एखादी गोष्ट दुसऱ्या गोष्टीशी शंभर टक्के जुळणारी म्हणजेच पूर्णत: मिळती-जुळती असते, तेव्हा त्यांच्यातील साम्य वर्णन करताना ‘तंतोतंत’ हा शब्द वापरला जातो. वैदिक काळात विद्वानांचे वादविवाद किंवा चर्चा यांमध्ये घट आणि पट म्हणजेच मातीचा घडा आणि वस्त्र अशा, त्या काळातील रोजच्या व्यवहारातील वस्तूंचा दाखला दिला जाई. जसे घटातील आकाश म्हणजे घटाकाश. काही विद्वानांना घटापटाची अशी चर्चा निरर्थक वाटे, म्हणून ते ‘घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात्’ म्हणजेच ‘घट फोडा, वस्त्र फाडा’ असे म्हणून त्यांचा राग व्यक्त करत. तर सांगायची गोष्ट म्हणजे पट याचा अर्थ वस्त्र. वस्त्र अनेक धाग्यांपासून म्हणजेच तंतूंपासून तयार होते. तंतू हे पटाचे एकक समजले जाते. एक जरी तंतू बदलला, तरी वस्त्र बदलते. त्यामुळे दोन वस्त्रे अगदी एकासारखी एक केव्हा दिसतील? जेव्हा त्या दोघांचा तंतू अन् तंतू समान असेल तेव्हाच! ह्या तंतू अन् तंतूवरून सामासिक शब्द तयार झाला, तंतोतंत.
‘तंतोतंत’ शब्दाचे वैशिष्ट्य म्हणजे तो चार अक्षरी शब्द, ‘त’ ह्या एकाच अक्षराच्या वापरातून बनला आहे. गंमत म्हणजे असे एका अक्षरापासून बनलेले चार अक्षरी शब्दही मराठीत चारच आहेत- तंतोतंत, बोंबाबोंब, लालीलाल आणि चेंचाचेंच.
– उमेश करंबेळकर, umeshkarambelkar@yahoo.co.in