पद्मा पिंपळीकर – अचलपुरावरील अमीट ठसा

0
315

पद्मा अनंत पिंपळीकर अचलपूरात राहत नाहीत. त्यांनी ते गाव सोडले व त्या लेकाकडे- श्रीरामकडे राहण्यास गेल्या. त्यालाही पंधरा वर्षे होऊन गेली, परंतु त्यांची छाप- त्यांच्या आठवणी अचलपूरच्या विशेषत: पांढरपेशा स्त्रीजीवनावर आहेत. मुख्यत: सुबोध हायस्कूलच्या शिक्षिका म्हणून त्यांच्या विविध आठवणी अचलपूरला आहेत. त्यांनी किती वेगवेगळ्या स्वरूपाची कामे गावात करून ठेवली आहेत !

त्या मूळ खामगावच्या उषा व्यंकटेश साने. त्या लग्नाने पद्मा अनंत पिंपळीकर होऊन अचलपूरमध्ये आल्या. साने-पिंपळीकर, दोन्ही घरे संघ शिस्तीत वाढलेली. पिंपळीकर विदर्भ मिलमध्ये विव्हिंग मास्तर होते – स्वत: अनंतराव शाळेत शिक्षक – ते नोकरीला लागले व निवृत्त झाले ते हेडमास्तर म्हणूनच. कर्तव्यकठोर, शिस्तप्रिय, कडक असा त्यांचा लौकीक. संघविचारांचे कार्यकर्ते म्हणून त्यांनी तो स्वभावविशेष सांभाळला. मात्र त्यांनी पत्नीला अनेकविध कामे करण्यास प्रोत्साहित केले- प्रेरणा दिली.

पद्मा (उषा साने) यांचा जन्म 18 जानेवारी 1939 चा. त्या गणित घेऊन बी एससी झाल्या 1959 साली. त्यांचे वडील एमबीबीएस डॉक्टर, परंतु त्यांनी नोकरी भारतीय लष्करात केली- निवृत्त झाल्यावर खामगावात दवाखाना थाटला. त्यांना आठ मुली. पैकी उषा (पद्मा) यांचा विवाह 1960 साली झाला. पद्मा व अनंत यांना तीन अपत्ये झाली- विवेक, दीपा व श्रीराम. विवेक अनंत पिंपळीकर यांनी लष्करी शिक्षण घेऊन हवाई दलात प्रवेश केला. ते चिकाटीने व मेहनतीने सब लेफ्टनंट या पदावर पोचले. त्यांचे विमान सरावात दुर्घटनाग्रस्त झाले व त्यातच विवेक यांना वीरमरण आले. त्यांनी घेतलेल्या प्रशिक्षणाच्या काळात लिहिलेली पत्रे संकलित करून त्यांच्या बहिणीने- दीपाने ‘आकांक्षा पुढति जिथे…’ हे पुस्तक प्रकाशित केले आहे.

अचलपूरच्या सुबोध हायस्कूलशी संलग्न असलेल्या ज्युनिअर कॉलेजला नाव सब लेफ्टनंट विवेक पिंपळीकर ज्युनिअर कॉलेज असे देण्यात आले आहे. मुलगी दीपा यांचा विवाह औरंगाबाद येथील विवेक खेकाळे यांच्याशी झाला. त्या ज्युनिअर कॉलेजला प्राध्यापक म्हणून निवृत्त झाल्या. तर मुलगा श्रीराम इंजिनीयरिंगचे शिक्षण घेऊन अदानी ग्रूप या कंपनीत असोसिएट व्हॉइस प्रेसिडेंट म्हणून कार्यरत आहे.

पद्मा यांनी त्यांचे अचलपूरातील जीवन समाजकार्यासाठी वाहून घेतले.

* पद्मा गृहिणी समाज महिला मंडळाच्या कामाची लेखी जबाबदारी पाहत असत.

* त्यांनी अचलपूरला विश्व हिंदू परिषदेचे दायित्व चार वर्षे सांभाळले. त्यावेळी त्यांनी धारणी येथे रामनवमीला शोभायात्रा काढली होती. त्यांचा सक्रिय सहभाग राम मंदिर बांधण्यासाठी झालेल्या आंदोलनात 1990 -91 मध्ये होता.

* कारगिल येथे पाकिस्तान सोबत झालेल्या युद्धासाठी गावातून निधी संकलन केले गेले. त्यावेळीही पद्मा यांनी निधी संकलन मोहिमेत सहभाग घेतला होता.

* त्यांनी समाजातील लहान मुलांसाठी शुभंकरोती संस्कार शिबिर सुरू केले. त्यांच्यातील शिस्तप्रिय शिक्षक त्या लहान मुलांना संस्काराचे धडे देऊ लागला. मुले व त्यांचे पालक उन्हाळ्यातील त्या संस्कार शिबिराची आतुरतेने वाट पाहत असत.

