निवांत अंधमुक्त विकासालय

3
32
carasole
अंधांसाठी सर्व काही!

There are problems in the world We will solve them There are hindrances on the road We will cross them There are difficulties in life We will overcome them There are questions in life We will answer them Inspite of problems, hindrances, difficulties And questions Life is Beautiful We the students of NIWANT Solemnly pledge that We will try to make this world More Beautiful place to live in

ही प्रार्थना आहे ‘निवांत अंधमुक्त विकासालया’ तील मुलांची. मुख्य म्हणजे त्यांनी प्रार्थनेतील प्रत्येक शब्दाचा अर्थ प्रयत्नपूर्वक आचरणात आणलेला आहे. त्यांनी त्यांचं आयुष्य खरोखरच सुंदर बनवलं आहे असं मी म्हणेन.
मी ‘निवांत अंधमुक्त विकासालया’त गेले होते. अंदाजे चार तास तिथं होते. संस्थेच्या नावात ‘निवांत’ हा शब्द असला तरी तिथं एकही विद्यार्थी/विद्यार्थिनी एक क्षणभरही बसलेला दिसणार नाही. निवांतपणा हा त्यांच्या वृत्तीत आहे. ती सर्वजण अगदी relaxed moodमधे असतात. मुक्तपणे, स्वत:च्याच घरात वावरत असल्याप्रमाणे ती असतात आणि ते त्यांचंच घर आहे असं जाणवलं मला. त्यांनी त्यांच्या अंधपणाचा बाऊ केलेला नाही, किंवा कोणी तसा करावा अशी अपेक्षाही त्यांनी ठेवलेली नाही. संस्थेची स्थापना मीरा बडवे यांनी 1996 साली केली. त्यामागचा उद्देश हा की अंध मुलांना दहावीपुढील शिक्षण घेता यावं- मग ते कोणत्याही शाखेचं असो; आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे शिक्षणाबरोबरच त्यांची शारीरिक, मानसिक व आत्मिक वाढ व्हावी.

संस्थेची स्थापना करावी असं केव्हा व का वाटलं? असं मी विचारलं, तेव्हा मीरा यांनी मला सांगितलं की, त्यांचे पती आनंद हे त्यांच्या वाढदिवशी अंधांसाठी असणार्‍या एका संस्थेत जाऊन देणगी देत असतात; रक्तदान करत असतात. एके वर्षी, मीरा यांना वाटलं, की चला, आपणही जाऊन बघुया, कुठे आपले पती जातात देणगी द्यायला व रक्तदान करायला ते! म्हणून त्याही आनंद यांच्याबरोबर गेल्या. तिथं छोटीशी अंध मुलगी मीरा यांना येऊन चिकटली, त्यांनी प्रेमानं, नकळतच तिला जवळ घेतलं. मीरा व ती मुलगी, दोघींनाही खूप चांगलं वाटलं. मीरा म्हणतात, तो क्षण माझ्या आयुष्याचा ‘टर्निंग पॉईंट’ झाला.
त्या दिवशी मीरा यांनी अंध मुलांसाठी काम करायचं ठरवलं. घरच्यांचा पाठिंबा होताच. आर्थिक परिस्थितीही चांगली होती. त्यांनी दहावीनंतरच्या पुढील शिक्षणासाठी अंध मुलामुलींना मदत करायची असं ठरवलं. मदत म्हणजे केवळ आर्थिक मदत नव्हे. तर त्यांना शिकवणं, त्यांच्या सर्व प्रकारच्या अडचणी सोडवणं.

मीरा MA (Literature) झाल्या आहेत. B.Ed ही झाल्या आहेत. त्या पुण्यातच कर्नाटक हायस्कूलमधे नोकरी करत होत्या. त्यापूर्वी त्यांनी कॉलेजमधेही नोकरी केलेली आहे. मीरा यांना मुलगी झाली तेव्हा त्यांनी नोकरी सोडली व पुढे, काही वर्षांच्या गॅपनंतर, मुलगी मोठी झाल्यावर त्यांनी  हे काम चालू केलं.

