वसंतदादा हे असामान्य, कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व होतेच, पण शालिनीताई यांचेही कार्यकर्तृत्व स्वतंत्रपणे विचारात घ्यावे लागेल. त्या महाराष्ट्रातील एक माजी मंत्री, माजी खासदार व सहकार क्षेत्रातील कार्यकर्त्या होत्या. त्यांनी राजकारणात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. त्यांच्याविषयीची माहिती पुस्तकात असणे आवश्यकच होते…
‘वसंतदादा‘ या मी संपादित केलेल्या पुस्तकात वसंतदादांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांच्याविषयी एक-दोन उल्लेखांपलीकडे माहिती नाही. पुस्तक ‘ग्रंथाली’च्या वतीने प्रकाशित करण्यात आले आहे. वसंतदादा यांच्या सार्वजनिक जीवनात शालिनीताई या अविभाज्य भाग होत्या.
शालिनीताई पाटील यांच्याबद्दल या पुस्तकात काहीच माहिती समाविष्ट झालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. वास्तविक, हे पुस्तक वसंतदादांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘स्मृतिग्रंथ‘ म्हणून तयार करण्यात आले. त्यामुळे सर्व लेख त्यांच्याविषयीचे असणे साहजिक आहे. पुस्तकात वसंतदादांच्या प्रथम पत्नी सौ. मालती यांचे छायाचित्र देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे वसंतदादा व शालिनीताई यांचे एकत्रित छायाचित्रदेखील आहे. तसेच, शालिनीताई यांच्या उपस्थितीतील कार्यक्रमांची आणखीही छायाचित्रे पुस्तकात समाविष्ट करण्यात आली आहेत. शालिनीताई या महाराष्ट्रातील एक माजी मंत्री, माजी खासदार व सहकार क्षेत्रातील कार्यकर्त्या होत्या. त्या दृष्टीने, त्यांनी राजकारणात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. त्यांच्याविषयीची माहिती पुस्तकात असणे आवश्यकच होते. पुस्तकाच्या संपादकीय नियोजनानुसार त्यांची स्वतंत्रपणे मुलाखत प्रसिद्ध करण्याचे ठरलेही होते. तसा उल्लेख पुस्तकातील माझ्या मनोगतात मी केलेला आहे. तथापि, हाती आलेली त्यांची मुलाखत परिपूर्ण स्वरूपात व वेळेत तयार करणे, काही अडचणींमुळे शक्य झाले नाही. त्या मुलाखतीतील तपशिलाच्या काही त्रुटी दूर करून ती मुलाखत पुस्तकाच्या पुढील आवृत्तीत समाविष्ट करण्याचा मानस आहे.
वसंतदादांच्या प्रथम पत्नी सौ.मालती या एक साध्यासुध्या गृहिणी होत्या. वसंतदादा स्वातंत्र्य चळवळीत कार्यरत असताना त्यांनी मोठ्या धीराने संसार केला व घर सांभाळले. त्यांचे आजारपणामुळे अकाली निधन झाले. दादांनी शालिनीतार्इंशी विवाह त्यानंतर बऱ्याच वर्षांनी केला. त्यावेळी शालिनीतार्इ विधवा होत्या व त्यांच्या पदरात दोन मुले व दोन मुली अशी चार अल्पवयीन अपत्ये होती. दादांचे त्यांनी शालिनीतार्इंशी विवाह करण्याच्या घेतलेल्या धाडसी निर्णयाबद्दल त्यावेळी कौतुक तर झाले नाहीच; उलट, त्यांना त्या निर्णयापासून परावृत्त करण्याचाच प्रयत्न काही निकटवर्तीय कार्यकर्त्यांकडून झाला. मात्र दादा त्यांच्या निर्णयावर ठाम राहिले आणि त्यांनी मुंबईत एका घरगुती कार्यक्रमात निवडक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शालिनीतार्इंशी विवाह केला.
वसंतदादा त्यावेळी पंचेचाळीस-सेहेचाळीस वर्षांचे असावेत. तेव्हा त्यांचा समावेश महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांत होत होता आणि ते प्रदेश काँग्रेसच्या नेतृत्वाची जबाबदारी पार पाडत होते. त्यांच्या त्या विवाहामुळे राजकीय क्षेत्रातील त्यांच्या प्रतिमेला कदाचित बाधा पोचेल, अशी भीती त्यांच्या निकटवर्तीयांना वाटत असावी. कारण मराठा समाजात विधवा विवाहाची प्रथा नव्हती आणि त्या विवाहाची अकारण सार्वत्रिक चर्चा होईल असे कार्यकर्त्यांना वाटत होते. त्यामुळे त्यांनी अन्य एखाद्या सुशिक्षित तरुणीशी विवाह करावा असेही सुचवण्याचा प्रयत्न त्यांच्यापैकी काहींनी केला होता; पण दादांनी तेव्हा त्या प्रस्तावास नकार दिल्याचे समजते. शालिनीताई या उच्च विद्याविभूषित (डॉक्टरेट) होत्या आणि कार्यकर्त्या म्हणूनही तेव्हा त्या वावरत होत्या. दादांनी त्यांना त्यांचा स्वीय सहाय्यक म्हणून चांगला उपयोग होऊ शकेल असाही विचार त्यावेळी केला असावा.
