मी प्रत्येक शनिवारी संध्याकाळी ७ ते ८ च्या दरम्यान कुतूहलाने ते सर्व पाहात असायचो. असे बरेच दिवस चालले होते. एक दिवस, माझ्यापेक्षा थोडी मोठी मुले पुस्तके नेण्यासाठी आली होती. मी त्यांपैकी एकाच्या हातातील जाड पुठ्ठा घातलेले, जुने-मळकट असलेले ‘चतुर बिरबल’ हे पुस्तक पाहिले व ते बघण्यासाठी त्याच्याकडून माझ्या हातात घेतले. मुले बोलत-गप्पा मारत असताना, मी त्यातील एक-दोन गोष्टी वाचूनदेखील काढल्या. मला आनंद झाला. मीही त्या वाचनालयाचा सभासद झालो. चार-पाच महिन्यांत पंधरा-वीस पुस्तके वाचून काढली. मला खूप आनंद झाला. माहिती, ज्ञान, करमणूक यांमुळे मला शाळेत बोलायला यायला लागले. मग शिक्षक मलाच शाळेत बातम्यांचे मोठ्याने वाचन करण्यासाठी पुढे करत.
आम्हाला आठवीपासून पुढील शिक्षणासाठी वडगाव विद्यालय, वडगाव हे दहा किलोमीटर एवढे अंतर एस.टी.ने जावे लागे. त्यावेळी वाचन कमी झाले. दहावीनंतर कोल्हापूर आय.टी.आय.येथे दोन वर्षे गेली. त्यावेळी सुध्दा मला त्या मंदिराची व वाचनालयाची ओढ, आकर्षण कायम होते. परंतु मी अभ्यास आणि इतर छंद , कुस्ती व क्रिकेट यांमुळे वाचनापासून दुरावत चाललो आहे याची खंत मला सतत बोचत असे. मी १९८६ मध्ये आय.टी.आय.ची परीक्षा दिल्यानंतर मला नोकरी लागेपर्यंत दोन महिन्यांच्या कालावधीत घरातील व गुरे चारण्याची कामे करावी लागली. त्यावेळी मी पुन्हा वाचनाशी जोडला गेलो व नोकरी मिळाल्यानंतर १९८६ ला माझे वाचन पुन्हा जोमात चालू झाले.
आमच्या गावचे डॉक्टर एस.डी.रेठरेकर व्यवसायासाठी बाहेरगावी स्थायिक झाले होते. माझी त्यांची योगायोगाने भेट झाली. ते बोलके असल्याने त्यांनी मला बोलते करायचा अवकाश, की आमची तासन् तास धर्म, सत्य, विद्वानांच्या जीवनातील प्रसंग यांबद्दल चर्चा व्हायची. ते गावी आल्यानंतर एक-दोन दिवस राहिले, की आम्ही दोघेच गावाकडचा नदीकाठ, महादेव मंदिर येथे बोलत बसायचो. तेही मला माझ्यातील सत्त्वगुण पाहून प्रोत्साहन द्यायचे.
तसेच, माझे गावातील ‘जयोस्तुते तरुण मंडळा’चे संस्थापक श्री विठ्ठल चोपदार यांच्याशी बोलणे होई. त्यांनीही मला काही पुस्तके वाचायला दिली. मी ती मन लावून, समजेस्तोवर पुन:पुन्हा वाचायचो.
