‘ध्यानधारणा’ हा परवलीचा शब्द बनला आहे. प्रत्येक जण गतिमान आणि धकाधकीच्या जीवनात डोके थंड करण्यासाठी आणि ठेवण्यासाठी कसून प्रयत्न करत आहे. त्यासाठी ‘मेडिटेशन’ किंवा ध्यान करण्याकडे कल वाढत आहे. ध्यानाने ब्लडप्रेशर, हार्टअॅटॅक, मधुमेह, संधिवात इत्यादी अनेक रोग बरे करू असे सांगणार्या संस्था फैलावल्या आहेत. ध्यानाने असे रोग बरे झाल्याचा दावा करणारे अनेक ध्यानस्थही आपणांस दिसून येतात!
मानसशास्त्रज्ञ व वैज्ञानिक यांनी ध्यानधारणा किंवा मेडिटेशन यांत खरेच एवढी ताकद आहे का? ध्यानाने अमुकअमुक बरे होते या म्हणण्यात तथ्य किती आहे? ध्यानाचे दुष्परिणाम काही होतात काय? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यास सुरुवात केली आहे. त्यातून काही धक्कादायक निष्कर्ष बाहेर पडू लागले आहेत.
ध्यानधारणा आणि स्वसंमोहन या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. स्वसंमोहनात विशिष्ट स्वयंसूचना दिल्या जातात, ध्यानधारणेतही त्या दिल्या जातात. मात्र त्यांचे ध्यानात स्वरूप एखादा मंत्र, तांत्रिक उच्चार, स्वसंमोहनातील अर्धनिद्रितावस्था (ट्रान्स) ही ‘समाधी’ची अवस्था बनते. परिसराचे भान लोपून ध्यानात व्यक्ती अर्धनिद्रितावस्थेत जाते आणि नंतर ती दीर्घ व सखोल अवस्थेत जाऊन जगाचे अस्तित्व काही काळ विसरते. विस्मृतीची ही अवस्था ध्यानकर्त्यास ‘खूपच वेगळी’ वाटते. यावेळी रोजच्या कटकटी नाहीत, त्रास नाही, भंडावणार्या गोष्टी नाहीत! त्यामुळे ही अवस्था त्यास आनंदाची अनुभूती देते आणि त्यास ताजेतवाने वाटते. ही अवस्था सारखी हवीहवीशी वाटू लागते. मात्र सर्वांनाच हा अनुभव येतो असे नाही.
मनोवैज्ञानिकांनी ध्यानावस्थेत मेंदूत कोणते बदल घडतात याचा शोध घेतला. अमेरिकेतील स्टेट युनिव्हर्सिटीतील बी.के.बागची व एस. वेंगर या मनोवैज्ञानिकांनी गुहेत राहणार्या भारतीय योग्यांची त्यासाठी तपासणी केली. मेंदूत घडणार्या जैवरासायानिक विद्युतबदलांचा आलेख विद्युतमष्तिष्क यंत्राद्वारे (ईईजी ) काढता येतो. ध्यानस्थ योग्यांचा मेंदूंचे कार्य-आलेख काढून ध्यानावस्थेतील मेंदू-बदल टिपण्यात आले.
ईईजीमधून आपणांस मेंदूपेशींतील जैवरासायनिक प्रक्रियेशी निगडित अशा विद्युत घडामोडींची माहिती होते. त्या घडामोडींतून तीन प्रकारचे प्रवाह निर्माण होतात. त्यांना अल्फा, बीटा, थीटा असे संबोधले जाते. त्यांपैकी अल्फाप्रवाहांचा संबंध हा ध्यानधारणेशी जोडला जातो. अल्फाप्रवाहांची गती आठ ते बारा हर्टस प्रती सेकंद असते. ते डोळे मिटल्यावर, तीव्र झोपेत असताना अधिक होतात. ते डोळे उघडल्यावर वा जागृत अवस्थेत जाऊन दुसरे प्रवाह अवतरतात.
