नागलवाडीचे नागार्जुन – पुराणे शास्त्रज्ञ

0
266

नगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील नागलवाडी हे मराठवाड्याच्या सीमेलगत वसले आहे. म्हणून त्याला तालुक्यातील शेवटचे गाव असे म्हणतात. नागलवाडी गाव छोटे असले तरी त्याची महती थोर आहे. गावाला पौराणिक व ऐतिहासिक असे दोन्ही संदर्भ लाभले आहेत. गाव दऱ्याखोऱ्यांच्या कुशीत, निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले आहे. तेथील सातवाहन काळातील असे सांगितले जाणारे केदारेश्वरचे मंदिर जुने आहे. भगवानगड परिसरातील डोंगरमाथा जवळच आहे- तो पावसाळ्यात मनमोहक निसर्गसौंदर्याने खुलून जातो. त्यामुळे त्या ठिकाणी निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची गर्दी असते. तेथून जवळ असलेल्या गुहेत प्राचीन रसायनशास्त्रज्ञ नागार्जुन यांची प्रयोगशाळा व वास्तव्य होते असे सांगितले जाते. सध्या डोंगराचा कडा ढासळून ती गुहा बुजली गेली आहे.

केदारेश्वर मंदिराच्या जवळ असलेल्या डोंगराच्या दरीत महानुभाव पंथाचे स्थान आहे. महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांनी त्या स्थानाला इसवी सन 1275 च्या सुमारास भेट दिल्याचा उल्लेख ‘लीळाचरित्रा’त आढळतो. त्या स्थानाचे दर्शन घेण्यासाठी अनुयायी भेट देत असतात. त्या स्थानाचे महात्म्य ‘लीळाचरित्र’ ग्रंथात आहे. श्री चक्रधर स्वामींनी स्थानाच्या शेजारील गुहेच्या दिशेने हात करून त्या गुहेत नागार्जुनाचे वास्तव्य होते. तेथे त्याचा मृत्यू झाला आहे. त्याचे शिर व धड वेगळे पडले आहे. शिर धडाला लावल्यावर तो पुन्हा उठेल असे वर्णन शिष्यांसमोर केले आहे. नागार्जुन देव यांनी अमरत्व प्राप्त केल्याचा त्यात उल्लेख आहे असे सांगितले जाते.

शास्त्रज्ञ प्रफुल्लचंद्र रॉय यांनी लिहिलेल्या ‘हिस्टरी ऑफ हिंदू केमिस्ट्री’ या पुस्तकात प्राचीन काळातील रसायन शास्त्रज्ञांची माहिती दिली आहे. त्यामध्ये ‘नागार्जुन’ या नावाचा उल्लेख आहे.

नागलवाडीचे नागार्जुन यांनी खनिजापासून विविध रसायने व धातुपाषाणातून शुद्ध धातू तयार करण्याची पद्धत सोळाशे वर्षांपूर्वी शोधून काढली होती ! नागार्जुन कोणत्याही धातूंचे सोने बनवत असाही बभ्रा झाला होता. त्यांनी विविध धातूंबरोबर पाऱ्याची संयुगे कशी करावीत त्याची उत्तरे नोंदली आहेत. नागार्जुन हे पाऱ्याला शिव तत्त्व व गंधकाला पार्वती तत्त्व मानत असल्याचे त्यांच्या संबंधीच्या पुस्तकात लिहिले आहे.

इतकेच नव्हे, तर त्यांनी झाडाच्या सालीत दडलेले सोने कसे वेगळे करावे हेही नमूद करून ठेवले आहे. माणसाचा अमरत्वाचा ध्यास पुराणा आहे. नागार्जुन यांनी अमरत्व प्राप्त करण्यासाठी नागलवाडीच्या कुशीत प्रयोगशाळा उभारली होती; विविध विषयांवर संशोधन केले होते. काळाच्या ओघात त्या शास्त्रज्ञाची प्रयोगशाळा नामशेष झाली आहे. तेथे काही अवशेष अस्ताव्यस्त पडलेले पाहण्यास मिळतात. त्यामध्ये दगडी रांजण, खळगे (खल) यांचा समावेश आहे. प्रयोगशाळेच्या अस्तित्वाच्या खुणा नागलवाडी गावातही विखुरलेल्या दिसतात. मात्र इतिहास संशोधक वगळता सर्वसामान्यांना त्या जागेविषयी व नागार्जुन यांच्याबद्दल फारशी माहिती नाही.

