Home वैभव इतिहास दुर्लक्षित महिपतगड

दुर्लक्षित महिपतगड

7
carasole

खेड तालुक्याच्या पूर्वेस बारा मैलांवर रसाळगड, सुमारगड आणि महिपतगड ही डोंगररांग उभी आहे. त्यामध्ये उत्तर दिशेला एकशेवीस एकर क्षेत्रफळावर महिपतगड उभा आहे. महिपतगडाची उंची आणि विस्तार प्रचंड आहे. ते तीन किल्ले एकमेकांच्या जवळ असल्‍यामुळे अनेक ट्रेकर्स महिपतगड – सुमारगड – रसाळगड असा ट्रेक देखील करतात. महिपतगडाला ‘महिमानगड’ असेही नाव आहे.

संगमेश्वर तालुक्यातील कुंडी या गावाच्या शिखरावर आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये महिपतगड उभा आहे. महिपतगडाची समुद्रसपाटीपासूनची उंची 3090 फूट आहे. त्यामुळे गडावर उन्हाळ्यातही थंड वातावरण असते. शिवाजी महाराजांनी कर्नाटकपर्यंतच्या मोहिमा यशस्वीपणे पार पाडल्या. त्या मोहिमांवरून स्वराज्याची राजधानी रायगड येथे परतण्याचा लांब पल्‍ला पार करताना मावळ्यांची दमछाक होत असे. त्यांच्यासाठी एखादे विश्रांतीस्थान असावे या उद्देशाने शिवाजींनी महिपतगडाची उभारणी केली.

महिपतगडाचा परिसर चार किलोमीटर अंतराचा विस्तीर्ण असा आहे. गड त्रिकोणी आकाराचा असून त्याच्या तीन दिशांनी तटबंदी उभारण्यात आली आहे. मात्र गडाच्या चारही बाजूंनी तुटलेले कडे आहेत. त्या‍मुळे प्रत्येक ठिकाणी तटबंदीची गरज भासत नाही. ज्या ठिकाणी कडा चढण्यास सोपा आहे तिथे तटबंदी उभारलेली दिसते. सध्या त्‍या तटबंदीची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. गडाकडे जातानाच भव्य असे प्रवेशद्वार आहे. किल्ल्याला एकूण सहा दरवाजे आहेत. ईशान्येकडे लालदेवडी दरवाजा, पूर्वेस पुसाटी दरवाजा, दक्षिणेकडे खेड दरवाजा, पश्चिमेस शिवगंगा दरवाजा, उत्तरेकडे कोतवाल दरवाजा आणि आग्नेयेस यशवंत दरवाजा आहे. सद्य…स्थितीत त्या दरवाजांच्या केवळ खुणा उरल्या  आहेत. शिवगंगा दरवाजाजवळ शिवाची पिंड आहे. पुसाटी दरवाजाजवळ एक शिडी आहे. कोतवाल दरवाजाजवळ मारुतीचे छोटे मंदिर आहे. किल्‍ल्‍यावर पारेश्वराचे मोठे मंदिर आहे. त्या मंदिरात वीस ते तीस जणांच्या राहण्याची सोय होते. मंदिरासमोर पिण्याच्या पाण्याची विहीर आहे. गडावरील भवानीमातेच्या मंदिराजवळ गड उभारताना गूळ व चुना यांच्या मिश्रणासाठी उभारलेल्या भट्टयांचे अवशेष आजही दिसून येतात. किल्‍ल्‍यावर शिवकालिन भुयार आहे. मात्र ते दगडमातीने भरून गेले आहे.

गडावर थंड पाण्याचे सात-आठ टाके आढळतात. त्यापैकी पाच टाके दगडमाती आणि पालापाचोळ्यांनी बुझून गेली आहेत. किल्ल्याचे पठार म्हणजे एक जंगलच आहे. अनेक प्रकारचे अवशेष या झाडीत लपलेले आहेत. तसेच तेथे अनेक जंगली प्राण्यांचा वावरही आहे. यामुळे या गडाकडे जाण्यासाठी माहितगार व अनुभवी वाटाड्यांची गरज लागते. गडावर तीन तोफा असून यातील दोन तोफा लहान तर एक सहा फूट लांबीची दिसून येते. त्या तोफा किल्‍ल्यावरील जंगलामध्ये दुर्लक्षित अवस्थेत पडून आहेत.

