‘एक चावट संध्याकाळ’ या नाटकात पुरुषांच्या पौंगडावस्था ते वृद्धत्व या दरम्यानच्या काळातल्या मानसिकतेची, गरजांची चर्चा करण्यात आली आहे, असे नाटककार म्हणतो. काय असतात त्या गरजा आणि काय असते त्या वेगवेगळ्या वयोगटांतील पुरुषांची मानसिकता?
लैंगिकता ही गोष्ट नैसर्गिक असल्याने निसर्गाच्या नियमानुसार तेथे सर्व गोष्टी घडत असते. त्याचे एक शास्त्र आहे. मानवी शरीराची जी गरज आहे तिला आनंदाची जोड दिली गेली आहे. पोषण आणि पुनरुत्पादन ही सजीवांची प्रमुख गरज मानली जाते. स्त्रीच्या शरीरामध्ये इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन आणि प्रोलॅक्टिन ही संप्रेरके आहेत. त्यांतील कोणतेही संप्रेरक हे सेक्सची इच्छा वाढवणारे नाही. त्याउलट पुरुषांमध्ये असणारे टेस्टोस्टोरॉन हे संप्रेरक सेक्सची इच्छा आणि त्याबरोबर शुक्राणू निर्माण करणारे आहे. पुरुषाचे वय वाढत जाते तसतसे त्या संप्रेरकाचे शरीरातील प्रमाण कमी होते. त्यामुळे पुरुषांची सेक्सची इच्छा उतारवयात कमी होते. पुरुषाच्या लैंगिक जाणिवा जागृत होण्यास वयाच्या बाराव्या वर्षांनंतर सुरुवात होते. त्याला स्त्रीच्या शरीराचे आकर्षण वाटू लागते. त्याला त्या काळात स्वप्नदोष जाणवतो. तो हस्तमैथुन करू लागतो. ते सर्व नैसर्गिकपणे होत असते; ते होणे आवश्यक असते. हस्तमैथुन करण्यात कोणताही धोका नाही. त्याबद्दलच्या गैरसमजांमुळे काहींना हस्तमैथुन करण्यामध्ये अनैतिकता वाटते. म्हणून ते ते टाळतात, पण त्यामुळे त्यांना नैराश्य येते. काही वेळा, त्यांचे मानसिक संतुलन सततच्या नैराश्याने बिघडण्याची शक्यता असते.
अश्लीलतेची चर्चा समाजात नेहमी चालत आलेली आहे. सभ्यतेच्या, अर्थातच श्लीलतेच्या प्रत्येक समाजाच्या काही कल्पना असतात. त्या स्थलकालव्यक्तिसापेक्ष असतात. एके काळी स्त्रियांनी शिकणे हेसुद्धा चुकीचे मानले गेले. स्त्रियांना शिकवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांना दगड आणि शेण यांच्या माऱ्याचा सामना करावा लागला होता. सार्वजनिक ठिकाणी चुंबन घेणे पाश्चात्य समाजात अशिष्ट समजले जात नाही. पण भारतात ते आक्षेपार्ह आहे. त्याचप्रमाणे एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीला अश्लील वाटते; ती दुसरीला तशी वाटत नाही. त्यातून अश्लीलतेबद्दलचे वाद उद्भवतात.
‘एक चावट संध्याकाळ’ हे नाटक अश्लील, बीभत्स आहे; दोन-चार पुरुषांनी कंपू करून एकमेकांना सांगण्याचे अश्लील विनोद रंगभूमीवरून सांगणे याला नाटक कसे म्हणायचे, असे हे नाटक बघून येणाऱ्यांचे म्हणणे आहे. चावट, अश्लील, बीभत्स, पांचट, हिडीस, भ्रष्ट या सगळ्यांमध्ये पुसट सीमारेषा आहे. ती ओलांडायची नाही हे सगळ्यांना माहीत असते; तसा अलिखित संकेत असतो, कारण ती ओलांडणे हे अवमूल्यन असते, पण तरीही ती ओलांडली जाते तेव्हा तत्संबंधात विरुद्ध प्रतिक्रिया येते.