बागची-वेंगर द्वयीस ध्यानस्थांत अल्फाप्रवाह दिसून आले. अकिरा कासामात्सू व टोमो हिराई यांनी असाच प्रयोग झेन नावाचा ध्यानप्रकार करणारे बौद्ध आचार्य व त्यांचे विद्यार्थी यांच्यावर केला. ध्यानामुळे अल्फाप्रवाहांची वृद्धी होते असा विचार जेव्हा पुढे आला तेव्हा, ज्यो कामिया नावाच्या एकाने त्याचा आधार घेऊन ‘अल्फा बायोफिडबँक’ नावाचे, मन शांत करणारे व बुद्धिमत्ता वाढवणारे तंत्र आणले होते. ते तंत्र वैज्ञानिक निकषांवर फारसे टिकले नाही. खरे तर, डोळे नुसते मिटले तरी अल्फाप्रवाह दिसू लागतात, तेथे ध्यानधारणेत तर दीर्घकाळ डोळे मिटलेले असल्याने अल्फाप्रवाह दिसणे साहजिकच होय!
ब्रिटिश कोलंबियातील सायमन फ्रेझर युनिव्हर्सिटी तील मानसविज्ञान विभागाचे बेरी बेरस्टेन यांनी मजेदार प्रयोग केला. त्यांनी संमोहनावस्थेतील संमोहकांना डोळे उघडण्यास सांगितले, तेव्हा त्यांच्याही ईईजीत डोळे बंद केल्यावर येणारे अल्फाप्रवाह काही आले! प्राथमिक अवस्थेतील (Primates) प्राण्यांतही हे प्रवाह दिसून आले आहेत. काही मानसिक विकारग्रस्त मुलांत (उदा. अती कडमडेपणा) अल्फाप्रवाह आढळले. अल्फाप्रवाह म्हणजे शांत मेंदू आणि तो नसणे म्हणजे अशांत मेंदू असे म्हणणे धाडसाचे ठरावे. कारण काही चिंता-चेतापदशेच्या (Anxiety Neurosis) रुग्णांतही अल्फाप्रवाह भरपूर दिसून आले आहेत. बेरस्टेनने उलटाही प्रयोग केला. अल्फाप्रवाह नाहीशा करण्याच्या सूचना देत ध्यानस्थांवर प्रयोग करत असताना अशा सर्वांना ध्यानधारणेचा अनुभव आला.
ओनें व पास्केविटझ या मानसशास्त्रज्ञांनी अल्फा फिडबँक ट्रेनिंग नावाच्या प्रयोगात अल्फाप्रवाह व ध्यानधारणा यांचा संबंध टिपण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ध्यानकर्त्यांपैकी निम्म्यांना शांत व निवांत होण्याच्या सूचना दिल्या व उरलेल्या निम्म्यांना ‘जर अल्फाप्रवाह निर्माण झाले नाहीत तर इलेक्ट्रिक शॉक देऊ’ अशा धमक्या दिल्या. दोघांचेही अल्फाप्रवाह समान आले. अल्फाप्रवाह आणि ध्यानधारणा यांचा थेट संबंध असल्याच्या दाव्यावर हे निष्कर्ष आघात करतात.
अमेरिकेत असलेल्या महर्षी महेश योगींच्या युनिव्हर्सिटीने (MMU) काही प्रयोग मध्यंतरी जाहीर केले होते. त्या विद्यापीठातून भावातीत ध्यान किंवा ट्रान्सेंडेंटल मेडिटेशन (TM) या ध्यानप्रकाराचा प्रचार केला जातो. तेथील डिव्हिड आर्म जॉन्सन व त्यांच्या सहकार्यांनी ध्यानावेळी त्वचेच्या संवेदनेत होणारे बदल, ऑक्सिजनचे शरीरातील प्रमाण, मेंदूतील विद्युतप्रवाह इत्यादींची मोजणी केली व काही निष्कर्ष काढले. पैकी मेंदूतील उजव्या व डाव्या अर्धुकातील प्रवाह एकजीव होतात व ध्यानावस्था प्राप्त होते असा त्यांचा दावा होता. त्यास त्यांनी संसक्ती (Coherence) असे म्हटले. वास्तवात, ही संसक्ती म्हणजे काय प्रकार होता?
