त्यागमूर्ती – रमाई आंबेडकर

रमाई आंबेडकर या बाबासाहेबांच्या पत्नी. त्यांचा जन्म दापोली तालुक्यात वणंदगाव (जिल्हा रत्नागिरी) येथे 7 फेब्रुवारी 1898 ला झाला. रमाई यांची साथ होती म्हणून बाबासाहेबांनी आयुष्याची लढाई जिंकली अशीच सर्वसाधारण भावना आहे. रमाई या त्याग, कष्ट, सहनशीलता या गुणांच्या प्रतीक झाल्या. त्यांनी त्यांच्या फक्त सदतीस वर्षांच्या आयुष्यात दु:ख आणि फक्त दु:ख सहन केले. रमाई ही तशी अनाथ पोर. रमाई यांचे भीमरावांसोबत लग्न झाले तेव्हा त्यांचे वय होते नऊ वर्षे. बालिकाच ती ! भीमराव त्यावेळी पंधरा वर्षांचे होते. कुपोषणामुळे व औषधपाण्याच्या अभावामुळे त्यांची मरण पावलेली मुले, त्यांचे स्वत:चे आजारपण. अनंत यातना त्यांनी सहन केल्या, तरी बाबासाहेबांना खंबीर साथ दिली.

रमाई यांना त्यांची आई सर्व गोष्टी शिकवत असे. तीच त्यांची ज्ञानाची शिदोरी ! “कामाशिवाय माणसे मरतात, पण काम केल्याने कोणी मरत नाही. आपले काम मन लावून करावे. ही दुनिया गुणांची कदर करते” ही त्यांची प्रिय अशी काही वाक्ये. रमाई गोवऱ्या थापणे, घर स्वच्छ ठेवणे या प्रकारची घरकामाची सर्व मदत आईला करत आणि लहान भावंडांनाही सांभाळत.

रमाई दिसण्यास सुंदर, गोरटेल्या, सडपातळ होत्या. त्या स्वभावाने मितभाषी, निश्चयी आणि स्वाभिमानी होत्या. रमाई यांच्या आईचे नाव रूक्मिणी व वडिलांचे नाव भिकू धुत्रे. त्यांना दोन बहिणी आणि एक भाऊ होता- मोठी बहीण (ती दापोली येथे दिली होती), धाकटी बहीण गौरा आणि धाकटा भाऊ शंकर. भिकू धुत्रे व रूक्मिणी मोलमजुरी करत. ते कुटुंब कामासाठी म्हणून दापोलीत स्थलांतरित झाले. तेथे त्यांनी त्यांचे आडनाव वलंगकर असे केले.

त्यांचे वडील माशांची टोपली डोक्यावर वाहून नेण्याचे काम करत. थेट समुद्रापासून मार्केटपर्यंत अशी ती त्यांची चाल असे. त्यांना त्या कामाचा त्रास होई. कधी छातीत दुखत असे. केव्हातरी रक्ताच्या उलट्याही होत. रमाई यांच्या आई रूक्मिणी आणि वडील भिकू या दोघांना त्यांचा आजार बळावून त्यांचे अकाली निधन झाले. रमाई त्यावेळी आठ वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर भावंडांची जबाबदारी येऊन पडली. वलंगकर काका व गोविंदपूर मामा यांनी त्यांना भायखळ्याला (मुंबई) नेले. काका-मामा तेथेच चाळीत त्या तिन्ही बालकांचा सांभाळ करू लागले.

रामजी सुभेदार बाबा भीमरावांसाठी मुली पाहत असताना त्यांना रमाईबद्दल कळले. रमाई यांचा भीमरावांबरोबर विवाह भायखळ्याच्या भाजी मार्केट मैदानात 4 एप्रिल 1906 रोजी झाला. रमाई यांना फक्त अक्षरांची तोंडओळख ! बाबासाहेब यांनी रमाई यांना लिहिण्या-वाचण्यास शिकवले. रमाई थोर पुरुष, माता यांचे आदर्श डोळ्यांपुढे ठेवून ग्रंथवाचन करू लागल्या. रमाई यांना बाबासाहेबांना वाचताना पाहून आत्मिक समाधान वाटे. त्यांना पहिला मुलगा 12 डिसेंबर 1912 रोजी जन्मला. बाबासाहेबांनी त्याचे नाव महात्मा फुले यांच्या दत्तक मुलाच्या नावावरून यशवंत असे ठेवले.

