पंपकीन हाऊस – निराधारांचे घर

2
61
carasole

‘पंपकीन हाऊस’ या संस्थेच्या आवारात आईवडील नसलेली, पालकांकडे सांभाळ करण्याची क्षमता नसलेली साठ ते पासष्ट अनाथ-निराधार मुले- रमली आहेत. ते ठिकाण अहमदनगरजवळील आरणगाव रस्त्यावरील विद्यानगरजवळ आहे. प्रेमाच्या व मायेच्या शिक्षणाने मुलांना आपलेसे केले आहे. मुले त्यांच्या स्वत:च्या पायांवर उभे राहण्याची क्षमता त्यांच्यात निर्माण होईपर्यंत तेथेच राहणार आहेत. अहमदनगर येथील पिल्ले परिवाराचा तो उपक्रम.

स्टेला पिल्‍ले व मॅन्यूअल पिल्ले हे दांपत्य त्या अनाथ मुलांचा सांभाळ करत आहे. पंपकीन हाऊस म्हणजे लाल भोपळ्याचे घर. भोपळा हे मुलांचे आकर्षण असते. त्यांनी भोपळ्याची गोष्ट ऐकलेली असते. लाल रंगसुद्धा मुलांना आवडत असतो. पिल्ले परिवार दोन दशकांपासून नगरमध्ये वास्तव्यास आहे. स्टेला पिल्ले या एका सरकारी शिक्षणसंस्थेत शिक्षिका असताना होत्या. त्या तेथे येणाऱ्या गरीब व अनाथ मुलांना मदत करत असत. त्यांनी दुसऱ्या एका शिक्षणसंस्थेतील अनाथ मुलांची स्थिती पाहून त्यांनी तशा मुलांचा सांभाळ करण्याचे ठरवले. पती मॅन्युअल पिल्ले यांनीही त्यांना साथ दिली. त्यांचा व्यवसाय शिवणकामाचा. पाच-सहा वर्षांपूर्वी तसे एक-दोन अनाहूत पाहुणे त्यांच्या घरी दाखल होऊन त्यांच्या कुटुंबाचे सदस्य झाले. मग त्यांनी २००३ मध्ये ‘पंपकीन हाऊस’ या संस्थेची स्थापना करून त्याद्वारे दीड ते बारा वर्षें वयोगटांतील तब्बल चौसष्ट अनाथ मुलामुलींना आश्रय दिला आहे. या कामात त्यांना त्यांची मुलगी फियोना व जावई कार्व्हालो व्हियाणी यांची साथ आहे.

मुले मुंबई, मालेगाव, नाशिक, पुणे तसेच नगर येथून आलेली आहेत. ती अनाथ आहेत. काहींचे पालक आहेत, पण ते आर्थिकदृष्ट्या समर्थ नाहीत. मुलांमध्ये जे नैसर्गिक गुण आहेत त्यांना ‘पंपकीन हाऊस’ पाठबळ देते. त्यांना इंग्रजी, फ्रेंच, संगीत, नृत्य, कला आदी शिकवून तयार करते. त्यासोबतच त्यांना व्यावसायिक कोर्सला पाठवते.

पिल्ले यांनी अनाथ मुलांचे पालन करण्याचा निर्णय घेतला कारण त्यांनीही गरिबी अनुभवली आहे. काही अनाथ मुले ‘चाईल्ड लाईन’द्वारे आली आहेत तर काहींना आईवडिलांनी आणून सोडली आहेत. ‘चाईल्ड लाईन’ ही जागतिक स्तरावरील संस्था आहे. त्या संस्थेमार्फत अनाथ मुलांना मदत करण्याचे काम केले जाते. ती संस्था दत्तक मुलांची प्रकरणेसुद्धा हाताळते. संस्थेचे मुख्ये कार्यालय अहमदनगर येथे असून गिरीश कुळकर्णी हे तिचे प्रमुख आहेत. संस्थेचा हेल्प लाईन नंबर आहे – ९५१०.

भरत नाट्यम्, आर्ट ऑफ क्राफ्ट, नृत्य, कला, टेलरिंग, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स हे विषय शिकवण्यासाठी सरकारी तंत्रशिक्षण महाविद्यालयाचे शिक्षक बोलावले जातात. त्याचसोबत श्रीरामपूर येथील ‘जोजफ टेक्निकल स्कूल’ येथे मुलांना पाठवून शिकवले जाते. तेथील बालरोगतज्ज्ञ डॉ. विवेक देशपांडे त्या मुलांना वैद्यकीय उपचारासाठी सहकार्य करतात. भोजन, कपडे, शैक्षणिक साहित्य यांसाठी लागणारा महिन्याचा सुमारे पस्तीस  ते चाळीस हजारांचा खर्च पिल्ले दाम्पत्य स्वत:च्या उत्पन्नातून भागवतात व कमी पडले तर मित्रांची मदत घेतात.

‘रोटरी, लायन्स क्लब’ यांसारख्या सामाजिक संस्थांची मदत या संस्थेस मिळाली आहे. मुलांना वयाच्या एकविसाव्या वर्षांपर्यत सक्षम नागरिक म्हणून घडवण्याचा दांपत्याचा मानस आहे. सक्षम नागरिक घडवणे म्हणजे माणूस म्हणून उभे करणे, जात-पात असे भेदभाव न पाहता सर्वधर्म समभाव जोपासणारा सक्षम असा माणूस घडवणे हे संस्थेचे उद्दिष्ट आहे.

सामूहिक वाढदिवस, सहली यांद्वारे मुलांमध्ये संघटनकौशल्याचे गुण रुजत आहेत. एकत्रित अभ्यास, जेवण व खेळ हा त्यांचा दिनक्रम झाला आहे. या अनोख्या कार्याबद्दल संस्थेला अहमदनगर येथील ‘स्नेहालय’ या संस्थेद्वारे ‘बालोपासक स्वर्गीय सानेगुरुजी धडपड्या मुला’चा पुरस्कार; तसेच, युवाशक्तीचा पुरस्कारही मिळाला आहे. त्यांच्या मायेच्या उबेतून बळ देऊन पिल्ले परिवार अनाथांना सनाथ बनवण्याच्या दृष्टीने कार्य करत आहेत.

संस्था पत्ता :

पंपकीन हाऊस, विद्या नगर,

नगर -दौंड रोड, प्लॉट नंबर १४५, अहमदनगर

९८५०२४५५५३

About Post Author

2 COMMENTS

Comments are closed.