इतिहास संशोधकांच्या संशोधनानुसार नागार्जुन यांनी धातू व रसायन या विषयावर अभ्यास करण्यासाठी ती प्रयोगशाळा उभारली होती. प्रयोगशाळा गावातील ‘कडा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंगराच्या दरीतील गुहेत आहे. गावकरी नागार्जुन यांच्या नावावरून गावाला नागलवाडी असे नाव पडल्याचेही सांगतात. गुहेतून पूर्वी सोन्याची भांडी बाहेर येत अशा कहाण्या सांगितल्या जात. रसायन‘शास्त्रा’ची भारतात समज तेवढीच होती. ती गुहा तेथे आहे, मात्र तिचे प्रवेशद्वार डोंगराची दरड कोसळल्याने बुजलेले आहे.

‘भारतीय प्राचीन वैज्ञानिक’ या पुस्तकात नागार्जुन यांच्या शोधाबद्दल व त्या स्थानाबद्दल माहिती लिहिलेली आहे. नागार्जुनांनी तेथील औषधी व गुणकारी झाडेझुडपे यांवरही संशोधन करून काही आजारांवर औषधे तयार केली होती. त्यांनी झाडाचा पाला वाटण्यासाठी, काढा ठेवण्यासाठी दगडी खलाचा वापर केला, ते खल मिळाले आहेत. औषधोपचार या विषयावर ‘आरोग्यमंजरी’, ‘कक्षपूत तंत्र’, ‘योगसर’, ‘योगाष्टक’ तर रस रसायन विषयावर ‘रसरत्नाकर’, ‘रसेन्द्रमंगल’ अशी ग्रंथरचना नागार्जुन यांच्या नावावर आहे. त्यांचे ‘रसरत्नाकर’ हे पुस्तक रसायनशास्त्रज्ञांना वरदान वाटते. भारतीय रसायन व धातुविज्ञान यांचा इतिहास जवळजवळ तीन हजार वर्षे जुना आहे.

नागलवाडी गावातील काशीकेदारेश्वराचे मंदिर प्राचीन काळातील आहे. ग्रंथ-पुराणात त्या जागेविषयी व सप्त ऋषींच्या वास्तव्यासंबंधी उल्लेख आढळतो. मंदिराच्या बाजूला पाण्याचा झरा असून तेथे रामायण काळात सीतेची न्हाणी होती अशी आख्यायिका सांगितली जाते.

अनिल साठे 9527020202 anilsathe.k@gmail.com

———————————————————————————————————-

भारतीय संस्कृतिकोशात रसायनशास्त्रज्ञ नागार्जुन यांच्याबद्दलची माहिती नमूद केली आहे ती अशी –

नागार्जुन हा इसवी सनाच्या सातव्या शतकातील रसायनशास्त्रज्ञ होता. बौद्ध आचार्य नागार्जुन व हा एकच अशी पूर्वी समजूत होती; पण ते भिन्न पुरुष होते असे बहुतेक विद्वान मानतात. त्यामुळे त्या रसायनशास्त्रज्ञाला सिद्ध नागार्जुन असे नाव देण्यात आले. त्याचा जन्म दक्षिण भारतातील कांची नगरीत झाला होता. तो तंत्रशास्त्राचा आचार्य असून त्याने श्रीपर्वतावर तारादेवीची उपासना व तांत्रिक साधना केली होती.

नागार्जुनाला एका तपस्व्याने रसायनविद्या आणि मायुरीविद्या (सामान्य धातूपासून सोने बनवण्याची किमया) शिकवली अशी आख्यायिका प्रचलित आहे. त्याला भारतीय रसायनशास्त्राचा प्रवर्तक मानतात. कारण त्याने उपलब्ध खनिजांपासून विविध प्रकारची रसायने आणि शुद्ध धातू मिळवण्याच्या पद्धती शोधून काढल्या. त्यानेच पारा व इतर धातू यांचे संरस (संयुक्त धातू) प्रथम तयार केले. त्याचा ‘रसरत्नाकर’ हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. त्यात अनेक रासायनिक प्रक्रिया व उपकरणे यांची माहिती दिली आहे.

त्यांच्याविषयी एक दंतकथा सांगतात, ती अशी – नागार्जुनाने एक सिद्ध रसायन निर्माण केले होते. ते प्रचारात आले असते, तर त्याच्या सेवनाने अवघी मानवजात अमर झाली असती. पण इंद्राच्या आज्ञेवरून नागार्जुनाने ते रसायन नष्ट केले.

नागार्जुन हा नालंदा येथील विद्यापीठाचा कुलगुरू होता असे म्हणतात. पण तो बौद्ध नागार्जुन की सिद्ध नागार्जुन हे सांगता येत नाही.

———————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here