तिंतल तिंतल लितिल ताल !

0
54
Tintal

नर्सरीतल्या बाळानंतिंतल तिंतल लितिल ताल…’ असं म्हटलं, की आर्इचे हात ‘स्काय’मधल्या ‘स्टार्स’ना टेकतात! या बालगीताचं काय नशीब खुललं ते पाहा! गीत जेन आणि अॅन टेलर या ब्रिटिश बहिणींनी १८०६ मधे लिहिलं. ‘चिवचिव चिमणी रबराची, कशी ओरडे गमतीची’ हेही जुनं बालगीत. या मराठी बालगीतात ‘र’ येतो. तो बालकाला म्हणता येत नाही. त्याची मजा और असते पण त्या गीताचे सोने झाले नाही. ‘ट्विंकल ट्विंकल’ म्हणणार्‍या आयांनी सप्तर्षी, ध्रुवतारा, वसिष्ठ, अरूंधती हे आकाशातील तारे-तारका पाहिले असतील की नाही, याची शंका वाटते. मात्र मराठी गीतातील जिवंत चिमणी परिचयाची होती आणि एकेकाळी, रबराची चिमणी कवितेत होती तशी घराघरात होती. पण इंग्रजांचं बालगीत जगभर घराघरात किलबिललं!

‘व्टिंकल व्टिंकल लिटिल स्टार’ हे गीत गाण्याचे दिवस उलटले, की मूल वरच्या वर्गात जातं. शाळेत अॅटलासविषयी माहिती होते. भारतात डेहराडूनचं ‘सर्व्‍हे ऑफ इंडिया’ स्कूल अॅटलास छापतं. प्रत्येक मुलाकडे तो असण्याची शक्यता आहे. त्यात पृथ्वीच्या उत्तर आणि दक्षिण गोलार्धांची चित्रं असतात. शाळाशिक्षक ती चित्रं समजावणं शक्य नसतं. ती घरच्यांना शिकवावी लागतात आणि नेमकं तेच होईनासं झालंय. म्हणजे पुस्तकातलं ज्ञान पुस्तकात राहतं!

हल्ली मुलं इंटरनॅशनल किंवा पब्लिक स्कूलमधे जातात. त्यांना गॄहपाठ दिला तर सगळं सोपं असतं. पक्षी, वाहनं यांची रंगीत गुळगुळीत चित्रं बाजारात मिळतात. मुलांच्या आया ऑफिसातून आल्यावर ती कापून वहीत चिकटवतात. त्यांना छान मार्क मिळतात. आर्इवडिलांना आनंद होतो. चित्रातला पोपट आणि चित्रातली चिमणी प्रत्यक्षात कधी पाहण्यात येत नाही.

सध्या वय वाढतं तशी धबधब्याखाली आंघोळ केल्यासारखी माहिती मुलांच्या अंगावर कोसळत आहे. पण एक म्हण आहे, ‘अतिशिक्षण आणि भिकेचं लक्षण’. अतिमाहिती मिळवता मिळवता मुलाचं मुद्याच्या गोष्टींकडे दुर्लक्ष होत आहे का? त्यांचं निसर्गाशी नातं तुटत आहे का?

मात्र पूर्वी असं नसणार. त्यामुळे आपल्या संस्कृतीत खगोलीय घटनांची दखल घेत आपण अनेक दिवस आणि रात्री साजर्‍या करतो. कोजागिरी पौणिमा, होळी पौणिमा, वटपौर्णिमा, बुध्द पौर्णिमा, गुरू पौर्णिमा, नारळी पौर्णिमा या तर दॄष्टीआड करता न येणा-या खगोलीय घटना आहेत. चतुर्थीला चंद्रदर्शन केल्यानंतर जेवण्याची, तसंच रथसप्तमीला सुगड्यात दूध ठेवून ते उतू जाऊ देण्याची कल्पना विलक्षण आहे. मकरसंक्रांतीला तीळगूळ खात पतंगोत्सव साजरा करताना उत्तरायणाचं महत्त्व कोणीही विसरत नाही. गणेश चतुर्थी सोडून तीनशेचौसष्ट दिवशी नियमित चंद्र पाहणारे भारतीय लोक आहेत. करवा चौथ, छट पूजा असे कितीतरी आकाशस्थ ग्रहतार्‍यांशी संबंधित दिवस भारतीय पंचागांत आहेत. त्रिपुराच्या वाती लावणा-या असंख्य महिला लहान लहान गावी आहेत.