सुभेदार रामजी बाबा यांचे निधन बाबासाहेब बडोद्याला असताना 2 फेब्रुवारी 1913 रोजी झाले. रामजीबाबा रमाई यांच्यासमवेत त्यांची छोटी बहीण गौरा आणि धाकटा भाऊ शंकर यांचाही सांभाळ करत असत. रमाई यांच्या सासरी इतर माणसांचाही गोतावळा होता. भीमरावांचा परिवार मीराआत्या, मुकुंद- त्याची पत्नी, गौरा, शंकर आणि दोन महिन्यांचा यशवंत असा होता. रमाई घरातील ज्येष्ठांची सगळी सेवा करत. त्या साऱ्या कुटुंबाचा आधारस्तंभ बनल्या. रमाई पहाटे चार वाजता उठत. शेणाच्या गोवऱ्या करून पहाटेच त्या विकायच्या. लोक बॅरिस्टरची पत्नी शेण वेचते असे म्हणून नावे ठेवतील याकरता त्या पहाटे सूर्योदयापूर्वी व रात्री आठनंतर वरळीला गोवऱ्या थापण्यास जात. त्यांना शेणाच्या गोवऱ्या विकून तुटपुंजे पैसे येत. त्या सरपणासाठी पोयबावाडी, दादर ते माहीमपर्यंत पायी फिरत.

रमाई यांना 1913 ते 1917 हा काळ त्रासदायक गेला. रमाई यांना कुटुंबातील सदस्यांच्या मृत्यूचे घाव सहन करावे लागले. 1914 मध्ये रमेश, 1917 मध्ये बाबासाहेबांची सावत्र आई जिजाबाई, बाबा-रमाई यांची मुलगी इंदू, बाबासाहेबांचे मोठे भाऊ आनंद- त्यांचा मुलगा गंगाधर इतक्या जणांचे मृत्यू चार वर्षांत होऊन गेले. नंतरही ते नष्टचर्य संपले नाही. त्यांचा मुलगा बाळ गंगाधर औषधोपचाराविना 1921 मध्ये मृत्यू पावला. बाबासाहेब व रमाई यांच्या राजरत्न या मुलाचाही मृत्यू 1926 मध्ये झाला. बाबासाहेब परदेशात असताना मुलगा आजारी पडला. त्यांचे बाळ उपचाराअभावी मृत्यूमुखी पडले. बाबासाहेबांना त्यांच्या मुलांच्या मूत्यूची हकिगत कळली, तेव्हा ते खूप रडले. ते रमाई यांना म्हणाले, “रामू, मला माफ कर. हेही दिवस जातील, दु:खच माणसाला मोठे करते !” बाबासाहेब किती योग्य म्हणाले होते ! कारण रमाई यांनी सहन केलेल्या हालअपेष्टा, पचवलेली दु:खे यांतूनच त्या अवघ्या समाजाच्या ‘माता’ झाल्या !

बाबासाहेब रमाईला पत्रांतून खुशाली कळवत असत

बाबासाहेब आंबेडकर 21 जुलै 1913 ला शिक्षणासाठी न्यू यॉर्कला गेले. त्यानंतर काही वर्षे त्यांचे वास्तव्य विदेशात होते. बाबासाहेब पत्रांतून खुशाली घेत. रमाई बाबासाहेब परदेशात असताना महिलांच्या सभा घेत, जागृती करत. त्या संसार सांभाळत समाजकार्यात सहभाग घेत. बाबासाहेबांना रमाई यांच्या त्यागाची, समर्पणाची, कष्टाची, सोशिकतेची जाण होती. म्हणून ते रमाई यांना त्यांची स्फूर्तिदेवता असे म्हणत व लाडाने रामू संबोधत. बाबासाहेब लंडनला पुन्हा 1920 ते 1923 हा काळ होते. रमाई दु:ख पत्राने कळवत, परंतु त्या बाबासाहेबांना त्यांच्या ध्येयापासून दूर होऊ देत नसत. रमाई त्या काळातही बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांनी गोळा करून दिलेली वर्गणी स्वीकारत नसत.

रमाई यांची ओळख बॅरिस्टरची पत्नी अशी असताना त्यांच्याकडे नेसण्यास साडी मात्र एकच होती- फाटकी, दोन जोड असलेली ! बाबासाहेब लंडनहून शिकून आले तेव्हा त्यांचा सत्कार करण्यासाठी सगळे जमले. रमाई यांच्या दीराने त्यांना पैसे देऊ केले. ते म्हणाले, “तुला नवीन कपडे घे.” रमाई बाजारात गेल्या. त्यांनी घरातील सगळ्यांसाठी कपडे घेतले. बाजारातून आल्यावर सगळ्यांनी विचारले, “रमा, तू तुला कपडे नाही घेतलेस?” रमाई फक्त हसल्या. साहेब येणार, त्यांचे स्वागत करण्यास जावे कसे? रमाई यांनी काय केले, तर बाबासाहेबांना शाहू महाराजांकडून सन्मान म्हणून शेला व फेटा मिळालेला होता, त्यांनी त्याची साडी बनवली व ती नेसून त्या सत्कारास गेल्या !

