शिमग्याच्या म्हणजेच होळीच्या सणाच्या उत्सवातील ‘पिसईचा नकटा’ दापोलीत लोकप्रिय आहे. नकटा म्हणजे देवीचा रखवालदार. नकट्याचे सोंग घेणारी व्यक्ती लाकडी मुखवटा घालते. तो मुखवटा काजूच्या झाडाच्या खोडापासून बनवलेला असतो. तो परंपरेने चालत आलेला असतो. नकट्याचा मुखवटा पोराबाळांना भीतीदायक वाटतो. नकटा गाण्याच्या तालावर, गाण्यानुसार अभिनय करून, हातातील कोयती गरागरा फिरवत नाचतो. ‘नकटा बामण दिसतो कसा | नकटा बामण चालतोय कसा’ असे ते गाणे आहे. नकट्याचे सोंग या गाण्याच्या सोबतीने घराघरासमोर नाचते.

साने गुरुजींच्या ‘सुंदर पत्रे’ या पुस्तकामध्ये शिमग्याच्या खेळ्याचे झकास वर्णन आहे. “पिसई गावाहून नकटा यायचा. काटखेळ करणारे यायचे. नवशी गावचा नकट्याचा खेळ चांगला की पिसई गावचा अशी शर्यत लागे. नकटा म्हणजे रावण. त्याच्या तोंडावर रंगीत लाक़डी मुखवटा असे. हातात कोयता असे. पाठीला बांधलेली घंटा आणि दुसरी दोन माणसे राम व सीता बनत. रामाच्या हातात धनुष्यबाण असे. राम आणि सीता हातात हात घालून नाचत. रावण तो कोयता त्यांच्या अंगावर फिरवत नाचे. मुले हळूच पाठीमागून जाऊन रावणाची घंटा वाजवत. रावण एखाद्याला पकडे व त्याच्या लाकडी कोयतीने त्याला मारण्याचा आव आणे. गाणे चाललेले असताना मृदुंग व झांजा वाजत. तो आवाज मी जन्मभर विसरणार नाही. धुधु धुमधुम्, धुधु धुमधुम् असा तो आवाज.
“उठा उठा पंतोजी आंघोली करा हो आंघोली करा
गुरूच्या महात्म्यान् लागलाय् झरा हो लागलाय झरा
रावण खातो गा पानाचा इडा हो पानाचा इडा |”
गावकऱ्यांची समजूत घरातील तान्ह्या मुलाला नकट्याच्या हातून आंघोळ घातली, की इडापीडा टळते अशी आहे. गावात नकट्याला खूप मान आहे. एखाद्याने नवे घर बांधले, की त्याचा, त्याच्या साथीदारांचा मानपान नारळ देऊन केला जातो.
पिसई गावात दोन नकटे आहेत. एक काटकरवाडीचा व दुसरा येसरेवाडीचा. येसरेवाडीचा नकटा अनेक पिढ्यांपासूनचा आहे. त्याची वंशावळ सांगण्यास जुनी जाणती मंडळीसुद्धा हयात नाहीत. येसरेवाडीचा नकटा अनेक वर्षे कै. धोंडू लक्ष्मण येसरे यांनी नाचवला. त्यांच्या पश्चात संतोष सोनू काटकर हे नकटा नाचवतात. नकट्याच्या गायनाचे काम सरपंच वसंत गोविंद येसरे करतात. बाळू तानू येसरे हे साथीला झांज अप्रतिम वाजवतात. काटकरवाडीच्या नकट्याची जबाबदारी भरतभाई येसावरे यांच्याकडे आहे. तेथील खेळही जुनाच आहे. त्यामध्ये सहदेव येसावरे, राजू म्हादलेकर, दिलीप मोरे, रोशन म्हादलेकर यांच्याकडून नकटा नाचवण्याची जबाबदारी सुरेंद्र येसावरे यांच्याकडे आली आहे. त्या खेळात भरतभाई येसावरे आणि निलेश काटकर हे गाणी गातात.


संदेश काटकर यांच्यासारख्या तरुणांनी या खेळाच्या संयोजनाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे. नकट्याच्या ताफ्यात येसावरे, काटकर, बैकर, येसरे असे गायक-वादक म्हणून आहेत. नकट्याचे सोंग निघते तेव्हा गावाच्या सीमेबाहेर आधी कोकणी खासीयतीप्रमाणे गार्हाणे घातले जाते- “व्हय म्हाराजा, तुझ्या खेळ्यांसाठी पोरं बाहेर पडलीत. नीटपणाने तडीस जाऊ दे. पोरांच्या मागे उभी राहा. व्हय म्हाराजा”
मग खेळे बाहेर पडतात. खेळे करण्याचे दिवस संपले, की नकट्याचा कबिला घरी परतण्यास निघतो. तेव्हा गावाच्या सीमेवर देवीचे पूजन होते. देवीने पाठराखण केली म्हणून देवीचे ऋण व्यक्त करण्यास पुन्हा गार्हाणे घातले जाते.
खेळाची सांगता साणेवर होते. साण किंवा सहाण म्हणजे चावडीसारखी जागा. तेथे, दूर जंगलातील पालख्या जमतात. नकटा खेळास निघताना साज चढवून गावातून बाहेर पडलेला असतो. तो साज साणेवर उतरला जातो. देवीची ओटी भरली जाते. वाड्या-वस्त्यांवरील पालख्या नाचवल्या जातात. शेवटी, प्रसादाने शिमग्याच्या सणाची सांगता होते.
– अश्विनी भोईर 8830864547 ashwinibhoir23@gmail.com
————————————————————————————————————————