डॉ. तात्यासाहेब लहाने

3
1171

“अरे वा! तुमचं ऑपरेशन उत्तम झालंय. आता चांगलं दिसेल, बाबा.”

जे.जे. रुग्णालयातील नेत्रचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. तात्यासाहेब लहाने ह्यांचे हे उद्गगार ऎकताच वृद्ध रुग्ण हात जोडून म्हणाला, “तुम्ही ऑपरेशन केलंत. ते उत्तमच होणार. तुम्हाला हातगुण आहे.”

आदल्या दिवशी दीडशे शस्त्रक्रिया करून,  दुस-या दिवशी सकाळी आठ वाजता डॉ. लहाने त्याच उत्साहाने रुग्णांना तपासायला आले होते.

जे.जे. रुग्णालयातील नेत्र शल्य चिकित्सा विभाग पाहताना, हे शासकीय रुग्णालय आहे  ह्यावर विश्वास बसत नाही. सर्वत्र स्वच्छता. झुरळे किंवा उंदीर फिरताना आढळत नाहीत. खाटांवर स्वच्छ चादरी. लादी दर चार तासांनी पुसली जाते. ते काम करणारा कामगार आळस करत नाही!

शस्त्रक्रियागृह, अँनेस्थेशिया देण्याची जागा आणि प्रतीक्षागृह अद्यावत आहे. सर्व परिसर वातानुकुलीत आहे.

अद्यावत उपकरण आयात करण्यासाठी आणि शस्त्राक्रियेच्या संपूर्ण विभागाच्या आधुनिकीकरणासाठी मोठा निधी लागला. डॉक्टरांची सेवावृती आणि त्यांची स्वच्छ प्रतिमा ह्यामुळे सरकारदरबारी त्यांचे प्रस्ताव लालफितीत अडकत नाहीत. अधिक निधीची गरज भासल्यास देणगीदार तयार असतात.

निस्वार्थी, सर्व गोष्टींवर बारीक लक्ष ठेवणारे, कनवाळू डॉ. लहाने ह्यांच्यासमोर मोठे आव्हान ठाकले आहे. त्यांच्या खांद्यांवर जे.जे. रुग्णालायाच्या डीनपदाची जबाबदारी आली आहे.

मागे एकदा, ही जबाबदारी तात्पुरती त्यांच्यावर पडली होती. त्यावेळचा प्रसंग.  ते एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात गेले. त्यांना तिथे आलेले पाहून विद्यार्थी चकित झाले.

“सर, ह्यापूर्वी कोणतेही डीन वसतिगृहात आले नव्हते.”

डॉ. लहाने एवढ्यावर थांबले नाहीत. त्यांनी उपहारगृह पाहिले, टॉयलेट पाहिले. एकूण अवस्थेबद्दल नाराजी व्यक्त केली आणि सुधारणा करायच्या सूचना दिल्या.

डॉक्टरांना जे.जे.मध्ये 1995 साली बदली करून घ्यावी लागली. एमबीबीएस झाल्यावर, त्यांना आंबेजोगाई येथील शासकीय रुग्णालयात नोकरी लागली. पदव्युत्तर अभ्यासही सुरू झाला. ही पायरी गाठताना तात्यारावांना हालअपेष्टा सोसाव्या लागल्या. कष्ट किती उपसले आणि संकटे किती सोसली त्याची गणतीच नाही.

तात्यारावांचा जन्म लातूर जिल्ह्यातील रेणापूरनजीक नाकेगावात 12 फेब्रुवारी 1957 रोजी झाला. पुंडलिकराव आणि अंजनाबाई ह्या शेतकरी दांपत्याच्या सात मुलांपैकी तात्याराव एक. जेमतेम अडीच एकर जमीन आणि खाणारी तोंडे अकरा. अक्षरओळख व्हावी ह्या माफक अपेक्षेने तात्यारावांची शाळा सुरू झाली.

गुरे राखणे हे मुख्य काम. तात्यारावांना ते काम आवडे. ते गुरे चरत असताना दगडावर बसून धडे वाचत. सकाळी हे काम. दुपारी शाळा. संध्याकाळी छोट्या भावंडांना खांद्यावर वाहायचे. एक काम संपले की दुसरे!