बाबासाहेबांची आर्थिक परिस्थिती थोडी सुधारल्यावर ते राजगृह येथे राहण्यास गेले. बाबासाहेबांचे सामाजिक कार्य वेगवेगळी सभा, आंदोलने यांत सुरू असायचे. रमाई या बाबासाहेबांचा जीव की प्राण होत्या. रमाई यांना क्षयरोगाची बाधा दिसून आली. बाबासाहेब गोलमेज परिषदेला गेले तेव्हा रमाई आजारीच होत्या. बाबासाहेब यांनी त्यांना धारवाडला वराळे परिवाराकडे ठेवले व ते लंडनला गेले. वराळे धारवाडमध्ये लहान मुलांचे वसतिगृह चालवत. लहान मुले वसतिगृहाच्या आवारात खेळण्यास येत. रमाई यांना तेथे मुलांना खेळताना पाहून आनंद होई. एकदा मुले खेळण्यास दोन दिवसांपासून आली नाहीत, तेव्हा चौकशी केली असता मुले उपाशी असल्याचे त्यांना समजले. त्यांनी स्वत:च्या हातातील सोन्याच्या बांगड्या आणि कपाटातील दागिन्यांचा डबा वराळेकाकांना देऊन मुलांना कधीच उपाशी राहू देऊ नका अशी ताकीद दिली. जन्मभर काबाडकष्टात दिवस काढलेल्या त्यांना सोन्याचा थोडाही मोह झाला नाही. त्या दिवसांपासून तेथील सर्व मुले व मोठी माणसेपण त्यांना रमाई म्हणू लागले !

रमाई यांचा आजार जानेवारी 1935 नंतर बळावला. काबाडकष्टाने पोखरून निघालेले शरीर अंथरुणावर खिळून होते. क्षयरोग हा त्या वेळी जिवघेणा आजार होता. बाबासाहेब त्यांच्याजवळ बसून राहत. स्वत: त्यांना औषध-कॉफी देत. रमाई यांची प्राणज्योत 27 मे 1935 ला सकाळी 9 वाजता मालवली. ‘दीनदलितांची आई’ स्वत:च्या यशवंताला पोरके करून वरळी स्मशानात विसावली. मानवतेची सेवा करणारे भीमराव व त्यांना साथ देणाऱ्या रमाई ‘मातोश्री’ !

बाबासाहेबांचे प्रेम ‘रामू’ला पाठवलेल्या प्रत्येक पत्रात प्रतिबिंबित झाले आहे. बाबासाहेब ‘बहिष्कृत भारत’च्या लेखात रमाई यांच्याबद्दल लिहितात, “रात्रंदिवस जिने प्रपंचाची काळजी वाहिली, जिला अजूनही ती करावी लागत आहे. जिने पती स्वदेशी परत आल्यानंतरही विपन्न दशेत शेणीचे भारे स्वत:च्या डोक्यावर वाहून आणण्यास मागेपुढे पाहिले नाही, अशा ममताळू, सुशील, पूज्य स्त्रीच्या सहवासात रोज, दिवसांच्या चोवीस तासांतील अर्धा तासही मला घालवता आला नाही.”

बाबासाहेबांनी ‘थॉट्स ऑन पाकिस्तान’ हा ग्रंथ ‘प्रिय रामू’ म्हणून त्यांना अर्पण केला आहे. अर्पणपत्रिकेत त्यांनी लिहिले आहे, की “तिच्या हृदयाचा चांगुलपणा, मनाचे कुतूहल आणि शिलाचे पावित्र्य यांसह तिचे शालीन मनोधैर्य नि तिने तिची माझ्याबरोबर दु:ख सोसण्याची तयारी अशा दिवसांत मला दाखवली जेव्हा मी नशिबाने लादलेला मित्रविरहित काळ चिंतेसह कंठत होतो, त्या बिकट परिस्थितीमध्ये साथ देणाऱ्या रामूच्या आठवणींत कोरलेले हे प्रतीक.”

रमाई यांच्यावर लिहिलेली पुस्तके आहेत, रमाई यांच्या नावाने उभारलेले स्मारक, शिक्षण संस्था, चित्रपट आहेत, तरीही रमाई यांना शब्दांत मांडणे व समजून घेणे हे कठीण आहे !

