दिलीप कुलकर्णी यांचे पुण्यातील घर अतिशय साधे – फारसा बडेजाव नाही, घरात जेमतेम जरूरीपुरत्या वस्तू … घराचे आजच्या तुलनेत असे वेगळेपण. दिलीप यांचे प्रथम दर्शन – उंच आणि शेलाटी अंगयष्टी, अंगात खादीचा स्वच्छ सदरा-लेंगा, कोणतेही संस्कार न केलेली – मुक्तपणे वाढू दिलेली पांढरी दाढी आणि दाढीआड लपलेला हसरा प्रसन्न चेहरा! दिलीप स्वत: व्याख्याने देण्यासाठी गावोगावी हिंडत असतात. दिलीप यांनी मेकॅनिकल इंजिनीयरिंग केल्यावर टाटा मोटर्समध्ये (टेल्को) नोकरी पत्करली. दिलीप यांच्यावर संघाचे संस्कार काही अंशी होते. त्यांनी नोकरी करताना विवेकानंद संस्थेचे स्वयंसेवी कार्य स्वीकारले. नोकरी आणि कार्य यांत समन्वय साधण्याचा प्रयत्न चार-पाच वर्षें चालू होता. त्यांना ते काम करताना जाणवले, की सामाजिक काम अर्धवेळ करून जमणार नाही! त्यांनी नोकरी सोडली व कन्याकुमारीच्या विवेकानंद संस्थेशी पूर्णवेळ जोडून घेतले, मग ग्राहक चळवळ, ग्रामायन यांचे काम केले. त्यांचे वाचन सुरू होतेच. त्यातून पर्यावरणाविषयी माहिती मिळत गेली. त्यांना सध्याच्या विकास संकल्पनेतून निसर्गाचा ऱ्हास आणि पर्यावरणाची अपरिवर्तनीय हानी होत आहे याची जाणीव होऊ लागली. मग त्यांनी लेख लेखनांतून, पुस्तके लिहून त्या विषयावर जनजागृती सुरू केली.
मधील काळात पौर्णिमा यांच्याशी सूर आणि विचार जुळले. लग्नाची गाठ बांधली गेली. दोघांना पर्यावरणावर जागृती करताना जाणवले, की ती दोघे ज्या जीवनपद्धतीचा विचार मांडतात ती त्यांनी स्वतः जगून पाहिली पाहिजे. कोकणात दापोलीजवळ कुडावळे या दुर्गम गावी स्थायिक होण्याचा निर्णय पंचवीस वर्षांपूर्वी घेतला आणि अंमलात आणला. दिलीप आणि पौर्णिमा पराकोटीचे साधे जीवन तेथे यशस्वीपणे जगत आहेत.
दिलीप माणसाची दैनंदिन जीवनशैली कशी असावी हे मार्मिकपणे सांगतात. सकाळी सूर्योदयापूर्वी उठावे, अनुशेपोटी काही व्यायाम करावा. व्यायाम शारिरीक असावा – मशीनवर करणे त्यांना मान्य नाही. दिलीप यांचे म्हणणे आहे, की चालणे हा उत्तम व्यायाम – निसर्गाच्या सान्निध्यात चालावे! दिवसाची सुरुवात उपयुक्त श्रमाने सुरू करावी. उपयुक्त श्रम म्हणजे ज्या श्रमातून व्यायाम होतो आणि आऊटपुटही मिळतो. उदाहरणार्थ लाकडे फोडणे, दाणे कुटणे, झाडून काढणे, घर सारवणे, बागकामासाठी खड्डे खणणे इत्यादी अनेक. त्यासाठी विद्युतयंत्र वापरू नये. उपयुक्त श्रमाने माणसाचे शरीर सुदृढ राहतेच, पण पर्यावरणही राखले जाते.
