‘दाभोळ’ हे रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील महत्त्वाचे बंदर. त्याचा उत्कर्ष चौदाव्या ते सतराव्या शतकांत झालेला होता. दाभोळ बंदराचा सर्वात प्राचीन उल्लेख सातवाहन काळात एका अनभिज्ञ परकीय प्रवाशाने लिहिलेल्या ‘पेरीप्लस ऑफ इथिरियन सी’ या ग्रंथात सापडतो. दाभोळचा तो उल्लेख ‘पालीपाटमे’ असा आहे. त्याच प्रमाणे जुन्या लिखाणात कोकणातील बंदरांचे संदर्भ सापडतात. त्यात सोपारा, कल्याण, चौल, मंदागौर (बाणकोट), मेलीझीगारा (सुवर्णदुर्ग-राजापूर), सेसेक्रियनाय (वेंगुर्ले) या बंदरांचे नामोल्लेख येतात.
सातवाहन राजवट मौर्य साम्राज्यानंतर महाराष्ट्रात अस्तित्वात आली. त्या काळात ही बंदरे भरभराटीस आली होती. त्या बद्दलचे उल्लेख स्ट्रॅबो, टॉलेमी, प्लिनी, व पेरिप्लस या भूगोलवेत्त्यांप्रमाणे तर हुएनस्तंग, इब्नबतुता, अल्बेरुनी या प्रवाशांनी त्यांच्या लिखाणात करून ठेवलेले आहेत. दाभोळ बंदरातून रोम, इजिप्त, अरेबिया, इराण, आफ्रिका या पश्चिमेकडील देशांशी व्यापार चालत असे. दाभोळचा संदर्भ पेरिप्लसमधील एक उल्लेख वगळता प्राचीन लिखाणात सापडत नाहीत. दाभोळ मध्ययुगीन इतिहासात भरभराटीला आले असणार. अफसानी निकीतीन हा प्रवासी रशियातून 1740 मध्ये भारतात आला होता. त्याच्या लिखाणात इजिप्त, अरबस्तान, खोरासन, तुर्कस्तान येथून मोठ्या प्रमाणात घोड्यांची आयात दाभोळ बंदरात होत असून, दाभोळ हे एक मोठे बंदर असल्याचे वर्णन आहे. अरबी घोड्यांचा दर्जा फार चांगला असल्याने त्या घोड्यांना विजयनगर, निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही या राजवटींत मागणी असे. परदेशांतून आलेले घोडे दाभोळ बंदरात उतरून विविध राज्यकर्त्यांकडे पाठवले जात.
दुआर्तेबार्बोसा या पोर्तुगीज प्रवाशाने 1518 मध्ये कोकण किनारपट्टीला भेट दिली. तो लिहितो, “मक्का, एडन, होर्मुझ येथून व्यापारी मोठ्या संख्येने घोडे घेऊन येथे येतात. तसेच खंबायत, दीव, मलबार किनाऱ्यांवरून जहाजे अनेक वस्तू घेऊन येथे येतात. येथील मुस्लिम व हिंदू धर्मीय व्यापारी खूप श्रीमंत आहेत. दाभोळच्या आतील भागात मोठ्या प्रमाणात तांबे, पारा, हिंगुल (पारा आणि गंधकाचे मिश्रण अथवा पाऱ्याचा अशोधीत धातू) सापडते. अंतर्गत भागातून आणलेले कापड दाभोळ बंदरात जहाजांवर मोठ्या प्रमाणात चढवले जाते. येथून निर्यात होणाऱ्या वस्तूंत विविध प्रकारचे कापड, मसाल्याचे पदार्थ, गहू, तेलबिया, कडधान्ये यांसारख्या वस्तू असतात.”
जॉन जॉर्डन आणि हेन्री मिडल्टन या प्रवाशांनी सतराव्या शतकात दाभोळला भेट दिली. त्यांच्या लेखनात दाभोळ बंदराचे वर्णन आहे. जॉन जॉर्डन लिहितो, “दाभोळ हे बंदर मुखापाशी अरुंद असून, त्या ठिकाणी खडक दिसत असला तरी बंदरात खोली मात्र अधिक आहे. त्या बंदरावरून दरवर्षी पाच-सहा जहाजे होर्मुझ बंदर व लाल समुद्र यांच्याकडे जातात. हेन्री मिडल्टनने लिहिले आहे, “आग्नेय आशियातील सुमात्रा बेटावरील ‘अचिन’ या बंदराकडे दोन-तीन जहाजे जातात. त्या जहाजांमध्ये सुरतेच्या जहाजांपेक्षा जास्त माल भरलेला असतो.” डच इस्ट इंडिया कंपनीतील ब्रोक त्याच्या लिखाणात म्हणतो, की “दाभोळची जहाजे सप्टेंबर महिन्यात सुमात्रामधील ‘अचिन’ बंदराकडे जातात आणि परतताना जावा, सुमात्रा यांमधून मिरी, डिंक, कापूर, लवंग आणि रेशमी कापड घेऊन येतात. तसेच, तेथील जहाजे विविध वस्तू घेऊन खांबात आणि पर्शियन आखातातील मोखा बंदराकडेही जातात.”
