श्रीराम भिकाजी वेलणकर हे ‘पिनकोड’चे जनक म्हणून ओळखले जातात. ‘पिनकोड’शी प्रत्येक भारतीयाचे नाते घट्ट जोडलेलेआहे. त्याच्या नावासमोर नुसता पिनकोड नंबर लिहिला, तरी ती व्यक्ती देशाच्या कोणत्या भागात राहते हे कळून येते. श्रीराम भिकाजी वेलणकर महाराष्ट्रापेक्षा बाहेरील राज्यांत जास्त काळ कार्यरत होते. त्यांनी डाक तार विभागाचे अधिकारी (निर्देशक) म्हणून काही काळ कोलकाता शहरात व्यतीत केला.
वेलणकर यांनी स्वतः स्वाक्षरी केलेले छायाचित्र |
वेलणकर यांचे वेगळे कार्य म्हणजे त्यांनी निर्माण केलेली ‘पिनकोड’व्यवस्था. भारत हा खंडप्राय देश आहे. तो अनेक राज्ये व केंद्रशासित प्रदेश यांत विभागला आहे. त्यात विविध भाषा बोलल्या आणि लिहिल्या जातात. एकाच नावाची अनेक गावे एकाच राज्यात किंवा वेगवेगळ्या राज्यांत आहेत. उदाहरणार्थ, रामपूर, रामनगर व राजापूर या नावाची गावे अनेक राज्यांत आहेत. त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यांत पत्रांचे वाटप कार्यक्षम रीत्या कसे करावे हा मोठा प्रश्न डाक विभागाला सतावत होता. ‘पिनकोड’चा शोध लागण्यापूर्वी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात पत्र पाठवले, तर ते पोचण्यास दिवस-महिने लागत. त्याचे महत्त्वाचे कारण स्थानिक भाषेत नाव व पत्ता प्रामुख्याने लिहिलेला असे आणि अक्षर दिव्य असायचे ! त्यामुळे पोस्टमनला ते चटकन कळत नसे.
नाशिक येथे पोस्ट अधिक्षक पदभार स्वीकारताना |
वेलणकर यांनी विकसित केलेली पिनकोड पद्धत पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांना त्यांनी समजावून सांगितली आणि देशात पिनकोडची सुरुवात 15 ऑगस्ट 1972 रोजी झाली. वेलणकर यांनी पिनकोड म्हणजे पोस्टल इंडेक्स नंबरची (पीआयएन) देशाच्या नऊ भागांत विभागणी केली. त्यामध्ये लष्करी सेवेसाठी वेगळा विभाग निर्माण करण्यात आला आहे. पिनकोड हा सहा अंकी असतो. त्या अंकातील सुरुवातीपासूनचा तिसरा अंक जिल्ह्यासाठी असतो, तर शेवटचे तीन अंक पोस्ट ऑफिससाठी असतात. पहिले दोन अंक हे भारतातील दोन विविध राज्यांसाठी देण्यात आले आहेत. उदाहरणार्थ, महाराष्ट्रासाठी 40 ते 44 पर्यंत आकडे देण्यात आले आहेत. 411030 म्हणजे पुणे शहरातील विशिष्ट भाग. त्या संख्येपैकी पहिला चार हा आकडा महाराष्ट्रासाठी, त्यानंतरचा एक हा आकडा सब रिजन, तिसरा एक हा आकडा जिल्ह्यासाठी म्हणजे येथे 411 हा पुणे जिल्हा होतो व शेवटचे तीन आकडे स्थानिक पोस्ट ऑफिससाठी देण्यात आले आहेत. राज्यानुसार देण्यात आलेले पिनकोडचे पहिले दोन अंक याप्रमाणे – दिल्ली 11, हरियाणा 12-13, पंजाब 14 ते 16, हिमाचल प्रदेश 17, जम्मू-काश्मीर 18-19, उत्तर प्रदेश व उत्तराखंड 20 ते 28, राजस्थान 30 ते 34, गुजरात 36 ते 39, महाराष्ट्र 40 ते 44, मध्यप्रदेश व छत्तीसगड 45 ते 49, आंध्र प्रदेश व तेलंगणा 50 ते 53, कर्नाटक 56 ते 59, तामिळनाडू 60 ते 64, केरळ 67 ते 69, पश्चिम बंगाल 70 ते 74, ओडिशा 75 ते 77, आसाम 78, पूर्वोत्तर 79, बिहार व झारखंड 80 ते 85. भारतीय डाक सेवेसाठी (एपीएम) 90 ते 99 पर्यंत कोड नंबर वापरले जातात.
