एका आनंदधर्मींची आनंदवाट
राजेंद्र चव्हाण आणि त्यांच्या शालेय गटासाठीच्या आशयघन एकांकिका हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात समीकरण आहे. ‘‘माणसाच्या गोष्टीची ‘गोष्ट’’ आणि ‘पोर्णिमा’ या दोन एकांकिकांचे प्रयोग नंदू माधव या रसिक नाट्यकर्मीने परीक्षक म्हणून कणकवलीच्या नाथ पै एकांकिका स्पर्धेत बघितले. त्यांनी एकांकिकेला बक्षिस दिलेच व मुंबई-पुणे येथे २६ व २७ जानेवारी २००७ रोजी प्रयोगांचे आयोजन केले. त्यामुळे डॉक्टरांच्या कामाचे वेगळेपण बालनाट्य चळवळीतल्या ज्येष्ठांच्या, रंगकर्मींच्या लक्षात आले. हे प्रयोग मोहन वाघांनी बघितले आणि त्यांनी २००७ च्या मे महिन्यात मुंबई येथे पाच प्रयोगांचे आयोजन केले. श्रीराम लागूंच्या ‘रूपवेध’ प्रतिष्ठानने ‘तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार, २००९’ त्यांना देऊन त्यांच्या कामावर राममुद्रा उठवली.
त्यांचे शाळेतले जीवन आणि घरातले व सभोवतालचे जीवन यांत दोन ध्रुवांइतके अंतर होते. झोपडपट्टीतले दादा, दारूविक्री करणारी लहान मुले, रात्रभर चालणारे कॅरमचे डाव, नव-यांची अनन्वित हिंसा सहन करणार्या बायका हे सगळे जीवन डॉक्टर सभोवताली बघत होते आणि शाळा व नंतर वैद्यकीय महाविद्यालयातल्या जीवनात साहित्य-कला-नाटक यांमधून माणुसकीने जगण्याचे शिकत होते.
डॉक्टरांनी एम.बी.बी.एस. झाल्यानंतर मुंबईत न राहता किंवा जन्मगाव किरोलीजवळचा भाग न निवडता सिंधुदुर्ग जिल्ह्याची निवड केली. त्यातले एक कारण होते सिंधुदुर्ग जिल्ह्याची रसिकता आणि कलासक्ती. डॉक्टरांना जशी स्वत:ची नैतिक मूल्ये पाळून वैद्यकीय सेवा द्यायची होती तशीच रंगभूमीवर काहीतरी करून बघायची ऊर्मी होती. डॉक्टर शिरगावला आल्यावर तिथली प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळा यांच्या संपर्कात आले. डॉक्टरांची मुलांच्यात मूल होऊन त्यांच्याशी गप्पा मारताना, त्यांना गोष्टी सांगताना, त्यांचे अनुभव ऐकताना, चित्रे काढून देताना मुलांशी छान गट्टी जमली. शिरगावमधल्या पालकांनाही त्यांची मुले डॉक्टरांच्या सहवासात आहेत म्हणजे निर्धास्त वाटू लागले. एकत्र आलेल्या अशा त्या सगळ्यांनाच काही निर्मिती करावी, सृजनसाहस करावे असे वाटू लागले.
राजेंद्र चव्हाण मुंबईत वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असल्यापासून, कणकवलीच्या प्रतिष्ठित ‘नाथ पै एकांकिका स्पर्धे’बद्दल ऐकून होते. शिरगावपासून तर कणकवली पंचवीस किलोमीटरवर. त्यामुळे डॉक्टर व त्यांचा शिरगाव मित्र परिवार यांनी शिरगावात मुलांबरोबर ते करत असलेले काम या एकांकिका स्पर्धेच्या निमित्ताने लोकांसमोर आणता येईल असा विचार केला. त्याचीच परिणती म्हणून ‘शिरगाव फ्रेंड सर्कल’ व ‘शिरगाव हायस्कूल’च्या संघाने ‘नाथ पै स्पर्धे’च्या बालएकांकिका गटात सहभाग घेतला. डॉक्टरांचा उत्साह आणि ऊर्जा यांच्या संसर्गाची बाधा सगळ्यांना झाली आणि शिरगावची मुले एकांकिका स्पर्धेत तृतीय पारितोषिकाची मानकरी ठरली. डॉक्टरांची मुलगी रूपाली हिला तर ‘मुक्ताई’च्या भूमिकेसाठी पहिले पारितोषिक मिळाले. रात्री दोन वाजता सादर झालेल्या त्या प्रयोगाला इतक्या उशिराही शंभर-सव्वाशे कणकवलीकर रसिक प्रेक्षक उपस्थित होते. पारितोषिक वितरणाच्या वेळी परीक्षक कै. उदय खानोलकर रूपालीच्या अभिनयाबद्दल भरभरून बोलले.