‘एक चावट संध्याकाळ’ हे नाटक, त्याला होणारा विरोध हे फारसे महत्त्वाचे नाही. त्याचे कारण म्हणजे एक गोष्ट स्पष्ट आहे, की जे सकस असते, काळाच्या पलीकडे जाणारे असते, ज्याच्यात टिकण्याची क्षमता असते; ते कितीही-कसाही विरोध झाला तरी टिकतेच. तेंडुलकरांची नाटके हे त्या संदर्भातील उत्तम उदाहरण आहे. त्यामुळे एखाद्या कलाकृतीला विरोध करण्यापेक्षा ज्याला जे हवे ते त्याने करावे, ज्याला जे हवे ते त्याने पाहावे. चांगले असेल ते टिकते आणि जे हिणकस असेल ते नष्ट होते. मुळात एखाद्या पुस्तकामुळे, नाटकामुळे, सिनेमामुळे समाजात अश्लीलता वाढीला लागली आहे, समाजाचे मानसिक आरोग्य बिघडले आहे, असे कधी होत नाही.
समाजाच्या नैतिकतेच्या कल्पना काळानुसार बदलत असतात. त्यामुळे अमुक गोष्ट श्लील आणि तमुक गोष्ट अश्लील असेही ठरवता येत नाही. तशी कायमस्वरूपी व्याख्याही करता येत नाही. र. धों. कर्वे यांनी म्हटल्याप्रमाणे, अश्लीलता हा प्रत्येकाच्या मनाचा गुणधर्म असतो. व्यक्ती पाहील तसे तिला दिसते. त्यामुळे मुख्य मुद्दा आहे व्यक्तीच्या मानसिकतेचा. एखाद्या गोष्टीला किती बळी पडायचे, तिला किती महत्त्व द्यायचे याचा. कोणतीही कलाकृती पटली नाही-आवडली नाही-की स्वत:ला संस्कृतिरक्षक मानणारे लोक उठून त्याविरुद्ध उभे राहतात. पण त्यापेक्षा तिची खोलवर समीक्षा करावी. जे आहे ते वाईटच कसे आहे याबाबत सैद्धांतिक मांडणी करावी. ती लोकांना पटवून द्यावी आणि त्यांनाच निर्णय घेऊ द्यावा. एखादी कलाकृती शंभरातील चार लोकांना आवडली नाही म्हणून त्यांनी उरलेल्या शहाण्णव लोकांचा ती बघून चांगली-वाईट ठरवण्याचा त्यांचा हक्क नाकारणे चुकीचे आहे.
आणखी एक मुद्दा. चावट, अश्लील, हिणकस, बीभत्स, हे सगळे नेमके कशाला म्हणायचे? त्या सगळ्या गोष्टी फक्त लैंगिकतेशी संबंधित असतात का?
चावट विनोद हा हिंसाचारच! – वंदना खरे
कोणत्याही नाटकावर अश्लीलतेचा शिक्का मारला जातो आणि त्यातून वाद होतात तेव्हा ते सगळे वाद वेगवेगळ्या प्रकारच्या सेन्सॉरशिपशी जोडलेले असतात. कोणत्याही कलाकृतीवर समाजाची, गुंडांची, सरकारची सेन्सॉरशिप असू नये. समाजात सर्व प्रकारच्या भावनांना व्यक्त व्हायला वाव असला पाहिजे. ज्यांना ज्या प्रकारची नाटके करावीशी वाटतात, त्यांना ती करता यावीत. ज्यांना ज्या प्रकारची नाटके पाहावीशी वाटतात, त्यांना ती पाहता यावीत.
