पळून चाललेय गाव, आचरे त्याचे नाव! (Aachre)

0
67
_nadipalikde_ghare_achara

गावपळणीची प्रथा कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यातील आचरे पंचक्रोशीत आहे. आचऱ्याला लागून असलेल्या वायंगणी, चिंदर, मुणगे आदी गावांतही दर तीन ते चार वर्षांनी गावपळण होत असते. गावपळणीची प्रथा मुणगे गावात मात्र काही समाजाचीच माणसे पाळतात.

आचऱ्याची रामनवमी, डाळपस्वारी, गणेशोत्सव आदी सण-उत्सवांना संस्थानी थाट असतो. ते आगळेवेगळेपण आचरे गावाच्या गावपळणीतही दिसून येते. चार वर्षें झाली, की गावपळणीचे वर्ष आले याची कुजबुज गावकऱ्यांत सुरू होते. शेतकरी त्यांची नाचणी, भुईमूग, भात यांची कापणी वेगाने करतात. ‘न जाणो म्हाताऱ्यान प्रसाद दिल्यान तर आमका गाव सोडूक व्हयो’ ही चर्चा शेतापासून घरापर्यंत चालू असते. श्रीदेव रामेश्वराला प्रेमाने, आपुलकीने आचरे गावात ‘म्हातारा’ म्हणण्याची प्रथा आहे.

गावपळणीचा कौल मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला रखवालीचे गाऱ्हाणे घालण्यासाठी बारा-पाच मानकरी मिळून लावतात. ‘देवान गावपळणीचो पोटचो उजवो कौल दिल्यान’ याची खात्री झाल्यावर ती वार्ता क्षणार्धात आसमंतात घुमते. संध्याकाळी शेतकरी लोक गावपळणीत राहण्यासाठी तात्पुरत्या मंडपाचा शुभारंभ करतात. त्याला गावपळणीची ‘खुंटी’ पुरणे असे म्हणतात. मंडपासाठी जागांची पाहणी केली जाते. वार्ता मुंबईला पोचल्यावर, मुंबईकर निसर्गाच्या सान्निध्यात राहण्यासाठी रेल्वे बुकिंग ऑफिस, ट्रॅव्हल कंपन्या या ठिकाणी धावपळू सुरू करतात. आचरा परिसरातील शैक्षणिक संस्था सुट्टीच्या कालावधीत शाळा कशी भरवावी याचे नियोजन करतात. सरकारी कार्यालये केवळ चालू ठेवायची म्हणून चालू असतात. ज्यांची शेतीवाडी नाही ते त्यांच्या पै-पाहुण्यांकडे सांगावा धाडतात. पर्यटकदेखील गावपळणीच्या दिवसांत आचऱ्याला येतात. त्यांना गावपळण प्रत्येक आचरावासीयांच्या अंगात मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून मार्गशीर्ष पौर्णिमेपर्यंत कशी चढत जाते ते अनुभवायचे असते. पर्यटकांनाही शेतकऱ्यांनी उभारलेल्या राहुटीत तीन दिवस, तीन रात्री राहवे लागते, _Samuhik_jevanतर गावपळणीचा अनुभव कळतो!

‘त्या काळातील सहजीवनाचा आनंद झापाच्या कावणातच आचरे पारवाडी येथील एका शेतकऱ्याने मालवणी कवनात छान वर्णन केला आहे.

अशी आमची गावपळान
ऱ्हवाक झापाचा कावान
भुकेक माशाचा जेवान
तानेक पेजेचा धुवान
मजेक इस्पिकाचा कुटान
थंड्येक इडयेचा खुटान
निजेक गोणपाटाचा किंतान
असा तीन दिवस भायर मजेत ऱ्हवान
घराक जावचा नदीतसून पेवान।

गावपळणीच्या राहुट्यांतील वास्तव्य जरी तीन दिवस-तीन रात्री असले, तरी त्याची तयारी पंधरा दिवस चालू असते. जमिनी तीन-चार वेळा सारवल्या जातात. प्रत्येकाची घरे नव्याने सजतात. जेवण विभाग, कोंबड्यांसाठी वेगळी जागा, गुरांचा गोठा, झिलग्यांची इस्पिका कुटुची स्वतंत्र खोली, पोरग्यांका धुमशानासाठी वेगळा हॉल आदी हौसेने उभारले जाते. गावपळणीची जेवणेदेखील लज्जतदार लागतात. सोबत नेलेल्या कोंबड्यांची संख्या गावपळणीच्या कडाक्याच्या थंडीत कमी करायची असते. नदीच्या माशांचे कालवण आणि शिकारीचे मटण झाल्याशिवाय गावपळणीच्या रात्रीच्या जेवणाला टेस्ट येत नाही. कुर्ल्याला जाणे, वावळीला जाणे आदी कार्यक्रम तर गावपळणीत अलिखित असतात. रात्री एकत्र भजने, भेंड्या, अंताक्षरी, बायकांच्या फुगड्या आदी करमणुकीचे कार्यक्रम म्हणजे गावपळणीची _rameshawar-devखास मेजवानी. संसारात असलेल्या बायकांबरोबर पुरुषांचेदेखील माहेरपण रामेश्वराने साजरे करायला दिलेले असते. गावपळणीच्या गप्पा आणि गजाली पुढील गावपळण येईपर्यंत चार-पाच वर्षें चवीने चघळल्या जातात.