दाभोळ हे सोळा-सतराव्या शतकात महत्त्वाचे असे आंतरराष्ट्रीय व्यापारी बंदर झाले. स्वाभाविकच, दाभोळ मध्यकाळात व्यापारयोग्य माल साठवणुकीचे महत्त्वाचे केंद्र बनले. पोर्तुगीजांनी पश्चिम किनाऱ्यावरील व्यापार त्यांच्या ताब्यात घेऊन बाहेर जाणाऱ्या जहाजांना परवाने (कार्टाझ) देण्यास सुरुवात केली. जॉन जॉर्डनने दाभोळमध्ये दस्तक देण्यासाठी गोव्याच्या गव्हर्नरने त्यांचा प्रतिनिधी ठेवल्याचा उल्लेख केला आहे. तोफेची दारू यासारखे युद्ध साहित्य जहाजांवरून नेण्यास बंदी असे. मध्य आशियातून आलेल्या घोड्यांच्या व्यापाराचा मक्ता; तसेच, विदेशी मद्य विकण्याचा मक्ता पोर्तुगीजांकडे होता. त्यासाठी गोव्यातील पोर्तुगीज सत्ताधीश आदिलशहाला वार्षिक पद्धतीने मोठी रक्कम देत असत. तसे उल्लेख सुरतेहून इंग्लंडला पाठवलेल्या पत्रांतून सापडतात. ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने दाभोळमधून व्यापार करण्याचा प्रयत्न सतराव्या शतकाच्या आरंभी केला. परंतु पोर्तुगीजांचे पश्चिम किनाऱ्यावरील वर्चस्व आणि निजामशाही व आदिलशाही राज्यकर्त्यांशी सख्य असल्यामुळे ते प्रयत्न सफल होऊ शकले नाहीत. इंग्रजांनी पोर्तुगीजांचे एक गलबत आफ्रिकेच्या कोमोरी बेटाजवळ 1617 मध्ये पकडले. त्यात सुरत, दीव आणि दाभोळ येथील व्यापारी होते. यावरून दाभोळचा आफ्रिकेशी व्यापार चालत असल्याचे निदर्शनास येते. पूर्वेकडील व्यापारासंदर्भात, दाभोळची गलबते बंगालच्या किनाऱ्यावरून मालाक्काकडे (मलेशियाच्या दक्षिण भागात वसलेले राज्य) जात असत. गलबते दाभोळ येथून सुरत, खंबात व केरळ यांच्या किनाऱ्यावरील बंदरे, पूर्व किनारपट्टीवरील महत्त्वाची बंदरे येथे जात असत. दाभोळ, चौल बंदरांचे महत्त्व नंतरच्या मोगल आणि ब्रिटिश कालखंडात कमी झाले. सुरत व मुंबई नावारूपाला आले आणि पश्चिम किनाऱ्यावरील दाभोळसह इतर बंदरे बिनमहत्त्वाची झाली.
परकीय प्रवाशांच्या वृत्तांतात दाभोळमधील वजने-मापे याबद्दल माहिती मिळते. येथून परदेशात जाणाऱ्या मालात प्रामुख्याने मिरी, कापड, सुंठ, लाख, तांदूळ, दोरखंड असे; तर शिसे, बॉडक्लॉथ नावाचे कापड, तंबाखू, लोकर, खजूर, मनुका, तलवारीची पाती येथे आणली जात. मिरीचे वजन करण्यासाठी खंडी हे माप वापरले जाई. जॉन अल्बर्ट मँडेलस्लो हा प्रवासी 1638 मध्ये जर्मनीमधून आला होता. त्याच्या लिखाणात दाभोळमधील एक मण हा चाळीस शेरांचा असल्याचे म्हटले आहे. दाभोळचा एक मण म्हणजे पंचवीस इंग्रजी पौंड असल्याचे; तसेच, व्यापारी मालाचे वजन करण्यासाठी प्रामुख्याने शेर, मण, खंडी ही वजने वापरली जात. सतराव्या शतकात दाभोळ येथून गोंबून येथे जाणाऱ्या मालासाठी दरखंडीस पन्नास लारी मोजाव्या लागत. तर माणशी अकराशे लाऱ्या भाडे आकारले जात असे. लारी हे आदिलशाहीतील चांदीचे नाणे होय. ते पश्चिम किनाऱ्यावर चलन म्हणून वापरले जात असे.
तत्कालीन प्रवास वर्णनातून प्रवासास लागणाऱ्या वेळेसंबधी माहिती मिळते. लंडन येथून दाभोळला पोचण्यास सात-आठ महिन्यांचा कालावधी लागत असे. तसेच, दाभोळ येथून सुमात्रातील अचीन बंदरात पोचण्यास साधारण एक महिना लागत असे. गोंबून (पर्शिया) येथून निघालेले गलबत दाभोळला सतरा-अठरा दिवसांत पोचत असे. दाभोळच्या बंदरावर बाराशे टन माल वाहून नेणारी गलबते लागत.
ओगिलबी हा प्रवासी (1670) म्हणतो, की “सध्या युद्धामुळे दाभोळच्या प्राचीन बंदराचे मोठे नुकसान झाले असून, तेथील व्यापार घटला आहे.” तर सतराव्या शतकाच्या अखेरीस आलेल्या अलेक्झांडर हॅमिल्टन याने दाभोळचे व्यापारी महत्त्व नष्ट झाल्याचे मत नोंदवले आहे. यामागे मोगल साम्राज्याचे महत्त्वाचे बंदर असलेल्या सुरतेला आलेले व्यापारी महत्त्व, पोर्तुगीजांचे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील वर्चस्व, इंग्रजांनी राजापूरला, तर डचांनी वेंगुर्ल्याला उघडलेल्या वखारी, सिद्दीचे दाभोळवर वरचेवर होणारे हल्ले, मोगल, मराठा आणि विजापूरकर यांच्यातील संघर्ष ही कारणीभूत ठरतात.
– संदीप परांजपे 9011020485 sparanjape0665@gmail.com
————————————————————————————————————————–
सुंदर माहिती दिली आहे.सर