स्वामी विवेकानंद जयंतीला जे व्याख्याते आले होते ते जे.डी.राऊतसर वडगाव विद्यालयात माझे इंग्रजी विषयाचे शिक्षक होते. ते ओळख विसरले होते, पण मी त्यांना विसरलो नव्हतो. त्यांची कोल्हापूरत एका व्याख्यानाच्या वेळी भेट झाली. मी त्यांना भेटलो. मी माझी पूर्वीची ओळख त्यांना पुन्हा करून दिली. ते माझे बोलणे ऐकून उत्साहित झाले. त्यांनी मला कोल्हापूर,पांजरपोळ येथील श्रीरामकृष्ण-विवेकानंद आध्यात्मिक सेवा केंद्र येथे येण्यास सांगितले. मी एका शनिवारी कामावरून सुटल्यानंतर तेथे गेलो. त्यांचे प्रवचन, प्रवचनातील सत्संगाचे महत्त्व, परमेश्वर प्राप्तीसाठीचे आवश्यक सद्गुण, चिकाटी यांबद्दल विविध महापुरुषांच्या जीवनचरित्रातील प्रसंग हे ऐकून माझ्यामध्ये माझ्या जीवनाच्या शोधाची महत्त्वाकांक्षा तीव्र स्वरूपात जागृत झाली. त्यासाठी मी मला जमेल तसे प्रार्थना, जप, ध्यान, एकांत, सत्संग करत होतो. त्यामध्ये बरेच चांगले मित्र मला मिळत राहिले- मीही आमच्या गावात माझे मित्र-चंद्रकांत जाधव, संजय पाटील, माणिक पाटील, विठ्ठल चोपदार यांच्या सहकार्याने गावातील यात्रेत, हरिनाम सप्ताहामध्ये श्रीरामकृष्ण-विवेकानंद भावधारेचे साहित्य ग्रंथप्रदर्शन मांडून विक्री करू लागलो. त्यामुळे गावात त्या पुस्तकांची विक्री होऊ लागली. मला त्या कामाचा अतिशय आनंद मिळत होता.
आम्ही तिघे भाऊ असल्याने छोट्या घरात कुटुंब मोठे होत होते. घरी अडचण होऊ लागली. आम्ही तिघेही भाऊ ‘मनुग्राफ इंडस्ट्रीज’मध्ये कामाला होतो, घरी पैसा येत असल्याने तिघांना पुरेल एवढे घर शेतात बांधायचे ठरले. तीन वर्षांत घर टप्प्या टप्प्याने बांधून झाले. कोणतेही बाहेरचे कर्ज घेतले नव्हते. शेतात घर बांधले त्या ठिकाणी १९८९ ला महापूर आला. महापूराने संपूर्ण गावाला पाण्याने वेढले होते. त्यामुळे पूररेषेतील आम्हा लोकांना ‘रोळ’ या परिसरात नवीन प्लॉट देऊन तेथे नवीन वसाहत (पूरग्रस्त) स्थापन झाली. त्याचे श्रीरामनगर असे नामकरणही करण्यात आले.
मी १८ फेब्रुवारी १९९८ ला दुपारी दोन वाजता घरी आलो, हातपाय धुतले, घरातील देवघरात कोपर्यात बसलो. शंभर पानी वही घेतली. ‘श्री गणेशाय नम:’ रेखाटले आणि श्रीरामकृष्ण-विवेकानंद आध्यत्मिक सेवा केंद्र वहीवरती रेखाटून, त्या दिवसाअखेर माझ्या संग्रहात असलेली सर्व पुस्तके त्या वहीत क्रमश: उतरली. पाच मिनिटे ध्यान केले आणि उठलो. घरी सर्वांना बेलूर मठाहून आणलेला प्रसाद वाटला. संस्थेच्या नावाचा शिक्का तयार केला. राहत्या घराच्या गॅलरीवर बोर्ड लिहिला. एकशेसतरा पुस्तके संग्रहात होती, त्यांवर शिक्के मारले. कामाला सुरुवात झाली. काही ग्रामस्थ पुस्तके घरी वाचायला नेऊ लागले. मी ज्या कंपनीत काम करत होतो, तेथील कामगारांना पुस्तके पोच देत होतो. पुस्तके देवघेवीच्या कामातून चांगले मित्र मिळत होते. काहीजण चांगल्या उपक्रमाबद्दल स्तुती करत होते. काम करत असल्याचा आनंद सात्त्विक होता. चार-पाच महिने गेले. विवेकानंद युवकांना कळावेत-समजावेत असे वाटत होते. काय करायचे हा प्रश्न पडला… जवळच्या शिये हायस्कूल ज्युनियर कॉलेजमध्ये जाण्याचे ठरवले. मुख्याध्यापकांच्या नावे १५ ऑगस्ट १९९८च्या स्वातंत्र्यदिनानिमित्त कॉलेज मुलांच्या वक्तृत्व स्पर्धा घेण्यात याव्यात, आयोजनामध्ये सहकार्य मिळावे असे पत्र लिहिले व स्पर्धेचे विषय दिले. पहिल्याच स्पर्धेस कॉलेजच्या मुलांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. बक्षिसांपोटी शालेय साहित्य वाटप (वह्या) केले. उपक्रमाचे कौतुक झाले. एका शिक्षकांनी (भोसलेसर) ‘स्वामी विवेकानंद-आजची गरज’ या उपक्रमाबद्दल मला जवळ घेऊन माझे आनंदाने कौतुक केले. सहकार्याचे आश्वासन दिले. मनाला जाणवले, ‘जेथे जातो तेथे तू माझा सांगाती’.