दिलीप यांनी पुण्यातील तथाकथित सुखवस्तू जीवनशैली सोडून कुडवळसारख्या अतिदुर्गम खेड्यात जाण्याचा निर्णय घेतला. त्याविषयी काही खंत वाटते का? त्याची काही किंमत तुम्हाला मोजावी लागली का? म्हणजे आरोग्यसुविधा, शहरी करमणूक, दळणवळणाची साधने वगैरे… असा प्रश्न विचारल्यावर, त्यांनी फार मजेशीर उत्तर दिले. ते म्हणाले, की शहरी माणूस शहरात राहण्याची फार मोठी किंमत मोजत असतो. त्याला त्याच्या जगण्यासाठी प्रचंड ऊर्जा लागते, कष्ट पडतात, ट्रॅफिक जामसारख्या समस्यांना सामोरे रोज जावे लागते. त्याशिवाय जगण्याची किंमत प्रचंड पैसे देऊनही मोजावी लागते. जगण्याचा प्रत्येक क्षण पैसे कमावण्यासाठी आणि म्हणून दुसऱ्यासाठी दिला जातो. त्यातून पैसा मिळतो, तो खर्च कोठे करायचा? तर बिनगरजेच्या वस्तू आणि अतिरिक्त ऊर्जा खरेदी करण्यासाठी! नोकरी अथवा व्यवसायाचा वेळ आणि आवश्यक असणारी झोप सोडून जो थोडाकाही वेळ शिल्लक राहतो, तोदेखील वाचवण्याचा आटापिटा करायचा. म्हणजे त्या वेळात जी वैयक्तिक कामे करायची ती यंत्रांवर सोडायची आणि उरलेला वेळ करमणुकीसाठी, हॉटेलिंगसाठी, जिममध्ये जाण्यासाठी वापरायचा. त्यातून माणूस केवळ वस्तू आणि ऊर्जा यांचा वापर वाढवतो आणि त्या गरजांची परिपूर्तता व्हावी म्हणून पैसे कमावत राहतो. कमावणे आणि खर्च करणे ही साखळी fusion सारखी वाढत जाते. त्यात बाह्य पर्यावरणाची हानी होतेच, पण शरीराच्या आंतरपर्यावरणाची देखील हानी होते.
तेथे त्यांचे ‘आयुर्वेदिक जगणे’ महत्त्वाचे ठरते. त्यात कमीत कमी ऊर्जेवर शिजवलेले साधे अन्न – ते देखील दिवसातून दोनदा अथवा तीनदा शारीरिक गरजेप्रमाणे खाणे. ठरावीक वेळी म्हणजे सूर्य दुपारी मध्यावर आल्यावर आणि सांयकाळी सूर्यास्ताच्या आत (पुन्हा दीक्षित डाएट आलेच) संयमित आहार घेणे. अधाशीपणा ना खाण्यात करायचा ना ऊर्जेच्या वापरात करायचा, ना वस्तूंच्या संचयात करायचा. संयमित, निरामय, पर्यावरणपूरक अशी जीवनशैली ठेवायची. त्यांनी पर्यावरणपूरक जीवनपद्धतीस निष्ठा वाहिली आहे. एकदा का एखादी गोष्ट निष्ठेने करायची ठरवली, की त्यातून केवळ आनंद मिळतो ही धारणा.
मी विचारले, ‘दिलीप तुम्हाला जगण्याला किती पैसे लागतात? दिलीप म्हणाले, आम्ही दोघे आणि दोन मुले मिळून आम्हाला महिना पाच हजार रुपये फार होतात. आम्ही गरीब नाही, कारण त्यातूनही काही पैशांची बचत होते. ती बँकेत ठेवली आहे, त्यांचे काय करायचे हा प्रश्न मला पडला आहे. दुसरी एक भानगड झाली आहे. माझ्या पुस्तकांची संख्या वाढली आहे. त्यांची Royalty आणि व्याख्याने देतो त्यांचे मानधन मिळते. तर उत्पन्न महिना दहा-बारा हजार रुपयांवर गेले आहे. मानधनाचे पैसे वाटून टाकतो, पण उरलेल्याचे काय करायचे हा प्रश्न पडतो. आम्हाला महिन्याला एक ते दोन युनिट वीज लागते. वीज मंडळाचे जे कमीत कमी बील असते – साधारण सत्तर रुपये -इतकाच आमचा विजेचा खर्च. आणि केवळ एका युनिटसाठी सत्तर रुपये देणारे आम्ही टाटा-अंबानी यांच्यापेक्षा श्रीमंत आहोत! घर मातीचे असेल तर उन्हाळ्यात गार आणि हिवाळ्यात उबदार राहते, म्हणून आम्हाला पंख्याची गरज लागतच नाही.
