Home वैभव इतिहास दिवाळीच्या दिवशी शिमगा !

दिवाळीच्या दिवशी शिमगा !

'काय वाटेल ते झाले तरी स्वतंत्र मुंबई राज्य निर्माण करण्याला मी संमती देणार नाही!'या शब्दांत नेहरूंकडून वचन घेऊन शंकरराव देव महाराष्ट्रात परतले. त्यांच्या स्वागतासाठी शिवाजी पार्कवर विराट सभा झाली. सभेला उद्देशून बोलताना शंकरराव म्हणाले,''काँग्रेसश्रेष्ठींसमोर मी संयुक्त महाराष्ट्राची न्याय्य नि किमान मागणी मांडली आहे. ती मान्य झाली नाही तर त्यासाठी मी सर्वस्व पणाला लावल्याखेरीज राहणार नाही. मुंबईशिवाय संयुक्त महाराष्ट्राची मी कल्पनाच करू शकत नाही. पण मी नेहरूंना सांगितले, की संयुक्त महाराष्ट्र द्यावयाची तुम्हाला भीती वाटते का? मग ठीक आहे. ती भीती नष्ट झाल्यावर तुम्ही मला संयुक्त महाराष्ट्र द्या. भीतीच्या दडपणाखाली मला तुम्ही संयुक्त महाराष्ट्र दिलात तरी नको आहे. तो हिसकावून नेण्याचा प्रश्न नाही. इतरांची भीती नष्ट झाल्यावर हातात मंगल कलश नि पवित्र नारळ घेऊन पंडित नेहरूंनी मला मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचे दान करावे. ह्या दानातच उभयतांचा गौरव आहे !''

या सभेनंतर संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाला शंकरराव देवांच्या रूपाने खंबीर, कणखर नेतृत्व लाभल्याची भावना सर्वत्र झाली आणि संयुक्त महाराष्ट्राचे हे आंदोलन शंकरराव देवांच्या नेतृत्वाखाली यशस्वी होईल असा विश्वास सर्वांना वाटला.

पण शंकरराव देवांनी सुचवलेल्या पर्यायाला गुजरात प्रदेश काँग्रेसने नकार दिला. त्यांचे म्हणणे असे की,''राज्यपुनर्रचना समितीच्या शिफारशी जशाच्या तशा स्वीकारण्याची महाराष्ट्रीय पुढा-यांचीतयारी नसेल, तर संकल्पित मुंबई राज्याची महाराष्ट्र, गुजरात आणि मुंबई अशी तीन राज्ये बनवणे हेच हिताचे ठरेल!''

त्या क्षणापर्यंत धूर्तपणे गप्प बसलेल्या मोरारजी देसाईंनी पहिल्यांदा विधान केले. त्यातून त्यांचा कावेबाजपणा जाणवतो. ते म्हणाले,''राज्यपुनर्रचना समितीने सुचवलेल्या द्विभाषिक राज्यात जर गुजरातबरोबर सहजीवन जगणे महाराष्ट्रीयांना अशक्य असेल, तर महाराष्ट्र, गुजरात आणि मुंबई अशी तीन राज्ये निर्माण करण्याची मागणी गुजरात्यांना करावी लागेल! कारण, केवळ आपले मताधिक्य वाढवण्यासाठी म्हणून पुनर्रचना समितीने सुचवलेल्या द्विभाषिक विदर्भाचा समावेश करण्याची मागणी महाराष्ट्र काँग्रेस करत आहे!''

मोरारजी देसाईंच्या ह्या विधानावरुन मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र होण्याला त्यांचा प्रखर विरोध होता हे जाणवते. वल्लभभाई आणि डाह्याभाई या पितापुत्रांचा मुंबईचे स्वतंत्र राज्य बनवण्याचा जो प्रयत्न होता तोच मोरारजींनी पुढे चालू ठेवला.

महाराष्ट्र काँग्रेसचे नेते वाटाघाटी करण्यासाठी पुन्हा दिल्लीला गेले. वाटाघाटी संपवून ते जसे परतले तसे इकडे मुंबईत व मराठी मुलखात वातावरण पार बदलून गेले. काही तरी विपरीत घडणार असल्याची जाणीव सर्वांना झाली.

अखेर, भर दिवाळीत काँग्रेस श्रेष्ठींनी राज्यपुनर्रचना समितीने सुचवलेल्या द्विभाषिकाच्या चिंधड्या केल्या. मुंबई शहर महाराष्ट्रापासून कापून वेगळे राज्य निर्माण केले.

नेहरूंनी शंकराव देवांना दिलेला शब्द पाळला नाही. नेहरूंनी शंकररावांचाच नव्हे तर उभ्या महाराष्ट्रात विश्वासघात केला आणि महाराष्ट्रात प्रथमच दिवाळीच्या दिवशी शिमगा साजरा झाला!

-नरेंद्र काळे

narendra.granthali@gmail.com

9822819709

Last Updated On – 1 May 2016

About Post Author

Exit mobile version