मुसलमानांना चंद्रदर्शनाचं केवढं महत्त्व! जपानी लोकही आपल्यासारखेच आहेत. ज्या दिवशी सूर्य अचूक पूर्वेला उगवतो त्या दिवशी जपानी राष्ट्रीय उत्सव साजरा करतात.

सध्या सगळ्या सणांचा इव्हेण्ट होतो. त्यांचं नातं पैशांशी जुळलेलं दिसतं. परंतु आकाशातली रोहिणी किंवा व्याधाचा तारा पाहून कोणाला पाच पैशांचं उत्पन्न मिळत नाही. मग त्यांच्याकडे पाहण्याच्या हौशी कोणी कशाला करायच्या असा सध्या कल आहे. त्यामुळे आपण कल्पनाशक्तीला तिलांजली देत आहोत हे मात्र कोणाच्या लक्षात येत नाही. इंग्रजांचं राज्य दीडशे वर्षं टिकलं, पण ते आपलं पंचांग हिरावून घेऊ शकले नाहीत, ते बरं झालं. पंचांगाला राष्ट्राच्या मर्यादा नसतात, कारण अवकाश बदलणं कोणत्याही सत्तेच्या हाती नसतं. आर्किटेक्चरच्या अभ्यासक्रमात पुस्तकात मानवी जीवन आणि पाचवं भूत ‘आकाश’ यांचा उल्‍लेख ना युरोपातील गुरूंनी केला, ना कधी भारतीयांनी. आकाश सतत डोक्यावर असून त्याच्याकडे सर्वांचं दुर्लक्ष झालं आहे. असं का?

पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूतं भारतीय परंपरेत आहेत. त्यात सगळं विश्व सामावलं आहे. वास्तुनिर्मिती करताना सर्व विद्वानांचा आणि कलावंतांचा अभ्यास पंचमहाभूतांतील पहिल्या चार भूतांशी जुळलेला आहे. मात्र आकाशाशी जुळला नाही. शेवटचं भूत आकाश हे निरुपद्रवी वाटतं. बाकीच्या चार भूतांपासून बचाव करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जातात. पॄथ्वीचा विचार करताना भूकंप आठवतो. समुद्र दिसला, की सुनामी आठवते. नदी पाहिली, की महापूर आठवतो. गगनचुंबी इमारती बांधताना वायूचा विचार सर्वप्रथम केला जातो. अग्नीचा विचार करायचा कोणी विसरत नाही, कारण सरकारने आगीपासून माणसं आणि इमारती यांचा बचाव करण्यासाठी भरपूर नियम केले आहेत.

बडोद्यातील आमच्या निवासातील आमचं स्वैपाकघर अचूक पूर्वेला आणि माजघर पश्चिमेला आहे. प्रकाशाची तिरीप 21 मार्च रोजी बरोबर तोंडावर येते. सूर्य वर्षभर कोणत्या कोनातून उगवतो आणि कोणत्या कोनात मावळतो हे विनासायास पाठ होतं. सप्टेंबरच्या 20, 21 आणि 22 तारखांना घरातल्या अन्नपुर्णा आणि बालकॄष्ण यांच्यावर सूर्यकिरण पडले, की सकाळचे किती वाजले हे सांगता येतं. चंद्राचं उगवणं आणि मावळणं पाहता येतं. गच्चीत झोपलं, की रात्री असंख्य तारे दिसतात; तसंच सप्तर्षीं आणि ध्रुवताराही दिसतो.

गूढ आणि अचूक स्थानी उभे केलेले पिरॅमिड; तसंच, गॅलिलिओ यांची आठवण काढल्याखेरीज आकाशाच्या अभ्यासाचा ओनामा होत नाही. नभोमंडळाचा विचार ग्रीस किंवा आफ्रिका खंडातल्या वाळवंटातले किंवा दर्यावर्दी लोक करत होते, त्‍यावेळी भारतातही खगोलाचे अभ्यासक होते. त्यात…

