डॉक्‍टर राजेंद्र चव्‍हाण

1
101
carasole1

एका आनंदधर्मींची आनंदवाट

पत्नी मालनसोबत डॉ. राजेंद्र चव्हाणांचा एक ‘नाट्य’पूर्ण क्षण‘तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार’ शिरगावच्या डॉक्टर राजेंद्र चव्हाण यांना मिळाला आणि मन अभिमानाने भरून आले. राजेंद्र चव्हाण हा रंगवर्ती गेली दोन दशके देवगड तालुक्यातल्या शिरगाव या छोट्याशा गावात तिथल्या मुलांना घेऊन एकांकिका करत आहे. कणकवलीत होणार्‍या आणि राज्यभरात प्रतिष्ठेच्या असलेल्या बॅ. नाथ पै एकांकिका स्पर्धेतल्या बालगटाची पारितोषिके जणू डॉक्टरांची वाट बघत असतात!

राजेंद्र चव्हाण आणि त्यांच्या शालेय गटासाठीच्या आशयघन एकांकिका हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात समीकरण आहे. ‘‘माणसाच्या गोष्टीची ‘गोष्ट’’ आणि ‘पोर्णिमा’ या दोन एकांकिकांचे प्रयोग नंदू माधव या रसिक नाट्यकर्मीने परीक्षक म्हणून कणकवलीच्या नाथ पै एकांकिका स्पर्धेत बघितले. त्यांनी एकांकिकेला बक्षिस दिलेच व मुंबई-पुणे येथे २६ व २७ जानेवारी २००७ रोजी प्रयोगांचे आयोजन केले. त्यामुळे डॉक्टरांच्या कामाचे वेगळेपण बालनाट्य चळवळीतल्या ज्येष्ठांच्या, रंगकर्मींच्या लक्षात आले. हे प्रयोग मोहन वाघांनी बघितले आणि त्यांनी २००७ च्या मे महिन्यात मुंबई येथे पाच प्रयोगांचे आयोजन केले. श्रीराम लागूंच्या ‘रूपवेध’ प्रतिष्ठानने ‘तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार, २००९’ त्यांना देऊन त्यांच्या कामावर राममुद्रा उठवली.

रामदास भटकळ यांच्या हस्ते ‘तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार, २००९’ स्वीकारताना. उजवीकडे ज्येष्ठ अभिनेते श्रीराम आणि दीपा लागूराजेंद्र चव्हाण यांना रंगभूमीचे आकर्षण लहानपणापासूनचे. त्यांचे किरोली हे सातारा जिल्ह्याच्या कोरेगाव तालुक्यातले गाव. घर गावच्या चावडीजवळ. त्यामुळे डॉक्टरांना चावडीजवळच्या देवळातल्या कीर्तन-हरिपाठापासून ते देवळाच्या प्रांगणातल्या तमाशा-नाटकांपर्यंतच्या करमणुकीच्या सगळ्या कार्यक्रमांत सहभाग घेता आला. त्यांची आजी नकला करायची – गोष्टी सांगायची. विशेष म्हणजे शाळेतले सगळे शिक्षक राजेंद्रवर माया करायचे. लहान राजेंद्रच्या पायांना चिखल लागू नये, तो पडू नये म्हणून त्याला पावसाच्या दिवसांत खांद्यावर बसवून नेणारे शिक्षकही त्यांना लाभले. गणित-विज्ञान या विषयांबरोबरच चित्रकलेचेही उत्तम अंग असलेले पंडित गुरूजी त्यांना भेटले. राजेंद्रना नाटकात काम करायची सवय लागली आणि ती पुढे वाढतच गेली. ते आठवीपासूनच्या शिक्षणासाठी मुंबईतल्या रामटेक़डी (शिवडी) वस्तीत आले. ते राहणे झोपडपट्टीतले. डॉक्टरांनी त्या वस्तीत जीवनाची भीषण रूपे पाहिली. पण डॉक्टर सोशल सर्व्हिस लीगच्या परळ हायस्कूलमध्ये मनापासून रमले. तेथेही त्यांना पालकांसारखे प्रेम करणारा शिक्षकवर्ग लाभला. प्राथमिक शाळेपासूनच्या अशा प्रेमळ गुरुजनांमुळेच डॉक्टरांच्या एकांकिकांतले सर किंवा मॅडम प्रेमळ, समजूतदार आणि विद्यार्थ्याला स्वतंत्र निर्णयाचे स्वातंत्र्य देणारे असतात.

