कर्जतचे दिनेश अडावदकर आकाशवाणीच्या मुंबई केंद्रामध्ये ज्येष्ठ निवेदक आहेत. निवेदक म्हणून निवेदन क्षेत्रात त्यांचा लौकिक मोठा आहे. त्यांना कला-भाषा, साहित्य यांची आवड लहानपणापासूनच होती. त्यांचे कविता, निबंध, स्फूट लेखन शालेय वयापासून चालू असे. प्रसिद्ध लेखक-कवींबद्दल आणि कलावंतांबद्दल त्यांच्या मनामध्ये कुतूहल कायमच राहत आलेले आहे. त्यांच्याशी पत्रव्यवहार करणे, त्यांची स्वाक्षरी घेणे, त्यांची व्याख्याने किंवा कार्यक्रम यांना हजेरी लावणे हीच त्यांची आवड. ते वर्णन करून सांगतात की माझ्या त्या वेळच्या स्वच्छंद वागण्यात शिस्त नव्हती. मधुमक्षिकेप्रमाणे ज्या फुलातून मकरंद मिळेल तेथून तो गोळा करणे, एवढेच त्या वयात ठाऊक होते.
त्यांनी कर्जतच्या सार्वजनिक वाचनालयामध्ये उत्तमोत्तम पुस्तके वाचून काढली. त्यांनी कर्जतच्या कवी मंडळात, स्थानिक कवी संमेलनात आणि सांस्कृतिक कार्यक्रमांत सहभाग घेतला. पद्माकर वैद्य यांचे त्यांना प्रोत्साहन असे. कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला, त्यावेळी वाचनालयामध्ये कुसुमाग्रजांच्या कविता आणि त्यांच्या नाटकांतील स्वगते यांवर आधारित कार्यक्रम त्यांच्या टीमने खास बसवून सादर केला. त्या वाचनालयाच्या नूतन वास्तूचे उद्घाटन ’महाराष्ट्राचे वाल्मिकी’ ग.दि. माडगूळकर यांच्या हस्ते झाले होते, त्यालाही दिनेश हजर होते. अशा आठवण ते सांगतात.
त्यांचे शेजारी होते साहित्यिक वसंत जोशी. त्यांनी ’बिनबियांच्या गोष्टी’ हा विनोदी प्रहसनाचा साहित्यप्रकार लोकप्रिय केला. जोशी ह्यांच्याकडे लेखक, कवी आणि सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते येत. त्यांना दिनेश ह्यांना जवळून पाहता आले. जोशी यांच्यामुळेच दिनेश यांना पु.ल. देशपांडे यांची भेट आणि त्यांच्याशी पत्रव्यवहार होऊ शकला. सकस, उत्कृष्ट साहित्याची अभिरुची, लेखनातील नेमकेपणा आणि स्पष्टता अशा संस्कारांतून घडली असे दिनेश कृतज्ञतेने नमूद करतात.
दिनेश हे कॉमर्स पदवीधर. त्यांनी त्यानंतर बऱ्याच वर्षांनी मुंबई विद्यापीठातून मराठी विषयात एम ए शिक्षण पूर्ण केले. दिनेश ह्यांना रेडिओ माध्यमाविषयी आकर्षण होते. मात्र तेथे कायमस्वरूपी निवेदनाचे काम मिळेल अशी कल्पनाही त्यांनी कधी केली नव्हती. आकाशवाणीशी त्यांचा संपर्क आला तो श्रोता सर्वेक्षण विभागासाठी एका सर्व्हेच्या निमित्ताने आणि त्यानंतर गावागावांत जाऊन रेकॉर्डिंग करण्याच्या एका प्रकल्पामुळे. तेव्हा त्यांनी कंत्राटी पद्धतीवर काम केले. त्याच दरम्यान, ’स्थायी निवेदक पदा’साठी जाहिरात आली आणि त्यात त्यांची निवड झाली. लेखी परीक्षा व स्वर चाचणी उत्तम पार पडली. मुलाखतीसाठी प्रसिद्ध साहित्यिक दया पवार आणि कथालेखिका गिरिजा कीर हे पॅनेलवर होते. दिनेश यांनी त्यांच्या व्यक्तिगत माहितीमध्ये ते कविता लिहितात असे नमूद केले होते. ते पाहून पवार-कीर यांनी दिनेश ह्यांना मुलाखतीमध्ये एक स्वरचित कविता सादर करण्यास सांगितली. योगायोग असा, की दिनेश यांनीसुद्धा अगदी आदल्या दिवशी कविता लिहिली होती. त्यांनी ती नवी कोरी कविता उत्स्फूर्तपणे त्यांच्यासमोर सादर केली. दिनेश यांना वाटते, की ती कविताच त्यांच्या निवडीसाठी निर्णायक गोष्ट ठरली असावी !
आकाशवाणीतील निवेदनाचे काम हा त्यांच्या आवडीचा भाग आहे. कारण तो त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचाही भाग आहे. त्यामुळे दर दिवशीची ड्युटी हे त्यांच्या दृष्टीने नवे आव्हान असते आणि नवे शिक्षणही असते. त्यांना आकाशवाणीच्या सेवाकाळात अनेक व्यक्तींच्या मुलाखती, अनेक कार्यक्रमांच्या संहिता, अनेक कार्यक्रमांसाठी निवेदन करण्याची संधी मिळते. काही वेळा प्रत्यक्ष श्रोत्यांच्या उपस्थितीत सादर होणाऱ्या रंगमंचीय कार्यक्रमांचे निवेदन व संयोजन करण्याची वेळही येते. तो अनुभव वेगळाच असतो. त्यांनी त्यातूनच दूरदर्शनसाठी काही मालिकांचे निवेदन केले आणि काही मुलाखतीसुद्धा घेतल्या.
दिनेश ह्यांना आवाजाच्या क्षेत्रातील ’स्वराभिनय’ हा पुरस्कार अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या बोरिवली शाखेतर्फे 2016 मध्ये मिळाला. त्यांचा ’माझे इंद्रधनू’ हा कवितासंग्रह प्रकाशित झाला आहे. त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे असे ते सांगतात.
– बिपीन हिंदळेकर 9920485590 bipinh72@gmail.com