राजेंद्र चव्हाण आणि त्यांच्या शिरगाव संघाचा १९९१ मध्ये सुरू झालेला हा प्रवास आजही सुरू आहे. ‘बॅ.नाथ पै एकांकिका स्पर्धे’च्या बालगटात शिरगावची एकांकिका असणे आणि प्रेक्षकांनी ती बघण्यासाठी आवर्जून थांबणे हे प्रतिष्ठेचा विषय झाले आहेत. डॉक्टर आधी एकांकिका लिहून मग ती मुलांबरोबर बसवत असत. तेव्हा त्यांच्या प्रतिभेचा उमाळा इतका जबरदस्त असायचा, की ते संपूर्ण एकांकिका एका झपाट्यात लिहून पुरी करत. डॉक्टरांनी काही वर्षांनी मात्र, नवीनच पद्धत अंमलात आणली. त्यांनी मुलांशी चर्चा करत, त्यांना विषय देत, त्यांच्या सूचना समजावून घेत, त्यांच्याकडून उत्स्फूर्त संवाद घेऊन एकांकिका लिहायला सुरुवात केली. अशा प्रकारे एखाद्या नाट्यबीजाचा विकास करत एकांकिका लिहिणे आणि सादर करणे आव्हानात्मक असते. डॉक्टरांना, त्यांच्या सहकार्यांना आणि काम करणार्या मुला-मुलींना सुरुवाती सुरुवातीला एकांकिका कोणते रूप घेणार याची कल्पना नसते. धुक्यातून वाट काढत जावे आणि ती वाट एका नयनरम्य स्थळी पोचावी तसे विलोभनीय नाट्य असते. प्रक्रियेत सगळेच सहभागी असल्यामुळे सगळी प्रक्रिया, त्यातले संवाद, पात्रांचा वावर हा नैसर्गिक असतो; कारागिरी अल्प असते, ती फक्त तांत्रिक अंगांसाठी. बाकी सगळे झुळझुळत्या झ-याप्रमाणे.
डॉक्टरांनी ‘अकरावा अवतार’ अशी एकांकिका लिहून ती खुल्या गटात एकदा सादर केली. पण मोठ्यांच्या नाटकात डॉक्टर रमले नाहीत. त्यांच्याच ‘ले चल गोकुलगाव’ या एकांकिकेत मोठ्या माणसांची कामे मोठ्या माणसांनी आणि लहानांची कामे लहानांनी करून त्यांनी काही प्रयोग केले. पण ती उदाहरणे अपवादात्मक. इतकी वर्षे इतके आशयघन, अर्थपूर्ण काम करूनही त्यांची त्या मानाने दखल घेतली गेली नाही याचे किंचितसे शल्य ड़ॉक्टरांना आहे. त्यांना समीक्षकांनी बालनाट्यात आशयाच्या दृष्टीने कधी पाहिले नाही असाही सल आहे. त्यांचे वाचन चांगले असल्याने मराठीतले निवडक साहित्य त्यांतल्या नाट्याच्या शक्यतांसह त्यांना खुणावत असते.
राजेंद्र चव्हाण हे नाव इतकी वर्षे काम केल्यावरही मुंबई-पुण्याच्या अभिजनांना अपरिचित आहे. ‘किती काळ मी स्वत:ला प्रूव्ह करत राहायचे?’ अशी एक व्यथाही डॉक्टरांना अस्वस्थ करते. अर्थात डॉक्टर अशा अस्वस्थतांनी फार काळ निराश होत नाहीत. ते आपली आनंदवाट ‘एकला चलो रे’ सारखे शिरगावची मुले, पालक, तिथले शिक्षक यांच्यासोबत पुन्हा चालू लागतात. ते त्यांच्या यशात मुलांबरोबरच त्यांचे पालक आणि शिक्षक यांची समर्थ आणि समजुतदार साथ नसती तर एवढे काम त्यांच्या हातून झाले नसते हेही जाणतात.
