दिग्दर्शनाचा अभाव

0
25
को.म.सा.प. साहित्य अभिवाचन स्पर्धा २०१२ मध्ये साहित्य अभिवाचन करताना पालीचा संघ
को.म.सा.प. साहित्य अभिवाचन स्पर्धा २०१२ मध्ये साहित्य अभिवाचन करताना पालीचा संघ

को.म.सा.प. साहित्य अभिवाचन स्पर्धा २०१२ मध्ये साहित्य अभिवाचन करताना पालीचा संघ  ´मुन्नी, चमेली, जलेबी आणि कोंबडी पळाली´ च्या युगात, मराठी पुस्तक वाचनाच्या एका कार्यक्रमात, आख्खं सभागृह हुंदके देऊन रडलं, असं मी तुम्हाला सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल का? अशक्यच वाटेल ते तुम्हाला. पण देवनारला झालेल्या ´साहित्य अभिवाचन´ स्पर्धेत ते घडलं! आणि ते घडवलं रायगड जिल्ह्यातील ´पाली´सारख्या छोट्या गावातून आलेल्या साध्यासुध्या दिसणार्‍या, कुठलाही अभिनिवेश न दाखवणार्‍या एका चमूनं, आपल्या  उत्तम साहित्य अभिवाचनानं.

 ‘कोमसाप’ च्या देवनार शाखेच्या वतीने गेली आठ वर्षे सुरू असलेल्या साहित्य अभिवाचन स्पर्धेने साहित्यप्रेमींसाठी वेगळ्या प्रकारची मेजवानी निर्माण केली आहे. कुठलाही साहित्याचा प्रकार एका तासात प्रेक्षकांपर्यंत असा पोचवायचा की त्यांनी म्हटले पाहिजे, ´क्या बात है!´
आणि भाग घेणार्‍या संघांना ते पोचवावे लागते, प्राथमिक मंचीय सुविधा देणार्‍या एका शाळेच्या सभागृहात. ध्वनिवर्धक जेमतेम चालतात. शेजारीच असणार्‍या रेल्वे मार्गावरून लोकल्स धडाडत जात असतात. शाळेच्या मैदानावर मुलांचा गोंगाट सुरू असतो. कधी कधी, मैदान वापरणारी मुले जवळपासच्या झोपडपट्ट्यांतली असतात. त्यांना वाचन-संस्कृतीचा गंध नसतो. ‘अभिवाचना’चा तर नसतोच नसतो! स्पर्धकांना या गोष्टी सांभाळून आपले  म्हणणे प्रेक्षकांपर्यंत पोचवावे लागते…आणि बहुतेक संघ त्यात यशस्वी होतात!

 स्पर्धेच्या बजेटातला मुख्य खर्च बक्षिसांचा असतो. तो ‘कोमसाप’च्या  देवनार शाखेचे सदस्य देणग्या मागून गोळा करतात. बाकी सगळी स्वयंसेवा . गोरगरीब मुलांच्या उत्थापनासाठी स्थापन झालेली कुमुद विद्यामंदिर ही शाळा स्वतः सभागृहाचा खर्च उचलते, साहित्यप्रेमापोटी आणि आपल्या शाळेत काहीतरी चांगले घडते म्हणून!

कोमसाप साहित्य अभिवाचन स्पर्धा २०१२ मध्ये पालीचा संघ विजेता ठरला. त्यावेळी पुरस्कार स्वीकारताना संघ प्रतिनिधी  संघ जे विषय घेऊन स्पर्धेत उतरतात,  त्यांत विविधता असते. काही संघ एकाच विषयावरील अनेकानेक कविता इतक्या सुंदरपणे एकत्र गुंफून प्रस्तुत करतात, की कवितेची आवड नसणार्‍यालाही कवितेची गोडी निर्माण होईल! काही संघ एखादा विषय –  गंभीर जसे, ´मुंबई´ , ´आई´, ´पंढरीची वारी´, ´संत ज्ञानेश्वर´ निवडून त्यावरची गंभीर तसेच मनोरंजक माहिती, संशोधन वगैरे  प्रस्तुत करतात. काही संघ कादंबरी, कथा, त्यामधून ´अभिवाचन स्वरूप´ निर्माण करून सादर करतात.

 मी आजपर्यंतच्या आठपैकी चार-पाच स्पर्धांमध्ये परीक्षक होतो.  गुणतक्ता बनवण्यातही माझे बरेच योगदान आहे. निकाल निःपक्षपातीपणे लागले पाहिजेत याकडे संस्थेचा कटाक्ष असतो आणि गुणतक्ता नीट लक्षात घेऊन गुण दिले, तर हमखास योग्य निकाल लागतो असा आमचा अनुभव आहे. म्हणूनच संघ आवर्जून पुन:पुन्हा भाग घेतात. स्पर्धेच्या यशस्वीतेची ती निशाणी आहे.

को.म.सा.प. साहित्य अभिवाचन स्पर्धा २०१२ चे परिक्षक (डावीकडून) संजीव वढावकर, विनोद भट आणि अशोक ताम्हणकर  स्पर्धेत भाग घेणार्‍या संघांच्या गुणवत्तेत नेहमी बरीच विविधता असते; तशीच ती इथेही आढळते. पण देवनार अभिवाचन स्पर्धेतली सगळ्यात खटकणारी गोष्ट म्हणजे बर्‍याच संघांना दिग्दर्शनाचे महत्वच कळत नाही! मग त्यांचे प्रयोग बेंगरूळ होतात. नुसते एखाद्या त्रयस्थ स्पष्टवक्त्या व्यक्तीने जरी त्यांना त्यांचे दोष दाखवून दिले तरी, खरे म्हणजे, त्यांचे प्रयोग वेगळे परिमाण गाठू शकतील. तसेच, संगीताचा उपयोग करण्याबाबत. काही संघ शून्य संगीत हे देखील परिणामकारक असते हे दाखवून देतात, तर काही अतिशय माफक संगीत वापरून योग्य परिणाम साधतात. यावर्षी प्रथम पुरस्कार मिळवणार्‍या संघाने प्रयोगाचे शेवटचे वाक्य संपता संपता एका गाण्याची एक लकेर फक्त ऐकवली.

 ध्वनिवर्धक वापरण्याचे भान आणि कौशल्य हा या स्पर्धेचा महत्वाचा भाग आहे. बर्‍याच संघांना त्याचे भान राहत नाही. आपण ध्वनिवर्धकासमोर वाटेल त्या पद्धतीने बोलून चालत नाही, जर आपणाला वाचनातून अभिनयकौशल्य दाखवायचे असेल  तर त्यासाठी आपण ध्वनिवर्धक वापरण्याआधी आपण त्याचा वापर करून त्याची `लायकी` तपासणे गरजेचे असते. काही संघांना समूह-आवाजाचा समतोल राखणे जमत नाही. मग कुणीतरी खूप हळू बोलतो वा कुणीतरी खूप जोरात बोलत राहतो. असल्या प्रयोगात प्रथम बोलणार्‍या व्यक्तीने आवाजाची` योग्य ती ‘पट्टी’ लावणे जरुरीचे असते, त्यावर पुढल्या सगळ्या प्रयोगाचा तोल आधारला जातो.

 ज्या पद्धतीने स्पर्धा पुढे जात आहे ते पाहता स्पर्धेला उज्ज्वल भविष्य आहे हे निश्चित.

अशोक ताम्हनकर,
ejetee@gmail.com
९८९२४६५१९५

About Post Author