वय पंधरा; तात्याराव 1972 साली दुष्काळ पडला, तेव्हा रोजगार हमी योजनेत पाझर तलावाच्या कामावर जाऊ लागले. तेथे मजुरी सुकडीच्या स्वरूपात मिळायची. त्यांनी ‘कमावा आणि शिका’ ह्या योजनेतही काम केले. तेथे त्यांना झाडांना दिवसभरात दोनशे घागरी पाणी घालावे लागे. त्यांनी दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले.  पुढे शिक्षण चालू राहील का? ह्या प्रश्नाची टांगती तलवार सतत डोक्यावर असायची. शिक्षकांनी तात्यारावांच्या वडिलांना, पुंडलिकरावांना आग्रह केला आणि तात्यारावांची शिक्षणाची गाडी दहावीनंतर चालू राहिली.

वैद्यकीय महाविद्यालयास प्रवेश मिळवायचा असेल तर बी.एससी.प्रथम वर्षात चांगले गुण मिळवणे क्रमप्राप्त असायचे. महाविद्यालयात हुशार मुलांची खास बॅच तयार करायचे. तात्यारावांचा चांगले गुण असूनसुद्धा त्या बॅचमध्ये समावेश झाला नाही. पण त्यांनी जिद्द सोडली नाही.

परीक्षा झाली. तात्याराव गावी आले. शेतीची कामे सुरू झाली. जून महिना उजाडला. पेरणीची कामे आटोपली आणि एक दिवस डॉ. काळे शेताकडे येताना दिसले. त्यांना येताना पाहूनच तात्यारावांना परीक्षेचा निकाल कळला.!

तात्यारावांची अभ्यास करण्याची जिद्द बळावली. मेडिकल महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा मनोदय तर होता. जुगलकिशोर कदम ह्या मित्राने सर्व खर्च सोसला. ह्या माणसाने केवळ तात्याराव ह्यांच्यावर उपकार केले नाहीत तर महाराष्ट्रातील हजारो रुग्णांवर उपचार केले असे पुढे सिद्ध झाले!

नेत्ररोगतज्ञ झाल्यावर सर्व संकटांचा नि:पात झाला असे ते म्हणत असतानाच दुदैवाचा नवा अवतार त्यांच्या समोर उभा ठाकला. डॉ. लहाने ह्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या! आयुष्याचे फक्त एक वर्षं शिल्लक आहे अशी घंटा वाजली होती.

सर्व अंधकार! प्रत्येक आठवड्यात मुंबईला येऊन डायलिसीस करावे लागे. हे खर्चिक होतेच आणि वेळेचा अपव्यय करणारे. अखेर, डॉ. लहाने ह्यांनी वरिष्ठ अधिका-यांना गळ घालून मुंबईला बदली करून घेतली. मुंबईला आल्यामुळे समस्यांचे निराकरण होणार नव्हते, पण वेळ वाचणार होता!

ह्या संकटसमयी डॉक्टरांची आई धावून पुढे आली. तिने डॉक्टरांना एक किडनी देऊ केली. ही घटना 22 फेब्रुवारी 1995 ची. डॉक्टर म्हणतात, माझ्या मातेने मला दोन वेळा जन्म दिला!

नियती निष्ठुर असते. त्यावेळी, तात्यारावांचा भाऊ, बाबुराव ह्यांनी किडनी दान करण्याची तयारी दाखवली होती. त्यांची कशीबशी समजूत काढण्यात आली. दुर्देवाने, त्यानंतर त्यांचा अकाली मृत्यू झाला!

नवजीवन प्राप्त झाल्यानंतर, गोरगरिबांची सेवा हे डॉक्टरांचे एकमेव ध्येय बनले.

