दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकलेला माणदेश

0
78
Dushkaal1

असं म्हणतात, रामाने बाण मारून पावसाला बाणेघाटात पिटाळलं. तेव्हापासून माणदेशात पाऊस नाही.  ‘‘त्‍येची अशी कथा सांगत्‍येत मास्तर का रामायण काळात रामलक्षिमन या भागात देव देव करत फिरत आलं. हितल्‍या रामघाटावर सावली बघून जेवाय बसलं अन् एकदम पाऊस आला, जोरकस आला. सगळ्या अन्नात पानी पानी झालं, तवा रामाला आला राग, त्‍येनं एक बाण मारून पावसाला पार बालेघाटात पिटाळला. तवाधरनं जो ह्या मानदेशात पाऊस नाय तो आजपातूर. बघा, तुमी पावसाळ्यात आपल्‍या टकु-यावरनं काळं,काळं ढग जात्‍यात… जात्‍यात अन् पडत्‍यात ते बालेघाटात…’’

आटपाडी तालुक्यातील माणगंगा नदीची सद्यस्थिती  माणदेशाचे भाष्‍यकार आणि साहित्यिक व्यंकटेश माडगूळकर यांच्‍या ‘बनगरवाडी’ कादंबरीतला रामा बनगर कथानायक असलेल्‍या मास्तराला माणदेशाच्‍या दुष्काळाचे इंगित असे  सांगतो. ती कादंबरी १९४० च्‍या दशकातली. माणदेश हा सांगली , सातारा आणि सोलापूर या तीन जिल्‍ह्यांमध्‍ये विभागलेला प्रांत. सुजलाम-सुफलाम मानल्‍या गेलेल्‍या पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी डाग किंवा धब्बा. जणू काही ‘डाग अच्छे होते है!’ म्हणून जपलेला! गेली शतकानुशतके अश्वत्थाम्‍याच्‍या जखमेप्रमाणे दुष्काळाचा भळभळता कलंक माथी घेऊन माणदेशातील माणसे जगणे भोगत आहेत. शक, हूण, चालुक्य, हेमाद्री, मुघल, मोगल…  कितीतरी सत्ता आल्‍या, गेल्‍या. शिवरायांच्‍या स्वराज्‍यातही तो भाग दुष्काळीच होता. अगदी इंग्रज आले, गेले. स्वातंत्र्यानंतरही सरकारे बदलली, पण तेथील माणसांच्‍या जगण्‍यात फरक पडलेला नाही. मधल्‍या काळात काही तलाव, बंधारे, पाझर तलाव त्या भागात झाले. पण मुळातच ज्‍या भागात वर्षाचे सरासरी पाऊसमान चारशे-साडेचारशे मिलिमीटर; त्‍या भागात पाणी साठवायची ती भांडी भरणार तरी कशी अन् ती पुरणार तरी कुणा-कुणाला?

आटलेली येरळा नदी  माणदेशचा भाग पाऊसमान कमी म्हणून समृद्धता नाही आणि समृद्धता नाही म्हणून विकास नाही या दुष्टचक्रात अडकून पडला आहे.

 पाण्‍याला मराठीत जीवन असा प्रतिशब्द आहे, तो सर्वार्थाने माणदेशी जीवनाला लागू पडतो. त्या भागात पाऊस कमी म्हणून ओढे- नाले – नद्या कमी. त्या भागात माणगंगा, येरळा अन् अग्रणी या तीन मोठ्या नद्या आहेत. माणगंगा ही सर्वात मोठी नदी एकशेऐंशी किलोमीटर लांबीची. येरळा साठ किलोमीटर, तर अग्रणी चाळीस-पन्‍नास किलोमीटर लांबीची.

माणगंगा नदीचे उगमस्थान  माणगंगा नदीच्‍या उगमाबद्दल जनलोकांत अनेक अख्‍यायिका आहेत. माणदेश कधी काळी दंडकारण्‍यात होता. राम-लक्ष्मण चौदा वर्षे वनवासात असताना ते सीतेसह शिखर शिंगणापूरच्‍या डोंगरावर आले. तिथे चालून चालून थकल्‍यावर सीतामाईला तहान लागली. पण त्‍या ओसाड डोंगराळी माळरानाच्‍या भागात पाणी कोठून मिळणार? अखेर, रामाने बाण मारून पाणी काढले. ज्‍या ठिकाणी बाण मारला,त्‍या ठिकाणातून प्रवाह वाहू लागला. त्‍या प्रवाहातून लक्ष्मणाने द्रोण भरून पाणी घेतले आणि तो तहानलेल्‍या सीतामाईकडे आला. परंतु तोपर्यंत तहानेने सीतेला ग्लानी आली होती. ‘झोपलेल्‍या माईं’ना कसे उठवावे म्हणून लक्ष्मणाने त्‍यांना उठताच दिसेल अशा मानेपासून हातभर अंतरावर पाण्‍याने भरलेला द्रोण ठेवला. सीतामार्इंना काही वेळाने जाग आली. त्‍या उठू लागताच मानेचा धक्का द्रोणाला लागला आणि पाणी सांडले – प्रवाह वाहू लागला. तेव्हापासून रामाने बाण मारलेल्‍या प्रवाहास बाणगंगा आणि सीतामार्इंच्‍या मानेचा धक्का लागून द्रोणातील सांडलेल्‍या पाण्‍याच्‍या प्रवाहास माणगंगा असे नाव पडले. ज्‍या ठिकाणी तो प्रसंग घडला त्‍या डोंगराला सीतामाईचा डोंगर असे नाव दिले गेले आहे. सीतेचे लहानसे प्राचीन मंदिरही तेथे आहे. अलिकडच्‍या काळात कळस्करवाडी आणि कुळकजाई (ता.माण, जि.सातारा) येथील स्थानिक रहिवाशांनी जुन्‍या मंदिरामागे नवीन मंदिराची उभारणी केली आहे.

