देव/नवस/बकरे… आणि धाराशिवचा दर्गा

1
221

व्यक्तीला मृत्यूनंतर काही धर्मांत जमिनीत पुरतात. त्याला दफन असे म्हणतात. ते शव जेथे पुरले जाते त्याला कबर/कब्र असे म्हणतात. त्यानंतर झाकलेली कबर, ती जागा ओळखू येण्यासाठी म्हणून तेवढा भाग उंच करून तेथे मातीचे किंवा अन्य टिकाऊ प्रकारचे बांधकाम केले जाते. त्याला थडगे असे म्हटले जाते. व्यक्ती प्रसिद्ध असते किंवा तिने काही लोकल्याणकारी कामे केलेली असतात तेव्हा तशा व्यक्तीच्या बाबतीत त्यांचे थडगे आदरणीय समजले जाते. त्याची सुरक्षितता, त्याची देखरेख इत्यादीसाठी त्यावर गोलाकार बांधकाम केले जाते. असे जे बांधकाम सार्वजनिक ठिकाणी आढळून येते त्याला दर्गा म्हटले जाते.

धाराशिव (उस्मानाबाद) येथील शहर पोलिस ठाण्याजवळ जिल्हा परिषद प्रशाला आहे. जुन्या शाळेजवळ अति दुर्लक्षित असे दगडी स्वरूपातील एक थडगे होते. शाळेचा एक शिपाई रिटायर झाला. त्याने त्याला विरंगुळा म्हणून त्या थडग्याची सुरक्षितता, स्वच्छता, डागडुजी इत्यादी कामे सुरू केली. त्याने तेथे एकेक गोष्ट हळूहळू केली. म्हणजे जरासे बांधकाम, फरशी, कंपाऊंड… नंतर भोवती भिंती असे करता करता त्याचे लहानसे रूप कालांतराने मोठे झाले. गंमत अशी की अनेक मुस्लिम आणि हिंदू मंडळी तेथे काही इच्छा बोलून दाखवण्याला अर्थात मन्नत मागण्याला येऊ लागली. त्यात काही काही लग्न झालेली जोडपी असतात. काही मूल झालेल्या स्त्रिया असतात. काही जण काहीच काम नसले तरी येतात.

जुन्या लहानशा खुणा, ओळखीच्या वस्तू-वास्तू यांना अशाच प्रकारे, योगायोगाने उजाळा मिळत असतो. तो लोकभावनेचा आविष्कार असतो. धाराशिवजवळ दहा-पंधरा किलोमीटर अंतरावर गड देवधरी नावाचे लहानसे खेडे आहे. डोंगराच्या खाली, अगदी दरीत असावे असे. त्या ठिकाणी असाच नव्याने निर्माण झालेला दर्गा होता. आधी तेथे काही नव्हते, पण एका हुशार माणसाने त्याची वार्षिक जत्रा सुरू केली. त्याला गावच्या जत्रेचे स्वरूप मिळाले. जिल्हा परिषदेकडे जत्रेसाठी पाण्याचे टँकर मागण्याचे प्रस्ताव येत गेले. पाणी हा विषय जिव्हाळ्याचा असल्याने जिल्हा परिषदेकडून टँकर त्या स्थळी येणे सुरू झाले. शासनदफ्तरी कागद काळे झाले, त्यास अधिकृत श्रद्धास्थानाचे स्वरूप आले. आसपासचे आणि मुख्यतः धाराशिव शहरातील लोक तेथे दर गुरुवारी नवस बोलणे-फेडणे करू लागले. त्याच्या कहाण्या पसरू लागल्या.

ह्यात कोणत्या सामाजिक घटकांचा सहभाग आहे?

मागील तीस वर्षांत तेथे गुरुवार प्रस्थ वाढत गेले. गर्दी वाढली. तेथे वस्तू, इंधन, जळण, शेड, भांडे इत्यादी देणारी दुकाने झाली. ‘देऊळ’ सिनेमा आठवतो? तशीच खरीखुरी कहाणी. जागेचा व्यवसाय आणि भाव वाढला. सरकारने डांबरी रस्ता करून दिला.

