‘गोट्या’ या मुलांसाठीच्या लोकप्रिय कथामालिकेचे लेखक ना.धों. ताम्हनकर हे बालवाङ्मय लेखक म्हणून परिचित आहेत. त्यांनी ‘गोट्या’व्यतिरिक्त लिहिलेले बालवाङ्मय… चिंगी, दाजी, खडकावरील अंकुर, अंकुश, बहीणभाऊ, नीलांगी, अविक्षित, मणी, रत्नाकर, नारो महादेव अशी भलीमोठी यादी आहे. त्यांनी बालवाङ्मयाखेरीज अनेक नाटके लिहिली होती याची माहिती मिळाली. त्याचे झाले असे, की त्यांचे ‘उसना नवरा’ हे थोडेफार नाव माहीत असलेले नाटक ‘इ–पुस्तकालय’वर मिळाले आणि ते वाचत असताना अर्थातच नाट्यलेखक ताम्हनकर यांच्याविषयी अधिक माहिती मिळवण्याची उत्सुकता जागृत झाली.
ताम्हनकर यांचा जन्म 31 ऑगस्ट 1893 रोजी झाला आणि मृत्यू 5 जानेवारी 1961 ला नाशिक येथे झाला. ताम्हनकर यांचे बालपण इचलकरंजी येथे गेले. त्यांचे शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले होते. त्यांनी इचलकरंजीचे संस्थानिक नारायणराव बाबासाहेब घोरपडे यांच्याकडे कारकून म्हणून काही काळ नोकरी केली. त्यांनी काही वर्षांतच शिक्षक म्हणून स्वतंत्र काम सुरू केले.
ताम्हनकर यांनी ‘ब्रह्मर्षी’ हे नाटक 1919 साली लिहिले. त्यांनी शाळेच्या मदतीसाठी अनेक नाटके लिहून त्यांचे प्रयोग करवले. त्या नाटकांची नावे – विद्यार्जन, गुरुदक्षिणा, मृत्युंजय, मित्रभाव, पितृभक्ती. पुढे ते किर्लोस्कर यांच्याकडे नोकरीस राहिले. त्यांनी तेथील कर्मचाऱ्यांच्या क्लबसाठी काही नाटके लिहिली. ‘उसना नवरा’ हे त्यांपैकीच एक. ताम्हनकर नाटकाच्या पुस्तक प्रस्तावनेत म्हणतात, की “लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्या वाढदिवसानिमित्त कर्मचाऱ्यांना नाटक करायचे होते आणि शंकरराव किर्लोस्कर यांनी माझ्याकडून ते लिहून घेतले.” त्यांनी किर्लोस्कर उद्योगसमूहात काम करणाऱ्यांसाठी पुरुषपात्रविरहित आणि पुरुष व स्त्रिया अशा उभयलिंगी व्यक्तिरेखा असलेली नाटके लिहिली. पुरुषपात्रविरहित नाटके म्हणजे चतुर शांता, नवऱ्याला वेसण, माईची माया, नव्या-जुन्या, आमच्या आम्ही, पहिली पायरी आणि विदुषी. उसना नवरा व्यतिरिक्त स्त्री-पुरुष उभयलिंगी पात्रे असलेली नाटके म्हणजे गोड गोंधळ, नवा रंग, प्रतापी पंत, साक्षात्कार, बच्चा नवरा, दाजी देशपांडे.
‘उसना नवरा’ हे नाटक रूपांतरित आहे. ते लॅरी इ.जॉन्सन या अमेरिकन नाटककाराच्या 1925 साली प्रकाशित झालेल्या Her Step-husband या नाटकावरून मराठीत उतरवलेले आहे. ते नाटक पहिल्या प्रयोगानंतर बहुधा बदल करून पुन्हा रंगभूमीवर सादर झाले. बहुधा अशासाठी म्हटले, की ना.सी. फडके यांनी त्या नाटकाबाबत काही मार्गदर्शन केले असा उल्लेख ताम्हनकर यांनी प्रस्तावनेत केला आहे. त्या नाटकाचा प्रयोग कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी 1933 साली केला होता आणि स्वतः फडके यांनी त्या नाटकात भूमिका केली होती.