‘योनीच्या मनीच्या गुजगोष्टी’ या माझ्या नाटकाला; तसेच, पाटोळे यांच्या ‘एक चावट संध्याकाळ’ या नाटकाला प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहाने मनाई केली. त्यामुळे दोन्ही नाटकांना एकत्र ठेवून चर्चा होते. पण दोन्ही नाटकांची तुलना होऊच शकत नाही. कारण आपण पुरुषप्रधान समाजात वावरतो. सर्व प्रकारची, अगदी भाषा वापरण्याचीही सत्ता निर्विवादपणे पुरुषांच्या हातात आहे. त्या भाषिक सत्तेचा दुरुपयोग करून स्त्रियांवर हिंसाचार होतो. त्या सत्तेमुळे स्त्रियांचे दमन होते. दमन झालेला गट वेगवेगळ्या माध्यमांतून स्वत:चा विरोध नोंदवण्याचा प्रयत्न करतो. दमन करणाऱ्या गटानेही तेच करणे हे मला मान्य नाही.
पाटोळे म्हणतात, की स्त्रियांसाठी वेगळी टॉयलेट्स असतात, बस असतात, ट्रेनचा डबा असतो, मग पुरुषांसाठी वेगळे नाटक असायला काय हरकत आहे? स्त्रियांसाठी सुविधा वेगळ्या असतात त्या हिंसाचारापासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी. बचाव करण्यासाठी. पुरुषांवर असा कुठला हिंसाचार होतो, की त्याकरता त्यांच्यासाठी वेगळे नाटक असण्याची गरज वाटावी…
मी अशोक पाटोळे यांचे नाटक पाहिलेले नाही, पण नाट्यगृहाने त्यांच्या नाटकावरही बंदी आणू नये. मी त्यापुढे जाऊन असे विचारेन, की प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहाच्या समांतर सेन्सॉरशिपला पाटोळे एकीकडे विरोध करतात आणि दुसरीकडे स्त्रियांनी आपले नाटक बघू नये, ते स्वत: ही समांतर सेन्सॉरशिप राबवतात त्याचे काय?
अशोक पाटोळे अशीही दुटप्पी भूमिका घेतात, कारण काय? तर त्यात पुरुषांची प्रायव्हसी जपली आहे. तसे असेल तर त्यांनी त्यांचे नाटक सार्वजनिक ठिकाणी का करावे?
मी ‘योनीच्या मनीच्या गुजगोष्टी’ या नाटकातून स्त्रीच्या लैंगिकतेचे सातत्याने जे दमन होत असते, त्याविरुद्धची माझी कॉमेंट मांडली आहे आणि मुख्य म्हणजे मी माझ्या बाकीच्या आयुष्यातही तेच काम करते. मी गेली वीस वर्षे स्त्री-पुरुषांच्या लैंगिकतेसंदर्भात कार्यशाळा घेते. त्यामुळे ‘योनीच्या मनीच्या गुजगोष्टी’ हे नाटक माझ्या कामाचा, माझ्या व्यक्तिमत्त्वाचा भाग म्हणून येते. मग स्त्रियांना अपमानास्पद वाटतील असे विनोद सांगणे हा पाटोळे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग आहे की काय? त्यांच्या नाटकात स्त्रियांना अपमानास्पद वाटेल असा काही भाग आहे, असे मला सांगितले गेले आहे. ते नाटक स्त्रियांनी पाहू नये असेही त्यांचे म्हणणे आहे. मग असे नाटक मुळात त्यांनी का लिहावे? स्टेजवरून सादर तरी का करावे? स्त्रियांचा असा विनोदाच्या अंगाने अपमान करण्याचा त्यांना काय हक्क आहे? स्त्रियांना अपमान वाटेल असे विनोद सांगणे हा स्त्रियांविरुद्धचा हिंसाचार आहे आणि पुरुष तो वर्षांनुवर्षे करत आहेत. पाटोळे यांनी त्यात भर का घालावी?
(१४ सप्टेंबर २०१२च्या ‘लोकप्रभा’ मासिकातून साभार)
महाजालावरील इतर दुवे
सार्वजनिक असभ्यपणा
नाट्यरंग : ‘एक चावट संध्याकाळ’ : असभ्यता.. चावडीवरची!
‘चावट’पणाची उलटतपासणी
चावटपणाचे मानसशास्त्र
अश्लीलतेच्या नावानं..