महाराष्ट्रात नृत्यकलेला पन्नासच्या दशकात फारशी प्रतिष्ठा नव्हती. त्यावेळी पुरुष नृत्य कलाकाराला ‘नाच्या’ म्हणून हिणवण्यात येत असे. अशा काळात कुटुंब आणि समाजातील अपसमजांना डावलून वसईतील श्रीधर पारकर यांनी केलेली वाटचाल महत्त्वपूर्ण ठरते. पारकर पति–पत्नीने ‘नृत्यकिरण’ या संस्थेच्या माध्यमातून जवळपास सात दशके नृत्यसेवा केली…
श्रीधर पारकर यांचा जन्म 15 जुलै 1929 रोजी झाला. त्यांचे मूळ गाव रत्नागिरी येथील ‘काळबादेवी’ हे बेट. त्यामुळेअवतीभवती समुद्र. कोरड्यास म्हणजे कालवणासाठी मासळी पकडून आणणे हे नऊ–दहा वर्षांच्या श्रीधर याचे नेहमीचे काम. श्रीधर थोडा मोठा झाल्यानंतर त्याला वडिलांनी मुंबईला नेले. त्याचे वडील डॉकयार्ड परिसरात हॉटेल चालवत. त्यांना श्रीधर मदत करू लागला. तेव्हा म्हणजे 14 एप्रिल 1944 रोजी जवळच, गोदीमध्ये स्फोट झाला. घाबरून श्रीधर, त्यांचे वडील आणि मामेभाऊ हे सैरावैरा पळू लागले. त्यानंतर आयुष्यात निर्माण झालेल्या अस्थिर परिस्थितीत दिवस काढत असताना, श्रीधर पारकर यांना स्वत:मधल्या नृत्यनिपुणतेची व नृत्याच्या ध्यासाची जाणीव झाली. त्यांनात्यांच्या वयाच्या योग्य टप्प्यावर भैरव प्रसाद नावाचे नृत्यशिक्षक भेटले.
भैरव प्रसादजी यांनी त्यांना नृत्याचे धडे दिले. चपळ श्रीधर यांनी त्यांचे ते धडे व्यवस्थित गिरवले. त्यामुळे श्रीधर यांना नृत्याची खरी ओळख झाली आणि त्यांनी त्यानंतर मागे वळून पाहिले नाही. त्यांनी त्यांचे जीवन नृत्यास वाहून घेतले. ते वाद्यवादन, संगीत दिग्दर्शन, गायन, नृत्यरचना, नेपथ्य, नृत्याचे सादरीकरण, नृत्य दिग्दर्शन अशा अनेकविध आघाड्यांवर सफाईने वावरले. त्यांनी ‘नृत्यकिरण’ ही संस्था 1951 साली स्थापन केली. त्यांनी त्या संस्थेच्या माध्यमातून वयाच्या 88 व्या वर्षांपर्यंत अखंड नृत्यसाधना केली. पारकरसर यांचे वयाच्या त्र्याण्णव्या वर्षी 10 एप्रिल 2022 रोजी निधन झाले.
त्यांनी नृत्य म्हणजे डान्सचे धडे गिरवण्यास बोरिवली (मुंबई) येथेसुरुवात केली. त्यांनाबोरिवलीतील एका नृत्य शिक्षकाने ‘तू नृत्य कसे करतोस? हे दाखवण्यास सांगितले. श्रीधरयांनीगुरूवंदना करून कथ्थकचे तोडे सादर केले. ते पाहून ते नृत्य शिक्षक उभे राहिले आणि त्यांनी श्रीधर यांना मिठीच मारली. त्यापुढील काही वर्षांतच श्रीधर यांचे नृत्यासंदर्भातील ज्ञान इतके वाढले, की ते नृत्याच्या कथेसाठी सगळी प्रॉपर्टी स्वतः बनवू लागले. ते पक्षी, राक्षस, विविध प्रकारचे मुकूट, वेगवेगळे प्राणी, पालख्या, सिंहासन, ढाल–तलवारी अशा एक ना अनेक गोष्टी बनवू लागले.