नाटकाच्या कथानकात अरविंद आणि मालती हे प्रेमविवाहित जोडपे आहे. मालतीला तिच्या आजोबांनी वाढवले आहे. त्यांच्या मनातून तिचे लग्न रंगराव नावाच्या श्रीमंताबरोबर लावून द्यायचे आहे. परंतु मालती आणि अरविंद यांनी प्रेमविवाह केला. तो अर्थातच आजोबांना पसंत नाही. लग्नाला दोन-अडीच वर्षे झाली आहेत. मालतीला सव्वा वर्षाचा मुलगा आहे. आजोबांची तार एके दिवशी अचानक येते, की ते त्यांची दुसरी नात- मालतीची दूरची बहीण केतकी हिच्याबरोबर काही तासांसाठी मालतीकडे येत आहेत. मालतीची तारांबळ उडते. तिने तिचे कुटुंब श्रीमंत आहे असे नाटक पत्राच्या माध्यमातून तिची मैत्रीण लिली हिच्याकडे केले आहे. लिलीचे लग्न रंगरावांबरोबर झाले आहे आणि लिलीने मालतीची पत्रे आजोबांना दाखवली आहेत. त्यामुळे आजोबांची भावनाही मालतीचे कुटुंब श्रीमंत आहे अशीच बनलेली आहे. प्रत्यक्षात मालती अतिशय गरीब आहे. त्यांची महिन्याची तोंडमिळवणी होते, इतकेच. ती श्रीमंतीचे निदर्शक असे सारे सामानसुमान –पडदे, चांदीची भांडी, ग्रामोफोन, बाजाची पेटी इत्यादी- सरला नावाच्या मैत्रिणीकडून आणते, सरला आणि तिचा नवरा सुधाकर हे मालती आणि अरविंद यांचे चांगले स्नेही आहेत. मालती केवळ सामानसुमान उसने आणत नाही तर नोकर आणि आचारी यांना दोन दिवसांसाठी करारावर नेमते. नोकर ठीक निघतो पण आचारी चोरटा निघतो, त्याला नवीनच ठेवलेला नोकर पकडतो. नेमू घातलेल्या आचाऱ्याची हकालपट्टी होते आणि अरविंदवर आचारी बनण्याची वेळ येते!

आजोबा येतात आणि सांगतात, की “ते शंभर बिघे जमीन नातवाच्या नावे करणार आहेत आणि सावकारी अरविंदला देणार आहेत. पूर्वी मी फार वाईट वागलो त्याची भरपाई करणार आहे. आवश्यक ते कागदपत्रे मी केली आहेत व ती अरविंदांच्या हाती सुपूर्द करायची आहेत.” त्यामुळे मालतीची पंचाईत होते. नवऱ्याला आचाऱ्याची भूमिका दिल्यामुळे नवरा कोठून उभा करायचा? तेव्हा सरला मदतीला येते. तिचा डॉक्टर असलेला मामेभाऊ बाबुराव एक दिवसासाठी गावात आला आहे. ती त्याला अरविंदची भूमिका वठवण्यास सांगते. तो म्हणजे ‘उसना नवरा’.
कथानकाच्या या सांगाड्यावरून फार्सला आवश्यक असे घटक त्यात भरलेले आहेत त्याची कल्पना येईल. खऱ्या अरविंदला फौजदारांनी चोर म्हणून पकडण्यास यावे, बाबुरावाने मालतीच्या नवऱ्याची भूमिका अस्सल वाटावी यासाठी अतिरिक्त वाटेल असा लघळपणा करणे, मालतीने स्वतःच त्याला भूमिका वाढवण्याच्या दृष्टीने काही सूचना देणे, त्याची लगट न आवडून त्याला झापणे, सर्वात शेवटी ज्या आजोबांना ती फसवू बघते त्यांनी बाबुराव हा अरविंद नाही हे ओळखूनही न ओळखण्याचे नाटक करणे असे फार्सचे अपेक्षित पवित्रे या नाटकात येतात. आवश्यक तो वेगही घटनांना आहे. त्याहून गुंतागुंत थोडी वाढवताही आली असती. त्यामुळे रंगत वाढली असती असेही वाचकाच्या मनात येईल. फडके यांनी त्याबाबत पुरेसा सल्ला ताम्हनकर यांना दिला होता की नाही ते कळण्यास मार्ग नाही. कदाचित नसेलही, कारण स्वतः फडके यांनी काही नाटके लिहिली होती (युगांतर, संजीवन, तोतया नाटककार- हा एक फार्स होता असे समजते, काळे गोरे, जानकी) आणि त्यांनी लिहिलेले फार्स अथवा विनोदी नाटके फार प्रसिद्ध पावलेली नाहीत.