भैय्यासाहेब ऊर्फ यशवंत भीमराव आंबेडकर सांगतात – “आई रमाई व बाबा यांचे संबंध खूप चांगले होते. ते आईला भागा किंवा रामू या नावाने बोलत असत आणि त्या नावानेच विदेशातून तिला पत्रे पाठवत असत. आई रमाई अनेक वेळा आजारी असायची. ती वाचेल किंवा नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. डिसोजा नावाचे डॉक्टर बाबांच्या चांगले ओळखीचे होते. त्यांचा दवाखाना लोअर परळच्या बाजूला होता. तेथे ते आईला घेऊन जात. बाबासाहेबांनी आई रमाईची खूप सेवा केली. बाबांनी हायकोर्टात वकिली सुरू केली होती. त्यांचा वकिलीत जम बसला व भरपूर पैसे मिळू लागले. ते मिळालेले सर्व पैसे आई रमाईला देत असत. आईला पैसेदेखील मोजता येत नसत. ती तीस आणि वीस रुपयांची एक सूर्जी अशा पाच बंडल करत असे व ते शंभर रुपये आहेत असे बाबांना सांगत असे. त्यावेळी बाबा खूपच हसत. तेव्हा आई रमाई बाबांना बोलत असे, की “का हसता? मी अडाणी आहे म्हणून” आणि त्यानंतर, दोघेही हास्यविनोदात रमून जात असत. असे कित्येक दिवस साठवलेले पैसे ती बाबांना देत असे. बाबा नंतर ते पैसे बँकेत जमा करत असत. आता आपले चांगले दिवस येतील असे आई रमाईला सारखे वाटत असे.

बाबा कामानिमित्त बाहेरगावी असत. बाबा गेल्यावर आई रमाई सारखी काळजीत असायची. ते बाहेरगावी गेल्यानंतर मी आईसोबत घरीच राहत असे. आई रमाई बाबांवरती व माझ्यावर खूप प्रेम करायची. तिला माझ्या आजाराबद्दल खूपच चिंता वाटत असे. बाबासाहेबांवरती अनेक वेळा जीवघेणे हल्ले झाल्यामुळे आई रमाई भीतीने चिंताग्रस्त होती. त्यामुऴे तिचे खाण्यापिण्याकडे लक्ष नव्हते. म्हणून तिची तब्येत दिवसागणिक खराब होत चालली होती. आई रमाई 27 मे 1935 ला माझ्या व बाबांच्या जीवनातून निघून गेली. दु:खाने गांजून गेलेल्या आई रमाईचा क्षय आजाराने असा करुण बळी घेतला.

बाबासाहेब व मी, आम्ही दोघांनी व शंकरमामा धुत्रे यांनी दु:खी अंत:करणाने टाहो फोडला. आई रमाईच्या मृत्यूमुळे आम्ही खचलो होतो. उदासीची सावली आमच्या जीवनावर पडू लागली. पण 1935 चा काळ हा बाबांसाठी चळवळीचा अत्यंत महत्त्वाचा असा काळ होता. बाबा व मी, आम्ही आमचे अश्रू आपल्याच हातांनी पुसून, आई रमाईच्या स्मृती अंत:करणात साठवून लढण्यासाठी सज्ज झालो आणि भारतातील शोषित-वंचितांच्या जीवनात मुक्तीची प्रकाशकिरणे 14 ऑक्टोबर 1956 ला नागपूर येथे सहा लाख जनसमुदायाला बौद्ध धम्माची दीक्षा देऊन प्रकाशित केले. बाबांनी आई रमाईला दिलेल्या अभिवचनाची ‘नवीन पंढरपूर’ निर्माण करून नागपूर येथे पूर्तता केली. तो नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी माझी आई रमाई नव्हती. मी व बाबा आईच्या आठवणीने अश्रू थांबवू शकलो नाही. ती असती तर किती आनंद झाला असता तिला ! आई रमाईला ते सारे अनुभवता आले नाही याचे दु:ख बाबासाहेब विसरू शकले नाहीत. म्हणूनच त्यांनी ‘थॉट्स ऑफ पाकिस्तान’ हा ग्रंथ आई रमाईला समर्पित केला. पण बाबासाहेब रमाईच्या समर्पणाला न्याय देऊ शकले नाहीत, याची तीव्र खंत बाबांना शेवटपर्यंत सतावत होती.

(तेजस्विनी तूपसागर (9665358983), रत्नकला बनसोड (9503877175) आणि शीतल कांबळे (7996389310) यांच्या रमाई (फेब्रुवारी व मार्च 2023) मासिकातील वेगवेगळ्या लेखांवरून संकलित)
——————————————————————————————–

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here