“दिलीप, तुमच्या विचारसरणीला पूरक अशी समविचारी लोकांना एकत्र घेऊन एखादी संस्था का काढली नाहीत?”
संस्था काढली, की नियमांची चौकट आली. अनेक व्यक्ती एकत्र आल्या, की मत-मतांतरे आली. पर्यावरणपूरक जगण्याचा माझा विचार वैयक्तिक माझा आणि माझ्या पत्नीचा आहे. मला लोकांनीदेखील तसे जगावे असे प्रकर्षाने वाटते. त्यासाठी मी त्या विषयावर लेखन करतो, मी ‘गतिमान संतुलन’ नावाचे मासिक स्वखर्चातून चालवतो. व्याख्याने देतो. ज्यांना माझे विचार पटतात त्यांनी त्यांच्या वैयक्तिक जीवनात बदल घडवावेत, त्यातून मिळणाऱ्या आनंदाचा लाभ घ्यावा. ते निसर्गाकडून जितके घेतात त्यापेक्षा जास्त त्याला परत द्यावे.” ही दिलीप यांची भूमिका. ती आग्रही नाही; समजावून सांगणाऱ्या शिक्षकाची आहे. त्यांचे म्हणणे एवढेच आहे, ते जितके करतात तितके प्रत्येक व्यक्तीला शक्य नसेल तर तिने तिला जेवढे झेपेल आणि जमेल तेवढे करावे. त्यातून त्या व्यक्तीला आनंद, आरोग्य आणि समाधान मिळेल. पर्यावरण संवर्धन हे कोण्या एका एनजीओचे काम नाही, ती गोष्ट प्रत्येकाने सर्वांसाठी आणि भावी पिढीच्या आणि प्राणिमात्राच्या भविष्यासाठी करायची आहे आणि वैयक्तिक, कौटुंबिक पातळीवर केली तर ती आपोपाप सार्वजनिक आणि मग वैश्विक होईल. तीच जीवनशैली औद्योगिक क्रांती होण्याआधी जगभर होती. म्हणजे गेल्या दोन-अडीचशे वर्षांतच सगळे बिघडले!
दिलीप, तुमचे तत्त्व सामान्य लोकांनी आचरणात कसे आणायचे? सर्वसामान्य माणसांनी ‘4-R’ चतु:सूत्रे पाळायची. Refuse, Reduce, Reuse, Recycle ही ती चार सूत्रे. Refuse म्हणजे पूर्णत: टाळणे. ज्या गोष्टींचे विघटन होण्यास फार मोठा कालावधी लागतो आणि ज्या बनवण्यास संपणारा नैसर्गिक ‘रिसोर्स’ वापरला जातो, ज्या बनवण्यास प्रचंड ऊर्जा लागते त्या वस्तू टाळाव्या. उदाहरणार्थ प्लास्टिक, कागद. अगदीच टाळता येत नसतील तर Reduce म्हणजे वापर कमीत कमी करावा. गरजेपुरता करा (अर्थात आधी गरजा कमीच कराव्या). तेही शक्य नसेल तेथे Reuse म्हणजे वस्तूचा वारंवार पुनर्वापर करावा. म्हणजे ज्या वस्तू आहेत तशा पुन्हा वापरता येतील त्याच वापराव्या. मग ती वस्तू कागदाची असो वा प्लास्टिकची असो वा पॅकिंग मटेरियल असो. शेवटी, ती वस्तू वापरण्याजोगी उरली नाही तर Recycle म्हणजे त्या वस्तूतून पुनर्निर्मिती करावी. प्लास्टिकपासून पुन:प्लास्टिक, कागदापासून पुन्हा कागद, धातूपासून पुन्हा वस्तू हे चक्र अव्याहत चालू राहिले पाहिजे! Recycle करण्यातही प्रचंड ऊर्जा पुन्हा लागतेच – तेव्हा शेवटचा पर्याय कमीत कमी लागावा. प्राधान्यक्रम Refuse, Reduce, Reuse and Recycle असाच हवा, तरच पर्यावरण टिकेल.