अशी संसक्ती अनेक स्थितींत आढळते असे लंडन येथील मॉडस्ले हॉस्पिटलातील न्यूरोसायकिअॅट्रिस्ट डॉ.पीटर फेनविक यांनी दाखवून दिले. फेफरे वा अपस्मार (एपिलेल्सी), कोमा, मृत्यू अशा अनेक स्थितींत संसक्ती आढळते. भावातीत ध्यानासंबंधात महर्षी महेश योगींकडून अनेक दावे करण्यात आले होते. उदा. ज्या ठिकाणी भावातीत ध्यान केले जाते तेथे शांतता असते व गुन्हे होत नाहीत. भावातीत ध्यान चालणार्या या विद्यापीठाच्या फेअरफील्ड व आयोवा प्रांतात अशी कोणतीही स्थिती आढळत नाही.
ध्यानावस्थेत अल्फाप्रवाह वाढतात म्हणून काळजी-ताण कमी होतो, यास वैज्ञानिक, ठोस आधार उपलब्ध नाही. मनोविज्ञानाचे निकष लावल्यास, ताण-काळजी व तत्सम मनोविकार आणि समस्या यांच्या मुळाशी अनेक कारणे असतात. ही कारणे ध्यानाने नाहीशी होत नाहीत. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती बेकार झाली तर ती अचानक उदभवलेली समस्या होय. त्यातून त्याची मनस्थिती बिघडते आणि घरात अशांतता निर्माण होते. त्याची मनस्थिती ठीक होण्यास कोणता उपाय हवा?
ध्यानाने अस्वस्थ, अस्थिर-मानसिकता ध्यानावेळी नाहीशी होईल. परंतु ध्यानातून बाहेर आल्यावर दैनंदिन जीवनातील समस्या जैसे थे असतील. दुसरा दावा असा केला जातो, की ध्यानाने समस्या सुटण्यास मानसिक बळ प्राप्त होते. थोडासा विचार केल्यास लक्षात येईल, की ध्यानावस्थेतील विचार हे समस्येशी निगडित नसतात तर ध्यानक्रियेवर केंद्रित असतात. मग समस्या सोडवणुकीचे मार्ग शोधणे दूरच! समस्या सोडवणूक करण्यासाठी योग्य समुपदेशनाची -काऊन्सेलिंगची- गरज असते आणि ही पद्धत गुंतागुंतीची आणि दीर्घ काळाची असते. उदधृत्त उदाहरणातील समस्या दूर करण्यासाठी व्यक्तिमत्त्वदोष दूर करणे, परिस्थितीची जाणीव निर्माण करणे, व्यक्तिमत्त्वविकास करणे, परिस्थितीवर मात करण्यासाठी काही तंत्रे शिकवणे इत्यादी अनेक पद्धती, उपाय करताना आवश्यक असतात. ध्यानाने हे साधता येणे कठीण, तात्पुरता भावनिक आधार एवढेच ध्यानाचे मूल्य उरते.
ताण (स्ट्रेस) ही मानसिक समस्या ध्यानाने कमी होते का याविषयी कॅन्सस विद्यापीठा तील डेव्हिड होल्म्स यांनी संशोधन केले. त्यांना उपाय म्हणून निव्वळ आराम करणारा व ध्यानधारणा करणारा या दोहोंची बोधावस्था (Consciousness) समान आढळली. त्यामुळे ताण कमी करण्याचे ध्यानाचे महत्त्व प्रश्नांकित बनले आहे. शरीरक्रियेतून निर्माण होणारा ताण (Physiological stress) हा ध्यानाने कमी होत नाही हे मनोवैज्ञानिक पॉल लेहरव यांच्या प्रयोगाने दिसून आले.