  • बिहार-बंगाल क्षेत्रातील कुसुमपूर गावचा आर्यभट पहिला इसवी सन 476
  • वराहमिहीर इसवी सन 490
  • आर्यभट दुसराइसवी सन 580
  • राजस्थानातील अबू पर्वताजवळच्या भिनमाळ गावचा ब्रह्मगुप्त इसवी सन 598 …665
  • सह्यपर्वताजवळील विज्जलगडचा भास्कराचार्य इसवी सन 1114
  • बख्तीयार खिलजीच्या तुर्की आक्रमणामुळे नालंदा विद्यापीठाचा झालेला सर्वनाश इसवी सन 1193 विद्यापीठाच्या वाचनालयाला आग लावली गेली तेव्हा सतत तीन महिने पुस्तके जळत होती. ते बेचिराख करून सर्वांना तिथून हाकलून लावलं गेलं. त्यानंतर अनेक शतके भारतीय खगोलशास्त्र गडप झालं होतं!
  • जयपूरचा सवार्इ जयसिंह – 1688 ते 1743 – यानं जनसामान्यांसाठी ठिकठिकाणी केलेली ‘जंतरमंतर’ची निर्मिती. तो सर्व खगोलशास्त्रज्ञांपेक्षा वेगळा उपक्रम म्हणता येर्इल.

अत्यानंदाची गोष्ट अशी, की  आधुनिक काळात पद्मविभूषण जयंत नारळीकर आणि त्यांच्या वडिलांचं नाव उदयास आलं. नारळीकर आणि मोहन आपटे हे मराठी भाषिकांचं नातं आकाशाशी जुळवून देत आहेत.

 तरीही खगोलशास्त्राचं पुस्तक उघडण्याआधी आपल्याला बाल्यावस्थेपासून आकाश माहीत होतं. कारण ते मेघडंबरीसारखं सतत डोक्यावर छत्र धरून असतं. सहजपणे चंद्राच्या बदलत्या कला दिसतात. कधी मंगळ तर कधी शुक्र, रोहिणी अथवा व्याधाचा तारा दिसतो. काहींनी आकाशगंगा आणि धूमकेतू पाहिले असतील. आम्हीही पाहिलेत.  जे पुस्तकातून कितीही समजावलं तरी समजणार नाही ते शरदाचं चांदणं ही अनुभवायची गोष्ट आहे. रामानं चंद्रासाठी हट्ट धरला होता, ही गोष्ट सगळ्यांना पाठ आहे. आपल्याही मुलांनी तसा हट्ट करण्याची शक्यता निदान महानगरात तरी शक्य दिसत नाही.

एकेकाळी तळमजली घरं होती. वाडे होते. अंगणं होती. लोक अंगणात किंवा गच्चीत झोपत. महानगरांमधे आकाश दिसण्याची सोय उरलेली नाही, कारण गॄहनिर्मितीत आकाशाचं अस्तित्व लक्षात घेतलं जात नाही. ते दाखवायचं तर सूर्यचंद्रांच्या उगवतीच्या आणि मावळतीच्या दिशांनुसार सगळ्या घरांची मांडणी बदलावी लागेल.

मुंबर्इत समुद्र सतत दिसावा या बेतानं इमारती बांधतात. तलावाच्या काठी टाऊनशिप उभ्या राहतात. विकासक निसर्गाच्या सान्निध्यात आमची घरं आहेत अशा पानभर जाहिराती छापतात. नदीकाठी घरं असल्याची ग्वाही देतात. नवमध्यम वर्गातील लोक पार्किंगची सोय असेल तरच वन किंवा टू बीएचकेचे फ्लॅट बुक करतात. मध्यमवर्गातील कुटुंबांना विनामूल्य आकाश दिसावं अशी घरं बांधली, तर मुलांना अॅंटलासातले ग्रह-तारे समजावून सांगता येतील. पालकांनी तसा आग्रह धरला, तर ‘आकाशदर्शन सोयीचं होणारी घरं मिळतील’ अशा जाहिराती येतील आणि मागणीनुसार पुरवठा करणं गृहनिर्मिती करणा-यांना भाग पडेल.