दिलीप यांची मानवी गरजांची व्याख्या ‘गरज पुरवते ती सुविधा आणि हाव पुरवते ती चैन’ अशी आहे. त्यांच्याकडे गॅस नाही, त्यांच्या दृष्टीने तो पेट्रोलियम प्रॉडक्ट आहे. सबब पुनर्वापर शक्य नाही, तर वापर टाळला पाहिजे. त्या दाम्पत्याच्या मते जे निसर्गात भरपूर मिळते तेच वापरावे. उदाहरणार्थ सूर्यप्रकाश मुबलक मिळतो, तर कपडे वाळवण्यास त्याचा वापर करावा – ड्रायरचा नव्हे. मनुष्य दिनचर प्राणी आहे, तेव्हा त्याने त्याची कामे सूर्योदय ते सूर्यास्त यामध्येच उरकावीत. रात्री काम करणे हा ऊर्जेचा अपव्यय आहे. माणसाचे शरीर दिवसा जगण्यासाठीच घडवले आहे. शरीराला घाम येणे फार महत्त्वाचे आहे. त्याने शरीर उन्हाळ्यात गार राहते (डेरा वापरून पाणी गार करणे हे तत्त्व). एसीची गरजच लागत नाही.
दिलीप अर्थशास्त्राचा देखील विचार व अभ्यास करतात. त्यांना प्रश्न विचारला, “विकास कशाला म्हणायचे?” “प्रती व्यक्ती वस्तूंचा वापर वाढला, की विकास झाला असे समजले जाते. वस्तूंचा व ऊर्जेचा वापर प्रती व्यक्ती वाढवायचा म्हणजे उत्पादन वाढवायचे, उत्पादन वाढवायचे म्हणजे जीडीपी वाढवायचा. ते वाढीव उत्पन्न निसर्गाला ओरबाडून मिळवायचे. तो विकास नव्हेच. माणसाचा उपभोग विकासाच्या त्या संकल्पनेने वाढतो. त्यातून माणूस आत्मिक समाधान गमावून बसतो, कचरा अतिरिक्त राक्षसी उत्पादनाने जगभर वाढतो, ताण व्यवस्थेवर येतो, पर्यावरण बिघडते, कुटुंबव्यवस्था नाहीशी होते, कारण प्रत्येकजण अतिरिक्त उपभोगासाठी कमावतो. विकास केवळ आर्थिक उपयोगाचा नाही तर विकास सम्यक झाला पाहिजे. त्या आंतरिक विकासात मानवाचा मानसिक, शारीरिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक पातळीवर विकास झाला पाहिजे आणि बाह्य विकासात निसर्गसंवर्धन, जैविक विविधता वाढली पाहिजे, प्रदूषण कमीत कमी झाले पाहिजे.
दिलीप यांची पुस्तके अनेक प्रकाशित झाली आहेत. त्यातील ‘निसर्गायन, बदलू या जीवनशैली’, ‘स्वप्नामधील गावा’, ‘गांधी उद्यासाठी’ ही पुस्तके महत्त्वाची आहेत. दिलीप ‘गतिमान संतुलन’ नावाचे मासिक स्वखर्चाने संपादित करतात. ते मासिक नाममात्र किंमतीत घरपोच येते. ते दैनंदिन जीवनात पर्यावरणस्नेही कसे जगावे याच्या सोप्या युक्त्या देतातच, पण बुद्धीला चालना देणारे वैचारिक लेख त्यात वाचण्यास मिळतात. पर्यावरणस्नेही जगणे ही काळाची गरज आहे.