ध्यान करणार्या व्यक्तीत स्वभावबदल होतात काय असा प्रश्नही विचारला जाऊ लागला आहे. स्वभावबदलाविषयी स्वभावविज्ञानशास्त्र बरेच पुढे गेले आहे. व्यामिश्र व गुंतागुंतीच्या क्रियांतून स्वभावनिर्मिती व विकास होतो असे दिसते. वर्तनविकासासाठी ध्यानाचा काही फायदा होतो का हे पाहण्याकरता डब्लिन येथील क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट मायकेल डेलमोंटे यांनी काही चाचण्या केल्या. ध्यानस्थांना प्रश्नावली देऊन दैनंदिन व्यवहारातील त्यांच्या वर्तनाचे मूल्यांकन केले. वर्तनविकासाऐवजी आपले सध्याचे वर्तन योग्यच असून याच वर्तनात नवीन भर टाकावयास हवी असा आत्मकेंद्रितपणा त्यांच्यात आढळला. एखाद्या विषयात भान हरवून पूर्ण बुडून जाणे हा प्रकारही ध्यानस्थांत आढळतो. त्यामुळे मनोदुर्दशा (सायकोसिस) व विषादविकृती (डिप्रेशन) ह्यांनी पीडलेल्या रुग्णांना ध्यानामुळे गंभीर दुष्परिणामांना तोंड द्यावे लागले.
ध्यानाच्या फायद्या-तोट्यांचा विचार करताना वैज्ञानिक पद्धतीच्या संशोधनाचे निष्कर्ष असे आहेत. भारतात याविषयी वस्तुनिष्ठ संशोधन स्वतंत्र वैज्ञानिक संस्थांतर्फे निष्पक्षपणे, फारसे झालेले नाही. जे संशोधन झाले ते ध्यानाचा पुरस्कार करणार्या संस्थांतून, त्यामुळे त्यांची विश्वासार्हता फारशी नाही. ध्यानाचे फायदे सांगणारे ध्यानस्थ मात्र खूप भेटतात. हे दावे अर्थातच व्यक्तिनिष्ठ होत. व्यक्तिनिष्ठ दावे वस्तुनिष्ठ निकषांवर फारसे टिकत नाहीत. समजा, ध्यानाने ब्लडप्रेशर कमी झाले असा दावा कोणी केला तर रक्तदाबाची समस्या उदभवण्यामागे कोणते घटक होते व त्या सर्वांची छाननी होऊन त्यांचा निरास आपसूकपणे (उदा. परिस्थितीत बदल) झाला काय, याविषयी ते फारसे सांगत नाहीत. मनोकायिक (सायकोसेमॅटिक) रोगांत तर सरळसरळ मनोव्यथेमुळेच शारीरिक व्याधी उद्धवतात, तेव्हा त्यांची लक्षणे मनोव्यथा दूर होण्याने नाहीशी होतात.
ध्यानधारणेभोवती गुढतेचे वलय उगाच निर्माण करण्यात आले आहे. ध्यानाची केंद्रे सर्वत्र आज विविध रूपांत दिसत आहेत. सामान्यांना ध्यानाचे हे असंख्य प्रकार चक्रावून सोडतात. त्यांचे रोग बरे करण्यापासून ते आयुष्य आनंदी बनवू इथवरचे अफाट दावे निराधारच होत. मानसिक वा शारीरिक रोग किंवा समस्या बर्या करण्याचा दावा केल्याने ध्यानास अवास्तव महत्त्व आले आहे. वास्तवात, वैज्ञानिक उपचारात काही वेळा मदत करणारे एक साधन, एवढेच महत्त्व त्यास द्यावयास हवे आणि अर्थातच ते वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय करणे केव्हाही चुकीचे नव्हे तर धोकादायक होय.