* त्या परतवाडा येथील संस्कार भारती या संघटनेच्या संस्थापक आहेत. त्यांनी संस्कार भारती संघटना परतवाडा-अचलपूर नगरीत रुजवली. संस्कारभारती शाखेने त्यांच्या अध्यक्षतेखाली विविध उत्सवांच्या निमित्ताने उत्तमोत्तम कार्यक्रम आयोजित केले होते. त्यांनी संस्कार भारती समाजात नावारूपास आणली. त्यांनी जनमानसात रुजवलेली संस्कार भारती त्यांच्याच अखत्यारीत तयार झालेले कार्यकर्ते समर्थपणे सांभाळत आहेत.

* पद्मा यांना नाट्य व लेखन यांची आवड असल्यामुळे त्यांनीही विदर्भ मिलच्या अनेक नाटकांमध्ये विविध भूमिका केल्या. त्यांनी स्वतः संस्कार भारतीच्या अनेक कार्यक्रमांचे कथालेखन केलेले असे.

* त्यांनी ‘श्री लक्ष्मी गृहोद्योग औद्योगिक उत्पादक संस्थे’चे सतत तीन वर्षे कार्यकारी अध्यक्ष पद भूषवले आणि संस्थेच्या कामाचा श्रीगणेशा केला. त्यामुळे परतवाडा येथील महिलांना रोजगाराची संधी मिळाली.

* ‘विद्या भारती’ संस्थेच्या त्या सक्रिय कार्यकर्त्या होत्या. त्यांनी परतवाडा येथील दहा महिला मंडळांना एकत्र आणून ‘मातृशक्ती संमेलन’ ब्राह्मण सभा कार्यालयात आयोजित केले.

* त्यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायत या ग्राहकांच्या हितासाठी असलेल्या संघटनेत अनंतरावांसोबत सक्रिय सहभाग दिला. त्यांची शासनातर्फे शैक्षणिक संस्थांमध्ये ग्राहक जागृती करण्यासाठी अधिवक्ता म्हणून निवड झालेली होती. त्यांनी ‘भोळी खरेदी धोक्याची’ हे पथनाट्य लिहून ते इतर महिलांसह सादर केले होते. ग्राहक मेळावे आयोजित करणे, ग्राहक हितासाठी विशेषांक छापणे या सर्वात त्यांचे सहकार्य अनंतरावांना होते.

* त्यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायत या ग्राहकांच्या हितासाठी असलेल्या संघटनेत अनंतरावांसोबत सक्रिय सहभाग दिला. त्यांची शासनातर्फे शैक्षणिक संस्थांमध्ये ग्राहक जागृती करण्यासाठी अधिवक्ता म्हणून निवड झालेली होती. त्यांनी ‘भोळी खरेदी धोक्याची’ हे पथनाट्य लिहून ते इतर महिलांसह सादर केले होते. ग्राहक मेळावे आयोजित करणे, ग्राहक हितासाठी विशेषांक छापणे या सर्वात त्यांचे सहकार्य अनंतरावांना होते.

पद्मा यांना वाचनाची आवड होती. फडके, खांडेकर, आपटे यांसारख्या नामवंत लेखकांच्या कादंबर्‍या, पु.ल. देशपांडे यांची प्रवासवर्णने आणि त्यांचे इतर साहित्य, ब.मो. पुरंदरे यांची शिवचरित्रमाला, गो.नी. दांडेकर यांची पुस्तके त्यांच्या विशेष आवडीची ! त्या वाचनामुळे विचार प्रगल्भ होत गेले असे त्या म्हणतात.

त्यांनी उतारवयात दासबोधाचा अभ्यास करून ‘दासबोध पत्राचार परीक्षा’ दिल्या. त्या दासबोध, ज्ञानेश्वरी, तुलसी रामायण, हरिविजय यांसारख्या धार्मिक ग्रंथांचे नेमाने वाचन करतात. त्यांनी त्यांच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी ‘श्रीज्ञानेश्वरी हस्तलिखित प्रत’ लिहून पूर्ण केली!

त्यांनी सब लेफ्टनंट विवेक पिंपळीकर यांच्या नावाने अचलपूरला व्याख्यानमाला सुरू केली होती. व्याख्यानमाला तीस वर्षे सुरू होती. त्यावेळी परतवाड्याचे लोक आतुरतेने व्याख्यानाची वाट पाहत असत. त्यावेळी पद्मा आणि त्यांचे कुटुंबीय आवर्जून परतवाड्यास जात असत. याशिवाय त्यांनी उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार सुरू केला. त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाचा, कार्यशैलीचा अमिट असा ठसा अचलपूरच्या सामाजिक क्षेत्रातील जवळपास सर्व क्षेत्रांत उमटवला. पद्मा व अनंत, दोघेही नागपूरला लेकाकडे स्थलांतरित झाले, अनंतरावांचे निधन 2009 मध्ये झाले.

वीरमाता पद्मा यांचे कार्यमग्न जीवन अचलपूरमध्ये प्रेरणा देणारे म्हणून मानले जाते. त्या मुलगा श्रीराम याच्या तिरोड्यास (भंडारा जिल्हा) असतात. त्यांची कमतरता अचलपूर-परतवाड्याच्या सामाजिक क्षेत्रात जाणवते.

पद्मा पिंपळीकर 7875882316

अनुपमा खवसे  9420235506 anukhawase29@gmail.com

—————————————————————————————————————

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here