…परी जीनरूपे उरावे

_PariJinrupeUravi_1.jpg

‘….  परी जीनरूपे उरावे’ या सुमारे पावणेतीनशे पानांच्या पुस्तकात नऊ प्रकरणे आहेत. त्यातील ‘मुंगीला मारणे अनैतिक आहे काय?’ हे पहिले, सर्वात लहान प्रकरण अडीच पानांचे आहे आणि आठवे ‘चार अक्षरांची सजीव राज्यघटना’ सर्वात मोठे म्हणजे सुमारे साठ पानांचे आहे; पण लेखकाने कोठेही क्लिष्टता येऊ दिली नाही. पुस्तकात चर्चा केलेले प्रश्न मोठे विचारात टाकणारे आहेत. मानवाचे साथीच्या रोगांपासून रक्षण वैद्यकशास्त्राने केले, की उत्क्रांतीतून निर्माण झालेल्या जेनेटिक्सने? (लक्षात घ्या, लेखक व्यवसायाने डॉक्टर आहेत.) मधुमेहासारखे विकार हे शरीरातील विकृती म्हणायची, की अतिशय खडतर परिस्थितीत मानवजात टिकवण्यासाठी केलेली निसर्गाची योजना? सामाजिक जाणीव ही देशप्रेम… इत्यादी संस्कारांतून निर्माण होते की उपजत असते? ‘नर-मादी’मध्ये आकर्षणातून निसर्गाला केवळ प्रजनन साधायचे आहे, की आणखी काही? आणि शेवटी, भविष्यकालीन वैज्ञानिक प्रगतीच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जीन आम्हाला घडवतात तसे आम्ही त्यांना घडवू शकतो का? हे आणि यांसारख्या अनेक प्रश्नांची चर्चा पुस्तकभर पसरली आहे.

ज्यांना केवळ मनोरंजनासाठी पुस्तक वाचायचे आहे त्यांचे सात्त्विक मनोरंजन होईल असेही पुस्तकात बरेच काही आहे.

पुस्तकात अनेक किस्से आहेत. युरोपात चौदाव्या शतकात आलेल्या महाभयंकर प्लेगच्या साथीचे वर्णन मुळातूनच वाचले पाहिजे. प्लेगमुळे अडीच कोटी लोक मृत्युमुखी पडले. त्या काळात युरोपची लोकसंख्या पाच कोटींपेक्षा जास्त नसावी हे लक्षात घेतले तर मृत्यूच्या प्रलयकारी तांडवाची कल्पना यावी. पण त्या प्रलयाचा स्पर्श ज्यू लोकांना फारसा झाला नाही याचे शास्त्रीय कारण आज कळते. ते तेव्हा कळले असते तर प्लेग एवढा पसरलाच नसता! त्यामुळे ती ज्यूंचीच करणी आहे असे समजून त्यांच्यावर हल्ले झाले. त्यात अनेक ज्यू मारले गेले. भारतातील ब्रिटिश काळात झालेल्या प्लेगचाही त्यात उल्लेख आहे. (तोच चाफेकर बंधूंनी केलेल्या रँडच्या हत्त्येला कारण ठरला.) मलेरिया आणि जेनेटिक्स, वनस्पतीमधील समाजव्यवस्था, मधमाश्यांतील जातिव्यवस्था, मनुष्य आणि चिंपांझीसारखे मानवाशी साधर्म्य असलेले प्राणी अन्न सामुदायिक रीत्या वाटून घेतात आणि विरुद्ध लिंगांच्या जोडीदाराबाबत मालकी हक्क गाजवतात त्याचे जीवशास्त्रीय कारण, यांसारख्या अनेक गोष्टींची जेनेटिक्सच्या दृष्टिकोनातून केलेली मीमांसा हे पुस्तकाचे वैशिष्ट्य ठरावे. पुस्तक एकाच वेळी भरपूर माहिती देते आणि विचारही करण्यास लावते. किंबहुना वाचकाला विचारप्रवृत्त करणे हा उद्देशच पुस्तकाचा आहे. त्यामुळे लेखक त्याची मते कोठेही निःसंदिग्धपणे मांडत नाही. पण माहितीच इतकी प्रक्षोभक आहे, की ती वाचकाला विचार करण्यास भाग पाडते.