 

‘निवांत अंधमुक्त विकासालया’ची स्थापना झाल्यापासून core teaching मीरा करतात. त्यांचे पती आनंद हे accounts व इतर टेक्निकल गोष्टी पाहतात. तिथं येणारी मुलं कोणी आर्टस, कोणी, कॉमर्स, कोणी लायब्ररी सायन्स, कोणी लॉ शिकणारी आहेत. त्या प्रत्येकाला शिकवण्याचं, त्या मुलांच्या शंका सोडवण्याचं काम मीरा करतात. कोणी मराठी मिडियममध्ये शिकणारा, तर कोणी इंग्लिश मिडियममधे शिकणारा. प्रथम मीरा स्वत: तो विषय शिकतात. एका मुलीला लायब्ररियनचा कोर्स करायचा होता तर त्यासाठी मीरा यांनी आधी तो कोर्स केला. म्हणजे विषय चांगला शिकवता येईल म्हणून! इकॉनॉमिक्स, सायकॉलॉजी, फिजिऑलॉजी, अॅनाटोमी, तुम्ही जे नाव घ्याल तो विषय मीरा मुलांना शिकवू शकतात. अॅनॉटोमी शिकवण्यासाठी, मीरा स्वत: एका डॉक्टरकडे जाऊन सर्व शिकून आल्या व आता त्या मुलांना शिकवतात, म्हणजे मुलांची तयारी करून घेतात. त्या डिसेक्शनपर्यंत मुलांना शिकवू शकतात.

त्यांचं शिकवणं सकाळी सातपासून सुरू होतं. ते रात्री आठ-नऊपर्यंत अखंड चालू असतं. मुलं वेगवेगळी असतात, त्यांची संख्याही कमीजास्त असते. मुलं आपापली कॉलेजं करून मग ‘निवांत’मधे येतात. मीरा यांच्या बंगल्यात त्या मुलांचा मुक्त वावर असतो. त्यांच्याकडे दोनशे अंध मुलं विविध प्रकारचं शिक्षण घेत आहेत. मीरा स्वत: त्या सर्व मुलांची कॉलेजांची फी भरतात.

पंधरा वर्षांनंतर, त्यांचे जे विद्यार्थी शिकून तयार झाले आहेत ते इतरांना शिकवायला ‘निवांत’मध्ये येतात. ‘निवांत’मधील विद्यार्थ्यांची नावं ‘मेरिट’मध्ये झळकलेली आहेत. बसवराज, शिवाजी लोंढे, विकास वाघमारे, वृषाली, नितिन धावरे यांनी आपापल्या ठिकाणी मोठं नाव मिळवलं आहे. काही मुलं जर्मन, फ्रेंच, जापनीज भाषा शिकलेली आहेत. काही मुलांनी जपानी, फ्रेंच या भाषांवर प्रभुत्व मिळवलं आहे. ती मुलं त्या भाषांतील पुस्तकं ‘ब्रेल’मध्ये करत आहेत. मुलांसाठी ‘ब्रेल’प्रिंटर’ही घेतलेला आहे. तो लायब्ररियन वृषाली चालवते.