दिलीप हे हाडाचे समाजशिक्षक आहेत. दिलीप यांनी स्वत: साधेपणाने जगून लोकांना साधेपणाने जगणे शिकवण्याचा अधिकार प्राप्त केला आहे. ते जे सांगतात ते स्वतः निरामय जीवनाचा अनुभव घेऊन लोकांना सांगतात. दिलीप कुलकर्णी यांना व्यक्ती म्हणून समजून घेतल्यावर मला खरा समाजशिक्षक सापडलाच होता. दिलीप कोणालाही व्यक्तिश: बांधील नाहीत. त्यांची फक्त स्वत:च्या तत्त्वांशी निष्ठा. ते स्वत: स्वतःच्या गरजा ठरवतात. त्यांची कोणतीही दैनंदिन गरज नातेवाईक, शेजारीपाजारी, मित्रमंडळी, जाहिराती ठरवत नाहीत, त्यांच्या पर्यावरणाच्या निष्ठेतून त्या ठरतात. त्यांनी जगण्याचे ते मोठे स्वातंत्र्य मिळवले आहे. त्यांनी अतिरिक्त उत्पन्नाचे ओझे उगाच डोक्यावर घेतलेले नाही. त्यांनी ते पण एक प्रकारचे स्वातंत्र्य मिळवले आहे. दिलीप पलायनवादी आहेत. आधुनिक जीवनपद्धत टाळत आहेत का? ते तसल्या टीकेचा विचारही करत नाहीत. त्यांची जगण्यावर निष्ठा आहे. त्यांचे स्वत:चे स्वतःच्या जीवनावर पूर्ण नियंत्रण आहे!
पौर्णिमा कुलकर्णी या पूर्वाश्रमीच्या पौर्णिमा लिमये. त्यांचा जन्म बारामतीचा. चौथीपर्यंत त्या औरंगाबादमध्ये आणि पाचवीपासून पुण्यात वाढल्या. त्या अकरावीत गेल्यावर ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’चे काम करू लागल्या. त्यामुळे सामाजिक कार्याविषयीची आवड त्यांच्यात निर्माण झाली. त्यांच्या घरचे वातावरण खेळीमेळीचे होते. पौर्णिमा यांचे वडील ‘विवेकानंद केंद्रा’चे काम करत. त्यामुळे दिलीप यांचे त्यांच्या घरी वारंवार जाणेयेणे होत असे. त्यांचे भाऊ शेती खात्यात वर्ग एक अधिकारी होते, तरीही त्यांचे राहणीमान अगदी साधे होते. त्यांनी मुलांच्या अभ्यासावर परिणाम होऊ नये म्हणून दहावी होईपर्यंत रेडिओदेखील घेतला नव्हता. पौर्णिमा यांनी बारावीनंतर मेडिकलला जाण्याचे ठरवले आणि टिळक आयुर्वेद महाविद्यालयात बीएएमएसला प्रवेश घेतला. त्या ज्ञानाचा उपयोग शिक्षण पूर्ण झाल्यावर खेड्यातील किंवा आदिवासी भागातील लोकांसाठी करायचा अशी त्यांची इच्छा होती. पौर्णिमा या आयुर्वेद शिकत होत्या आणि दिलीप यांचे ‘निसर्गायण’ त्यांना जवळचे वाटले. त्यामुळे पुढे दोघांनी विवाहाचा निर्णय घेतला. त्यांचा विवाह डिसेंबर 1985 मध्ये झाला. त्या दोघांचे लग्न अतिशय साध्या पद्धतीने झाले. एप्रिल 1993ला त्यांनी निसर्गस्नेही जीवन जगण्यासाठी स्वप्नामधील गावास जाण्याचे ठरवले.
(श्रीकांत कुलकर्णी यांच्या ‘माझ्या नजरेतून’ या ब्लॉगवरून उद्धृत संपादित संस्करीत)
– श्रीकांत कुलकर्णी ९८५००३५०३७
shrikantkulkarni5557@gmail.com