गोविंद तळवलकरांनी आपल्या अग्रलेखांतून सातत्याने पाश्चात्य ज्ञानविज्ञानाचा, ग्रंथांचा, उत्तम शास्त्रीय नियतकालिकांतील अभ्यासकांच्या लेखांचा, अभ्यासक विद्वानांचा परिचय नेहमीच करून दिला. अग्रलेखावर लेखकाचे नाव नसल्याने नेमके कोणते अग्रलेख तळवलकरांनी लिहिले हे कळणे कठीण असले तरी त्यांची शैली लक्षात घेता त्यांचे म्हणून लक्षात आलेले लेख, ग्रंथरूपात प्रकाशित झालेले अग्रलेख व अन्य ग्रंथ वाचून अनेक विषयांची, शोधप्रबंधांची, शोधनिबंधांची, ग्रंथांची, शास्त्रीय नियतकालिकांची ओळख झाली. विदर्भात अनेक ग्रंथ विशेषतः इंग्रजी ग्रंथ खूप दिवसांनी वाचायला मिळतात. काही शास्त्रीय नियतकालिके तर वाचायलाही मिळत नाहीत. तळवलकरांच्या लेखांमुळे इंग्रजीतील नव्या ग्रंथांचा व नियतकालिकांतील महत्त्वाच्या लेखांतील आशयही अनेकदा कळला. इंग्रजीतील अनेक नामवंत लेखकांच्या लिखाणाची, वाङ्मयाची ओळखही तळवलकरांच्या लिखाणातून झाली. काय काय वाचले पाहिजे हे कळण्यासाठी तळवलकरांचे लिखाण उपयोगी पडले. या दृष्टिकोनातून तळवलकरांनी वाचक घडवला असे म्हणावेसे वाटते.
– किशोर महाबळ
निर्मल अपार्टमेंटस्, हितवाद प्रेसमागे धंतोली, नागपूर-440012
(‘रुची’ दिवाळी अंक, 1996 वरून उद्धृत)