त्यांचे शाळेतले जीवन आणि घरातले व सभोवतालचे जीवन यांत दोन ध्रुवांइतके अंतर होते. झोपडपट्टीतले दादा, दारूविक्री करणारी लहान मुले, रात्रभर चालणारे कॅरमचे डाव, नव-यांची अनन्वित हिंसा सहन करणार्‍या बायका हे सगळे जीवन डॉक्टर सभोवताली बघत होते आणि शाळा व नंतर वैद्यकीय महाविद्यालयातल्या जीवनात साहित्य-कला-नाटक यांमधून माणुसकीने जगण्याचे शिकत होते.

डॉक्टरांनी एम.बी.बी.एस. झाल्यानंतर मुंबईत न राहता किंवा जन्मगाव किरोलीजवळचा भाग न निवडता सिंधुदुर्ग जिल्ह्याची निवड केली. त्यातले एक कारण होते सिंधुदुर्ग जिल्ह्याची रसिकता आणि कलासक्ती. डॉक्टरांना जशी स्वत:ची नैतिक मूल्ये पाळून वैद्यकीय सेवा द्यायची होती तशीच रंगभूमीवर काहीतरी करून बघायची ऊर्मी होती. डॉक्टर शिरगावला आल्यावर तिथली प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळा यांच्या संपर्कात आले. डॉक्टरांची मुलांच्यात मूल होऊन त्यांच्याशी गप्पा मारताना, त्यांना गोष्टी सांगताना, त्यांचे अनुभव ऐकताना, चित्रे काढून देताना मुलांशी छान गट्टी जमली. शिरगावमधल्या पालकांनाही त्यांची मुले डॉक्टरांच्या सहवासात आहेत म्हणजे निर्धास्त वाटू लागले. एकत्र आलेल्या अशा त्या सगळ्यांनाच काही निर्मिती करावी, सृजनसाहस करावे असे वाटू लागले.

राजेंद्र चव्हाण मुंबईत वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असल्यापासून, कणकवलीच्या प्रतिष्ठित ‘नाथ पै एकांकिका स्पर्धे’बद्दल ऐकून होते. शिरगावपासून तर कणकवली पंचवीस किलोमीटरवर. त्यामुळे डॉक्टर व त्यांचा शिरगाव मित्र परिवार यांनी शिरगावात मुलांबरोबर ते करत असलेले काम या एकांकिका स्पर्धेच्या निमित्ताने लोकांसमोर आणता येईल असा विचार केला. त्‍याचीच परिणती म्हणून ‘शिरगाव फ्रेंड सर्कल’ व ‘शिरगाव हायस्कूल’च्या संघाने ‘नाथ पै स्पर्धे’च्या बालएकांकिका गटात सहभाग घेतला. डॉक्टरांचा उत्साह आणि ऊर्जा यांच्या संसर्गाची बाधा सगळ्यांना झाली आणि शिरगावची मुले एकांकिका स्पर्धेत तृतीय पारितोषिकाची मानकरी ठरली. डॉक्टरांची मुलगी रूपाली हिला तर ‘मुक्ताई’च्या भूमिकेसाठी पहिले पारितोषिक मिळाले. रात्री दोन वाजता सादर झालेल्या त्या प्रयोगाला इतक्या उशिराही शंभर-सव्वाशे कणकवलीकर रसिक प्रेक्षक उपस्थित होते. पारितोषिक वितरणाच्या वेळी परीक्षक कै. उदय खानोलकर रूपालीच्या अभिनयाबद्दल भरभरून बोलले.