शहरातील अनेक हिंदू कुटुंबे आहेत, की जे गड देवधरीला जातात, नवस फेडतात. नवस बकऱ्याचा लागतो. तेथे कोणत्याही वारी बकरे मिळण्याची सोय आहे. शासकीय कर्मचारी चक्क गुरुवारी ऑफिस चालू असताना सरळ दुपारी तेथे आमंत्रित असतात. तिकडे जाण्यास, तेथे जेवण करण्यास धर्म, जात, पद यांचा कसलाही अडथळा येत नाही. सगळे आनंदाने, हौसेने जातात, जेवतात, परत येतात. ज्यांचे बकरे तिकडे कापले गेलेले असतात त्यांना त्यांचे नातेवाईक अहेर करतात – कपडे, भेटवस्तू असे कौतुक असते.

एका व्यक्तीचे आजारपण वाढले. त्याला पोटाचे दुखणे आहे असे मनाने निदान ठरवले गेले. त्यांच्यासाठी गडाला नवस बोलला गेला, आजार काही काळाने गेला, पण बकरे कापणे भाग पडले. बोलावणे सगळ्यांना गेले, तर बकरे एक कसे पुरणार? दोन बकरे कापले गेले. सगळा खर्च जवळपास चाळीस हजार रुपये झाला असावा. त्यांनी त्यांचा अधिकारी वर्ग, सोबतचे कर्मचारी यांसहित गावाकडील मंडळी, पाहुणे अशी मस्त भारी प्रतिष्ठित कंदुरी साजरी केली.

म्हणायला देव कुणाचा तर मुस्लिमांचा आणि कंदुरी कोणाची तर वरिष्ठ हिंदूंची ! भारतीय समाज असा संमिश्र कौतुकाचा, भाविकतेने भारलेला आहे ! दर्ग्याला नवस बोलून कंदुरी करणारी हजारो कुटुंबे आहेत. त्यांच्या मनात, डोक्यात कोणताही धर्म नसतो. मजा अशी की देव, धर्म, इच्छा, नवस, बकरे, श्रद्धा यांचे अफलातून संयुग तयार झाले आहे.

टीप – कंदुरी: बहुतांश खेडेगावांत देवाला बकरे कापणे आणि त्याचा नैवेद्य देवाला दाखवणे, त्या कार्यक्रमास लोकांना हजर राहायला आणि तेथे मिळून मटणाचे जेवण एकत्र बसून करायला आमंत्रित केले जाते. या संपूर्ण प्रक्रियेला आणि पद्धतीला कंदुरी असे म्हणतात.

– सुनील बडूरकर 9975019165 badurkarsunil@gmail.com

About Post Author

1 COMMENT

  1. सरजी नमस्कार!🙏
    गड देवधरीच्या दर्ग्याचा इतिहास सुंदर शब्दांत उलगडला. मला वाटते, हिंदु हा अधिकचा धर्मभोळा असल्याने तो दर्गा, थडगे वा शेंदूर फासलेल्या दगडालाही नतमस्तक होतो. मात्र…हिंदुशिवाय इतर कोणत्याही दुसऱ्या धर्माची व्यक्ती इतर स्थळी नतमस्तक हौत नाही. याचाच अर्थ- हिंदुंनी इतर धर्मीयांप्रमाणेच स्व-धर्माचा आणि धर्म श्रद्धांचा आंधळेपणाने नव्हे; तर,डोळसपणे विचार करावा. गांधीजींनी “कोणताही देव-देवता बकरा, कोंबड्यांची रक्ताची इच्छा धरत नाही. जर तसे असेल तर मग माझ्या बळी द्या!” असे म्हणत धर्म जागृती घडवली. तसे करणे आज काळाची गरज आहे असे वाटते. आपण आपल्या या नंतरच्या लेखातून असे प्रबोधन घडवून आणण्यासाठी प्रयत्न करावे ही विनंती ! 🙏
    धन्यवाद!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here