गडावर दर मंगळवारी नजीकच्या निगुडवाडीतील गुरव पूजा करतात. या व्यतिरिक्त वर्षातून दोन वेळा राखण दिली जाते. तेथील म्हसोबा हे देवस्थान नवसाला पावणारे असल्याचा समज आहे.

महिपगडावरून संगमेश्वर तालुक्याचे नयनरम्य दर्शन होते. गडाकडे जाणारा रस्ता सुस्थितीत नाही. त्यामुळे अनेक स्वयंसेवी संस्था दरवर्षी गडाकडे जाणारी पायवाट नीटनेटकी करण्याचा प्रयत्न करत असतात. गडावर राहण्याची सोय असली तरी जेवणाची सोय नाही. पाणी बारामही उपलब्ध आहे. महिपतगड फिरण्यास दोन ते तीन तास पुरतात.

गडाच्या पायथ्याजवळूनच संगमेश्वर ते कराड असा जोडणारा कुंडी घाटाचा रस्ता जातो. मात्र तो चांगल्या स्थितीत नाही. महिपतगडाकडे जाण्यासाठी खेड वरून पहाटे दहिवली गावाला जाणारी बस पकडावी. ते एका तासाचे अंतर पार केल्यनंतर दहिवली गावात पाचेता येते. त्या गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी मळलेली वाट आहे. ती वाट लांबची असल्याने गडमाथा गाठण्यास चार तास लागतात. त्या वाटेने जाताना दोन खिंडी पार कराव्या लागतात. गडाकडे जाणारा दुसरा रस्ता वाडीजैतापूर गावातून जातो. खेडवरून वाडीजैतापूरला जाणारी गाडी पकडावी. वाडीजैतापूरास उतरल्यावर मळलेल्या वाटेने दोन ते अडीच तासांचा प्रवास केल्यानंतर वाडीबेलदार गावात पोचता येते. वाडीबेलदारहून गडमाथा गाठण्यास एक तास पुरतो. वाट चांगली मळलेली असल्याने चुकण्याचा संभव नाही. रसाळगडवरून सुमारगड मार्गेसुद्धा महिपतगड गाठता येतो. ते अंतर साधारणत…: सात तासांचे आहे. जंगल दाट असल्याने वाट चुकण्याचा शक्‍यता आहे.

महिपतगडाला 2015 मध्ये संरक्षित स्मारक म्हणून मान्यता मिळाली आहे.

– टिम थिंक महाराष्‍ट्र

About Post Author

7 COMMENTS

  1. खूपच छान आहे माहिती.
    धन्यवाद

    खूपच छान आहे माहिती.
    धन्यवाद

  2. चांगली माहिती पण १- २ फोटो
    चांगली माहिती. पण १- २ फोटो पाहिजे होते.

  3. संपूर्ण लेखात महिपतगड आणि…
    संपूर्ण लेखात महिपतगड आणि महिमतगड या मध्ये घोळ झालेला आहे.महिपतगड खेड तालुक्यातील आहे आणि महिमतगड संगमेश्वर तालुक्यातील आहे.

  4. महिपतगड हा खेड तालुक्यात…
    महिपतगड हा खेड तालुक्यात येतो, संगमेश्वर नाही, महिपतगड गडावर जाण्यास तीन वाटा आहेत, 1. दहिवली गावावरून
    2. जैतापुर मार्गे वाडीबेलदार
    3. रसाळगड-सुमारगड-महिपतगड

  5. होय किल्ला छान आहे फक्त…
    होय किल्ला छान आहे फक्त किल्ल्यावरून संगमेश्वर चे दर्शन होऊ शकत नाही कारण किल्ला खेड तालुक्यात आहे

Comments are closed.

Exit mobile version