 

मीरा यांनी त्यांना शिकवताना आरंभी वेगवेगळे प्रयोग करून पाहिले. मुलं दहावी-बारावीपर्यंत मराठी मिडियममध्ये शिकलेली असतात. त्यांची नाळ इंग्लिश भाषेशी जुळलेली नसते. त्यांची इंग्रजी शब्दसंपदा कमी असते. अशा वेळी मीरा यांनी त्यांच्यासाठी डिक्शनरी बनवली आहे. प्रथम शब्द व मग वाक्यं अशी त्यांची प्रगती होत जाते. मीरा त्यासाठी भरपूर वेळ देतात. हे सारं ब्रेल लिपीत केलं जातं. मीरा मुलांना शिकवताना महागडी टिचिंग एड्स वगैरे वापरत नाहीत. उलट, त्या आपल्या रोजच्या वापरातल्या घरगुती वस्तूंचा वापर करतात. त्यातच त्यांचं कौशल्य आहे! उदाहरणार्थ, X axis, Y axis ही संकल्पना अंध मुलांच्या लक्षात आणून देण्यासाठी त्या हातांचा वापर करतात. ‘कॉलम्स’ (Columns) आणि ‘रो’ज (rows) ही संकल्पना शिकवण्यासाठी कागदाला घड्या घालून त्यांच्या साहाय्यानं शिकवतात. शरीररचना व डी.एन.ए. मॉडेल चिमट्यात मणी अडकावून शिकवतात.

मीरा, मुलांना ब्रेलमध्ये नोटस देतात. त्या अंध मुलांसाठी काय शिकल्या नाहीत? त्या स्वत: इतक्या असंख्य गोष्टी, विषय शिकल्या आहेत आणि इतकं असून मीरा असं म्हणतात, की शेवटी, जर गणित केलं तर मला या मुलांमुळे जे शिकायला मिळालं त्याचं पारडं जास्त जड आहे.

काही मुलं JAWS च्या साहाय्यानं software विकसित करतात. त्या पाच जणांना पुण्यातील कंपन्यांमध्ये नोकरी मिळेना, म्हणून मीरा व आनंद यांनी त्यांच्यासाठी कंपनी काढली. अमेरिकेतील Boardwalk Tech. या कंपनीनं त्या मुलांना काम दिलं. भारतातील Dot.net नावाच्या कंपनीनंही त्यांना ‘school sports program’ संदर्भात काम दिलं आहे. पुण्यातील सारंग कुलकर्णी त्यांना मदत करतात.

मीरा यांनी ‘कमावा व शिका’ हा मंत्र मुलांना पहिल्यापासून दिला आहे. मीरा यांच्या बंगल्यातील एक खोली म्हणजे छोटीशी चॉकलेट फॅक्टरीच आहे! मुलं तिथं स्वत: चॉकलेट बनवतात, त्यांचं पॅकिंग करतात, ज्यांची ऑर्डर असेल तिकडे नेऊन पोचवतात. मुलं स्वत: चॉकलेट बनवण्यासाठी लागणारा माल, पॅकिंगसाठी लागणारं सामान आणण्यासाठी जातात, कारनं, लाखांतील कॅश घेऊन मुंबईला क्रॉफर्ड मार्केटमध्ये जाऊन कच्चं चॉकलेट खरेदी करतात. त्यानंतर खारला जाऊन सॅटिन रिबन, इतर पॅकिंग मटेरियल विकत घेतात व पुण्याला परत येतात. चॉकलेटच्या ऑर्डर तर इतक्या आहेत, की काही वेळेस त्या पुर्‍या करणं म्हणजे तारेवरची कसरत असते, मुलांची.

बहुतेक मुलं होस्टेलवर राहतात. फार थोडी घरी राहतात. मुलं कागदाची फुलं बनवणं, पेपरबॅग बनवणं, ग्रिटिंग कार्डस बनवणं ही कामं इथं करतात. प्रत्येक जण स्वत: पैसे कमावतो. दुसरीकडे शिक्षण चालू असतंच.

मीराताईंची मुलगी तर म्हणते, की मी सावत्र मुलगी आहे, हीच सर्व दोनशे मुलं आईची सख्खी मुलं आहेत!

