नाशिकच्या रेडिओवर अमेरिकी शाळा (US Marathi Schools have programme on Nasik Vishwas radio)

3
73

मी लॉकडाऊनच्या काळात रेडिओ विश्वास वर समन्वयकम्हणून काम करू लागले. रेडिओ विश्वास हा कम्युनिटी रेडिओ आहे. तो मोबाईल अॅपद्वारे जगभरात कोठेही ऐकता येतो. त्याचे मुख्य केंद्र नाशिक येथे आहे. रेडिओ विश्वासवरील बालविश्वहा छोट्यांसाठी असलेला कार्यक्रम लॉकडाऊनमुळे शाळा बंद असताना एप्रिल  ते ऑगस्ट 2020 पर्यंत बंद होता. मुले शाळेत, शाळा ऑनलाइन असल्याने येत नाहीत. त्यांची तालीम कशी घेणार, रेकॉर्डिंग कसे करणार हे प्रश्न शिक्षकांना होतेच. त्यात शिक्षकांना कोरोनाकाळात निरनिराळ्या नगरांत कोरोनावर रिसर्चसाठी पाठवले गेले. त्यामुळे ते व्यस्त होते. माझे रेडिओ विश्वासवरील मुलाखतींचे इतर कार्यक्रम मात्र सुरू होते. मी फोनवरून, अगदी परदेशांतील व्यक्तींशी देखील संपर्क साधून मुलाखती रेकॉर्ड करून नाशिकला पाठवत होते. त्या मुलाखती ऐकून अमेरिकेतील शिकागो येथील मराठी विद्या मंदिरच्या कोऑर्डिनेटर सुलक्षणा कुलकर्णी यांनी मला विचारले, “आम्हाला रेडिओ विश्वाससाठी मुलांचा कार्यक्रम देता येईल का? आमची मुले मराठी कार्यक्रम उत्तम देतील.

 

मी आश्चर्यचकित झाले. कोरोनाची परिस्थिती अमेरिकेतही होती. त्यामुळे शाळा तेथेही ऑनलाईन होत्या. मी तिला स्टेशन डायरेक्टर हरिभाऊ कुलकर्णी यांच्याशी बोलून संमती दिली. दहा दिवसांतच, सुलक्षणा कुलकर्णी यांनी कार्यक्रम रेकॉर्ड करून मला पाठवला. त्यांनी इसापनीतीतील गोष्टी, लहान मुलांच्या मनोरंजन करणाऱ्याराजाने टोपी घेतलीवगैरे सुरस कथा नाट्यरूपात सादर केल्या होत्या आणि पाच ते सात वर्षांची मुले उत्तम दिग्दर्शनासह शुद्ध मराठी बोलत होती. त्या मराठीचा नादच काही वेगळा वाटतो. इतके शुद्ध मराठी महाराष्ट्रातही बोलले जात नाही. ती मुले सुंदर मराठी बोलतात याचे श्रेय त्यांच्या पालकांना आणि शिक्षकांना द्यायला हवे. मात्र प्रश्न कार्यक्रम प्रसारणाच्या वेळेचा उभा राहिला. रेडिओ विश्वासवरील मूळ बालविश्वकार्यक्रम भारतीय वेळेनुसार रविवारी सकाळी 10 वाजता प्रसारित होत असे. पण अमेरिकेत त्यावेळी रात्र असते व वेगवेगळ्या देशांत वेगवेगळ्या वेळा असतात. मग तेथील मुले तो कार्यक्रम ऐकणार कशी? ‘रेडिओ विश्वासने तो कार्यक्रम सकाळी 10 व रात्री 10 वाजता असा दोनदा प्रसारित करण्याचे ठरवले आणि अमेरिकेतील मराठी मुलांचा कार्यक्रम तेथेही त्यांना व त्यांच्या पालकांना सोयींच्या वेळी ऐकता येऊ लागला. शिकागो मराठी शाळेचा पहिला परदेशीबालविश्व कार्यक्रम प्रसारित झाल्यानंतर त्या कार्यक्रमाची श्रोत्यांकडून वाहवा झाली.

शिकागो मराठी विद्यामंदिरचा कार्यक्रम नंतर अमेरिकेतील मराठी शाळांच्या ग्रूपवर फिरत होता. अन्य पालकांमध्ये त्यांच्याही मुलांना कार्यक्रमात घ्यावे अशी इच्छा निर्माण झाली. मग मी न्यू जर्सी येथील मॉर्गनविल मराठी शाळेच्या समन्वयक स्नेहल वझे यांच्याशी संपर्क केला. त्यांचे विद्यार्थीदेखील कार्यक्रम मराठीत सादर करण्यास उत्सुक होते. शाळेने थोड्या मोठ्या मुलांना, सात ते अकरा वयोगटाच्या मुलांना घेऊन उत्तम विनोदी कार्यक्रम तयार करून पाठवून दिला. त्या कार्यक्रमाला अमेरिकेत ट्रंप-बायडेन या अध्यक्षीय निवडणुकीची पार्श्वभूमी होती. तर दुसऱ्या एका नाटुकल्यात, एक मराठी आजी भारतातून आणि एक अमेरिकन आजी अमेरिकेतून एकमेकींशी झूमवर बोलत आहेत असा गमतीदार कन्सेप्ट रंगवला होता.

