दावलवाडी हे गाव जालना जिल्ह्याच्या बदनापूर या तालुक्यात आहे. ते जालन्यापासून आठ किलोमीटर तर बदनापूर या तालुक्याच्या केंद्रापासून दहा किलोमीटर अंतरावर वसले आहे. गाव जालना-औरंगाबाद (संभाजीनगर) हायवेपासून एक किलोमीटर आत आहे. हायवे रोडवर भव्य प्रवेशद्वार आहे. गावाच्या वेशीवरही एक प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारावरच भव्य असा छत्रपती शिवाजीराजे यांचा अश्वारूढ पुतळा आहे. तो लोकवर्गणीतून उभा आहे. पुतळ्याला लागून ग्रामदेवता हनुमान, महादेव, विठ्ठल-रूक्मिणी, दत्त अशी मंदिरे आहेत. एका बाजूला महानुभाव आणि दुसऱ्या बाजूला श्रीकृष्ण मंदिर आहे. मुख्य प्रवेशद्वार छत्रपती यांच्या नावे आहे. गावच्या वेशीवर आणखी एक प्रवेशद्वार आहे. त्यावर दोन बाजूंना तुकडोजी व गाडगे महाराजांचे मुखवटे आणि दोन हत्तींसह पूर्णाकृती महालक्ष्मी अशी शिल्पाकृती साकारली आहे.
गावची लोकसंख्या दोन हजारांच्या आसपास आहे. दावलवाडी या गावाने आर.आर. पाटील ग्रामविकास मंत्री असताना, ‘संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियाना’त जिल्ह्यात 2002 मध्ये दुसरा क्रमांक तर पुढच्याच वर्षी 2003 मध्ये पहिला क्रमांक मिळवला होता. गावामध्ये सर्व जनसुविधा उपलब्ध आहेत. गावाला राष्ट्रपती पुरस्कार 2000 ते 2005 या काळातील उल्लेखनीय कामाबद्दल मिळालेला आहे. वंसतराव नामदेव जगताप हे सरपंच होते, त्यांनी तो स्वीकारला. त्यामुळे गाव मराठवाड्यासह राज्यभर चर्चेत आले असे अभिमानाने गावकरी सांगतात. आर.पाटील यांनी दावलवाडी गावास भेटही दिली. गावच्या परिसरात महिको हायब्रीड सीड्स कंपनी आहे. त्या कंपनीचासुद्धा गावाच्या विकासासाठी मोलाचा सहभाग आहे. सध्या ग्रामपंचायत इमारत सुसज्ज करण्याचे काम सुरू आहे. तसेच, गावठाण लाईट फीडरचे कामही सुरू होत आहे. गावात अंतर्गत भूमिगत गटार योजना राबवली जात आहे. गावात पाण्याची व्यवस्था चांगली आहे. गावाची महती अशी, की शरद पवार, अंकुशराव टोपे, राजेश टोपे, रावसाहेब दानवे, राजेंद्र पवार, रोहित पवार असे खासदार व आमदार असलेल्या व्यक्ती गावात येऊन गेलेल्या आहेत.
गाव औद्योगिक क्षेत्रात आघाडीवर आहे. एमआयडीसी (जालना) जवळ असल्याने शेती, व्यवसाय, उद्योग या क्षेत्रांत गावाने प्रगती केली आहे. विनोदराय इंजिनीयरिंग कंपनी, पद्मविभूषण बद्रिनारायण बारवाले यांनी स्थापन केलेली महिको हायब्रीड सीड्स कंपनी व मुख्य संशोधन केंद्र दावलवाडी गावच्या परिसरात आहे. गाव औद्योगिक ट्रान्सपोर्ट क्षेत्रात आघाडीवर आहे. ट्रक बिझनेस औद्योगिक वसाहतीमध्ये चालतो. गावात पोचण्यासाठी एसटी व डुगडूगी येते. गावातील सत्तर टक्के लोक शहरी भागात कामासाठी जातात. ते राहण्यास गावात येतात. जिल्हा व तालुका केंद्रे जवळ असल्याचा गावाला फायदा आहे. गावाचे राहणीमान चांगले आहे. दावलवाडीपासून एक किलोमीटर अंतरावर ड्राय पोर्ट उभे राहिले आहे. नागपूर-शिर्डी समृद्धी महामार्गाला जोडलेले आहे. केंद्र सरकारच्या वतीने राज्यात चार ड्राय पोर्ट उभी राहत आहेत. त्यांतील हे एक. त्यामुळे या एकूण परिसराला भरभराट लाभणार आहे.
गावात हिंदू, मुस्लिम, बौद्ध, मातंग, कैकाडी असे विविध जातिधर्मांचे लोक राहतात; त्यामुळे सर्व सण-उत्सव जोमाने साजरे केले जातात. आईचे मंदिर गावाबाहेर आहे. गावावरील संकट दूर करावे या हेतूने पूर्वापार बांधलेले आहे. आईची जत्रा असते. गावचा इतिहास, स्थानिक कला, जुन्या पांरपरिक रूढी-पंरपरा व कलाकौशल्य गावचे महिला, युवक व ज्येष्ठ जपत असतात. गावात स्वाध्याय परिवाराची योगेश्वर कृषी शेती संस्था आहे. समर्थ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आहे. गावात सुंदर निसर्ग आहे. तेथील हवामान उष्ण कोरडे व थंड ऋतूप्रमाणे असते. गावात हिवाळी बागायती शेती जेमतेम आहे. तेथे सोयाबीन, मका, बाजरी, कापूस, ज्वारी, हरभरा, गहू ही पीके आणि भाजीपाला व फळे बागायतदार घेतात. गावकऱ्यांनी प्रत्येक घरासमोर एक अशी झाडे लावली आहेत. गावात खानदेशचे प्रसिद्ध दाळ बट्टी, पुरणपोळी हे खाद्यपदार्थ रुचिदार म्हणून लोकप्रिय आहेत.
मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक नामदेव बाबुराव पाटील-जगताप, राजकीय क्षेत्रातील तुकाराम पाटील-जगताप हे जनसंघ व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते होते. दामोदर पाटील-जाधव हे पाच गावच्या ग्रूप ग्रामपंचायतीचे उपसरपंच होते.
गावाला लागून जुना ब्रिटिशकालीन तलाव आहे. शिवारात जलसिंचन विभागाची तीन तळी आहेत. तेथे पाऊस चांगला पडतो. गावात सातवीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. दावलवाडी गावाच्या चार-पाच किलोमीटर परिसरात शेलगाव, खारगाव, नजिक पांगरी, मात्रेवाडी ही गावे आहेत.
– सुभाष जगताप 9923063646
—————————————————————————————————————————————————