फार्समध्ये बहुधा समजुतीचा घोटाळा, सोंग आणण्यात मूळ प्रवृत्तीच्या विरोधात जावे लागल्याने होणारी तडफड, गोंधळ सुटण्याऐवजी वाढणे असे दिसते. प्रसंग रेखाटताना वास्तवाचे भान सोडलेले नसते. तसे या नाटकात होते का? मालती आणि अरविंद यांची परिस्थिती अगदी जेमतेम. त्यांच्या घरी टेलिफोन असतो. तो त्यांना परवडण्याइतका स्वस्त होता का? (1930च्या आसपास). मालती आणि सरला यांची मैत्री घनिष्ट – म्हणजे अडचणीच्या प्रसंगी स्वतःचे सामानसुमान सरलाने देण्याइतकी. पण तिला मालतीच्या प्रेमविवाहाची माहिती नाही. हे शक्य वाटते का? मध्यमवर्गीय मराठी स्त्री मैत्रिणीच्या नवऱ्याला पहिल्या नावाने 1930 सालच्या आसपास हाक मारते हे तितके सुसंगत वाटत नाही. मालतीला स्वतःची आर्थिक परिस्थिती फुगवून सांगण्याची सवय आहे हे तिचा नवराच सांगतो. त्यामुळे तिच्या झालेल्या फजितीला केवळ योगायोग नाही तर काही अंशी ती स्वतः जबाबदार आहे असे म्हणणे भाग पडते. ज्या काळात नाटक आले त्या काळात या गोष्टींची दखल कोणी घेतली होती की नाही ते माहीत नाही. परंतु त्याचे प्रयोग बरेच झाले आणि काही वर्षांनी लीला चिटणीस यांनी मालतीची भूमिका केली होती असे इंटरनेटवरून समजते. नाटक सोबतच्या लिंकवरून वाचता येईल.
टेलिग्राम |
व्हॉट्सअॅप |
फेसबुक |
ट्विटर |

– रामचंद्र वझे 98209 46547 vazemukund@yahoo.com
रामचंद्र वझे हे निवृत्त बँक अधिकारी. त्यांनी बँकेत चाळीस वर्षे नोकरी केली. त्यांनी वयाच्या तेविसाव्या वर्षांपासून लिखाणास सुरूवात केली. त्यांना प्रवासवर्णनांचा अभ्यास करत असताना काही जुनी पुस्तके सापडली. ती पुस्तके लोकांसमोर आणणे गरजेचे आहे असे त्यांना वाटू लागले. त्यांनी तशा पुस्तकांचा परिचय लिहिण्यास सुरूवात केली. रामचंद्र वझे यांची ‘शेष काही राहिले’, ‘क्लोज्ड सर्किट’, ‘शब्दसुरांच्या पलिकडले’ आणि ‘टिळक ते गांधी मार्गे खाडीलकर’ ही पुस्तके ‘ग्रंथाली’कडून प्रकाशित करण्यात आली आहेत. त्यांनी लिहिलेल्या कथा हंस, स्त्री, अनुष्टुभ, रुची अशा मासिकांमधून प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांचे ’महाराष्ट्र टाईम्स’ आणि ‘लोकसत्ता’ या दैनिकांमधून लेख आणि पुस्तक परिक्षणे प्रसिद्ध झाली आहेत.
—————————————————————————————————————————————————–
वझे साहेंबांमुळे काही दुर्मीळ माहीती वाचकांपर्यंत पोहोचणं आहे त्याबद्दल वझे साहेब व थिंक महाराष्ट्र डॉट कॉम चे आभार.