यथावकाश श्रीधर वसईत वास्तव्यास आले, पण त्याआधी श्रीधर यांनी चित्रपटात नृत्य कलाकार म्हणून काम करण्याचा ध्यास घेतला. त्यांना त्यांच्या वयाच्या बाविसाव्या वर्षी राज कपूर यांच्या ‘आवारा’ या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. ते ‘घर आया मेरा परदेसी, प्यास बुझी मेरे अखियन की’ या गाण्यात राज कपूर व नर्गिस यांच्यासोबत झळकले. पारकर यांनी त्यानंतर पन्नासच्या वर चित्रपटांत काम केले, नृत्यनाटिका केल्या.परंतु त्यांचे भाग्य चित्रपटातील नर्तक म्हणून नव्हते. त्यांनी नृत्याच्या संदर्भात दुसरा योग्य मार्ग निवडला.वसईत आल्यानंतर, पारकर यांनी त्यांची पत्नी आशालतायांच्यासह वसईतच स्वतंत्रपणे काम सुरू केले. आशालता यादेखील कथ्थक नृत्यांगना होत्या. श्रीधर पारकर हे त्यांच्या नृत्यकौशल्याने छाप पाडत. वसईकरांनी देखील पारकर यांना भरभरून प्रेम दिले. त्यांनी वसईतील अनेक शाळांमधील विद्यार्थी–विद्यार्थिनींना नृत्याचे धडे दिले. वसईतील न्यू इंग्लिश स्कूलचे शिक्षक म्हापणकर यांनी पारकर यांना प्रोत्साहन दिले आणि हळूहळू पारकर लोकप्रिय होऊ लागले. प्रतिष्ठित घरातील मुले–मुली व तरुणीही त्यांच्याकडून विश्वासाने नृत्याचे धडे घेऊ लागले. गुरू घनश्यामदास; तसेच, उदयशंकर यांच्या शास्त्रोक्त पठडीत शिकलेल्या पारकर यांनी तशीच प्रशिक्षण पद्धत अनुसरली. पारकर पति–पत्नीने नृत्यसेवा जवळजवळ सात दशके केली. महाराष्ट्रात नृत्यकलेला पन्नासच्या दशकात फारशी प्रतिष्ठा नव्हती. त्यावेळी पुरुष नृत्य कलाकाराला ‘नाच्या’ म्हणून हिणवण्यात येत असे. अशा काळात कुटुंब आणि समाजातील अपसमजांना डावलून पारकर यांनी केलेली वाटचाल महत्त्वपूर्ण ठरते.
पारकर दाम्पत्याच्या पोटी राजीव हे पुत्ररत्न1958 साली जन्माला आले. त्यानंतर नीता या कन्येचा जन्म झाला. चौकोनी कुटुंब सुखेनैव नांदत होते. तरीही, काही प्रमाणात पारकर यांना आर्थिक विवंचनेला तोंड द्यावे लागले. त्या काळात त्यांना वसईतील त्यांच्या मित्रवर्गाने खूप सहकार्य केले. पारकरही त्यांच्याप्रती कृतज्ञ राहिले. वसईत जेव्हा पारकर दाम्पत्य आले, तेव्हा ते प्रथम काणेवाड्यातील एका खोलीत राहू लागले. तेथे पंखाही नव्हता.त्यामुळे उन्हाळ्यात त्यांना, विशेषतः त्यांच्या दोन लहान मुलांना खूप त्रास होऊ लागला. तरीही, त्यांनी ते दिवससंयमाने काढले. दोघांनीही ‘नृत्य हाच अर्थार्जनाचा मार्ग’ हे ठरवले.
पारकर या दाम्पत्याने नृत्याचे कार्यक्रम वसईत आणि वसईबाहेरही केले. त्यांनी ‘नृत्यकिरण’यासंस्थेद्वारे ‘वनराणी’, ‘बाल्कनजी बारी’, ‘शिकाऱ्याचं हृदय परिवर्तन’, ‘अंधारातून प्रकाशाकडे’, ‘चांडलिका’ असे अनेक प्रयोग केले. त्यापैकीफादर हिलरी फर्नांडिस लिखित‘अंधारातून प्रकाशाकडे’ या येशू ख्रिस्ताच्या जीवनावर आधारित संगीत नृत्यनाट्याचे दिग्दर्शन पारकर यांनी केले होते व त्यात प्रमुख भूमिकाही केली होती.
पारकर यांनी नृत्यसाधकांसाठी काही नियम तयार केले होते ते असे– नियमित रियाज करणे, वेळ पाळणे, नृत्य करताना तंग पेहराव घालू नये, विशेषतः मुलींनी पंजाबी ड्रेस घालावा, घुंगरांना नमस्कार केल्याशिवाय ते पायांवर बांधू नयेत, खाण्यावर नियंत्रण असावे.
अशा या कलासक्त दाम्पत्याचा प्रेरक जीवनपट पारकर यांनीच लिहिलेल्या ‘तपस्या’ या आत्मकथनात वाचण्यास मिळतो. तो नव्या नृत्यप्रेमी पिढीला प्रेरक ठरेल. डिंपल प्रकाशनाने ते पुस्तक प्रकाशित केले आहे.
– संदीप राऊत 9892107216
———————————————————————————————————————————————