महाराष्ट्रात असणार्या आदर्श ग्रामीण ग्रंथालयाहून चांगले काम करायचे, आपले ग्रंथालय ग्रामीण ग्रंथालयांचे तीर्थक्षेत्र बनवायचे असे स्वप्न मनी फुलले. ग्रंथालय दिवसेंदिवस वृद्धिंगत होत होते. ग्रामपंचायतीकडे दोन गुंठे जागेची मागणी केली. ना हरकत ठराव चार महिन्यांनी मिळाला. परंतु त्यांनी बांधकामास परवानगी देण्यास नकार दिला. तुम्ही रीतसर जागा मिळवा मगच बांधकाम करा. पुढे तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याकडे विविध प्रकारची कागदपत्रे, विनवण्या, मागण्या यांची पूर्तता करत साडेचार वर्षांनी नियमाने जागा ताब्यात आली. इमारत बांधणीसाठी फंड मिळण्याचे काम अतिदुर्लभ वाटू लागले. लोकप्रतिनिधींना भेटलो. तत्कालीन आमदारांच्या कार्यालयाचे दरवाजे, कधी मी स्वत: तर कधी मित्रांना घेऊन किमान साठ ते सत्तर वेळा चार वर्षांत ठोठावले. आश्वासने मिळत होती. शेवटी, एक दिवस दीड लाख रुपये इमारतीसाठी निधीचे पत्र मिळाले. भूमिपूजन व नारळ फुटला. नंतर पंधरा दिवसांत २०१० साली विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली. खूप आटापीटा केला. तत्कालीन आमदारांना भेटीगाठी केल्या. ‘करूया’ एवढेच फक्त आश्वासन! शेवटी त्यांच्या कार्यालयाकडे जाणे बंद केले, कारण ते दुसर्या मतदारसंघातून निवडून आले होते. आमच्या मतदारसंघातून दुसरे नवीन आमदार निवडून आले. त्यांना गेली दोन वर्षे वाचनालय इमारत बांधून मिळावी म्हणून विनंती अर्ज केला आहे. त्याच्या ऑफिसला किमान बारा हेलपाटे घातले आहेत. परंतु अडीच वर्षांपूर्वी राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान ला १०४ पानी इंग्रजीमध्ये वीस हजार रुपये खर्चून प्रस्ताव पाठवला होता. त्याचे फलित एप्रिल २०१२ रोजी २,२२,००० रुपयांचा चेक इमारत निधीसाठी आला. २२’ X ३३’ इमारतीचा आराखडा, त्याचा सध्याचा खर्च आहे जवळपास तीस लाख रुपये. त्यांच्याकडून तीन टप्प्यांत(राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकात्ता) ४,४२,००० रुपये मिळणार आहेत. उर्वरित साडेपाच लाख रुपये लोकवर्गणी जमा करणार आहोत. पहिल्या टप्प्याचा खर्च दहा लाख रुपये आहे. स्वत:चे एक लाख रुपये सुरुवातीला घालून काम चालू झालेले आहे. उपलब्ध बजेटमधून फाऊंडेशन व कॉलमपर्यंतचे काम पूर्ण करण्यात आले असून हाती असलेला पैसा आता संपलेला आहे.
काही ज्येष्ठ मंडळी, उद्योग-व्यवसायिक (शिरोली, एम. आय. डी. सी.परिसर) यांनी पाच हजारांपासून पुढे चांगले सहकार्याचे आश्वासन दिले आहे. उर्वरित रकमेसाठी चिंतन, शोध, संकल्प, प्रयत्नांचा प्रवास चालू आहे…
लक्ष्मण पांडुरंग कदम
श्रीरामकृष्ण विवेकानंद वाचनालय
शैक्षणिक आणि सांस्कृतिक सेवा केंद्र
मु.पो. शिये, ता. करवीर, जि. कोल्हापूर
पिनकोड ४१६ १२२
९१७७५५१९३९३
खुप छान
खूप छान.
Comments are closed.