या सगळ्यामागे घरोघरी आर्यभट निर्माण होण्याची अपेक्षा नाही, पण निसर्ग माणसाचं औत्सुक्य वाढवतो. त्यातूनच नवा विचार करण्याची प्रेरणा मिळते. सध्या निसर्गाचा अभ्यास करण्याची आवड वाढली आहे, त्याला चालना मिळेल. पावसाळी सहली, गिरीभ्रमण करणारे तरूण आहेत. वीकेंड रिसॉर्टची गि-हार्इकं वाढलीत. कन्याकुमारीला सूर्योदय पाहायला लोक पहाटे उठून धावत सुटतात. प्रत्येक हिल स्टेशनवर सनसेट पॉर्इंट असतोच. दार्जिलिंगला लोक पहाटे उठून कांचनगंगेचं बर्फाच्छादित रूप, सूर्याची उगवती किरणं पाहायला जातात.

prakash_pethe_4  तारकापुंज आणि सप्तर्षीसह ध्रुव तारा दिसेल अशी घरं कशी बांधता येतील याचा विचार व्हावा. ते कसं करता येर्इल याची ढोबळ उदाहरणं द्यायची झाली, तर कुठल्याही मारुतीच्या मंदिरातली मूर्ती दक्षिणमुखी असते. बाकीचे देव पूर्वेला किंवा पश्चिमेला पाहतात. जगातल्या सर्व मशिदींतले नमाजी मक्केकडेच तोंड करून बसतात. शिवलिंगाच्या शाळुंकेवर अभिषेकाची संततधार धरणारं पाणी उत्तरेकडच्या गोमुखातून बाहेर पडतं. असंख्य मंदिरं त्यातील मूर्तीवर विशिष्ट तिथीला सूर्यकिरण पडतील या बेतानं बांधली गेलेली असतात. त्याप्रमाणे घरातील प्रत्येक खोलीतील मोठी खिडकी दिशादर्शक कंपासच्या सुर्इनुसार पूर्व पश्चिम-उत्तर दक्षिण दिशांकडे करता येर्इल. एका बाल्कनीतून डोक्यावरचं अर्धं आकाश आणि दुसरीतून बाकीचं अर्धं दिसेल अशी घरं किंवा गॄहसंकुलं बनवली तर तिथला परिसर जिज्ञासेला खाद्य पुरवेल. निसर्गाशी जवळीक साधेल. औत्सुक्य कॉलेजमधे शिकवत नाहीत किंवा ते अपेक्षित प्रश्नावलीत सापडत नाही. ते मुलांना त्याच्या संगोपनकाळात निसर्गाकडून विनामूल्य मिळतं.

आकाश निरीक्षणाची सुरूवात ध्रुव तारा पाहण्यापासून करणं सोपं असतं. उत्तानपाद राजाची गोष्ट सांगता येते. त्या राजाला दोन राण्या असतात. एक सुनिती आणि दुसरी सुरूची. मोठीचा मुलगा ध्रुव आणि आवडत्या धाकटीचा उत्तम वगैरे वगैरे. मग ध्रुवाला अढळपद मिळतं. तोच तो ध्रुवतारा. हे सगळं आपल्या छोट्यांना पाहता येर्इल अशी गृहनिर्मिती केली, तर सगळ्या इमारती वेगळं रूप धारण करतील आणि सर्व लहानमोठया नगरांची आकाशरेषा बदलून जार्इल. मोठी बहार उडेल. तसं घडो की न घडो, पण ही कल्पनाच रोमांचकारी आहे.

प्रकाश पेठे भ्रमणध्वनी :094277 86823, दूरध्वनी: (0265) 264 1573

इमेल – prakashpethe@gmail.com 

तुमचा विचार मानायचा तर निसर्गापासून दूर असणारी/राहणारी कमी कल्‍पक, कमी संवेदनशील असतात असे म्‍हणावे लागेल. पुन्‍हा हे जर सत्‍य मानायचे तर पन्‍नास किंवा शंभर वर्षांनंतरची माणसे ही आजच्‍या माणसांपेक्षा कमी कल्‍पक असतील, असे तुमचे म्‍हणणे आहे का? किंवा पन्‍नास-शंभर वर्षांपूर्वीच्‍या माणसांपेक्षा ही आजची आपली माणसे कमी कल्‍पक व कमी संवेदनशील आहेत असे मानायचे का? निर्मितीशील/कल्‍पक असणे म्‍हणजे शोधक बुद्धीचे हे खरे आहे का? उत्‍पादकता वाढवण्‍याचे, गोष्‍टी घडवण्‍याचे नवनवे मार्ग म्‍हणजेच शोधक बुद्धी.

