Home कला परंपरा कीर्तनसंस्थेची!

परंपरा कीर्तनसंस्थेची!

carasole

‘मी जर वर्तमानपत्राचा एडिटर झालो नसतो तर नि:संशय कीर्तनकार झालो असतो!’

– लोकमान्य टिळक

कीर्तन ही महाराष्ट्राची एक विशेष सांस्कृतिक परंपरा आहे. कीर्तनसंस्थेचे विशेषत: महाराष्ट्रातील स्‍थान लोकहितकारी संस्थेचे आहे. तिचे महत्त्व प्राचीन शिक्षणपरंपरेतील लोकांना तर वाटतेच, परंतु अर्वाचीन शिक्षणपरंपरेतील कित्येक लोकांनीही तिचे महत्त्व वर्णले आहे.

डॉ. भांडारकर, ‘नाट्यकथार्णव’कर्ते शंकरराव रानडे, वामनराव मोडक, हरिपंत पंडित, रावबहादूर काळे इत्यादी काही विद्वान लोक तर विशेष प्रसंगी स्वत: कीर्तनकार बनून लोकशिक्षणाचे काम करत असत. न्यायमूर्ती तेलंग, न्या. रानडे, यांसारखी मंडळी देखील कीर्तनसंस्थेची पुरस्कर्ती होती.

लोकमान्य टिळक, दादासाहेब खापर्डे, रावबहादूर चिंतामणराव वैद्य, शिवरामपंत परांजपे, कृष्णाजीपंत खाडिलकर, नरसोपंत केळकर व औंधचे राजे बाळासाहेब पंतप्रतिनिधी हे तर वेळोवेळी कीर्तनसंमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले होते.

लोकमान्य टिळक १९१८च्या जानेवारीत नागपूरात भरलेल्या पहिल्या कीर्तनसंमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले होते, की ”कीर्तनसंस्था समाजात धार्मिक नीती व श्रद्धा उत्पन्न करणारी अपूर्व अशी शक्ती आहे. समाजात विशिष्ट मताची परिस्थिती निर्माण करायची झाल्यास, मग ते मत राजकीय असो अथवा धार्मिक असो- त्यासाठी कीर्तनसंस्थेसारखे अन्य साधन नाही. इतकेच नव्हे तर माझे असे ठाम मत आहे, की ‘मी जर वर्तमानपत्राचा एडिटर झालो नसतो तर नि:संशय कीर्तनकार झालो असतो!’ स्वराज्यात शिक्षणखात्याचा जर मी मंत्री झालो तर कीर्तनकार, पुराणिक व प्रवचनकार यांना खेडोपाडी हिंडण्यास सांगून त्यांच्याद्वारे शिक्षणप्रसाराचे काम करून घेईन.”

भक्तीचे जे नऊ प्रकार आहेत, त्यांतील दुस-या स्थानी कीर्तन आहे. भक्तीचे नऊ प्रकार असे : १. श्रवण, २. कीर्तन, ३. स्मरण, ४. पादसेवन, ५. अर्चन, ६. वंदन, ७. दास्य, ८. सख्य व ९. आत्मनिवेदन. या सर्वांत पहिल्या तीन प्रकारांवर व त्यांतही ‘कींर्तन’ भक्तीवर संतांनी विशेष जोर दिलेला दिसून येतो.

सगुण अथवा निर्गुण परमात्म्याचे संबोधक अशा शब्दांचे उच्चारण करणे याला कीर्तन म्हणतात. हे एकट्याने करायचे असते. अनेक जणांनी (एकत्र येऊन) मिळून हे केले तर त्यास ‘संकीर्तन’ म्हणतात.

कीर्तनापेक्षा संकीर्तनात विशेष चमत्कार दृष्टीस पडत असल्यामुळे ‘संकीर्तन’ कीर्तनापेक्षा विशेष श्रेयस्कर मानले जाते. मात्र हल्लीच्या काळात कीर्तन-संकीर्तनात भेद करत नाहीत. ते दोन्ही एकच मानतात.

कीर्तन-संकीर्तनाचे तीन प्रकार

१. गुणकीर्तन २. लीलाकीर्तन, ३. नामकीर्तन

१. गुणसंकीर्तन, २. लीलासंकीर्तन ३. नामसंकीर्तन

‘कीर्तना’चा महिमा मोठा आहे. त्यामध्ये सामान्य जनतेचा सुलभतेने उद्धार होण्याची सोय असल्यामुळे नारदमुनींनी कीर्तनाचा आरंभ केला. नारदमुनींनी ते महर्षी व्यासांस शिकवले. व्यास महर्षींनी शुकास शिकवले आणि पुढे त्याचा सर्वत्र प्रसार झाला अशी कीर्तन परंपरा सांगितली जाते.

‘काळ’कर्ते शिवराम महादेव परांजपे यांचे कीर्तनाबद्दलचे उद्गार: असे – ”परमेश्वराच्या गुणसंकीर्तनापासून मनुष्याच्या मनामध्ये ज्या वृत्ती निर्माण व्हायच्या आणि उचंबळून यायच्या त्या अर्थातच परमेश्वरासारख्या उच्च आणि उदात्त स्वरूपाच्या असणार व त्यांच्यामध्ये सत्त्वगुण हाच प्रधान गुण असणार. अशा वृत्ती माणसाच्या मनामध्ये वरचेवर निर्माण होऊ लागल्या आणि त्यांची त्याच्या मनाला सवय लागत चालली, म्हणजे तो मनुष्य नराचा नारायण होण्याच्या मार्गाला लागला, असे म्हणण्याला काहीच हरकत नाही. हे जे महत्त्व, हा जो शुभ फलप्रद भावी परिणाम त्याची प्राप्ती सर्वांना व्हावी, हाच कीर्तनसंस्थेच्या प्रचाराचा आद्यहेतू असला पाहिजे.”