राजेंद्र चव्हाण आणि त्यांच्या शिरगाव संघाचा १९९१ मध्ये सुरू झालेला हा प्रवास आजही सुरू आहे. ‘बॅ.नाथ पै एकांकिका स्पर्धे’च्या बालगटात शिरगावची एकांकिका असणे आणि प्रेक्षकांनी ती बघण्यासाठी आवर्जून थांबणे हे प्रतिष्ठेचा विषय झाले आहेत. डॉक्टर आधी एकांकिका लिहून मग ती मुलांबरोबर बसवत असत. तेव्हा त्यांच्या प्रतिभेचा उमाळा इतका जबरदस्त असायचा, की ते संपूर्ण एकांकिका एका झपाट्यात लिहून पुरी करत. डॉक्टरांनी काही वर्षांनी मात्र, नवीनच पद्धत अंमलात आणली. त्यांनी मुलांशी चर्चा करत, त्यांना विषय देत, त्यांच्या सूचना समजावून घेत, त्यांच्याकडून उत्स्फूर्त संवाद घेऊन एकांकिका लिहायला सुरुवात केली. अशा प्रकारे एखाद्या नाट्यबीजाचा विकास करत एकांकिका लिहिणे आणि सादर करणे आव्हानात्मक असते. डॉक्टरांना, त्यांच्या सहकार्‍यांना आणि काम करणार्‍या मुला-मुलींना सुरुवाती सुरुवातीला एकांकिका कोणते रूप घेणार याची कल्पना नसते. धुक्यातून वाट काढत जावे आणि ती वाट एका नयनरम्य स्थळी पोचावी तसे विलोभनीय नाट्य असते. प्रक्रियेत सगळेच सहभागी असल्यामुळे सगळी प्रक्रिया, त्यातले संवाद, पात्रांचा वावर हा नैसर्गिक असतो; कारागिरी अल्प असते, ती फक्त तांत्रिक अंगांसाठी. बाकी सगळे झुळझुळत्या झ-याप्रमाणे.

शिरगावची नाटक मंडळीग्रामीण जीवन आणि समस्‍यांवर प्रकाश टाकण्‍यासाठी राजेंद्र चव्‍हाण यांनी ‘नवे नवे आकाश हवे’, ‘आयंता’, ‘फास्‍ट फॉरवर्ड’, ‘पौर्णिमा’, ‘माणसाच्‍या गोष्‍टीची गोष्‍ट’ अशी अनेक नाटके लिहीली आहेत. राजेंद्र चव्‍हाण यांनी मुलांची निरागसता म्‍हणजे काय, आजूबाजूच्‍या वास्‍तवाशी ती कशी रिअॅक्‍ट होतात, त्‍यांच्‍यावर संस्‍कार कसे करता येऊ शकतात, मुलांच्‍या कल्‍पनाशक्‍तीची झेप कुठवर जाऊ शकते, त्‍यातून नवसृजन कसं घडू शकतं याचा उहापोह ‘पौर्णिमा’ आणि ‘माणसाच्‍या गोष्‍टीची गोष्‍ट’ या बालनाट्यांमधून केला आहे. ‘आयंता आणि इतर एकांकिका’ या त्‍यांच्‍या पुस्‍तकाला 2000 सालचा राज्‍यशासनाचा पुरस्‍कार मिळाला आहे. ‘राजेंद्र स्कूल’च्या एकांकिका कणकवलीकर रसिक आणि सिंधुदुर्गातही अनेकजण मनापासून बघतात, त्यांचा आनंद घेतात आणि समृद्ध होतात. डॉक्टरांच्या बालनाट्यांचे सगळ्यांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातला आशय. मनोरंजन, तंत्र, स्पर्धेत यशस्वी होण्यासाठीच्या गिमिक्स असल्या उधार-उसनवारीचा संपूर्ण अभाव. आशय केंद्रस्थानी ठेवून नाट्यरचना केली जाते. डॉक्टरांनी गेल्या वीस वर्षांत किती विविध विषय या एकांकिकांमधून हाताळले आहेत! पर्यावरण, दूरचित्रवाणीचे आक्रमण, विज्ञाननिष्ठा, निसर्गाशी बांधिलकी, कुटुंबातले स्नेहसंबंध… आणि हे सगळे सकारात्मक पद्धतीने, उपदेशाचा आव न आणता; दोन वर्षांपूर्वी तर, त्यांनी सिंधुदुर्गातली भटकी जमात कातकरी (वानरमार जमात) आणि त्यांच्या जीवनाचा व मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न संवेदनशीलतेने ‘धनू’ एकांकिकेतून हाताळला आणि नवल हे, की एकांकिकेतल्या प्रमुख भूमिकेत कातकरी मुलेच होती. डॉक्टरांच्या एकांकिकेत खलभूमिका नसतात. कुठलीच व्यक्ती वाईट नसते. तिचे वर्तन त्या-त्या परिस्थितीत चुकत असेल, पण व्यक्ती मूलत: खलप्रवृत्ती नसते यावर डॉक्टरांचा ठाम विश्वास आहे. आई-वडिलांच्या नैतिक मूल्ये जपण्याच्या संस्कारांमुळे डॉक्टर त्यांची साधनशुचिता, विवेक, माणुसकी जपू शकले. त्याचे प्रतिबिंब त्यांच्या लेखनातून दिसते.