 

बालविश्वहा रेडिओ विश्वासवरील कार्यक्रम पुन्हा सुरू तर झाला. पण तो नियमितपणे सुरू राहणे गरजेचे होते. ते फक्त अमेरिकेतील मराठी शाळांवर निर्भर राहून चालणार नव्हते. मग मी ठाणे कोकण मराठी साहित्य परिषदेच्या समूहावर लेखकांना व शिक्षकांना आवाहन केले, की बालविश्वसाठी कार्यक्रम लिहून वा बनवून पाठवा; मुलांसाठी कार्यक्रम पाठवताना ते कसे असावेत याचीही माहिती दिली. अपेक्षा अशी होती की कार्यक्रम केवळ माहितीप्रचुर नसावेत तर मनोरंजकही असावेत, मुलांच्या जगातील विषय आणि शब्द वापरून तयार केलेले असावेत, उद्बोधक असतील तर चांगलेच. गाणी-नाटुकले-एकपात्री-कथा असे वैविध्य असेल तर अत्युत्तम. त्या आवाहनानुसार लेखकांची व शिक्षकांची टीमच तयार झाली. भारती मेहता, मानसी जोशी, नीतिबाला कुलकर्णी अशा लेखकांनी संहिता लिहून दिल्या. काही शिक्षिकांनी स्वतः नाटुकली लिहिली. मयुरी कदम यांनी पर्यावरण या विषयावर संवाद लिहिले. त्यात परिसरात कोठेही कचरा न साठू देण्याबद्दल आवाहन होते. ज.ए.इं.च्या ब्लॉसम स्कूलच्या शिक्षकांनी त्यांची बालवाडीतील मुले घेऊन सिंह आणि उंदीर यांची कथा सादर केली. पालकांनी मोठ्या उत्साहाने त्या कथेचे स्टुडिओत रेकॉर्डिंग केले. ब्राह्मण शिक्षक मंडळाचे वर्तकनगर माध्यमिक विद्यालय यांनी भारती मेहता लिखित बालनाट्य बसवले तर नलिनी पुजारी यांच्यासोहम अॅकॅडमीमधून मानसी जोशी लिखित सूर्याची सुट्टीहे नाटुकले आले. त्या निमित्ताने शिक्षकांमधील काही लेखिका, दिग्दर्शिका पुढे आल्या.

दरम्यान, अमेरिकेतील आणखी काही शाळांना संपर्क करून ऑडिओ देण्यास सांगितले. त्याप्रमाणे अमेरिकेतील टॅम्पा येथील मराठी शाळेच्या समन्वयकांनीही इच्छा दर्शवली. अमेरिकेतील मराठी शाळांनी, त्यांची संस्कृती मराठी आहे हे दाखवणारे विषय निवडले होते. मुले मराठीतील काही स्त्री रत्ने या शीर्षकाखाली सावित्रीबाई फुले, झाशीची राणी अशा व्यक्तिमत्त्वांवर बोलत होती. सहा वर्षांची मुले डॉक्टर आनंदीबाई जोशी यांची माहिती सांगत होती. अमेरिकेतील मराठी शाळांमध्ये रामायण-महाभारत शिकवले जाते. तसेच, संतांचीही माहिती दिली जाते. तो त्यांचा अभ्यासक्रम असतो. ते सगळे या निमित्ताने रेडिओ विश्वासवर प्रकट होत गेले.

 ठाण्याच्या आव्हान पालक संघाच्या शाळेच्या प्रेसिडेण्ट वंदना कर्वे यांचा प्रश्न वेगळाच होता. त्या म्हणाल्या, “आमच्या शाळेतील मुले ही विशेषमुले आहेत. पण ती स्वतः कामे करतात. स्वतःच्या पायावर उभी आहेत. आम्ही त्यांच्या हाताला काम दिले आहे.वंदना यांनी त्या विशेषमुलांची छान गाणी आणि संवाद असा कार्यक्रम पाठवला. कार्यक्रम प्रसारित झाल्यावर त्या मुलांच्या पालकांना खूप आनंद झाला.बालविश्वच्या लॉकडाऊन यशात आणखी एक मोरपीस खोवले गेले !

शिकागो मराठी विद्यामंदिर यांनी मराठी भाषा कशासाठी?” अशा शीर्षकाचा कार्यक्रम मराठी भाषा दिनासाठी पाठवला होता, तो मुद्दाम नमूद करण्यास हवा. त्यांनी आपल्या मुला मुलात खेळते मराठी ही ओळ गायल्यावर गाण्याचा अर्थ वेगळ्या प्रकारे माझ्या लक्षात आला. त्यांनी, तेथील पालकांनी आणि शिक्षकांनी मराठी भाषेवरील प्रीती दाखवली होती. त्यांना त्यांच्या मुलांना मराठी भाषाच नव्हे तर मराठी सण समारंभ, खाद्यपदार्थ, सामाजिक उत्सव असे सगळे शिकवायचे आहे, आजी-आजोबांशी मराठीत संवाद साधायचा आहे, शिवाजी महाराजांचा इतिहास माहीत करून घ्यायचा आहे. आम्ही मराठी भाषा मुलांना त्यासाठी शिकवत आहोत असे प्रतिपादन कार्यक्रमात केले होते.