मोतिबिंदूच्या शस्त्रक्रियेअभावी हजारो वृद्ध दृष्टी गमावतात. त्यानंतर त्यांच्या आयुष्याची परवड होते. ती थांबवायचे आव्हान डॉ. लहाने ह्यांनी स्वीकारले. कार्य हिमालयाएवढे आहे, ह्याची त्यांना जाणीव आहे. पण, डॉ. लहाने ह्यांचा स्वत:च्या बुद्धीवर, ज्ञानावर, कौशल्यावर, मेहनतीवर, नैपु्ण्यावर विश्वास आहे. ह्याचे प्रत्यंतर अनेक वेळा आले आहे. महाविद्यालयातील विशेष गटातील विद्यार्थ्यांपेक्षा जास्त गुण मिळवणे; मुंबईत आल्यावर इंग्रजीवर प्रभुत्व मिळवणे; मायक्रोस्कोप हाताळणे; केवळ दोन दिवस निरीक्षण करून लेझर शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणे; ही त्याची झलक.

डॉ. लहाने ह्यांचा काम करण्याचा झपाटा विलक्षण आहे. जे.जे. रुग्णालयाच्या नेत्रशल्य विभागात पूर्वी वर्षाला सहाशे शस्त्रक्रिया होत. आता, त्या पंधरा ते वीस हजार होतात.  तेथे खासगी तारांकित रुग्णालयासारख्या सुविधा मिळतातच; शिवाय, जे.जे. मधील निष्णात डॉक्टरांशी खासगी रुग्णालयातील डॉक्टरांची तुलनाच होऊ शकत नाही. डॉ. लहाने ह्यांच्या सहकारी डॉ. रागिणी पारेख ह्यासुद्धा डॉ. लहाने ह्यांप्रमाणे ध्येयवेड्या आहेत, डॉ. राहुल कुलकर्णी, डॉ. एस नटराजन ह्यांच्यासारखे डॉ. लहाने ह्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले डॉक्टर नेत्र शिबिरात डॉ. लहाने ह्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात.

जे.जे.मध्ये महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून रुग्ण येतात. शिवाय, डॉ. लहाने खेडोपाडी मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिरे घेतात. त्यांनी हजारो आदिवासींवर शस्त्रक्रिया केल्या आहेत.

‘उरण समाचार’चे संपादक श्री. अतुल पाटील आणि त्यांचे मित्र उरण परिसरात अनेक नेत्रशिबिरे आयोजित करून डॉ. लहाने ह्यांच्या कार्यात खारीचा वाटा उचलतात. अनेक व्यक्ती व संस्था ह्याप्रकारे डॉक्टरांना मदत करत असतात.

भायखळा येथील ‘आय केअर चॅरिटेबल ट्रस्ट’ ही संस्था वर्षभरात तीन-चार लाख रुपयांचा निधी जमवते. प्रत्येक वर्षाच्या डिसेंबर महिन्यात बाबा आमटेंच्या ‘आनंदवन’ येथे जातात. तेथे मोतिबिंदू शस्त्रक्रिया करतात. ‘आय केअर’ संस्थेचे हे कार्य गेली कित्येक वर्षे सुरू आहे. समाजसेवेत सातत्य राखणे महत्त्वाचे असते.

नवी जबाबदारी स्विकारताना डॉ. लहाने माझ्याशी बोलत होते “मी दोनएक महिने माझ्या नव्या जबाबदारीचा आणि कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यायचे ह्याचा अभ्यास करणार आहे” असे वाक्य बोलून, डॉ. लहाने ह्यांनी काही क्षण पॉज घेतला. मग पुढे सांगू लागले,

“कालचंच उदाहरण घ्या. मी संध्याकाळी जे.जे.च्या आवारात फेरफटका मारत होतो. एके ठिकाणी दोन सफाई कामगार कचरा पत्र्याने खरवडून काढत होते. मी त्यांना म्हटलं, “कारे बाबा, पत्रा का वापरता?”

त्यांनी ओळखले नाही. ते म्हणाले, “साहेब, आता हे लहाने डॉक्टर डीन झाले ना! त्यांना घाण अजिबात आवडत नाही. हा कचरा कित्येक दिवसांत साफ केलेला नाही. त्यामुळे हा जमिनीला घट्ट चिकटून बसलाय. तो झाडून निघत नाही. म्हणून पत्रा.”

डॉक्टरांच्या सेवाभावी, कामसू आणि कर्तव्यदक्ष स्वभावाचा प्रभाव असा आहे. त्यांना कागदी घोडे नाचवण्याची आवश्यकता नाही.