श्रीमंत बाळासाहेब पंत प्रतिनिधी स्वत: काव्य करून गात. त्यांना गाणेबजावणे याचा नाद लहानपणापासून होता. त्यांच्या वडिलांनी त्यांना तुकाराम-रामदास यांचे अभंग गाताना ऐकले तेव्हा त्यांनी त्यांना “तुम्ही अंभग उगीच म्हणत बसता. त्यापेक्षा कीर्तन का करत नाही?” असे विचारले. अशा प्रकारे, वडिलांनी त्यांना कीर्तन करण्यास प्रोत्साहन दिले. श्रीमंत बाळासाहेब पंत यांनी प्रथम दुस-यांच्या पद्यांवर कीर्तन केले. पण पुढे त्यांनी स्वत: परशुराम त्रिंबक यांच्या जन्मावर ‘त्र्यंबकाख्यान’ रचले. श्रीमंत पंतप्रतिनिधी कीर्तन करत हे ब-याच जणांना अज्ञात आहे. ते आपल्या वडिलांच्या सांवत्सरिक श्राध्दोत्सवात स्वत: कीर्तन करत आणि कीर्तनाचा आराखडा दरवर्षी स्वरचित नवीन करून लोकांस ऐकवत.

कीर्तन-संमेलन प्रसंगी अनेक विद्वान अध्यक्षांनी कीर्तन कसे असावे याविषयी विस्तारपूर्वक सांगितले आहे. पण बाळासाहेब पंत प्रतिनिधी यांच्या प्रतिपादनांत विशेष हा, की त्यांनी प्रत्यक्ष कीर्तने रचून कीर्तन असे असावे हे कृतीने दाखवले आहे.

दासबोधात ‘कीर्तनांबद्दल ओव्या आहेत. त्यांतील निवडक ओव्या

 

सगुण कथा या नाव कीर्तन | अव्दैत म्हणिजे निरूपण |
सगुण रक्षून निर्गुण | बोलत जावे || (४-२-२३)
कीर्तन केले पोटासाठी | देव मांडिले हाटवटी |
आहा देवा बुद्धी खोटी | माझी मीच जाणे | ( ५-८-१९)

कीर्तनकाराला ‘हरिदास” म्हणतात. हरिदासी कीर्तनाची ‘पूर्वरंग’ आणि ‘उत्तररंग’ अशी दोन अंगे असतात. पूर्वरंगात अभंग वा गीत घेऊन त्या अनुषंगाने परमार्थपर निरूपण असते, तर उत्तररंगात त्याच विषयाचा दृष्टांत म्हणून रामायण, महाभारत, पुराणे यांतील किंवा ऐतिहासिक प्रसंगांचे आख्यान सांगितले जाते. कीर्तनात सर्व रसांचा परिपोष केला जातो. सभ्यतेच्या मर्यादा सांभाळणारा शृंगारही कीर्तनात वर्ज्य नसतो. कीर्तनकार ज्ञानी आणि बहुश्रुत हवा. म्हणजे त्याला ताला-सुराचे ज्ञान हवे. निवडक जुन्या-नव्या ग्रंथांचे, इतिहासाचे, काव्याचे, साहित्याचे वाचन हवे. प्रचलित सामाजिक, धार्मिक, राजकीय विषयांची किमान तोंडओळख हवी. भक्तिभाव, अल्पसंतोष नि:स्पृहता, सेवाभाव, ज्ञान आणि वक्तृत्व या गुणांनी युक्त असा कीर्तनकार, समाजाच्या उत्कर्षाला, समाजमाणूस घडवायला हातभार लावतो.

इतर अनेक क्षेत्रांप्रमाणे कीर्तनसंस्थेतही या गुणांची ‘वानवा’ निर्माण झाली असल्‍याचे काही वर्षांपूर्वी अखिल भारतीय कीर्तन संस्थेचे (दादर, मुंबई) अध्यक्ष सुरेश उपाध्ये यांच्या निदर्शनास आणून दिले गेले होते. त्‍यावेळी ते म्हणाले, की असे भासते परंतु वस्तुस्थिती तशी नाही. आज विविध माध्यमांच्या कल्लोळात या क्षेत्रातील चांगलुपणाकडे दुर्लक्ष झाले आहे. तेथील यश झाकोळून गेले आहे.

– राजेंद्र शिंदे

 

About Post Author

2 COMMENTS

  1. 29 may 2016 roji maze ‘nachu
    29 may 2016 roji maze ‘nachu keertanache rangi’ he pustak prasiddha jhale.Te maze mama keertanbhushan Laxman Pandurang Phatak yanchya jeevanavar aahe.Tyani 58 varshe sumare 4 hajar Keertane keli. Akhil Bharatiya Keertansansthet tyanchi anek keertane jhali. Tyaveli Purav navache uttam vyavasthapak hote.Aundhchya Pantapratinidhi yaanisudha majhya mamanchi anek keertane tyanchyakade thevali. Maze Pustak mi keertankarana arpan kele aahe.Pustak Sahyadri Prakashan Pune yaani prasiddha kele aahe.

Comments are closed.

Exit mobile version