राहुल गांधीने देशात वृद्ध विरूद्ध तरूण असे काहीसे चित्र उभे केले आहे. राहुलचे देशातील तरूणांना आवाहन असे, की तुम्ही राजकारणात सामिल होवून कॉंग्रेसला पाठींबा द्या. मात्र त्यामध्ये कॉंग्रेसमधील घराणेशाहीबद्दल अवाक्षरही उच्चारण्यात आलेले नाही. त्यामुळे हे आवाहन केवळ ‘निवडणुकांपुरते’ मर्यादीत असल्याचे वाटते. तर दुस-या बाजूला अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधातील आंदोलनाला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अण्णांकडून या प्रकारे तरूणांना आवाहन करण्यात आले नव्हते. अण्णांनी केवळ भ्रष्टाचाराविरूद्ध उभे राहण्याचे आवाहन केले होते आणि ते जनतेस अपील झाले. त्यांना तरूणवर्गाकडून जोरदार पाठींबा दिला गेला. आता तरूणवर्गासमोर राहुल गांधीप्रणीत आणि अण्णा हजारे प्रणीत अशी दोन आवाहने आहेत. त्यातील कोणते आवाहन तरूणाईला अपिल होईल?
अण्णांच्या आंदोलनानंतर त्यावर कसे रिअॅक्ट व्हावे, याचा कुणालाच अंदाज नाही असे दिसते. भ्रष्टाचारामुळे ‘याबद्दल कुणीच काही करत नाही’ या प्रकारची जनतेच्या मनात जी वषिण्णता होती, त्यातून अण्णांना प्रचंड पाठींबा मिळाला. तसा तो अकल्पित होता. त्यामुळे राजकारण्यांपासून मेधा पाटकरांपर्यंत या आंदोलनाच्या यशाला कसे सामोरे जावे, ते कसे स्वीकारावे हे कुणालाच ठावूक नाही, असे वाटते. त्यामुळे एकाच वेळी बचावात्मक आणि आक्रमक अशा दोन्ही अंगांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात असल्याचे दिसून येते.
शरद देशपांडे
पुणे विद्यापिठ,
निवृत्त तत्त्वज्ञान विभागप्रमुख
{jcomments on}