वेलणकर हे गणितज्ञ होते. त्यामुळे त्यांनी सहा आकड्यांमध्ये संपूर्ण देशाचा नकाशा मांडला आणि पिनकोड नंबरची निर्मिती केली. राज्य सरकारने वेलणकर यांच्यावरील एका धड्याचा इयत्ता नववीच्या पुस्तकात संस्कृती या विषयात समावेश केला आहे.
श्रीराम वेलणकर यांचा जास्त परिचय हा संस्कृत पंडित आणि गणितज्ञ म्हणून होता. त्यांनी संगीत क्षेत्रातदेखील भरीव काम केले आहे. वेलणकर हे ब्रिटिशांच्या राज्यात आयसीएसच्या लेखी परीक्षेत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यावेळी भारतातून फक्त तीन व इंग्लंडच्या परीक्षेतून एकशे सत्तेचाळीस अधिकारी निवडण्यात येत असत. त्यांच्या निवडीचे मुख्य विषय संस्कृत, अर्धमागधी आणि इतिहास असे होते. त्यांच्या आणि दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्याच्या गुणांत जवळ जवळ दीडशे गुणांचा फरक होता. तरीही त्यांना तोंडी परीक्षेत अत्यंत कमी गुण देऊन पाचवा क्रमांक देण्यात आला. कारण त्या दोन परीक्षांमधील काळात रत्नागिरीच्या जिल्ह्याधिकाऱ्यांकडून मागवलेल्या इतिवृत्तानुसार, सावरकर रत्नागिरीत स्थानबद्ध असताना, त्यांच्या घरी लहान मुलांना जमवून संध्याकाळी गोष्टी सांगत. त्या ऐकण्यास श्रीराम भिकाजी वेलणकर नावाचा मुलगा जात होता अशी माहिती ब्रिटिश सरकारला कळली होती. रँग्लर र.पु. परांजपे हे त्यावेळी परीक्षक समितीत होते. त्यांनी स्वतः काही वर्षांनी रेल्वे प्रवासात दोघे एका डब्यात असताना ओळख झाल्यावर श्रीराम वेलणकर यांना ही गोष्ट सांगितली अशी आठवण राजीव वेलणकर यांनी सांगितली.
शेतकरी नेते शरद जोशी यांचे वडील ए.एन. जोशी हे वेलणकर यांचे घनिष्ट मित्र होते. त्यांच्यातील सल्लामसलतीतून शरद जोशी यांनी पोस्टल सेवेत प्रवेश केला. त्यांची नेमणूक स्वित्झर्लंडमध्ये बर्न येथे झाली असताना, वेलणकर एका परिषदेनिमित्त तेथे गेले होते. वेलणकर व पिताजी ए.एन. जोशी यांचा शरद जोशी यांच्या शेतीक्षेत्रात जाण्यास विरोध होता.
श्रीराम वेलणकर आणि त्यांची मुले डावीकडून विनता, सुवर्णा, वीणाताई आणि राजीव |
श्रीराम वेलणकर यांचा जन्म सरंद या दापोलीतील छोट्याशा गावी 1915 मध्ये झाला. ते राजापूर हायस्कूलमधून मॅट्रिक 1931 साली झाले (इंग्रजी सातवी). त्यांचे वडील भिकाजी वेलणकर हे शिक्षक होते. वेलणकर घराणे मूळचे रत्नागिरीतील कळंबुशी या गावचे. श्रीराम यांना चार मुले. मुलाचे नाव राजीव वेलणकर, मुलींची नावे वीणाताई गोडबोले, विनतामाई वैद्य आणि सुवर्णा वेलणकर. सुवर्णा तरुणपणी आणि विनता काही वर्षांपूर्वी वारल्या. त्यांचा मुलगा राजीव गिरगाव येथे तर मुलगी वीणाताई दादरला राहते. त्यांचीही वये ऐशीच्या पुढे आहेत. ताई ह्या संस्कृतच्या शिक्षिका होत्या. त्या म्हणाल्या, की वडील पोस्टात असल्याने त्यांच्या वारंवार बदल्या होत असत. त्यामुळे मुलांचा सांभाळ आईने केला. ते वर्षातून एक महिना वेलणकर जेथे असत तेथे सुट्टीसाठी जात असत. श्रीराम वेलणकर यांच्या धाकट्या भावाचे नाव अनंतराम भिकाजी वेलणकर होते. ते 1934 साली मॅट्रिक झाले.
राजीव श्रीराम वेलणकर – mrinraj@gmail.com
मूळ स्रोत – प्रसाद घारे prasad.ghare@gmail.com
(अधिक माहिती राजा पटवर्धन 9820071975 rajapatwardhan2015@gmail.com)
—————————————————————————————————————————————————
Great
उत्तम माहिती
फार वेगळी माहिती मिळाली. नोकरशाहीत असे काही माणिक मोती असतात, म्हणून ते रहाटगाडगे चालू असते.