मुलांसोबत संवाद‘‘नाटकातून मलाच स्‍वतःला तपासता येतं. काही प्रश्‍न समाजाला विचारता येतात. मुख्‍यतः ज्‍यांचे प्रश्‍न नाटकातून मांडतो, त्‍याच वर्गातील मुले नाटकात काम करत असल्‍याने त्‍यांना वेगळा अभिनय करावाच लागत नाही. त्‍यांचं जगणंच नाटक होऊन जातं. तेही ‘ममतेपासून समतेपर्यंत’ जाणारं – डॉ. राजेंद्र चव्‍हाण

 

डॉक्टरांनी ‘अकरावा अवतार’ अशी एकांकिका लिहून ती खुल्या गटात एकदा सादर केली. पण मोठ्यांच्या नाटकात डॉक्टर रमले नाहीत. त्यांच्याच ‘ले चल गोकुलगाव’ या एकांकिकेत मोठ्या माणसांची कामे मोठ्या माणसांनी आणि लहानांची कामे लहानांनी करून त्यांनी काही प्रयोग केले. पण ती उदाहरणे अपवादात्मक. इतकी वर्षे इतके आशयघन, अर्थपूर्ण काम करूनही त्‍यांची त्या मानाने दखल घेतली गेली नाही याचे किंचितसे शल्य ड़ॉक्टरांना आहे. त्यांना समीक्षकांनी बालनाट्यात आशयाच्या दृष्टीने कधी पाहिले नाही असाही सल आहे. त्यांचे वाचन चांगले असल्याने मराठीतले निवडक साहित्य त्यांतल्या नाट्याच्या शक्यतांसह त्यांना खुणावत असते.

राजेंद्र चव्हाण हे नाव इतकी वर्षे काम केल्यावरही मुंबई-पुण्याच्या अभिजनांना अपरिचित आहे. ‘किती काळ मी स्वत:ला प्रूव्ह करत राहायचे?’ अशी एक व्यथाही डॉक्टरांना अस्वस्थ करते. अर्थात डॉक्टर अशा अस्वस्थतांनी फार काळ निराश होत नाहीत. ते आपली आनंदवाट ‘एकला चलो रे’ सारखे शिरगावची मुले, पालक, तिथले शिक्षक यांच्यासोबत पुन्हा चालू लागतात.  ते त्यांच्या यशात मुलांबरोबरच त्यांचे पालक आणि शिक्षक यांची समर्थ आणि समजुतदार साथ नसती तर एवढे काम त्यांच्या हातून झाले नसते हेही जाणतात.

डॉ. चव्हाणांचे रूपाली हॉस्पिटलडॉक्टर नोव्हेंबर-डिसेंबर असे दोनच महिने एकांकिका करतात. त्‍यानंतर वर्षांचे दहा महिने ते त्यांच्या वैद्यकीय सेवेत मग्न असतात. डॉक्टरांचे शिरगावला ‘रूपाली हॉस्पिटल’ आहे. रूपाली हे त्‍यांच्‍या मुलीचे नाव. हॉस्पिटलमध्‍ये सहा बेडची सोय आहे. तिथे कुठल्याही प्रकारच्या अनावश्यक वैद्यकीय चाचण्या, सलाईन्सचा वापर आदी केले जात नाही. त्यांनी व्यवसायात कसल्याही अपप्रवृत्तींचा शिरकाव जाणीवपूर्वक होऊ दिलेला नाही. ते कोळोशी इथल्या ‘नारायण आश्रम’ या सेवाभावी संस्थेबरोबर आजुबाजूच्या परिसरात ग्रामीण शिक्षणाचे व आरोग्याचे काम करतात. चॅरिटेबल डिस्‍पेन्‍सरी चालवणे, अंगणवाडी शिक्षकांसाठी शिबिरे घेणे, अपंगांना आवश्‍यक ती साधने मिळवून देणे, आरोग्‍यसेविकांना माहिती देणे, गुटखाविरोधी (याप्रमाणे विविध विषयांवर) चित्रांच्‍या स्‍पर्धा आयोजित करणे, विद्यार्थ्‍यांसाठी विविध क्षेत्रातील अभ्‍यासू व्‍यक्‍तींची व्‍याख्‍याने आयोजित करणे, मुलांच्‍या व्‍यक्तिमत्‍त्‍वाचा विकास होईल अशा पद्धतीने कॅम्‍प आयोजित करणे, पर्यावरणाची माहिती करून देणा-या सहली काढणे असे अनेक उपक्रम डॉ. चव्हाण राबवतात. अनेकदा, ते बचतगटांमध्‍ये जाऊन तिथे सिनेमा दाखवतात. सिनेमा पाहिल्‍यानंतर त्‍यावर बचतगटाच्‍या महिलांशी चर्चाही करतात. 1992 पासून ते शिरगावच्या मागासवर्गीय विद्यार्थिगृहाशी संलग्‍न आहेत. या वसतिगृहात पन्‍नास मुले आहेत. त्‍यांना मोफत औषधे पुरवणे, त्‍यांना अभ्‍यासात मदत करणे अशी कामे डॉक्‍टर करत असतात. त्‍यामुळे विद्यार्थ्‍यांना ते जवळचे वाटतात. मुले डॉ. चव्‍हाणांना ‘डॉक्‍टर काका’ अशी हाक मारतात. त्‍यामुळे विद्यार्थ्‍यांना येणा-या अडचणी ते डॉक्‍टरांकडे येऊन मनमोकळेपणाने बोलतात.

