धनगरी लोककला संवर्धनासाठी एक दिवसाचे शिबिर कोल्हापूरजवळ कसबा बावडा येथे झाले. धनगरी लोककलांमधील पंचवीसाहून अधिक प्रकार सुमारे अडीचशे कलाकारांनी सादर केले. तो अनोखा व अफाट आविष्कार ठरला. तीन संस्थांनी एकत्र येऊन एवढा मोठा घाट घातला होता. हालमत सांप्रदाय मंडळ (कुपवाड), शिवाजी विद्यापीठाचे राजर्षी शाहू लोक संस्कृती केंद्र आणि कसबा बावडा येथील बिरदेव धनगर समाज मंडळ या त्या तीन संस्था. कलाकार कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, बेळगाव आणि विजापूर अशा सात जिल्ह्यांतून आले होते. प्रेक्षक लोक महाराष्ट्र-कर्नाटकाच्या विविध भागांतून आले होते. हालमत सांप्रदाय मंडळाचे कार्यकर्ते गेल्या आठ वर्षांपासून लोककला संवर्धनासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांच्या कलाकारांना या शिबिराच्या निमित्ताने धनगरी परंपरेतील सगळ्या लोककला सादर करण्याची संधी मिळाली.
देशात धनगरांची लोकसंख्या नेमकी किती हे कोणी ठामपणे सांगू शकत नाही- एका ‘सर्व्हे’नुसार महाराष्ट्रातील लोकसंख्येच्या सोळा-सतरा टक्के संख्या धनगरांची आहे. पण आम धनगरांना ते कोण आहेत आणि कितीजण आहेत याची माहिती नाही. ती पद्धतशीरपणे होऊ दिली जात नाही अशी त्या समाजाची समजूत होत चालली आहे. त्यांचा समज त्यांना गावगाड्यात आणि सामाजिक दृष्टीने गृहित धरले जाते असा झाला आहे. ती जमात सुमारे छत्तीस पोटजातींत विखुरलेली आहे; गावोगावी भटकंती हा त्या समाजाचा व्यवसाय आहे.
अर्थात, धनगर समाजास इतिहास आहे, त्यांची स्वतंत्र संस्थाने विजयनगर, अजमेर, म्हैसूर अशा ठिकाणांसह अनेक प्रांतांत होती. मोठमोठी मंडळी भारतभर या समाजात होऊन गेली, उदाहरणार्थ – राजा बलियाप्पा गवळी (बळीराजा), भारताचा उद्गाता चंद्रगुप्त मौर्य, भारतातील सामाजिक सुधारणांचा आद्य विचारप्रवर्तक पेरियार, थोर विचारवंत डी.के. नायकर, क्रांतिवीर संगोळी रायाण्णा, अहिल्यादेवी होळकर, सहकाराचा जन्मदाता सिद्धनगौडा पाटील, स्वातंत्र्यसेनानी गोविंद गुरू बवारी, फत्तेसिंह गडरी, हिंदी साहित्यिक पद्मश्री श्यामसिंह शशी, हॉकीतील जगज्जेता खेळाडू दादा किसनलाल, वीरचक्र विजेता शहीद महीलाल धनगर, क्रांतिवीर आप्पाराव पाटील, आजपाल चौहान (अजमेरचे संस्थापक राजे), म्हैसूरचे विजयराज वडियार अशी. विजयनगरचे राजशकट कित्येक वर्षे मेंढपाळ समाजाच्या हाती होते. शिवाजी महाराजांच्या सैन्यदलात काही पराक्रमी सरदार हे धनगर-मेंढपाळ, पैलवान होते.
स्वातंत्र्यानंतर धनगरांना आरक्षण देताना त्यामध्ये अनेक घोळ घातले गेले. त्यामुळे तो समाज शासकीय, शैक्षणिक व राजकीय लाभांपासून दूर राहिलेला आहे.