मध्यंतरी, मीरा व आनंद अमेरिकेला पंधरा दिवस जाऊन आले. मीरा म्हणाल्या, की ‘आमच्या इथं रामराज्य आहे. आम्हांला वॉचमन वगैरेची गरजच नाही.’ बंगल्यात, बंगल्याच्या आवारात मुलं मस्त वावरत, गप्पा मारत असतात. आम्ही ‘निवांत’मध्ये गेलो त्या दिवशी कोणीतरी केळी आणून दिली होती. त्यांचं वाटप सर्वांना एकजण करत होता. मुलं केळी खाऊन ‘साली’ व्यवस्थित ‘डस्टबीन’मध्ये टाकत होती. शिस्त वाखाणण्यसारखी आहे.

मुलांनी सुधा मूर्तींची सर्व पुस्तकं, विंदा करंदीकर, नारायण सुर्वे, अलका मांडके, पोपटराव पवार, प्रेमानंद रामाणी, मीना प्रभू, संदीप खरे, सुधीर मोघे अशा अनेकांच्या पुस्तकांची ब्रेलमध्ये रूपांतरं केली आहेत. त्यांच्याकडे तीन हजार पुस्तकं आहेत. त्यांनी महाराष्ट्रात अजून चौदा ‘ब्रेल लायब्ररी’ चालू करून दिल्या आहेत.

शामक डावरनं येऊन मुलांना डान्स ट्रेनिंग दिलं आहे. मुलं योग करतात. त्यांची क्रिकेटची टीम आहे. मुलं ‘स्टेज शो’ज करूनही फंडरेझिंग करतात. त्याचे आतापर्यंत पन्नास शो झाले आहेत. मुलं रक्तदान करतात, वृक्षारोपण करतात. जी मुलं शिक्षण पूर्ण करून कमावती झाली आहेत ती ‘निवांत’मधील नवीन मुलांना मदत करतात. त्याशिवाय आपल्या कमाईचा ठरावीक हिस्सा, ज्यांना आपल्यापेक्षा जास्त अपंगत्व आहेत अशांना दान करतात. उदाहरणार्थ, ऑटिझम, स्किझोफ्रेनिया इत्यादी. गेल्या पंधरा वर्षांत एक हजार मुलं ‘निवांत’मधून बाहेर पडली आहेत. ती सर्वजण नोकरी करत आहेत. महिना पाच-दहा हजार रुपये कमावत आहेत. काहींनी संसार थाटले आहेत. त्यांना मुलं आहेत. त्याविषयी मीरा यांनी गंमत सांगितली. त्या म्हणाल्या, की मला ब्रेल वाचता येत असल्यामुळे, त्यांची प्रेमपत्रंही मला वाचता येतात. त्यामुळे त्या संदर्भातही मला त्यांचं समुपदेशन करावं लागतं. सेक्स एज्युकेशनही द्यावं लागतं. मग मीच त्यांची लग्नं लावून देते.

मीरा यांनी आपला पूर्ण बंगला, आपलं पूर्ण आयुष्य, आपलं सर्वकाही अंध मुलांना दिलेलं आहे, देत आहेत. तेही नि:स्वार्थ भावानं!

मीरा बडवे
9422033122

पद्मा क-हाडे
9223262029
padmakarhade@rediffmail.com

About Post Author

3 COMMENTS

  1. मला ‘निवांत अंधुकक्त’…
    मला ‘निवांत अंधुकक्त’ चळवळीत सहभागी व्हायचे आहे, पडेल ते काम करायचे आहे. सेवाभावी संस्थेचा पूर्ण पत्ता व संपर्क क्र. पाठववणेबाबत विनंती धन्यवाद.

  2. माझा फोन व Whatsapp क्र …
    माझा फोन व Whatsapp क्र 7700061768 आहे

  3. या आपल्या संस्थेच्या अंगिकृत…
    या आपल्या संस्थेच्या अंगिकृत सेवाभावी कार्यात मन:पूर्वक एक सामान्य निवासी कार्यकर्ता म्हणून सहभागी होणेहेतु नम्र विनंती.

Comments are closed.