नितीन देसाईंनी सेट उभारावे!

0
32

     ‘बालगंधर्व’ चित्रपट पाहून मोठी निराशा झाली. एवढा मोठा निर्मिती खर्च करून साधी उत्तम डॉक्युमेंटरीदेखील तयार होऊ शकली नाही. …..


     ‘बालगंधर्व’ चित्रपट पाहून मोठी निराशा झाली. एवढा मोठा निर्मिती खर्च करून साधी उत्तम डॉक्युमेंटरीदेखील तयार होऊ शकली नाही. या चित्रपटामधून बालगंधर्वांचे व्यक्त्तिमत्त्व, त्यांचे अभिनयकौशल्य, त्यांचा चार्म आणि त्यांची गानशैली यांपैकी कोणताच मुद्दा मनावर ठसत नाही. मुदलात तो काळ उभा करण्याचे जमलेले नाही; म्हणजे तसा प्रयत्नदेखील जाणवत नाही. सगळी संभाषणे क्लोजप्समध्ये येतात, टांग्याचे अस्तित्व घोड्यांच्या टापांच्या आवाजावरून समजायचे! दहा हजार रुपयांची रक्कम चक्क पाकिटामधून दिली जाते. दिग्दर्शक-लेखक यांना विषयाचा आवाका आला नाही की ते संशोधन-अभ्यासात कमी पडले?

     सुबोध भावे स्त्री भूमिकांत फार सुरेख दिसतो, परंतु गंधर्वांसाठी त्यांनी जे बेअरिंग घेतले ते योग्य आहे का? ‘देवा’, ‘मायबापा’ हे शब्द बालगंधर्वांच्या व्यक्त्तिमत्त्वाशी जोडले गेले आहेत. भावे बालगंधर्वांचे संभाषण सॉफ्ट आवाजात करतात, परंतु त्यात गोडवा बेताचाच जाणवतो आणि आर्तता-करूणा तर अजिबात नसते. सुबोधला कोणीतरी चांगला दिग्दर्शक भेटायला हवा होता.

     महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात नितीन देसाई हा परवलीचा शब्द झाला आहे. त्यांनी सेट उत्तम उभारावे, परंतु त्यांना दुसर्‍या क्षेत्रात उतरायचे असेल तर त्यांनी आधी ‘होमवर्क’  करावे, योग्य व्यक्त्तींचा सल्ला घ्यावा. पान-पानभर जाहिरातींनी व वातावरण निर्मितीने, प्रेक्षक भुलले खरे, परंतु जाणकार प्रेक्षक नंतर खंतावलेदेखील.

– दिनकर गांगल
-संपादक
www.thinkmaharashtra.com

दिनांक – 20.05.2011

{jcomments on}

About Post Author

Previous articleअनेक वर्षांनी निखळ आनंद देणारे विनोदी नाटक पाहिले
Next article‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ ही साइट नवीन रूपात
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.