डॉक्टरांचा नवनवीन गोष्टी शिकण्याकडे कल असतो. एकदा त्यांनी चक्क केस कसे कापावेत हेच शिकून घेतले आणि तेव्हापासून ते आपल्या मुलांचे केस घरीच कापू लागले. ब-याच वेळा ते वसतिगृहातील विद्यार्थ्यांचेही केस कापत असत. विद्यार्थी हॉस्पिटलमध्ये अभ्यासातील अडचणी सोडवण्यासाठी येत असत. काही विद्यार्थ्यांनी हॉस्पिटलला भेट दिली असता त्यांनी विचारले, ‘‘काय काम आहे रे?’’ विद्यार्थी म्हणाले, ‘‘डॉक्टरकाका, केस कापायचे आहेत!’’ असे काही गमतीदार अनुभवही डॉक्टरांना येत असतात. ‘वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान’कडून 2012 च्या एप्रिल महिन्यात आयोजित करण्यात आलेले कला शिबिर डॉक्टरांकडून घेण्यात आले. ते संपल्यानंतर असा उपक्रम कायमस्वरूपी सुरू ठेवण्याची मागणी विद्यार्थी-पालकांकडून होऊ लागली आहे. डॉक्टरांनाही शिबिरातून आपल्याला अनेक गोष्टी शिकता येतील असे वाटले आणि ‘सृजनाच्या वाटा’ या शिबिराची सुरूवात झाली. प्रतिष्ठानच्या कणकवली येथील सभागृहात दर शनिवारी सायंकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत डॉक्टरांकडून हे शिबिर घेण्यात येते. या शिबिरात सध्या पस्तीस मुले सहभागी होतात. या शिबिरात मातीकामापासून अभिनय करणे, गाणी रचणे, त्यांना चाली लावणे, विषय देऊन त्यावर मुलांकडून लेखन करवून घेणे, चित्रे काढणे, नृत्ये करणे, मुलांशी गप्पा मारणे अशी धमाल-मस्ती सुरू असते.
डॉक्टरांचा दिनक्रम व्यस्त असला तरी सायंकाळी सातनंतर त्यांच्याजवळ मोकळा वेळ असतो. मग ते मालन वहिनींबरोबर आजुबाजूच्या परिसरात फिरायला जातात, स्वत:चा ब्लॉग लिहितात, अजय कांडरसारख्या कविमित्राच्या ‘आवानओल’मधल्या कवितांची रेखाटने करतात, गाणी रचतात, त्यांना चाली लावतात आणि गणित हा आवडीचा विषय असल्याने दहावी-बारावीच्या गणिताच्या प्रश्नपत्रिकाही छंद म्हणून सोडवतात! हा माणूस रोजच्या जीवनात साधा आणि निगर्वी असतो. एका पिसाने मोर म्हणून मिरवणार्या जगात हा रंगीबेरंगी पिसार्यांचा मालक आपल्या जगण्यातला आनंद अतिशय साधेपणाने, समाधानाने घेत असतो आणि भोवतालच्यांना देत असतो.
डॉ. राजेंद्र चव्हाण,
मु.पो. शिरगाव, ता. देवगड,
जि. सिंधुदुर्ग पिनकोड – 416610
9767023593, 02364-236256
rajendra.chavan60@gmail.com
www.rajendrachavan60.blogspot.com
www.kavitetoon.blogspot.com
– प्रसाद घाणेकर
मी शिरगाव ग्रामपंचायती मध्ये
मी शिरगाव ग्रामपंचायतीमध्ये ग्रामविकास अधिकारी (1994 ते 2001) असताना देवगड पंचायत समितीच्या वतीने ओरोस येथील प्रदर्शनात शिरगावच्या ग्रामपंचायतीच्या वतीने शिरगाव हायस्कूलच्या मुलांना घेवून शोभायात्रेत दृश्य सादर करण्यात आले होते. आमचे त्या कलाकृतीने तेव्हा तालुक्याचे नेतृत्व केलेले होते. तेव्हाच्या सादरीकरणाला वाहवा मिळून तालुक्यात नाव झाले. खरोखरच, डाॅक्टरांची कामगिरी सुंदर, प्रेमळ, मनमिळाऊ, सरस, निर्गरवी, प्रबोधनपर आणि समाजप्रिय आहे. डाॅक्टर सरांची व माझी त्यावेळी खूप चांगली दोस्ती झाली होती. मला प्रमोशन मिळून मी ओरोस-मालवण येथे आल्यानंतर माझा आणि त्यांचा संपर्क नाही. त्यांच्या विषयीचा हा लेख खरोखरच खूप समर्पक व वास्तवपूर्ण आहे. मी या विचारांशी सहमत आहे. (9422379849).
Comments are closed.