विमलेश्वराच्या मंदिरासभोवती दाट वनराई आहे. आकाशाकडे झेपावणारे उंचच उंच माड, पोफळी आदी झाडे मन लुभावून टाकतात. परिणामी, तेथे कमालीची शांतता व शीतलता जाणवते. डोंगराच्या पायथ्याशी अखंड कातळात कोरलेल्या कलाकृतीतून मंदिर साकारले आहे. मंदिराच्या दोन्ही बाजूंस दोन हत्ती कोरलेले आहेत व त्यांच्या शेजारी दीपमाळा आहेत. मंदिराच्या जवळून, वरील बाजूने वाहतुकीचा मार्ग जात असल्याने मंदिराच्या सभोवतीचा कडा सुमारे तीन फूट खोदून चर काढलेला आहे. कळसाचे बांधकाम सिमेंटने उंच बांधून वाढवण्यात आले आहे.
प्रवेशद्वारावर मानवी रूपातील पाच कोरीव शिल्पे आहेत. ती शिल्पे पंचतत्त्वांची प्रतीके मानली जातात. मंदिराच्या पाय-या चढताच भलीमोठी घंटा टांगलेली दिसते. पुढे जाताच, 35 × 30 × 12 फूट क्षेत्रफळ असलेला सभामंडप लागतो. मंदिरात अंधार असल्याने तेथे वटवाघळांचा वावर बराच असतो. त्यांच्या चित्काराने दचकायला होते. तेथून काही पाय-या चढल्यावर मंदिराचा गाभारा लागतो. मध्यभागी सुबक आकारातील शंकराची पिंड व नंदीची मूर्ती लक्ष वेधून गेते. तेथील गाभा-यात उंचावर असलेले शिवलिंग हे भारतातील दुर्मीळ वैशिष्ट्य! मानवी कल्पकता व निसर्ग यांचा सुंदर मिलाफ असलेले ते प्राचीन मंदिर त्याच स्थितीत टिकून आहे. मंदिराच्या समोर ओढा असून त्याला बारमाही पाणी असते. तेथे दोन झरे वाहताना दिसतात. पावसाळ्यात ओढ्याचे पाणी गढूळ होत असले, तरी झ-याचे पाणी मात्र स्वच्छ असते. त्यामुळे ते गंगेचे पाणी मानले जाते. लेण्यांच्या दगडांतून सफेद गोंदासारखा द्रव पाझरतो, त्यास स्थानिक बोलीभाषेत ‘पाषाण’ असे म्हणतात. त्या द्रवाचा उपयोग स्थानिकांकडून दमा या आजारावर केला जातो.
नयनरम्य परिसर आणि शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या विमलेश्वर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या मनात मंदिर कायमचे कोरले जाते. अलिकडच्या काळात, त्या परिसरात चित्रपटांचे चित्रिकरण झालेले आहे.
विमलेश्वर मंदिरात जाण्यासाठी मुंबईहून रेल्वेने कणकवली स्थानकावर उतरावे. तेथून विजयदूर्गला जाणारी गाडी वाडा गावातून जाते. तेथून थेट गाडी न मिळाल्यास देवगडला जाऊन तेथून विजयदूर्गची गाडी पकडता येते. स्वतःच्या वाहनाने जाताना मुंबई-गोवा महामार्गावर तरळा या गावातून एक फाटा वाड्याला जातो. त्या रस्त्यानेदेखील वाडा गावात पोचता येते.
– पांडुरंग भाबल