माणगंगा नदीच्या उगमस्थानी असलेल्या मंदिरातील सीतेची मूर्ती  दुष्काळाचा ज्ञात आणि नोंद असलेला इतिहास इसवी सन ९४१ सालापासून सुरू होतो. दुष्काळ सलग आठ वर्षे पडला होता. त्‍यानंतरचा संपूर्ण भारत वर्षात प्रसिद्ध पावलेला १३९६ ते १४०७ या काळातला दुर्गादेवीचा दुष्काळ. त्‍या दुष्काळाची मोठी झळ माणदेशातल्‍या सर्व प्रांतांसह, गुराढोरांनाही बसली. त्‍यानंतर परत दुष्काळ १४५८ ते १४६० या काळात पडला. त्यावेळी माणदेशातील मंगळवेढा प्रांतात झालेल्‍या घटनेची नोंद इतिहासात आहे. दामाजीपंत नावाचे विठ्ठलभक्त संत बिदरच्‍या बादशहाच्‍या पदरी अंमलदार म्हणून नोकरीत होते. मंगळवेढे त्‍यावेळी ज्वारीचे कोठार म्हणून ओळखले जात होते. त्‍यावेळी गोदामात धान्‍य होते. दुष्काळात अन्न-अन्न करून मरणा-या गोरगरिबांची दशा दामाजीपंतांना पाहवली नाही. त्‍यांनी धान्‍याची कोठारे गोरगरिबांना बादशहाच्‍या परस्पर खुली केली. पुढे १७९१ ते १७९२ या काळात परत दुष्काळ पडला. तो कवटी दुष्काळ या नावाने ओळखला गेला. त्याच दुष्काळातून बेरोजगार लोकांना व शेतमजुरांना दुष्काळी कामे देऊन मोबदल्‍यात धान्‍य,अगर गरजेच्‍या वस्तू देण्‍याची प्रथा सुरू झाली. त्‍यानंतरच्‍या १८७६ ते १८७८ या काळातल्‍या दुष्काळात माणदेशात पहिल्यांदा जनावरांच्‍या छावण्‍या सुरू करण्‍यात आल्‍या. पिंगळी, नेर, म्हसवड; तसेच सांगोला भागात शेकडो जनावरे मृत्‍युमुखी पडल्‍याच्‍या नोंदी इतिहासात आहेत. त्याच काळात ब्रिटिश आमदनीत राणी व्हिक्‍टोरियाने माणगंगा नदिपात्रात राजेवाडी तलाव (त्यालाच म्हसवड तलाव असे नाव शासनदप्तरी आहे) बांधण्‍यात आला. त्याचे पाणलोट क्षेत्र ४८० चौरस मैल आहे.

धोम धरणात आटलेला पाण्‍याचा साठा अग्रणी नदीची अवस्था माणदेशातील इतर नद्यांप्रमाणेच आहे.माणदेशातील आटपाडी परिसरातील शेतक-यांनी केवळ दुष्काळ आहे आणि तत्कालीन इतर राज्‍यपद्धतीनुसार त्या भागातही दुप्पट-तिप्पट शेतसारा घेतला म्हणून औंध सरकारविरुद्ध १९३७ मध्‍ये मोर्चा काढला होता. चार हजार शेतक-यांनी आटपाडी ते औंध हे जवळपास नव्‍वद किलोमीटरचे अंतर पायी चालत ‘लाँग मार्च’ केला होता. त्या मोर्चाचा परिणाम पुढच्‍या काळातील राजकारणावर झाला. औंधचे राजे भवानराव पंतप्रतिनिधी यांनी वयाच्‍या त्र्याहत्तराव्‍या वर्षी, ‘संस्थानचा सारा कारभार १९३७ साली, तेथून पुढे जनताच प्रजापरिषदेच्‍या रूपाने चालवेल’ अशी घोषणा केली. त्‍यामुळे आटपाडीकरांना प्रत्‍यक्ष स्वातंत्र्यापूर्वी दहा वर्षे आधी स्वातंत्र्य मिळाले. मात्र त्‍यानंतरच्‍या काळातही दुष्काळाने त्यांची पाठ सोडल्‍याचे दिसत नाही. व्‍यंकटेश माडगुळकरांच्‍या ‘बनगरवाडी’ या कादंबरीतल्‍या घटना, दुष्काळासंबधित वर्णने मुळीच काल्पनिक म्हणता येणार नाहीत. माणदेशातील मेंढपाळ लोक केवळ पाऊस नाही अन् चारा मिळत नाही, म्हणून शेकडो मैल स्थलांतर करत आहेत.

माणदेशातले अनेक लोक पूर्वी मुंबईत गोदी कामगार म्हणून जात असत. तसेच, वसईला गवंड्यांच्‍या हाताखाली म्हणून जाणा-यांची संख्‍या लक्षणीय आहे. आटपाडी, खानापूर परिसरातील अनेकांचा देशभरात विखुरलेला सोने-चांदी गलाईच्‍या व्‍यवसाय आहे त्यामागचे एकमेव कारण तेथील भागातल्‍या दुष्काळाचेच आहे.

विजय लाळे
विजय आनंद अपार्टमेंट,
नेवरी रोड, संभाजीनगर,
विटा शहर, जिल्‍हा सांगली ४१६३११
मोबाइल ८८०५००८९५७

About Post Author