धनगर-मेंढपाळ हा येरागबाळा दिसतो. त्यांच्या पेहरावावरून त्याला ‘येडं धनगरं’ असे म्हटले जाते. पण तो सतत उघड्यावर असल्याने त्याला हवामानाचे ज्ञान असते. ती मंडळी वाऱ्याच्या दिशेवरून पावसाचे ठोकताळे बांधत असतात आणि ते बरोबर येतात. ते संकटाची चाहूल मेंढरांच्या हालचालींवरून ओळखतात. ते मेंढ्या घेऊन भटकंती करतात, त्यांतदेखील योजना असते. ते पावसाळी दिवसांत कमी पावसाच्या प्रदेशांत आणि पाणी टंचाईच्या काळात कोकण भागात जातात. त्यांना रात्रंदिवस मेंढरांच्या सेवेत असताना रानावनात, शिवारात चोरा-चिलटांपासून शेळ्या-मेंढ्यांच्या आणि स्व-संरक्षणासाठी जाळ करून राहवे लागते.
तसा जागता पाहरा देता-देतानाच धनगरी ओवीचे धन तयार झाले ! ती ओवी त्यांनी अपार श्रद्धा असलेल्या देवाला वाहिली ! त्यांनी ‘उभ्या राहिल्या जाग्याला’ आणि ‘पहिले नमन बिरोबाला’ असे म्हणत ‘सुंबरानं मांडल्या’चा घाट घातला. ते त्यांच्या व्यवसायाचे, त्यांच्या भोवतालच्या परिसराचे प्रतिबिंब ओव्यांतून मांडत असतात. ते त्यांचा देव, त्यांची दिनचर्या आणि त्यांच्या शेळ्या-मेंढ्या, जत्रा-यात्रा, सण-समारंभ याचे चित्र ओवीतून सादर करतात. धनगरी ओवी, प्रकटणे ही पारंपरिक कला आहे. त्यात त्यांना त्यांचा नायक, खलनायक दिसतो. तेच ते ओवीबद्ध पद्धतीने मांडतात.
ओवीला पुढे वाद्यांची जोड मिळाली. त्यातून ढोल, कैताळ, घुमकं, सनई, घुंगरू मिळत गेले. ढोलाच्या वेगवेगळ्या लयींतून डिंब, कैपट, वालुग, बैठकीची ओवी असे स्वरूप आले. कलांच्या सादरीकरणात प्रदेशनिहाय फरक आहे तरी त्यांचे विषय आणि आशय एकच आहेत. वालग्यातील अनेक स्टेजेस, ऱ्हिदम्स, ठेके, शिड्या मारून वेगळ्या अस्तित्वाची चुणूक दाखवली जाते. या वादनात अनेक तरुणांनी विशेष प्राविण्य मिळवलेले दिसते. त्यामध्ये लय यावी म्हणून सनई, घुमकं, पोवा, गेयता, आवाजातील चढउतार, पद्याची गद्यामध्ये फोड करून सांगणे अशा पद्धती आणल्या गेल्या आहेत. या कलांना हेडाम, व्हैक, भाकणूक, बतावणी अशी नवी अंगे जोडली गेली आहेत. बैठकीची ओवी, ताल-सुरांची वेगळ्या ढंगांची ओवी असे बाज त्यामध्ये पाहण्यास मिळतात. केवळ सनईवर सादर होणारी ओवी, वालुग येथे सादर केले गेले. एकटा डिंबाड्या सगळा माहोल हलवताना-डोलावताना दिसला. पहाडी आवाजाने आणि तालासुरातील साथीने त्याला एका सुरातील सुंबरानाचे स्वरूप आलेले आहे.
त्यात पुढे नृत्याविष्कार आले. आता, एकसारखे ताल, एकरंगी पोशाख असतात. त्यातून साकारते गजनृत्य. त्यातही प्रदेशनिहाय वेगवेगळेपणा आहे. त्यांचे लब-ढब स्थानिक बोलीतून पाहण्यास मिळतात. माणदेशी गजनृत्य, वैदर्भीय गजनृत्य, कोकणी गजनृत्य, कर्नाटकी गजनृत्य, देशावरच्या कलाकारांचे गजनृत्य यामध्ये काही फरक पाहण्यास मिळतात. त्यातील बारकावे, हेलकावे आणि त्यांचे पोशाख यांतून प्रादेशिकता अधिक प्रतिबिंबित होताना दिसते. धनगरी कला आणि त्यातील कथानक मौखिक पद्धतीने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे येत गेले आहे. अनेक कलाकार फारसे शिक्षण नसलेले आहेत. पण त्यांना रामायण, महाभारत यांतील विविध कथा-आख्यायिका कोणत्या ग्रंथांत किती क्रमांकाच्या पानांवर आहेत आणि त्यातील कोणत्या अध्यायातून कोणता संदर्भ घेतला आहे हे मुखोद्गत असते.