लेखकाची भूमिका वाचकाला माहिती देणाऱ्याची आहे, प्रचारकाची नाही. तरीही काही वेळा शब्दयोजना अधिक काटेकोर करणे जरूरीचे होते असे वाटते. उदाहरणार्थ मधमाश्यांची जातिव्यवस्था. मधमाश्यांची समाजव्यवस्था आदर्श आहे असे लेखकाने म्हटले आहे. ती समाजव्यवस्था जन्माधिष्ठित जातिव्यवस्था आहे. ती त्या अर्थाने परिपूर्ण (Perfect) आहे. पण परिपूर्णतेचाच दुसरा अर्थ प्रगतीची दारे बंद झाली असा आहे. जी व्यवस्था वैयक्तिक प्रगतीची दारे बंद करते तिला आदर्श कसे म्हणता येईल? मानवी स्वभावाच्या उत्क्रांतीसंबंधी लिहिताना स्त्री-पुरुषांच्या स्वभावातील स्वाभाविक फरकासंबंधी लेखक म्हणतात, पुरुष स्वभावतः आक्रमक, महत्त्वाकांक्षी आणि सत्ता गाजवणारा असतो आणि स्त्री प्रेमळ, सहनशील आणि तडजोड करणारी असते. सारख्याच प्रकारे वाढवलेल्या जुळ्या मुलगा आणि मुलगी यांच्या समोर खेळणी ठेवली तर मुले बंदुका, तलवारी, कार निवडतात तर मुली बाहुल्या निवडतात. संस्काराने त्यात काही फरक पडतो काय हे पाहण्यासाठी तीन पिढ्यांचे निरीक्षण केले आणि तो प्रयोग सोडून देण्यात आला. हे एक असे क्षेत्र आहे, की ज्यामधील संशोधन आर्थिक, राजकीय, सामाजिक आणि मानसिक क्षेत्रावर दूरगामी परिणाम करणार आहे. त्यामुळे त्या क्षेत्रात कोणतेही मत निश्चित करण्यापूर्वी बरेच संशोधन आवश्यक वाटते. लेखक शेवटी एपिजेनेटिक्सकडेही वळतो. “Human epigenom project” पूर्ण झाल्यानंतर जगाचे स्वरूप काय असेल ते सांगणे कठीण आहे. पण ते सध्याच्या जगापेक्षा वेगळे असेल हे नक्की.

_PariJinrupeUravi_2.jpgजेनेटिक्ससंबंधीच्या अनेक प्रकारच्या ऐतिहासिक, सामाजिक, तात्त्विक, वैज्ञानिक माहितीने पुस्तक ओतप्रोत भरले आहे. त्यामुळे ते निश्चित संग्राह्य झाले आहे. असे असले तरी एका बाबतीत ते गोंधळात टाकणारे आहे. उत्क्रांती झाली की केली? पुस्तकात अनेक ठिकाणी “उत्क्रांती केली’, ‘उत्क्रांतीचा हा हेतू होता’ अशा आशयाची वाक्ये वरचेवर येतात. उत्क्रांती केली असेल तर ती करणारा कोण? त्याने मग हे सारे का केले? त्याचा हेतू काय? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. ते प्रश्न माणसाला अध्यात्माकडे घेऊन जातात. पुस्तकाचे शीर्षकसुद्धा त्या दृष्टीने गोंधळात टाकणारे आहे. ‘मरावे परी कीर्तिरूपे उरावे’ या रामदासांच्या उक्तीवरून शीर्षक बेतले आहे. पण तेथे रामदासांना माणसाने (सु)कीर्ती वाढेल असे काम करावे दुष्कीर्ती मिळवू नये असा उपदेश करायचा आहे. येथे जीन रूपे उरायचे म्हणजे माणसाने काय करायचे? उलटपक्षी, जीन्सच कोणत्याही परिस्थितीत माणसाने अमर राहिले पाहिजे अशा तऱ्हेने वागत असतात. येथे व्यक्तीने करण्यासारखे काहीच नसते.

डार्विनच्या उत्क्रांतीच्या सिद्धांताऐवजी (की सिद्धांताबरोबर?) ‘इंटेलिजन्ट डिझाईन’चा सिद्धांत शिकवावा असे मानवसंसाधनविकास मंत्र्यांनी अलिकडे म्हटले आहे. इंटेलिजंट डिझाईनचा सिद्धांत उत्क्रांती अमान्य करतो आणि वेगळेच प्रश्न निर्माण करतो. त्या पार्श्वभूमीवर उत्क्रांती झाली, की केली हा प्रश्न केवळ शब्दच्छलाचा राहत नाही; वैचारिक भूमिकेचा बनतो.

पुस्तकातील चित्रांनी आणि व्यंगचित्रांनी पुस्तकाची रंजकता वाढवली आहे. पुस्तकाला डॉ. राणी बंग यांची प्रस्तावना आहे आणि पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी ते पुरस्कृत केले आहे. पुस्तकाची बांधणी आणि मुखपृष्ठ ‘ग्रंथाली’च्या लौकिकाला साजेसे आहे.

‘… परी जीनरूपे उरावे’
लेखक – डॉ. विश्राम मेहता
ग्रंथाली प्रकाशन, २०१८
किंमत ४०० रुपये
पृष्ठ संख्या – ३२४

– हरिहर कुंभोजकर

About Post Author