शालिनीतार्इंनी खरोखरच दादांच्या स्वीय सहाय्यक म्हणून चांगल्या प्रकारे जबाबदारी काही वर्षे पार पाडलीही. तथापि, त्यांचा पिंड कार्यकर्त्याचा असल्यामुळे दादांच्या बरोबर काम करता करता हळुहळू त्याही सार्वजनिक कार्यात सक्रिय झाल्या. त्यांनी महिलांसाठी म्हणून स्वतंत्रपणे काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी सांगलीत श्री लक्ष्मी महिला सहकारी बँकेची तर मुंबईत इंदिरा सहकारी बँकेची स्थापना केली. त्यांनी इतरही काही संस्थांची राज्य पातळीवर उभारणी केली. त्यांना सांगली मतदारसंघातून विधानसभा व लोकसभा निवडणूक लढवण्याची संधी मिळाली. त्यांना ए.आर. अंतुले यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात महत्त्वाचे महसूल खात्याचे मंत्रिपदही मिळाले. त्यामुळे त्यांचा समावेश राज्य पातळीवरील प्रमुख नेत्यांत होऊ लागला. त्यांनी काँग्रेस पक्षाच्या आदेशानुसार सातारा लोकसभा मतदारसंघातून ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या विरूद्ध निवडणूक लढवण्याचेही धाडस दाखवले. त्यांना यशवंतरावांपेक्षा फक्त पन्नास हजार मते कमी पडली.
त्या महाराष्ट्राच्या राजकारणात आघाडीवर चमकत असतानाच त्यांचे मतभेद वसंतदादांशी काही कारणावरून झाल्याचे सांगण्यात येते. त्या दोघांच्या वैवाहिक जीवनाच्या वाटाही वेगळ्या, दादांच्या उत्तरायुष्यात झाल्या असाव्यात. कारण त्या दोघांचेही वास्तव्य वेगवेगळ्या ठिकाणी असे. वसंतदादांनी शालिनीतार्इंना सार्वजनिक कार्यात काम करण्यासाठी पूर्ण मोकळीक प्रारंभीच्या काळात दिली होती. वसंतदादांना शालिनीतार्इ स्वतंत्रपणे काम करतात, याबद्दल त्यांचे कौतुकच असायचे. ते कौटुंबिक पातळीवरही समाधानी होते. त्यांनी शालिनीतार्इंच्या मुलांची जबाबदारी तर मनापासून स्वीकारली होतीच; त्यांचे मुलांशी व्यक्तिगत संबंधही प्रेमाचे व जिव्हाळ्याचे राहिले. त्यांचा शालिनीतार्इंशी दुरावा मात्र वाढत गेला.
शालिनीताई जिद्दी व महत्त्वाकांक्षी होत्या. त्यामुळे सर्व निर्णय त्या स्वत: घेत असत. वसंतदादांना बहुधा ते आवडले नसावे. वसंतदादांमुळेच शालिनीतार्इंना राजकारणात महत्त्वाचे स्थान मिळते, अशी वसंतदादांच्या कार्यकर्त्यांची ब कुटुंबातील निकटवर्तीयांची समजूत होती आणि तशी चर्चाही होत असे. तथापि, शालिनीतार्इंना तसे वाटत नव्हते. त्या त्यांची राजकीय क्षेत्रातील प्रगती व उत्कर्ष या मागे त्यांचे काम व कर्तृत्वच कारणीभूत आहे असे मानत असत. वसंतदादा व शालिनीताई यांच्यातील दुराव्यामागे हे महत्त्वाचे कारण असावे अशीही चर्चा तेव्हा होत असे. खरे कारण काय आहे, याबाबत कोणीही उघड भाष्य न केल्याने ते गुलदस्त्यातच राहिले.
अर्थातच, तो सारा वेगळा इतिहास आहे. वसंतदादांनी त्यांच्या कौटुंबिक जीवनाबद्दल वाच्यता फारशी कधी कोठे केल्याचे निदर्शनास आले नाही. शालिनीतार्इंनी मात्र ‘संघर्ष’ या स्वतंत्र पुस्तकाद्वारे; तसेच, काही मुलाखतींतून त्यांच्या कार्यकर्तृत्वाविषयी व भूमिकेबाबत वेळोवळी मतप्रदर्शन केले आहे. त्यांचा मुख्य आक्षेप त्यांचे कर्तृत्व वसंतदादांना सहन झाले नाही असा असून, त्यांनी त्यांच्यावर अन्याय केला असेही त्यांचे म्हणणे आहे. त्यांनी त्यांचे लग्न व जीवनाची वाटचाल याबद्दल त्यांच्या पुस्तकात सविस्तर लेखन केले आहे.
‘वसंतदादा‘ या पुस्तकातील कोठल्याही लेखात त्यांच्याविषयी काही माहिती ओघाने आली असती तर प्रश्नच नव्हता. ती प्रसिद्ध झालीच असती. तथापि, तशी ती आलेली नसल्यामुळे किंवा स्वतंत्रपणे ती दिली गेली नसल्याने काही वाचकांकडून शंका उपस्थित केली जाणे साहजिक आहे. वसंतदादा हे तर असामान्य, कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व होतेच, पण शालिनीताई यांचेही कार्यकर्तृत्व स्वतंत्रपणे विचारात घ्यावे लागेल. त्या प्रभावीपणे कार्यरत असून जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निमित्ताने त्यांची संघर्षशील वृत्ती व लढाऊ बाणा प्रकर्षाने जाणवत असतो. व्यक्तीचे वैवाहिक वा कौटुंबिक जीवन आणि तिचे सार्वजनिक क्षेत्रातील कार्यकर्तृत्व या वेगवेगळ्या बाबी आहेत. त्यांचा विचार स्वतंत्रपणे करणेच उचित ठरेल.
– दशरथ पारेकर 9420454765 dvparekar@rediffmail.com
संबंधित लेख-
लोकनेता वसंतदादा (Vasantdada Patil – Man of the Masses)
आकाशवाणी आणि आंदोलन (How All India Radio Agreed To Marathi Cricket Commentary? Thanks To Vasantdada Patil)
———————————————————————————————-