आचरे गावाचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर शिवशंभू यांनी त्यांच्या भूतगणांना वावर करण्यासाठी ते तीन दिवस चार वर्षांतून एकदा दिलेले असतात. त्यामुळे सर्वजण गावात न थांबता वेशीबाहेरची परंपरा जोपासतात. तसेच, ‘गाव पूर्वी नांदत नव्हता. तो नांदावा म्हणून तीन दिवस गाव ओस पाडेन’ असे वचन रामेश्वराने दिल्याने ती गावपळण होऊन गाव अक्षरशः तीन ते चार वर्षांतून एकदा ओस पाडला जातो.

आकाशाचे छत म्हणजे आमचा रामेश्वर! तृणांकुराची शय्या म्हणजे आमचा रामेश्वर! दगडाची व चिऱ्याची उशी म्हणजे आमचा रामेश्वर! हीच श्रद्धा प्रत्येक आबालवृद्धाची असल्याने त्या तीन दिवसांचे आगळे माहेरपण बायकांबरोबर पुरुषही अनुभवत असतात. गावपळणीच्या काळात आचरे गाव भयाण वाटते. ‘माणसाशिवाय गाव’ ही कल्पना डोळ्यांनी बघणेसुद्धा महाभयंकर असते. तो आवाज, तो कोलाहल, ते हसणे, ती भांडणे… सारे कसे शांत, शांत! रामेश्वरसुद्धा तीन दिवस अगदी शांतपणे कैलासी समाधी लावून बसलेला असतो! रामेश्वराचे दैनंदिन कार्यक्रम मात्र चालू असतात. त्यात खंड नसतो. रामेश्वराची त्रिकालपूजा, महानैवेद्य, महाआरती आदी कार्यक्रम ठरल्याप्रमाणे, ठरल्यावेळी होत असतात.

तीन दिवस-तीन रात्रींसाठी सर्व संसारावर तुळशीपत्र ठेवून गाणे म्हणत रमण्याचा तो क्षण! त्याचा अनुभव गावपळणीच्या अनोख्या ट्रेलरमधून प्रत्येकाला येत असतो. गावपळणीचे मंतरलेले तीन दिवस आणि मंतरलेल्या तीन रात्री प्रत्येकाला आगळेवेगळे तत्त्वज्ञान शिकवून जातात. त्या तत्त्वज्ञानाचे मोल कोणत्याच मापात होऊ शकणार नाही. म्हणूनच प्रत्येक आचरावासीय त्याला अथवा तिला धन्य मानते, की ‘देवानेच त्याला व तिला संस्थान आचऱ्याच्या कुशीत जन्माला घातले!’ म्हणूनच म्हटले जाते, प्रत्येकाने एक तरी गावपळण अनुभवावी.

_os_padlele_gavतीन दिवस-तीन रात्री मजेत घालवल्यावर तेथील बकऱ्यांच्या झुंजी, कोंबड्यांच्या झुंजी मनमुराद अनुभवल्यावर, त्या बकऱ्या आणि कोंबड्यांच्या झुंजीचा निकाल एकच असतो – जिंकले तरी मटण आणि हरले तरी मटण! शेवटी दोघांचा निकालच आणि जिभेची लज्जत! तीन रात्री झाल्यावर बारा-पाच मानकरी गाव भरवण्याचा कौल लावतात. कौल झाला नाही,  एक दिवस वाढला, तरी आचरावासीय खुशीत असतात. कारण एक दिवस वाढल्याने येणारी संकष्टी त्यांना त्या झोपडीतच साजरी करता येते! मार्गशीर्षातील व्रते, मार्गशीर्षातील घट त्या झोपडीतच बसतात. शेवटी म्हणतात ना, माणसाचा देव माणसाबरोबर! पुन्हा चौथ्या दिवशी सर्व मानकरी देवळात जमून गाव भरवण्याचा कौल लावतात. कौल झाल्यावर पुन्हा तोफांचे आवाज, पुन्हा नौबतीच्या इशारती – गावच्या माणसांना परत गावात बोलावण्यासाठी! पण तत्पूर्वीच कौल झाल्याची बातमी वाऱ्याबरोबर चतुःसीमा पार करते. पुन्हा रस्ते फुलून जातात, माणसांनी आणि गुरावासरांनी प्रेमभराने गावात परतण्यासाठी गाव पुन्हा सर्वांना बोलावू लागते. गावाला माणसांची जाग येऊ लागते. संपूर्ण आचरे संस्थान जुनी कात टाकून नव्या उमेदीने ताजेतवाने होते, आणि पुढील चार वर्षांनी येणाऱ्या गावपळणीची आतुरतेने वाट पाहू लागते.

– सुरेश ठाकूर 9421263665
Surshyam22@gmail.com
(सुरेश ठाकूर यांच्या ‘शतदा प्रेम करावे…’ या पुस्तकातील भाग. ते पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वर उपलब्ध आहे.)

About Post Author