इंडिओक्रसी नावाचा एक सिनेमा आहे. तो उपरोधिक स्‍वरूपाचा वैज्ञानिक कथा चित्रपट आहे. त्‍याचे सुत्र आहे की, दिवसागणिक हे जग अधिकाधिक चमत्‍कारिक (स्‍टुपिड) होत जाणार आहे. ख्‍यातनाम अर्थतज्ञ, टायलर कोवेन यांनी म्‍हटले आहे की, मानवी शोधक बुद्धी खालावत चालली आहे. त्‍यांची व्‍हीडिओ फित पहा.

दुसरा मुद्दा असा आहे की, आकाशदर्शन होईल अशा इमारती नुसत्‍या बांधून पुरणार नाही. अजूनसुद्धा रात्रीचे आकाश पहायला किंवा निव्‍वळ स्‍वच्‍छ आकाश पहायला शहरापासून दूर जावे लागते, इतके नगरभाग प्रदूषणमय झाले आहे. तंत्रविज्ञानाचा फायदा असा असतो, की जीपीएसच्‍या साहाय्याने आपल्‍याला पृथ्‍वीवरील जमिनीचा जसा वेध घेता येतो व पत्‍ते शोधणे सोपे होते, तसेच जीपीएसने आकाशातील ता-यांचा, ठिकाणांचा शोध घेणे शक्‍य होणार आहे. ही रम्‍यता केवढी मोठी आहे.

ह्रषीकेश पेठे, rhishikeshpethe@gmail.com

प्रकाश पेठे यांनी या मुद्द्यांना दिलेले उत्‍तर –

आज विराटनगरातली माणसं कॉंक्रिटच्‍या जंगलामुळे निसर्गापासून दूर गेली आहेत. त्या उलट हजारो लहान गावांतली माणसं निसर्गाच्या जवळ आहेत. जर पुढच्या पिढीला महानगरात चिमण्या, कावळे, पोपट व इतर प्राणी पाहायला मिळणार नसतील, तर ती एका आनंदाला मुकतील. निसर्गाचा आनंद घेण्यासाठी लोक दूर जातात, पण त्यातला अर्धा निसर्ग शहरात आणणे काही प्रमाणात शक्य आहे. समजा, हे नव्या पिढयांना दिसलंच नाही, तर ती ‘ढ’ होतील असे मी खात्रीने सांगू शकत नाही.

मी स्वत: मित्राच्या जीपीएसचा उपयोग करून रस्ता शोधायचा कसा ते पाहिले आहे. तसेच गुगल स्कायचाही अनेक वेळा फेरफटका केला आहे. पण मला वाटतं, खरं आकाश पाहायला मिळणं गरजेचं आहे. कारण समुद्र जितका सुंदर दिसतो तितकंच आकाशही! दोन्ही एकत्र पाहायला मिळेल तर जास्तच रम्य. लोकांची कल्पनाशक्ती खुंटेल की विकसेल यावर शास्त्रज्ञ सांगू शकतील, पण एक नक्की, की हाती कोणतेही साधन नसता आर्यभटानं काही कोडी उलगडून दाखवली होती व नुसत्या डोळ्यांनी नीट दिसत नाही म्हणून गॅलिलिओला दुर्बीण शोधायची प्रेरणा झाली होती.

प्रकाश पेठे

About Post Author

Previous articleनाते आकाशाचे
Next articleनवी वादचर्चा
प्रकाश पेठे यांचा जन्म अमरावतीचा. ते बडोदा येथे स्थायिक आहेत. त्यांनी ‘सर जे जे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर’ (मुंबई) येथून शिक्षण पूर्ण केले. त्यांचा वडोदरा महानगरपालिकेसाठी शहराचा पहिला विकास आराखडा व नगर रचना योजना बनवण्यात सहभाग होता. त्यांनी संगीत विशारद ही पदवी 1989 मध्ये मिळवली. ते नगर विकास अधिकारी या पदावरून निवृत्त 1998 मध्ये झाले. त्यांनी ‘महाराज सयाजीराव विद्यापीठ’ बडोदे येथे 1977 पासून अतिथी प्राध्यापक, 2001 पासून ‘सरदार वल्लभभाई पटेल इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलाजी’ येथे अतिथी प्राध्यापक म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. पेठे यांना प्रवास, छायाचित्रण, साहित्य, संगीत आणि कला अशा विविध विषयांची आवड आहे. त्यांची ‘स्वप्नगृह’, ‘धमधोकार’, ‘आनंदाकार’, ‘वडोदरा’ व ‘नगरमंथन’ अशी पुस्तके ‘ग्रंथाली’तर्फे प्रकाशित झाली आहेत.