Home अवांतर किस्से... किस्से... धयकाल्याच्या रात्री…

धयकाल्याच्या रात्री…

0

कोकणातील श्रीकृष्ण अष्टमीच्या दहीकाल्यात गाजते ती गणेशाची पूजा. रंगमंचावर गणपतीची पूजा करताना भटजींकडून होणारे विनोद आणि गणपतीची होणारी आरती हे सारेच मालवणी लोकसंस्कृतीचे आगळेवेगळे संचित आहे. गणेशाची पूजा केली जात असताना, आरती म्हणताना होणारा संवाद ऐकण्यास खूपच गोड असतो. मालवणी शिवी ही ओवीप्रमाणे असते याची प्रचीती तेथे येते. गणपतीची पूजा करायची आहे, पण साहित्य नाही, मग चालीवर घेऊया असे सांगत होणारे संवाद अस्सल विनोदाची निर्मिती करणारे असतात. पूजाअर्चा झाली, की नैवेद्य दाखवला जातो. तोही समजून घ्या असे गाऱ्हाणे घातले जाते आणि आरती सुरू होते.

हेची आवस खिलोरी, बापूस खटयाळो।

कायनाय हेका, भाव शेंड्याळो।

फडफड्या कानाचो एक दिसता सुळो।

खाजीच्या कामास भारी हुळहुळो।थयथय थयथय नाचता,

पोरगो शिवल्याचो।

बसाक दिलो ह्येका राजा उंदराचो।

जयदेवा जयदेवा जय कानसुर देवा।

भक्तिभावान करतय मी तुझी सेवा।

चार हात एक स्वांड,

आठ तुझ्यो बायल्यो।

तुया दिसतंस बरो,

पण वायट तुझो खायलो।

त्या वेळी भटजी आणि नाईक यांचा संवाद रंगतो आणि शेवटच्या शब्दाने सारा घोळ घातल्याचे सांगितले जाते. मग भटजी स्पष्टीकरण देतात. नाईकजी सोळा उंदीर खाल्ले… तेव्हा नाईक म्हणतो, अहो, सांगताय काय? तुम्ही उंदीर खाल्ले? कसे खाल्ले? त्या वेळी भटजी त्यांचे सोवळे उंदराने खाल्ले असे सांगतात. त्यामुळे उंदराबाबत मला भीती वाटते. हेच मी गणपतीला प्रत्येक आरतीच्या वेळी सांगतो असे जेव्हा ते बोलतात तेव्हा सारे जण हसू लागतात. त्यानंतर उंदराची आरती केली जाते. मग फुगडी घातली जाते. देव काढला जातो. हे सारे सुरू असताना रंगमंचावर एकीकडे ढोल वाजवताना, दुसरीकडे मशाल पेटवली जाते. मशाल शंखासूर जाईपर्यंत पेटत असते. त्याबद्दलची माहिती दशावतारी कलांवतांकडून बोलताना मिळते.

‘गुरुकृपा दशावतार लोककला नाटयमंडळ’ सांभाळणारे मारुती सावंत यांनी या पारंपरिक दशावतार आणि कलावंत यां विषयीचे वैशिष्ट्य जपले आहे. त्यांनी गावानुसार परंपरा बदलत जातात याकडे लक्ष वेधले आहे. कलावंत रात्रीच्या खेळासाठी सूर्यास्तापूर्वीच पोचतात. त्यांना गाववासीयांकडून शिधा दिला जातो आणि दुसऱ्या दिवशी कलाकार दुसऱ्या गावात रवाना होतात. गावे लांबच्या अंतरांची असतील तर निवासाचे ठिकाण बदलले जाते. या जत्रोत्सवात कलाकारांच्या झोपेच्या वेळाही बदलतात. त्यांची झोपेची वेळ म्हणजे दिवसाचा प्रहर असतो. कलाकार मंडळी चैत्र पौर्णिमेपर्यंत प्रत्येक रात्र जागवत असतात. पण दरवेळी गाव मात्र वेगळे असते. पण त्या काळात, कलावंतांच्या दिवसरात्रीच्या वेळाच्या संकल्पनाच बदलून जातात.

किशोर राणे 9422054627 kishorgrane@gmail.com

मु. पो. हरकूळ खुर्द, ता. कणकवली, जिल्‍हा सिंधुदुर्ग 416601

———————————————————————————————-

About Post Author

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version