पिपली लाईव्ह – उत्तर भारतातल्या पिपली गावातला एक शेतकरी नि त्याचा मोठा भाऊ, छोट्या भावाची गरिबीला करवादलेली बायको, मुलं आणि घरातली एक म्हातारी, असं कुटुंब. गहाण टाकलेली जमीन कर्ज न फेडल्याने हातची जाणार, या भीतीनं ग्रस्त असलेलं हे कुटुंब.
आत्महत्या केलेल्या शेतक-याच्या कुटुंबाला नुकसानभरपाई म्हणून एक लाख रुपये मिळतात अशी माहिती कुठूनतरी मिळवून तसं काही आपल्या बाबतीत करता येईल का, असा विचार हे दोघं भाऊ करत असतात. देशी दारूचा रोजचा डोस मारून घरी परत येत असताना एकदा या दोघांच्या बोलण्यातून बातमी पसरते, की छोटा भाऊ (म्हणजे नाथा) आत्महत्या करणार ! बातमी पसरते ती अगदी इंग्रजी वृत्तवाहिन्यांपर्यंत. मग सगळ्या माध्यमांचा गदारोळ पिपलीगावामध्ये उतरतो. नाथाच्या हगण्यामुतण्यापासून त्याच्या बकरीपर्यंत सगळ्यांच्या बातम्या बनतात. शेवटी, नाथा गायब होतो. माध्यमांच्या दृष्टीने तो मरतो. अशी एकूण ती कथा.
शेतक-यांच्या आत्महत्या, भारतातली शेतीची एकूण अवस्था, मूळ मुद्दा सोडून इतर सर्व मनोरंजक चाळे करणारी माध्यमं. अशा सगळ्या गोष्टींना गुंफून तयार झालेली ‘पीपली लाईव्ह’ , ह्या दीड-दोन तासांच्या चित्रपटाची कथा. आपल्याला फक्त ह्या कथेच्या अनुषंगानं काहीतरी छोटंसं म्हणायचं असल्यानं चित्रपटाच्या इतर बाबींकडे जायला नको. थोडंफार विनोदी अंगानं जात गंभीर काहीतरी बोलण्याचा प्रयत्न ह्या चित्रपटाच्या दिग्दर्शिके चा आहे, एवढं लिहून हा भाग संपवू.
निळू फुले दिगू टिपणीस – ‘सिंहासन’ नावाचा मराठी चित्रपट १९७९ साली प्रदर्शित झाला. अरुण साधूंच्या ‘मुंबई दिनांक’ आणि ‘सिंहासन’ ह्या दोन कादंब-यांवर आधारित विजय तेंडुलकरां ची पटकथा. बाकी दिग्दर्शक नि कलाकार अशी सगळी मातब्बर मंडळी. राजकारणावर भाष्य करणारा त्या काळी गाजलेला हा चित्रपट. कथेच्या तपशिलात न जाता सांगण्याचा मुद्दा एवढाच, की राजकारण नि एकूण सामाजिक स्तर नि भंपकपणा पाहून या चित्रपटातील एक पात्र मानसिक संतुलन हरवून बसतं नि हसत सुटतं. हे मध्यवर्ती पात्र आहे, दिगू टिपणीस नावाच्या पत्रकाराचं. निळू फुले यांनी उभा केलेला दिगू टिपणीस सगळ्या जगाकडे बघत हसत सुटतो नि पिक्चर संपतो.
राकेश – ‘पिपली लाईव्ह’ मध्ये आहे तो राकेश नावाचा छोट्या हिंदी दैनिकातला पत्रकार. महानगरी माध्यमांच्या मुजोर भपक्यापासून दूर असलेला. नाथाचा आत्महत्येचा निर्णय आपल्या लेखातून पहिल्यांदा जगापुढे आणणारा. ‘खरी’ पत्रकारिता करण्याची प्रामाणिक इच्छा असणारा राकेश. त्याच्या लेखाने माजलेला गदारोळ ऐकत ऐकत इंग्रजी-हिंदी वृत्तवाहिन्या पिपलीमध्ये पोचतात. त्यांच्या सोयीने प्रेक्षकांचे मनोरंजन होईल अशी स्टोरी कव्हर करतात.
ह्या जर्नालिस्टांबरोबर वावरताना राकेश अंतर्मुख होत जातो. नाथाची स्टोरी रंगवण्यात गुंतलेल्या माध्यमांना जमीन खणता खणता मेलेला दुसरा, त्याच गावातला गरीब शेतकरी हा साध्या बातमीचाही विषय का वाटत नाही? असा साधासरळ प्रश्न त्याला पडतो. तो हा प्रश्न इंग्रजी जर्नालिस्ट मॅडमला विचारतो. ती त्याला त्याच्या प्रश्नातला ‘अव्यावहारिक भाबडेपणा’ स्पष्ट करून तिचा स्वत:चा शार्पनेस दाखवून देते.
नाथाला एका ठिकाणी लपवून ठेवण्यात आलं आहे. तिथं माध्यमांपासून गावगल्लीतल्या राजकारण्यांपर्यंत सर्वजण आपापली पोळी भाजून घ्यायला मौजूद असतात आणि गोंधळ उडतो. त्या गोंधळात स्फोट होतो. स्फोटात एक व्यक्ती मरण पावते. माध्यमांच्या, राजकारण्यांच्या नि गावक-यांच्यात बातमी पसरते ती नाथा मेल्याची. पण खरा मरतो तो राकेश.
खोटेपणा ‘अनकव्हर’ करण्यापेक्षा ‘कव्हर’ करणं हेच माध्यमांचं ब्रीद सत्यात उतरतं.
खरेपणाला कव्हर करताना दिगू टिपणीस वेडा झाला नि आता २०१० सालात राकेश मेला. हेच काय ते माध्यमांचं कुठल्याही कव्हरशिवाय पडून असलेलं वास्तव.
– अवधूत डोंगरे