मी स्नेहल वझे यांना विचारले की शाळा बंद असताना तुम्ही पहिलीच्या मुलांचा कार्यक्रम रेकॉर्ड कसा केलात? त्यांनी सांगितले ते ऐकून तेथील मंडळी मराठीविषयी किती आस्था बाळगून आहेत ते माझ्या लक्षात आले. त्यांनी शाळेच्या कार्यक्रमासाठी स्टोरी निवडण्याचे काम करण्यासाठी एक व्हाट्सअॅप ग्रूप तयार केला- रेडिओ विश्वास कार्यक्रमया नावाचा. त्यात स्नेहल वझे, दीप्ती कारखानीस, रुपाली घोडेकर अशी साहित्य समजणारी काही मंडळी म्होरकी आहेत. मुलांना व्हाट्सअॅपवर दिग्दर्शनासह डायलॉग पाठवले जातात. मुलांचे पालक ते मुलांकडून छान वदवून रेकॉर्ड करून पाठवतात. मग रूपाली घोडेकर सारखी तंत्रस्नेही सर्व डायलॉग सॉफ्टवेअरवर एकत्र जोडून कथा किंवा नाटक तयार करते ! मूळ स्क्रिप्ट तिला दिलेले असतेच. तो सगळा आटापिटा मराठीसाठी करण्यात पालकदेखील रस घेऊ लागले आहेत. त्यांना त्यांची मुले मराठी कार्यक्रमात सहभागी होत आहेत याचा आनंद आहे. तेथील शाळांचे समन्वयक पालकांच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोचवत असतात. त्या वाचून माझाही उत्साह दुप्पट होतो. स्नेहल वझे म्हणाल्या, “आमच्या शाळेतील मुलांची रेडिओ कार्यक्रमाविषयी उत्साह, उत्सुकता वाढली आहे. मुलं मराठी आणखी छान बोलू लागली!

टेलिग्राम

व्हॉट्सअॅप

फेसबुक

ट्विटर

मेघना साने 98695 63710 meghanasane@gmail.com

मेघना साने मुंबई विद्यापीठाच्या एम ए, एम फिल पदवीधारक असून, त्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या ठाणे शहर शाखेच्या अध्यक्ष आहेत. त्यांनी मराठी रंगभूमीवर नाट्यसंपदाच्या तो मी नव्हेचसुयोगच्या लेकुरे उदंड झाली या नाटकांमधून पाच वर्षे भूमिका केल्यानंतर एकपात्री प्रयोगाची स्वतंत्र वाट चोखाळली आहे. त्यांनी कोवळी उन्हेया स्वलिखित एकपात्री प्रयोगाचे देशविदेशांत दौरे केले आहेत.

————————————————————————————————————————————

About Post Author

Previous articleगडकरी – नाटककाराची विविधांगी प्रतिभा (Tribute to playwright Ram Ganesh Gadkari)
Next articleतेरावे साहित्य संमेलन (Marathi Literary Meet 1927)
मेघना साने या ठाणे येथे राहतात. त्या मुंबई विद्यापीठाच्या एम ए, एम फिल पदवीधारक आहेत. त्यांनी मराठी रंगभूमीवर ‘तो मी नव्हेच’ व ‘लेकुरे उदंड झाली’ या नाटकांमधून पाच वर्षे भूमिका केल्या. त्यांनी ‘कोवळी उन्हे’ या स्वलिखित एकपात्री प्रयोगाचे देशविदेशांत दौरे केले आहेत. मेघना साने यांची कथा, काव्य, ललित अशी तेरा पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. मेघना साने प्रत्यक्ष कार्यक्रमांत व रेडिओवर सूत्रसंचालक आणि निवेदिका म्हणून; तसेच, ‘इ प्रसारण इंटरनेट रेडिओ अँड टेलिव्हिजन’वर कार्यक्रमाची निर्मिती करत असतात.

3 COMMENTS

  1. मेघना ताई, बाल विश्व हा कार्यक्रम अमेरीकेतील मराठी मुलांनी सादर केला यात खरोखरच मातृभाषेविषयीचं प्रेम दिसून आलं आणि महाराष्ट्राच्या मातीशी, मायभूमीशी जोडली गेलेली ही नाळ तुटणार नाही याची पुन्हा एकदा खात्री पटली. तसंच रेडीओ विश्वाच्या यशातही एक मानाचं पीस खोवलं गेलं आहे. अतिशय माहितीपूर्ण आणि उद् बोधक लेख !

  2. मुलांसोबत काम करत असताना त्यांचा उत्साह वाखाण्याजोगा असतो.. रेडिओ विश्र्वास मुळे मुलांच्या अनुभव विश्वात वाढच झाली आहे. धन्यवाद मेघना मॅडम.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here