(लेखाची पूर्वप्रसिद्धी – ‘आजचा सुधारक’, नागपूर)
डॉ. प्रदीप पाटील, क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट,
9890844468, इमेल – pradeep_aakar@yahoo.co.in
पत्ता – ‘चार्वाक’, 6564, जुना कुपवाड रोड, ‘हॉटेल लव्हली’ सर्कलसमोर, सांगली 16
www.aakarfoundation.org.in
भारतासारख्या आध्यात्मिक
भारतासारख्या आध्यात्मिक परंपरा असलेल्या देशात ध्यान, समाधी यांना अनन्यसाधारण महत्व आहे. वैज्ञानिक निकषांवर त्यांचं मूल्यमापन करणं केवळ अशक्य. त्याला आधार आहे तो प्राचीन ऋषिमुनींच्या अनुभवसिध्द वेदवचनांचा. उपरोधाने ध्यानस्थ म्हणुन मनोविकारांशी ध्यानाची सांगड घालणा-या लेखकाची किव वाटते. कदाचित ध्यानामध्ये मेंदुत प्रसवनार्या लहरींचे मोजमाप करणे अल्फ़ा बीटाच्या पलीकडील असेल. मोठमोठ्या संस्थांचे संदर्भ दिल्याने त्यांच्या म्हणण्याला authentic परीमाण मिळेल असे समजू नये. ज्या गोष्टीमध्ये आपल्याला गती नाही, अनुभव नाही त्यावर मूळातच बोलु नये आणि टवाळी तर नकोच.
भारतीय संस्कृतीचा संपूर्ण
भारतीय संस्कृतीचा संपूर्ण जगात आदर केला जातो. आपल्या देशातील असे लेखन करून काय साध्य करून दाखवतात?
बंगल्याचे नाव सांगते की लेखक
बंगल्याचे नाव सांगते की लेखक नास्तिक आहे.. पूर्व ग्रह दूषित आहे..जरा विवेकानंद वाचा म्हणजे कळेल ध्यान महत्व.. लोकांची दिशा भूल करणारा लेख आहे हा.
सन्माननीय पाटील साहेब, ध्यान
सन्माननीय पाटील साहेब, ध्यान म्हणजे काय हे प्रथम समजून घ्या. आपण जगावेगळे लिहून आपला गाढवपणा आपण का निष्कारण जगासमोर मांडता? doctor, clinical psychologist, इत्यादी डिग्री म्हणजे आपण खूप शिकून काहीही वक्तव्य करून आपण जगापेक्षा वेगळे आहोत हे दाखविण्याचा केविलवाणा, ओंगळवाणा प्रयत्न. अशी फडतूस कामे करण्यापूर्वी आपण एकदा तरी ध्यानास बसला आहात का?
ध्याना मुळे अनेक आजार बरे होतात. यावर अनेक संशोधकांनी संशोधन केले आहे. सर्व धर्मात जगभर आदर आहे. त्याचप्रमाणे ध्यानावरती जगभर विपुल संशोधन झाले आहे, त्याही आपण अभ्यास करावा. आपले अज्ञान जाहीररित्या मांडण्यापूर्वी आपण किती मूर्ख आहोत हे यापुढे जगाला सांगू नये.
ध्यानाच्या नावाखाली व्यवसाय करणाऱ्या तथाकथित लोकांचे अंतिम ध्येय हे पैसा असल्यामुळे कदाचित ध्यानाबद्दल आपले काही गैरसमज झाले असल्यास आता लगेच शांत चित्ताने मांडी घालून बसा. डोळे मिटा. अशाच अवस्थेत किमान २० मिनीटे बसून राहा व त्यानंतर तुमचा उपरोक्त लेख परत वाचा म्हणजे तुम्हाला तुमची चूक उमजेल.
anubhavani bola nishkarshya
anubhavani bola nishkarshya anubhavan peksha mothe nahi niskarshya kadnya peksha swata meditation cha abhyas karas meditation nakki kay aahe. kelela abhyas ani satat meditation chi practice kara.
open challange.
buddha. vivekanand. ramkrushna paramhans. sant dhnyaneshwar yan peksha tumchi budhi nakkich choti aahe
meditation kahi milavnya sathi naste, reality samjun gheun satya paryant pohachnya sathi aste
मनूषाला मनशाती व जीवनाचा खरा
मनूषाला मनशाती व जीवनाचा खरा आनँद म्हणजे मेडीटेशन होय
Comments are closed.