सप्रेम नमस्कार, वि.
लेखक-कलावंत-वैज्ञानिक मंडळींनी साहित्य अकादमीचे व अन्य सरकार पुरस्कृत पुरस्कार परत केले. त्या संबंधात काही व्यक्तींनी छोटीमोठी निवेदने प्रसिद्धीस दिली. त्यामध्ये एक मुद्दा तात्कालिक राजकीय निषेधाचा आहे व दुसरा लेखक-कलावंतांच्या आविष्कार स्वातंत्र्याचा. यासंबंधात सखोल विचार आवश्यक आहे असे मत सर्वत्र आढळून येते. त्यासाठी संदर्भ म्हणून अशा महत्त्वाच्या तीन घटना इतिहासकालात घडल्या व त्यावेळी संबंधित व्यक्तींनी निषेधात्मक कृती केली, त्यांची तीन निवेदने ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’वर प्रसिद्ध केली आहेत – रवींद्रनाथ टागोर, ज्याँ पॉल सार्त्र व मालती बेडेकर. तुमच्या माहितीसाठी ती सोबत जोडली आहेत. ती निवेदने लेखक-समीक्षक दीपक घारे यांच्याकडून उपलब्ध झाली.
निषेधाचा असा भाग नोंदत जाण्याबरोबरच, ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ला महत्त्वाचा भाग वाटतो तो विधायकतेचा, रचनेचा. तसा मजकूर, रोज एक लेख याप्रमाणे ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’वर प्रसिद्ध केला जातो. ते लेखन व्यक्तीची कर्तबगारी, संस्थेचे कार्य व संस्कृतिसंचित या तीन विभागांत अनेक पोटशीर्षकांतर्गत वाचायला मिळते. त्याखेरीज सांस्कृतिक जगातील वादचर्चेस पूरक अशा स्वरूपाचे लेखन-संकलनदेखील सादर केले जाते. तीन लेखकांची निवेदने हा त्यातील प्रकार.
नमुना म्हणून आणखी दोन टिपणे जोडली आहेत. त्यासतील एक प्रत आहे डॉ. उमेश करंबेळकर यांच्या प्रसिद्ध केलेल्या लेखाची – खारीचा वाटा. करंबेळकर सूक्ष्म ललित बुद्धीने हे काम करत असतात. शोधक बुद्धीचे असे काम महाराष्ट्रात विविध क्षेत्रांत चालू असते (पूर्वीही होत होते), त्याची नोंद ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’वर केल्याने जगभरच्या मराठी लोकांना एक वेगळाच ठेवा उपलब्ध होतो असे त्यांच्या प्रतिसादावरून जाणवते. सध्या ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ला महिन्याकाठी तीन लाख हिट असतात व त्याचे वीस हजार नियमित वाचक आहेत.
संख्या व दर्जा या दृष्टीने वेबसाइटवरील मजकुरामध्ये सुधारणा साधण्याचा प्रयत्न सतत असतो. हे माध्यम या तऱ्हेने- विधायक रीत्या, माध्यमाचे लोकशाही स्वरूप उपयोगात आणून – पण त्यास थिल्लर स्वरूप येऊ न देता – प्रथमच वापरले जात आहे व त्यामुळे प्रयोग सतत चालू असतात. विषयतज्ज्ञ व तंत्रज्ञ यांचे सल्ले घेतले जातात. ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे सुजाण व संवेदनाशील महाराष्ट्रीय माणसाचे तटस्थ, वस्तुनिष्ठ व्यासपीठ असावे असा प्रयत्न आहे.
महाराष्ट्राचे समग्र चित्र पोर्टलवर साकारायचे तर सुमारे सव्वा लाख लेख प्रसिद्ध व्हावे लागतील. सध्या प्रसिद्ध लेखांची संख्या फक्त अडीच हजार आहे. प्रसिद्धीचा वेग वाढवायचा तर साधनसंपत्ती हवी. कृपया या आगळ्यावेगळ्या, सांस्कृतिक कामास मदत करावी. कोणी म्हणेल वेबसाइटचे माध्यम मागे पडले आहे, अॅपचा जमाना आहे. ते सत्यच आहे, माध्यमे पुढे पुढे जातील, परंतु ‘कंटेंट’ महत्त्वाचा राहील. सध्याची ज्येष्ठ पिढी जगली ते सांस्कृतिक जीवन ‘साठवून’ ठेवण्याचा हाच काळ आहे. तो दिवसा दिवसाने संपत आहे!
सध्या ‘थिंक महाराष्ट्र’ला मिळणाऱ्या देणग्यांमधून वेबपोर्टलचा कारभार तुटपुंजा पद्धतीने चालवला जातो, तरी तो वार्षिक खर्च वीस लाख रुपये आहे. हे काम अधिक परिणामकारकतेने करायचे असेल तर वर्षाकाठी सुमारे एक कोटी रुपयांची आवश्यकता आहे. या व्यासपीठाचा समाजातील प्रभाव वाढावा आणि त्या अनुषंगाने विधायक गोष्टी घडण्याीचे वातावरण निर्माण करता यावे याकरता तुमच्यासारख्या सजग, वैचारिक आणि संवेदनशील व्यक्तींच्या सहकार्याची आवश्यकता आहे. तुम्ही तुमचे सहकार्य कशा स्वरूपात देऊ इच्छिता ते कळवावे ही विनंती.
कळावे.
आपला
दिनकर गांगल
मुख्य संपादक, थिंक महाराष्ट्र डॉट कॉम