. ग्रामपंचायतीचे एकूण सरासरी वार्षिक उत्पन्न एक लाख पंचवीस हजार रुपये इतके आहे. ते सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने शक्य आहे असे अजय गवळी म्हणाले. ग्रामविकासात महिलांच्या सहभागाविषयी विचारले तेव्हा ते म्हणाले,“ग्राम सभेत पन्नास टक्के महिला आहेत. चर्चा, निर्णय यांत महिलांचा वाटा मोठा आहे. शासनाने ठरवून दिल्यापेक्षा सहा-सात सभा जास्त होतात, कोणताच निर्णय ग्रामसभेबाहेर होत नाही.”

शैलाताई उत्साहाने म्हणाल्या, “गावात महिलांचे सहा बचतगट आहेत. मंगल उन्हाळे, सीमा पंडित रोकडे, नंदा मनोहर उन्हाळे, रेखा संजय उन्हाळे, मंगला बाळासाहेब गवळी, शोभा गोरख गवळी या महिला बचतगट चालवतात. त्या माध्यमातून गणपतीच्या मूर्ती बनवणे, मडकी बनवणे, पापड मशीन, पत्रावळी मशीन इत्यादींसाठी कर्जे दिली जातात. गावात स्टेट बँक, बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी या बँका कर्ज पुरवठा करतात. या बॅंकांमार्फत साडेसात कोटी रुपयांचे कर्जवाटप झाले असून शंभर टक्के वसुली झाली आहे.”

खरोखर, नारायण टेंभी या छोट्या गावाने या अत्याधुनिक काळात नव्या-जुन्याचा सुंदर समतोल साधला आहे असे दिसते. नव्या काळाची गती, खऱ्या शाश्वत विकासाची प्रगती आणि एकोप्याची शहाणी मती यातूनच ग्रामविकासाचे उद्दिष्ट साधले जाऊ शकते याचे सुंदर उदाहरण या गावात घालून दिले आहे. गांधीजींच्या स्वावलंबी नैतिकखेड्याचे स्वप्न या गावाने प्रत्यक्षात उतरले आहे असे वाटते.

अजय गवळी, 9823522737
गणेश पगार (ग्रामसेवक) – 07875531141, ganeshpagar1411@gmail.com

– अंजली कुलकर्णी

About Post Author

2 COMMENTS

Comments are closed.