डोळ्यांच्या एक लाख तीस हजार शस्त्रक्रिया करणा-या डॉक्टरांनी ‘गिनेस बुक’मध्ये केव्हाच स्थान मिळवले आहे!

आमदार रघुनाथराव मुंडे ह्यांच्या मुलीबरोबर डॉक्टरांचा विवाह झाला. सुलोचनाबाई ह्या, झपाटलेल्या डॉक्टरांचा संसार चालवताना, ते ध्येयाची पाठ सोडणार नाहीत ह्याची दक्षता घेतात. त्यांची मुलगी सायली ही देखील डोळ्यांची डॉक्टर आहे. जावई एम.डी.आहेत. त्यांचा केइएममध्ये आणखी स्पेशलायझेशनचा अभ्यास सुरू आहे. मुलगा एमबीबीएस झाला आहे. सर्वात छोटी सपना आयएएस च्या परीक्षेची तयारी करतेय. डॉक्टरांच्या आई-वडिलांना माळेगावलाच राहणे आवडते.

डॉक्टरांना समुद्राचे आकर्षण आहे. ‘समुद्र सर्व पोटात घेतो!’ ते कधी मनात आले तर रात्री गेटवेला जाऊन कठड्यावर बसून समुद्राकडे एकटक बघत राहतात. थोड्या वेळाने छान भेळ येते. भेळ आणणा-यांच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया डॉक्टरांनीच केलेली असते.

तहानलेल्या माणसाची तहान भागवण्यासाठी पाणी तत्पर असते.  दयावंत त्या पाण्याप्रमाणे दु:खितांचे दु:ख हरण करण्यास तत्पर असतो. डॉ. लहाने ह्यांना त्या दयावंताप्रमाणे कार्य करताना जीवनाचे सार्थक झाल्याची तृप्तता मिळते.

आदिनाथ हरवंदे

About Post Author

Previous articleटायपोग्राफी डे आणि शांताराम पवार
Next articleनिगर्वी आणि निश्चयी! – दांडेकर
आदिनाथ हरवंदे हे रत्‍नागिरीच्‍या जांभारी गावचे. ते 'औद्योगिक विकास व गुंतवणूक महामंडळात' एकतीस वर्षे कामास होते. ते जनसंपर्क विभाग प्रमुख पदावरून 2002 साली निवृत्‍त झाले. त्‍यांनी महाराष्‍ट्रातील प्रमुख नियतकालिके आणि दिवाळी अंक यांमध्‍ये 1975 पासून सातत्‍याने लेखन केले. क्रीडा क्षेत्र त्‍यांच्‍या विशेष आवडीचे. क्रिकेट परीक्षणासाठी त्‍यांनी देशांतर्गत आणि देशाबाहेर अनेक दौरे केले. त्‍यांनी धावपटू, विश्‍वचषक क्रिकेटचा जल्‍लोष, कसोटी क्रिकेट ते एकदिवसीय क्रिकेट, खेलरत्‍न महेंद्रसिंग धोनी, चौसष्‍ट घरांचा बादशहा - विश्‍वनाथ आनंद अशी क्रीडासंदर्भात पुस्‍तक लिहिलेली. त्‍यात 'लालबाग' आणि 'जिगीषा' या दोन कादंब-याही आहेत. त्‍यांच्‍या लेखनास अनेक पुरस्‍कार प्राप्‍त असून त्‍यांना सचिन तेंडुलकर याच्‍या हस्‍ते 'ज्‍येष्‍ठ क्रीडा पत्रकार' हा पुरस्‍कार प्रदान करण्‍यात आला. लेखकाचा दूरध्वनी 9619845460

3 COMMENTS

  1. खुपच थोर व्यक्तीची माहीती…
    खुपच थोर व्यक्तीची माहीती आहे.. देव म्हणजे आजुन.काय? तो माणसातच असतो।

  2. ध्येय वेडा माणूस
    लाख लाख…

    ध्येय वेडा माणूस
    लाख लाख शुभेच्छा
    कोटी कोटी प्रणाम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here