कविमित्राच्या ‘आवानओल’ या कवितासंग्रहातील कवितांची डॉक्टरांनी काढलेली रेखाटने

संगणकातील ‘पेंट’ हे साधे अॅप्लिकेशन वापरून डॉक्टरांनी काढलेले चित्र

डॉक्‍टरांचा नवनवीन गोष्‍टी शिकण्‍याकडे कल असतो. एकदा त्‍यांनी चक्‍क केस कसे कापावेत हेच शिकून घेतले आणि तेव्‍हापासून ते आपल्‍या मुलांचे केस घरीच कापू लागले. ब-याच वेळा ते वसतिगृहातील विद्यार्थ्‍यांचेही केस कापत असत. विद्यार्थी हॉस्पिटलमध्‍ये अभ्‍यासातील अडचणी सोडवण्‍यासाठी येत असत. काही विद्यार्थ्‍यांनी हॉस्पिटलला भेट दिली असता त्‍यांनी विचारले, ‘‘काय काम आहे रे?’’ विद्यार्थी म्‍हणाले, ‘‘डॉक्‍टरकाका, केस कापायचे आहेत!’’ असे काही गमतीदार अनुभवही डॉक्‍टरांना येत असतात. ‘वसंतराव आचरेकर प्रतिष्‍ठान’कडून 2012 च्‍या एप्रिल महिन्‍यात आयोजित करण्‍यात आलेले कला शिबिर डॉक्‍टरांकडून घेण्‍यात आले. ते संपल्‍यानंतर असा उपक्रम कायमस्‍वरूपी सुरू ठेवण्‍याची मागणी विद्यार्थी-पालकांकडून होऊ लागली आहे. डॉक्‍टरांनाही शिबिरातून आपल्‍याला अनेक गोष्‍टी शिकता येतील असे वाटले आणि ‘सृजनाच्‍या वाटा’ या शिबिराची सुरूवात झाली. प्रतिष्‍ठानच्‍या कणकवली येथील सभागृहात दर शनिवारी सायंकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत डॉक्‍टरांकडून हे शिबिर घेण्‍यात येते. या शिबिरात सध्‍या पस्‍तीस मुले सहभागी होतात. या शिबिरात मातीकामापासून अभिनय करणे, गाणी रचणे, त्‍यांना चाली लावणे, विषय देऊन त्‍यावर मुलांकडून लेखन करवून घेणे, चित्रे काढणे, नृत्‍ये करणे, मुलांशी गप्‍पा मारणे अशी धमाल-मस्‍ती सुरू असते.