ओवी आरंभीच्या काळात बिरोबा, काशिलिंग, शंकर-पार्वती, सूर्य-चंद्र, देवी मायाक्का या देव-दैवतांच्यापुरती मर्यादित होती. ती विविधांगांनी विकसित होत गेलेली आहे. राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक प्रश्नांची सोडवणूक यांसाठी धनगरी ओव्यांचा जागर सुरू झालेला आहे. अनेक तरुण त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने सिद्ध होताना दिसू लागले आहेत. त्यामध्ये सुरकरी, धारकरी वेगवेगळे असले तरी धनगरी लोककला सादर करणे हे एक शास्त्र बनले आहे आणि त्याबाबत एकवाक्यता पाहण्यास मिळते.
शिवाजी विद्यापीठाच्या सहभागाने या कलांचे डॉक्युमेंटेशन केले जात आहे, हालमत संप्रदाय मंडळाचे सागर माने, रोहित बन्ने, भाग्येश देवकाते, विजय दुधाळे, शामराव पिंगळे यांनी हा पुढाकार घेतला आहे. बारा-पंधरा वर्षांच्या तरुणाईपासून ते पंच्याहत्तर-ऐंशी वर्षांच्या वयस्कर माणदेशी धनगरांपर्यंत सर्व वयोगटांचा मेळाव्यात सहभाग होता. सळसळती तरुणाई आणि खेड्या-पाड्यांतून आलेल्या बाया-बापडे शिबिराच्या निमित्ताने एकत्र आले होते. पीएच डी करू पाहणारे ज्ञाती बांधव मेळाव्यास उपस्थित होते.
शिबिराचे उद्घाटन वाशीच्या ओवीकार संघाच्या ढोल वादनाने झाले. वाघापूरचे भाकणुककार कृष्णात डोणे महाराज यांनी त्या कलांविषयी देश-विदेशात आलेले काही अनुभव सांगितले. तर शाहीर आझाद नायकवडी यांनी शाहिरीचे लोकसंवादातील महत्त्व विशद केले. कर्नाटकातून आलेले जक्काण्णा मिशी यांनी कर्नाटकातील धनगरी लोककलांचे समाजजीवनातील स्थान नमूद केले. त्यांनी कर्नाटक सरकार या कला जपण्यासाठी करत असलेल्या विविध प्रयत्नांची माहितीही दिली. योगेश प्रभुदेसाई यांनी धनगरांची हेमाडपंथी मंदिरे आणि त्यातील वीरगळ या संबंधीचे वाचन सादर केले आणि त्यांचे महत्त्व सांगितले. संतोष जाधव यांनी धनगरी कांबळ्यांचे विविध प्रकार आणि त्यातील सूक्ष्मता वर्णन करून सांगितले. सागर माने याने ‘धनगरी ओवी- एक महाकाव्य – समज-गैरसमज’ याविषयी नव्या समाजची भूमिका विशद केली. शामराव पिंगळे यांनी हब्ब् उत्सवाचे समाजजीवनातील महत्त्व सांगितले.
बतावणी, दुधाची गाणी फारशी कोठे म्हटली जात नाहीत. त्याकडे इतर नागर समाजाने फारसे लक्ष दिलेले नाही. साहित्यात तर ते आलेलेच दिसत नाही. ते चित्रपटाच्या दुनियेत मात्र कोठे कवडशासारखे दिसू पाहतात. शेकडो वर्षांची ती कला गावकुसाबाहेर आहे. त्या कलेत समाजबांधणी, लोकप्रबोधन आणि समाजाच्या प्रगतीची मोठी ताकद आहे. पण त्याकडे मध्यमवर्गीयांकडून, प्रस्थापित धनगरांकडून नाके मुरडली जातात. तिच्याविषयी गैरसमज करून दिले जातात. त्यामुळे तिची अवस्था कुंठित आहे. त्या दृष्टीने कलाकारांच्या मेळाव्याचा प्रयत्न दिशादर्शक आणि अनुकरणीय असा झाला.
– रावसाहेब पुजारी 9322939040
———————————————————————————————-