डावीकडून डॉ. चव्हाण यांचे जावई राहुल, स्वतः डॉ. चव्हाण, पत्नी मालन, मुलगा अरूण, पाठीमागे मुलगी तृप्ती आणि मोठी मुलगी रूपालीडॉक्‍टरांच्‍या कुटुंबात एकूण पाच सदस्य. ते स्‍वतः, त्‍यांची पत्‍नी मालन. मालन वहिनींचे शिक्षण फारसे झालेले नसले तरी त्‍यांना शेती आणि बागकामांची फार आवड आहे. त्‍या डॉक्‍टरांच्‍या सगळ्या उपक्रमांमध्‍ये सहभागी असतात. डॉक्‍टरांची मोठी मुलगी रूपाली इन्‍फोसिस कंपनीत पाच वर्षे इंजिनीयर म्‍हणून कार्यरत होती. तिचे यजमानही इंजिनीयर आहेत. ती लग्‍नानंतर तिच्‍या तीन वर्षाच्‍या बाळासोबत रमली आहे. तिच्‍याहून लहान असलेल्‍या तृप्‍तीने जे. जे. स्‍कूल ऑफ आर्टस् मधून कमर्शिअल आर्टची पदवी मिळवली असून पुण्‍याच्‍या ‘एफ.टी.आय.आय.’मधून आर्ट डिरेक्‍शनचा तीन वर्षांचा अभ्‍यासक्रम पूर्ण केला आहे. ती सध्‍या एका हिंदी चित्रपटावर, तसेच सुनिल सुकथनकर/ सुमित्रा भावे यांच्‍या आगामी ‘संहिता’ या चित्रपटावर असिस्‍टंट आर्ट डिरेक्‍टर म्‍हणून काम करत आहे. सर्वात लहान मुलगा अरूणने पुण्‍यात फर्ग्‍युसनमधून बायोटेकमध्‍ये बी.एस.सी., ‘टी.आय.एफ.आर’ मुंबईमधून एम.एस.सी. केले असून सध्‍या तो अमेरिकेतील ‘येल विद्यापीठा’त ‘उत्‍क्रांती आणि पर्यावरण’ या विभागात संशोधन करत आहे. डॉक्‍टर म्‍हणतात, की ‘माझी मुले खेडेगावात मराठी शाळेत शिकली. मात्र तरीही त्‍यांनी जी क्षेत्रे निवडली त्‍यात ती प्रगती करत आहेत.’ त्‍यामुळे केवळ इंग्रजी माध्‍यमातून शिक्षण घेण्‍याचा अट्टाहास योग्‍य नसल्‍याचे मत डॉक्‍टर मांडतात.

डॉक्‍टरांचा दिनक्रम व्यस्त असला तरी सायंकाळी सातनंतर त्‍यांच्‍याजवळ मोकळा वेळ असतो. मग ते मालन वहिनींबरोबर आजुबाजूच्या परिसरात फिरायला जातात, स्वत:चा ब्लॉग लिहितात, अजय कांडरसारख्या कविमित्राच्या ‘आवानओल’मधल्या कवितांची रेखाटने करतात, गाणी रचतात, त्यांना चाली लावतात आणि गणित हा आवडीचा विषय असल्याने दहावी-बारावीच्या गणिताच्या प्रश्नपत्रिकाही छंद म्हणून सोडवतात! हा माणूस रोजच्या जीवनात साधा आणि निगर्वी असतो. एका पिसाने मोर म्हणून मिरवणार्‍या जगात हा रंगीबेरंगी पिसार्‍यांचा मालक आपल्या जगण्यातला आनंद अतिशय साधेपणाने, समाधानाने घेत असतो आणि भोवतालच्यांना देत असतो.

डॉ. राजेंद्र चव्‍हाण,

मु.पो. शिरगाव, ता. देवगड,
जि. सिंधुदुर्ग पिनकोड – 416610
9767023593, 02364-236256
rajendra.chavan60@gmail.com
www.rajendrachavan60.blogspot.com
www.kavitetoon.blogspot.com

– प्रसाद घाणेकर

About Post Author

1 COMMENT

  1. मी शिरगाव ग्रामपंचायती मध्ये
    मी शिरगाव ग्रामपंचायतीमध्ये ग्रामविकास अधिकारी (1994 ते 2001) असताना देवगड पंचायत समितीच्‍या वतीने ओरोस येथील प्रदर्शनात शिरगावच्‍या ग्रामपंचायतीच्‍या वतीने शिरगाव हायस्कूलच्या मुलांना घेवून शोभायात्रेत दृश्‍य सादर करण्‍यात आले होते. आमचे त्‍या कलाकृतीने तेव्‍हा तालुक्याचे नेतृत्व केलेले होते. तेव्हाच्या सादरीकरणाला वाहवा मिळून तालुक्यात नाव झाले. खरोखरच, डाॅक्टरांची कामगिरी सुंदर, प्रेमळ, मनमिळाऊ, सरस, निर्गरवी, प्रबोधनपर आणि समाजप्रिय आहे. डाॅक्टर सरांची व माझी त्यावेळी खूप चांगली दोस्ती झाली होती. मला प्रमोशन मिळून मी ओरोस-मालवण येथे आल्यानंतर माझा आणि त्‍यांचा संपर्क नाही. त्यांच्‍या विषयीचा हा लेख खरोखरच खूप समर्पक व वास्तवपूर्ण आहे. मी या विचारांशी सहमत आहे. (9422379849).

Comments are closed.